अफगाणिस्तान : नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश. लोकसंख्या अंदाजे १,७५,००,००० (१९७१). क्षेत्रफळ ६,५०,००० चौ. किमी. उ. अक्षांश २९० ते ३८० ३५’ व पू. रेखांश ६०० ५०’ ते ७१० ५०’. ईशान्येकडील वाखानचा अरुंद पट्टा ७५० पू. रेखांशापर्यंत आहे. देशाच्या उत्तरेस रशिया, ईशान्येस चीन, पूर्वेस भारत व पाकिस्तान, दक्षिणेस पाकिस्तान व पश्चिमेस इराण हे देश आहेत. अफगाणिस्तानची पूर्वपश्चिम लांबी सु. १२४० किमी. व दक्षिणोत्तर लांबी सु. ५६० किमी. आहे.
भूवर्णन : हा देश पर्वतमय असून त्याची समुद्रसपाटीपासूनची सर्वसाधारण उंची १,२२० मी. आहे. येथील हिंदुकुशाची सुरुवात वाखानमधील छोटे पामीर येथून होते. ७,३०० मी. पासून उंचीने कमी होत होत हा पर्वत नैर्ऋकडे ९६० किमी. पर्यंत पसरत जातो. कोह-ई-बाबा (५,१५० मी.), बंद-ई-बायान (३,७४९ मी.), सफेद कोह (३,१७० मी.) व पारोपामिसस (३,५९६ मी.) ही त्याच्या रांगांची नावे होत. मध्यवर्ती डोंगराळ भागाला हजाराजात म्हणतात. तेथून भूभाग व नद्या ईशान्येशिवाय सर्व बाजूंनी उतरत जातात. देशाच्या दक्षिणेस दश्त-इ-मार्गो व रेगिस्तान आणि नैर्ऋत्येस खाश हे ओसाड प्रदेश आहेत.
हेलमंड ही येथील सर्वांत मोठी नदी. हजाराजातहून दक्षिणेकडे वाहत जाऊन तेथील रुक्ष प्रदेशाचे ती दश्त-इ-मार्गो व रेगिस्तान असे दोन भाग करते आणि नंतर पश्चिमेकडील सेस्तानमधील अंतर्गत खोलगट प्रदेशातील दलदलीकडे जाते. रेगिस्तानच्या उत्तरेकडील अनेक नद्यांचे पाणी घेऊन येणारी अर्घंदाब ही हेलमंडची प्रमुख उपनदी आहे. हजाराजातहून खाश रूद व फरह रूद या नद्या नैर्ऋत्येकडे, हरी रूद पश्चिमेकडे, मुर्घाब वायव्येकडे, कुंडुझ उत्तरेकडे, कोकचा ईशान्येकडे व काबूल नदी पूर्वेकडे वाहते. लोगर, पंजशीर व कुनार या काबूलच्या उपनद्या होत. काबूलप्रमाणेच कुर्रम, टोची, गुमल याही पूर्वेकडे वाहत जाऊन पाकिस्तानात सिंधूला मिळतात. त्यांनी तयार केलेल्या खैबर, कुर्रम, टोची व गुमल या खिंडींतून पाकिस्तानात उतरता येते. मध्य आशियातील अमुदर्याच्या उगमाकडील काही प्रवाह अफगाणिस्तानातून येतात. हिचा ५६० किमी. चा भाग व तिच्या उगमाकडील प्रवाह असलेल्या पांज व पामीर या उपनद्या रशिया व अफगाणिस्तान या देशांमधील सरहद्दीवरच आहेत. अफगाणिस्तानच्या पश्चिम सरहद्दीवर नमकसार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आग्नेयीस सेस्तान किंवा हामून-इ-हेलमंड व गौड-इ-झीरे ही सरोवरे आहेत. हजाराजातमध्ये दश्त-इ-नाबर व आब-इ-इस्ताद ही सरोवरे आहेत.
दीर्घ व कडक उन्हाळा आणि अतिशीत हिवाळा हे येथील हवामानाचे खास वैशिष्ट्य. रात्रीच्या व दिवसाच्या तपमानात बराच फरक असतो. उन्हाळ्यात सेस्तान व उत्तरेकडील अमुदर्या नदीच्या सखल (४५० मी.) प्रदेशात पारा ५३.३० से. इतका चढतो. त्यातच ताशी २०० किमी. वेगाने वाहणाऱ्या धुळीच्या वादळाने उन्हाळा असह्य होतो. उंच पठारावर असल्याने काबूल-जलालाबाद भागाचे तपमान मात्र ३२० से. पेक्षा क्वचितच वर जाते. हिवाळ्यात काही ठिकाणी पारा -१८० से. पर्यंत तर हिंदुकुशाच्या भागात तो -२६० से. इतका उतरतो. उत्तरेकडून व पश्चिमेकडून झोंबणारे थंड वारे वाहतात. १,५५० मी. पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात हिमवृष्टी होते. ९३० ते १,२४० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात हिवाळा सुखकारक असतो. पाऊस मुख्यत: हिवाळ्यात व वसंत ऋतूत येतो. मध्यवर्ती उंच भागात तो २५ ते ३० सेंमी., बराचसा हिमरूपाने, तर दक्षिणेकडील वैराण प्रदेशात ५ सेंमी. पर्यंत पडतो.
येथील जमीन निरनिराळ्या प्रकारची आहे. पर्वतमय प्रदेशातील दऱ्याखोऱ्यांमधील रेताडचिकणमातीची, पूर्वेकडील काळीभोर, हिंदुकुशाच्या दक्षिणेकडील क्षारयुक्त व उत्तरेकडील मुख्यत: रेताड व लुकण मातीची आहे.
येथे खनिज संपत्ती विपुल व विविध प्रकारची आहे. परंतु भौगोलिक अलगपणा, दळणवळणाची अपुरी साधने, निर्यातीची कमी शक्यता व औद्योगिक मागासलेपणा यांमुळे केवळ स्थानिक गरजेपुरताच हिचा वापर केला जात आहे. शिसे, लोखंड, तांबे, क्रोमियम, जस्त या धातूंच्या खनिजांचे व सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोरेट, बेरिलियम, क्रोमाइट, गंधक, अभ्रक, ॲस्बेस्टस, भांड्यांची माती व संगमरवर यांचे साठे हिंदुकुशाच्या उत्तरेला, काबूलनजीक आणि कंदाहारच्या उत्तरेला असल्याचे आढळले आहे. बामियानच्या उत्तरेला हिंदुकुशामध्ये कारकर व इशपुश्त या ठिकाणी दगडी कोळशांच्या खाणी आहेत. दार-इ-सुफ येथे कोळशाचे विपुल साठे आहेत परंतु तेथे अद्यापि उत्पादन होत नाही. तालिकन येथील सैंधवाच्या खाणींतून व निरनिराळ्या ठिकाणच्या खाऱ्या पाण्याच्या झऱ्यांपासून मिठाचे उत्पादन होते. अफगाणिस्तानमध्ये पेट्रोलियमचे भरपूर साठे दिसून आले आहेत. मझर-इ-शरीफ प्रांतातील सार-इ-पूल येथे तेलाच्या दोन विहिरी सापडल्या आहेत. अमुदर्या नदीच्या गाळात सोने सापडते कंदाहार प्रांतात सोने आणि हजाराजात व पंजशिर भागात चांदीचे साठे सापडले आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या ते किफायतशीर नाहीत. बदखशान प्रांतात नीलमणी पुरातन काळापासून काढले जातात.
उंचीप्रमाणे मैदानी प्रदेशातील स्टेप्स प्रकारच्या गवतापासून उंच पर्वतीय भागातील अल्पाईन कुरणांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे गवत आढळते. देवदार, चीड, स्प्रूस, पाईन, ज्युनिपर, यू, हॅझल, अक्रोड, बदाम, पिस्ता, ऑलिव्ह, तुती, गूजबेरी, जर्दाळू, विलो, पॉप्लर, ॲश ही झाडे आढळतात. अनेक प्रकारचे गुलाब, रंगीबेरंगी फुलांच्या वेली, तसेच लिंबू, द्राक्षे इत्यादींमुळे प्रदेश शोभिवंत दिसतो. सतापा, मंजिष्ठ इ. औषधी वनस्पतीही होतात. रुक्ष भागात अकेशिया, बोरी, बाभळी, तसेच हिंग देणारी झाडे आढळतात. भूछत्र व तत्सम वनस्पती खाण्या-साठीही वापरतात. अरण्ये फक्त पूर्वेकडील नुरिस्तानमध्ये व सफेदकोहच्या भागात आहेत.
लांडगा, कोल्हा, तरस, रानटी कुत्रा, रानमांजर, चित्ता, रानमेंढी, रानबोकड, मुंगुस, चिचुंद्री, जर्बोआ, अनेक प्रकारचे ससे इ. प्राणी येथे आहेत. अरण्यात अस्वल व अमुदर्याच्या भागात मंगोलियन वाघही आहेत. महोका, हंस, बदक, काणुक, पाणकोळी, कुनाल, तितर, हळदी, मॅगपाय, बुलबुल, लावा, भांडक, चिमणी इ. पक्षी आढळतात. मासे विशेष महत्त्वाचे नाहीत तथापि माहसीर, ट्राउट इ. प्रकार आढळतात.
दिवाकर, प्र. वि.
इतिहास: इ.स.पू. ४००० च्या सुमारास हिंदुकुशाच्या उत्तरेस शेतकऱ्यांची वस्ती होती असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे मत आहे. इ.स.पू. २००० च्या सुमारास आर्यांच्या एका शाखेने बाल्ख येथे वस्ती केली व दुसऱ्या शाखा इराण व सिंधू खोऱ्याकडे गेल्या. वैदिक वाङ्मयात अफगाणिस्तानबाबत बरेच उल्लेख आढळतात.ऋग्वेदात ‘पक्थ’ या जमातीचा जो निर्देश आहे तो पठाणांचा असावा. या देशास ‘कापिषी’ व तेथे होणाऱ्या मद्यास ‘कापिषायनी’ असे पाणिनीने म्हटले आहे. काबूलच्या उत्तरेस ८० किमी. वर असलेले वेग्राम हेच प्राचीन कापिषी नगर असावे, असे तेथील शिलालेखावरून दिसते. प्राचीन ग्रीक व रोमन भूगोलवेत्ते यास‘कापिसेन’ म्हणत. ह्युएनत्संग हा यास किआ-पिशे नाव देतो. ग्रीक भूगोलवेत्ता स्ट्रेबो अफगाणिस्तानला‘अरियाना’ असे म्हणतो.
इ.स.पू. सहाव्या शतकाच्या मध्यात दक्षिण इराणमधील अकॅमेनिडी साम्राज्याचा हा भाग असावा, असे तेथे मिळालेल्या नाण्यांवरून दिसते. अलेक्झांडरने इ.स.पू. ३२८च्या सुमारास अकॅमेनिडींना या प्रदेशातून हाकलून तेथे ग्रीक सत्ता स्थापन केली. अलेक्झांडरनंतर सेल्यूकस निकेटर या भागाचा (त्या वेळच्या बॅक्ट्रियाचा) सत्ताधीश झाला. चंद्रगुप्त मौर्याने निकेटरचा पराभव केल्यानंतर निकेटरने त्यास हिंदुकुशाचा पूर्व व दक्षिण भाग दिला. इ.स.पू. १३० ते १२५ या काळात पार्थियन व युए-ची टोळ्यांनी बॅक्ट्रियन-ग्रीकांचा पराभव केला. युए-ची टोळ्यांतील कुशाणांनी बाल्खमध्ये आपले वर्चस्व स्थापन केले. यांच्या वंशजांपैकी काडफिसेस व नंतर कनिष्क यांनी हिंदुकुश पर्वताच्या पूर्वेस काबूल-कंदाहार येथे राज्य स्थापिले. कनिष्काने तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला बामियानजवळ बुद्धाच्या मूर्ती, कंदाहार, शैलीचे शिल्प व अशोकाचे शिलालेख आढळतात. कनिष्कानंतर हे साम्राज्य नष्ट झाले. हूणांनी हल्ले करून तेथे छोटी छोटी राज्ये स्थापिली. सातव्या शतकापासून येथे अरबांनी स्वाऱ्या करून इस्लामीकरणाची मोहीम सुरू केली. परंतु काबूल येथे दहाव्या शतकापर्यंत हिंदू राजे राज्य करीत असल्याचा उल्लेख मिळतो. अलप्तगीन याने ९६३ मध्ये गझनी येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्याच्या मागून आलेल्या सबक्तगीनने काबूलचे हिंदू राज्य जिंकल्याचा अल्-बीरूनी उल्लेख करतो. त्याच्यामागून आलेल्या गझनीच्या महंमदाने १००१ मध्ये पंजाबचा राजा जयपाल याचा पराभव केला. जयपाल याची सत्ता त्या वेळेस हिंदुकुशापासून गझनीपर्यंत होती. महंमदाने भारतावर स्वाऱ्या करून अमाप संपत्ती लुटली. गझनीचे प्राबल्य कमी होण्याच्या सुमारास घोर येथे बाराव्या शतकात सेल्जुक तुर्कांची एक सत्ता निर्माण झाली. घोरचा महंमद यानेही हिंदुस्थानात स्वाऱ्या करून अमाप लूट मिळविली. १२१९ मध्ये चंगीझखानाने ही राज्ये नष्ट केली व अफगाणिस्तानातील अनेक शहरे उद्ध्वस्त केली. चंगीझखानानंतर अफगाणिस्तानचा बराचसा प्रदेश त्याच्या वंशजांकडे असला तरी तेथे काही स्वतंत्र व काही मांडलिक सत्ता होत्या. १३८० मध्ये तैमूरलंगनेही स्वारी करून अफगाणिस्तान आपल्या अंमलाखाली आणला. त्याच्यानंतर त्याचा चौथा मुलगा शहारूख (१४०५–४७) याच्याकडे अफगाणिस्तान होता. त्याची राजधानी हेरात होती. अनेक कवी, विद्वान, संगीतज्ञ, शिल्पकार त्याच्या आश्रयास होते. यानेच हेरात शहराचे सांस्कृतिक महत्त्व वाढविले. उझबेकचा मुंहमदखान शैबानी याने १५०७ मध्ये तैमुरांचा पराभव केला. तैमूरच्या वंशजांपैकी बाबर याने मध्य अफगाणिस्तानात १५०४ मध्ये सत्ता स्थापन करून काबूल येथे राजधानी वसविली होती. त्याने इराणच्या शहा इस्माइलला साह्य करून शैबानीचा पराभव केला. बाबरने १५२२ मध्ये कंदाहार जिंकले व त्यानंतर त्याने आपली राजधानी दिल्लीला हलविल्यावर अफगाणिस्तान मोगल साम्राज्याचा एक प्रांत बनला. पुढे दोनशे वर्षे अफगाणिस्तानला स्वतंत्र राजकीय अस्तित्व नव्हते. या काळात अफगाणिस्तानातील हिंदुकुशाचा पूर्व भाग हिंदुस्थानातील मोगलांच्या ताब्यात होता तर हेरात व सेस्तानचा भाग इराणच्या सफाविद घराण्याच्या ताब्यात होता. कंदाहारसंबंधी दोन्ही सत्तांमध्ये वाद चालू होता. सतराव्या शतकाच्या मध्यात सफाविदांनी कंदाहार व हेरात जिंकून घेतले.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून अफगाणिस्तानात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. १७०९ मध्ये होटाकी घिलझई टोळीचा पुढारी मीरवैयखान याने कंदाहारच्या इराणी सुभेदाराविरुद्ध शस्त्र उचलले. त्याने १७१५ मध्ये कंदाहार जिंकले. १७१६ मध्ये हेरातच्या अब्दाली टोळ्यांनी इराणविरुद्ध बंड केले. १७२२ मध्ये मीरवैयखानाचा मुलगा मुहमद याने इराणमधील इस्फाहानवर स्वारी केली. इराणच्या प्रसिद्ध नादिरशहाने अफगाणांचा पराभव करून १७३७ मध्ये कंदाहार व काबूलवर सत्ता स्थापन केली. त्याच्यानंतर अफगाण सरदारांनी अहमदशाह अब्दालीस कंदाहारचा अधिपती बनविले. याने अफगाणिस्तानला परकीय सत्तेतून मुक्त केले व सध्याचा अफगाणिस्तान अस्तित्वात आणला. याने हिंदुस्थानवर अनेक स्वाऱ्या केल्या. १७६१च्या स्वारीत त्याने ⇨पानिपत येथे मराठ्यांचा पराभव केला. त्याच्यानंतर गादीवर आलेल्या तिमुरशहाच्या मुलांत यादवी सुरू झाली ती १८२६ मध्ये दोस्त महंमद अमीर झाला आणि संपली.
एकोणिसाव्या शतकात रशिया व ग्रेट ब्रिटन यांच्यात अफगाणिस्तानवर ताबा ठेवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. रशियापासून हिंदुस्थानचे संरक्षण करण्यासाठी इंग्रजांना अफगाणिस्तान ताब्यात ठेवावयाचा होता. या स्पर्धेतून इंग्रज-अफगाण यांच्यात तीन युद्धे झाली. १८३९च्या पहिल्या युद्धात ब्रिटिश सेना काबूलपर्यंत गेली. परंतु अफगाणांनी इंग्रजांची कत्तल केल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. १८७८ मध्ये अफगाणिस्तानचा शेरअली ब्रिटिशांची सत्ता जुमानीनासा झाला म्हणून इंग्रज सैन्य काबूलला गेले. परंतु याही वेळेस कत्तल झाल्याने इंग्रजांना परतावे लागले. १८८० मध्ये इंग्रजांनी अब्दुर रहमानचे अमीरपद मान्य केले परंतु अफगाणिस्तानचे परराष्ट्रीय संबंध नियंत्रित करण्याचा अधिकार आपल्याकडे ठेवला. अब्दुर रहमानने अफगाणिस्तानात एकसूत्री कारभार चालू केला. याच्याच कारकीर्दीत १८९३ मध्ये सर मॉर्टिमर ड्युरँड याने अफगाणिस्तान व ब्रिटिश हिंदुस्थान यांच्या सरहद्दी [→ ड्युरँड रेषा] निश्चित केल्या. यानंतर हबीबुल्ला, ⇨ अमानुल्ला, मुहंमद नादिरशहा हे अमीर झाले. अमानुल्ला गादीवर आल्याबरोबर त्याने अफगाणिस्तानचे स्वतंत्र राज्य जाहीर केले आणि ब्रिटिशांवर हल्ला केला (१९१९). हेच इंग्रज-अफगाण तिसरे युद्ध समजले जाते. हे युद्ध थोड्या अवधीत थंडावले परंतु ब्रिटिशांनी पडते घेऊन अफगाणिस्तानचे संपूर्ण स्वातंत्र्य मान्य केले[→ इंग्रज-अफगाण युद्धे]. अमानुल्लाने अनेक सामाजिक सुधारणा केल्या. त्यांपैकी ‘पडदा’ पद्धत बंद करणे, स्त्रीशिक्षण इ. सुधारणा महत्त्वाच्या होत्या. याने अफगाणिस्तानमध्ये संविधानात्मक सुधारणा घडविल्या. यानंतर गादीवर आलेल्या नादिरशहाच्या कारकीर्दीत अफगाणिस्तानचे संविधान तयार झाले पण लवकरच त्याचा खून झाला. त्याचा पुतण्या मुहमंद झहीरशहा १९३३ मध्ये गादीवर आला. १९७३ जुलैपर्यंत तोच अमीर होता. याच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या देशहिताच्या गोष्टी झाल्या. १८ जुलै १९७३ मध्ये देशात रक्तहीन क्रांती होऊन राजेशाही नष्ट करण्यात आली. देशाचा पहिला अध्यक्ष म्हणून सरदार मुहंमद दाऊदखान याने सत्ता हाती घेतली.
दुसऱ्या महायुद्धात अफगाणिस्तानने तटस्थता पतकरली. १९४६ मध्ये अफगाणिस्तान संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला व त्याला आंतरराष्ट्रीय मदतीचा फायदा मिळू लागला. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पुश्तू बोलणाऱ्या पठाणांचा एक सलग प्रांत असावा म्हणून अफगाणिस्तानने पख्तुनिस्तानची मागणी केली. त्यामुळे अफगाणिस्तान व पाकिस्तान यांचे संबंध बिघडले. याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला. तेव्हा इराणच्या शहाने मध्यस्थी करून त्यांचे संबंध सुधारले (१९६३-६४). भारताशी मात्र अफगाणिस्तानचे संबंध मित्रत्वाचे आहेत.
राजकीय स्थिती : साम्यवादी व लोकशाही राष्ट्रांतील शीत-युद्धात अफगाणिस्तानने तटस्थतेचे धोरण स्वीकारल्यामुळे आणि भौगोलिक दृष्ट्या रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, इराण या देशांच्या सीमा अफगाणिस्तानला संलग्न असल्याने त्या देशाला मध्यगत राष्ट्राचे व महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. १९१९ पर्यंत या देशात राजाची अनियंत्रित सत्ता होती. १९२३ मध्ये अमानुल्लाखानाने सुरू केलेल्या मर्यादित लोकशाही शासनात नादिरशहाने १९३० मध्ये सुधारणा करून द्विसदनीय विधिमंडळाची सुरुवात केली. दि. ३१–१०–१९३१ रोजी प्रसिद्ध झालेले संविधानच अफगाणिस्तानचे कायदेशीर संविधान मानले जाते. १९६४ मध्ये संविधानात काही फेरबदल करण्यात आले. राजा हाच संविधानीय प्रमुख असून तो कार्यकारी मंडळ, विधानमंडळ व न्यायशाखा यांचाही प्रमुख असतो. राजा सुन्नी हनाफी पंथाचा असावा लागतो. तोच पंतप्रधानाची नेमणूक करतो. पंतप्रधान राजाच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ बनवितो. पंतप्रधान स्वत: राजीनामा देईपर्यंत किंवा राजा त्याला पदच्युत करीपर्यंत मंत्रिमंडळ अस्तित्वात असते. मंत्रिमंडळातील सभासद राजाच्या इच्छेनुसार केव्हाही बदलता येतात. सामान्यपणे मंत्रिमंडळात व इतर सत्तास्थानांवर राजघराण्यांतील लोकांची नेमणूक केली जात असे नवीन संविधानसुधारणांनुसार ही तरतूद आता नाही. संसदेत ‘मजलिस-इ-अयान’ (राज्यसभा) व ‘मजलिस शुरा-इ-मिली’ (लोकसभा) यांचा समावेश असतो. मजलिस-इ-अयानमधील सभासदांची संख्या बदलती असून सभासदांची नेमणूक राजा करतो. मजलिस शुरा-इ-मिलीमध्ये २१५ सभासद असून त्यांची निवड दर चार वर्षांनी प्रौढ स्त्रीपुरुषांच्या गुप्त मतदानाने होते. या देशात राजकीय पक्ष नव्हते. लोकांना राजकीय पक्ष स्थापन करणे, मुद्रणस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य इ. अधिकार नवीन सुधारणांनुसार दिले गेले. संविधानाव्यतिरिक्त ‘लोया जिर्गा’ या राष्ट्रीय संस्थेला कार्यकारी व विधिमंडळाच्या बाबतीत महत्त्वाचे स्थान आहे. ही संस्था तेथील ‘पुश्तुन जिर्गा’ या निरनिराळ्या जमातींच्या पंचायत मंडळाची मोठी शाखा आहे. यामध्ये संसदेचे काही सभासद व प्रांतीय परिषदांचे अध्यक्ष यांचाही समावेश असतो. राष्ट्राच्या आणीबाणीच्या प्रसंगी आणि महत्त्वाच्या प्रश्नांबाबत निरनिराळ्या जातीजमातींचे नेते काबूलला जाऊन संसदेच्या सभासदांचे मत ऐकून घेतात व नंतर त्यावर लोया जिर्गा आपला निर्णय देते. राजाने संसद बरखास्त केली तरी नवीन संसद बोलाविली जाईपर्यंत लोया जिर्गा संस्थेच्या सभासदांचे स्थान कायम असते. लोया जिर्ग्याची मान्यता असल्याशिवाय राजाला पदत्याग करता येत नाही. द्विसदनी संसदेला कायदे करणे, तहाला अनुमती देणे, सैन्य रवाना करणे, विधेयके सुचविणे, अर्थसंकल्पाला मान्यता देणे हे अधिकार आहेत.
१९६३-६४ पासून अफगाणिस्तानात काबूल, हेरात, कटाघान, मझर-इ-शरीफ, कंदाहार, नानगरहर, पाकटिया असे सात प्रमुख व बदखशान, फराह, गझनी, गिरीष्क, मैमान, पाखान, शिबरघान वगैरे एकोणतीस छोटे प्रांत आहेत. प्रांतीय सरकारांच्या राज्यपालांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राजा करतो राज्यपालाकडील कर्मचाऱ्यांचे मुख्यालय काबूल येथे ठेवलेले आहे. प्रत्येक प्रांतात स्वतंत्र परिषद असून त्यातील सभासदांची निवड प्रत्यक्ष व गुप्तमतदान-पद्धतीने केली जाते. गृहखात्याकडून येणाऱ्या सूचनांचे राज्यपालांना पालन करावे लागते. दहा हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या शहरांवर महापौर व निवडून दिलेले नगरपालिका-मंडळ कारभार करते. नागरी विभागात पोलीस कर्मचारी व सरहद्द-विभागात संरक्षण-पोलीस-दल संरक्षणाचे कार्य करतात. निरनिराळ्या भटक्या जमातींच्या विभागासाठी खास आयुक्त नेमलेले असतात. स्थानिक पुढाऱ्यांमार्फत या जमातींशी संबंध ठेवला जातो. करवसुली, आवश्यक त्या वेळी फौजफाटा उभारणे इ. कामे आयुक्ताला करावी लागतात.
न्यायशाखा स्वतंत्र असून तीत सर्वोच्च न्यायालय व इतर न्यायालयांचा समावेश असतो. न्यायपद्धती ही शरीयत या मुस्लिम कायद्यावर आधारित आहे. याशिवाय येथे वाणिज्य-संहितेसारखे लेखी कायदे असून न्याय देताना धार्मिक व नागरी कायद्यांचाही विचार केला जातो. मुख्य न्यायमूर्तींच्या शिफारशीनुसार राजाच न्यायाधिशांची नेमणूक करीत असे. दिवाणी व फौजदारी असे कायद्याचे भेद नाहीत. काबूल येथे सर्वोच्च न्यायालय असून १९ उच्च न्यायालये, १७१ मुलकी न्यायालये आणि लष्करी न्यायमंडळेही आहेत. मूलभूत हक्कांवर गदा येत असल्यास उच्च न्यायालयाकडे फिर्याद करण्याची सोय आहे.
सैन्याचे विमानदळ व पायदळ असे दोनच विभाग आहेत. आरमार नाही. सैन्याची मुख्य कचेरी काबूल येथे आहे. गझनी, कंदाहार, हेरात, मझर-इ-शरीफ आणि जलालाबाद येथे पायदळाच्या विभागीय कचेऱ्या आहेत. सैन्याची संख्या सु. १,५०,००० असून त्याचे बारा विभाग आहेत (१९६४-६५). खास राजदल असून आणीबाणीच्या काळात निरनिराळ्या जमातींतून सु. ३ ते ४ लक्ष सशस्त्र दलेही उभारण्याची सोय आहे. १९५० नंतर रशियाने जेट विमाने व विमान-तंत्रज्ञ पुरविल्यापासून विमानदल सुसज्ज झाले आहे. छोटेसे विमानदल असून त्यात बहुतांशी रशियन बनावटीची विमाने आहेत. मझर-इ-शरीफ व वेग्राम येथे बाँबफेक्या जेट विमानांसाठी तळही बांधले आहेत. दुसरा असाच विमानतळ हेलमंड दरीत शिदंड येथे १९६३ मध्ये बांधण्यात आला. काबूल येथे सैनिकी शिक्षणाची अकादमी असून १९५७ मध्ये पायदळ व तोफखाना-शिक्षणाचे विद्यालयही सुरू झाले. १९५८ मध्ये हवाई शिक्षणाची अकादमी सुरू झाली. प्रत्येक धडधाकट अफगाणाला दोन वर्षे तरी सैन्यात नोकरी करावी लागते.
टिकेकर, श्री. रा.
आर्थिक स्थिती : औद्योगिक दृष्ट्या हा मागासलेलाच देश आहे. अन्नधान्ये, कापूस व लोकर ह्या बाबतींत मात्र अफगाणिस्तान स्वयंपूर्ण आहे. १९३२ पासून राष्ट्रविकासावर भर दिला गेला. ह्यात जलविद्युत्-योजना, कापडगिरण्या, साखरकारखाने आदी गोष्टींच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रमुख आयात-निर्यात मालाला योग्य किंमती मिळण्यासाठी शासनातर्फे खास यंत्रणा सुरू करण्यात आली. आर्थिक समतोल राखण्यासाठी राष्ट्रीय बँकेची स्थापना करून प्रमुख शहरांतून व परदेशांतही तिच्या शाखा काढण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर व प्रामुख्याने पाकिस्ताननिर्मितीनंतर देशाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला. १९५१ मध्ये अमेरिकेच्या मदतीने आर्थिक विकासाचा चार कलमी कार्यक्रम आखण्यात आला. नंतर रशिया व इतर पूर्वयूरोपीय देशांच्या सहकार्याने असे कार्यक्रम योजण्यात आले. पहिल्या (१९५६–६१) व दुसऱ्या (१९६१–६६) पंचवार्षिक योजनांत यांत्रिक शेती, धरणे, पाटबंधारे आदींकडे लक्ष केंद्रित केले गेले. १९६७ मध्ये तिसरी पंचवार्षिक योजना हाती घेतली होती.
एकूण जमिनीपैकी सु. १३% इतकीच जमीन शेतीखाली आहे. देशाचा दक्षिण आणि नैर्ऋत्य भाग वालुकामय आहे. पर्वतमय प्रदेशातील गवताळ भाग काही काळच गुरे चरण्यास उपयुक्त असतो. दऱ्याखोऱ्यांमध्ये अन्नधान्ये व वाटाणाघेवड्यांसारखी पिके होतात. पूर्वेकडील व दक्षिणेकडील मैदानी प्रदेश व हिंदुकुशाच्या उत्तरेकडील लोएसची मैदाने येथील जमीन सुपीक असून शेतीसाठी उत्कृष्ट आहे. पाटबंधाऱ्यांच्या व ‘कारेझ’ (जमिनीखालून पाणी नेण्याची पद्धत)च्या साहाय्यानेही शेती केली जाते. हल्ली शेतीसाठी पाणीपुरवठ्याचे आधुनिक तंत्र अवलंबिण्यात येत आहे. १९६० मध्ये काबूल नदीवर ‘नघलू’ धरण व दरूंता येथील धरण बांधण्यात येऊन शेतीला पाणी तसेच जलालाबादच्या औद्योगिक भागाला वीजही पुरविण्यात आली. हेलमंड व अर्घंदाब नद्यांवर दोन मोठी धरणे बांधून जलविद्युत् निर्माण करणे, व्यापार व उद्योग यांचा विकास करणे, जलसिंचन-क्षेत्र वाढविणे, भटक्या जमातींचे पुनर्वसन करणे, रस्तावाहतुकीत सुधारणा करणे अशी बहु-उद्देशीय योजना हाती घेण्यात आली आहे. हेलमंडवरील कजाकाई धरण ११० मी. उंच असून त्यापासून १,३०,००० किवॉ. वीज उत्पन्न होईल व १,४३,६६८ हे. जमिनीला पाणी मिळेल. अर्घंदाब या हेलमंडच्या उपनदीवरील धरण ७० मी. उंच असून त्यामुळे ७४,४६५ हे. जमिनीला पाणी मिळेल.
गहू हे मुख्य पीक असून तांदूळ, बार्ली, कापूस, बीट, ऊस, मका, ज्वारी, बाजरी, मसूर, तंबाखू, मोहरी इ. पिके काढली जातात. बटाटे, कांदे, मिरच्या, टोमॅटो, घेवडा, कोबी, गाजर, सलगम ह्या भाजीपाल्यांचेही उत्पादन केले जाते. फळांच्या उत्पादनाकरिता देश प्रसिद्ध असून काबूल व कंदाहार प्रांतांत मोठ्या प्रमाणावर फळबागा करतात. येथे उत्तम प्रतीची द्राक्षे, खरबूज, कलिंगड, जर्दाळू, अक्रोड, तुतू, डाळिंब, सफरचंद, केळी, अंजीर, संत्री, मोसंबी ही फळे होतात. ही फळे व ह्यांपासून बनविलेला सुका मेवा ही निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
डोंगराळ प्रदेश व त्यावरील गवत ह्यांमुळे अफगाणिस्तानात पशुपालन हा शेतीपेक्षा महत्त्वाचा व्यवसाय आहे. पशुधनावर करही घेतला जातो. मेंढ्या हे अफगाणिस्तानचे एक प्रमुख उत्पन्न असून त्यातील घिलझई मेंढ्या लोकरीसाठी, अरब मेंढ्या लोकर, मांस व लोणी यांसाठी व काराकुल मेंढ्या कातड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील तुर्कमेन जातीचे घोडे उत्कृष्ट दर्जाचे असतात. उंट व गाढव यांचा कष्टाच्या कामासाठी उपयोग केला जातो.
अफगाणिस्तानात कोळसा व खनिजतेल असून विजेचेही उत्पादन होऊ लागले आहे. कापड व सिमेंट ह्यांशिवाय इतर मोठ्या उद्योगधंद्यांची फारशी वाढ झालेली नाही. काबूलपासून ९७ किमी. वरील गुलबहार येथे देशातील मोठी कापडगिरणी आहे जबल-अस-सिराज व पुल-ई-खुमरी येथे सिमेंट कारखाने, कंदाहार येथे फळांचे पदार्थ करण्याचे व ते डबाबंद करण्याचे कारखाने, बाघलान येथे बीट-साखरेचा कारखाना, काबूल व कंदाहार येथे लोकरी कापडाच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या आहेत. येथे लाकडावर उत्कृष्ट नक्षीकाम केले जाते. काबूल येथे टाकसाळ असून दारूगोळा, शस्त्रे, कातडी सामान, कापड यांचे कारखाने आहेत. कुंडुझला कापूस पिंजणे, वनस्पती, साबण हे उद्योग आहेत. आगपेट्या, कातडी पादत्राणे, फर्निचर यांच्या उत्पादनास स्वीडन व फ्रान्स यांची मदत मिळविली आहे. काबूल, कंदाहार, हेरात, मझर-इ-शरीफ व जलालाबाद ही प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. गझनी, गार्देझ, मैमान, कुंडुझ, अंदखुई, फैजाबाद ही इतर केंद्रे आहेत.
पूर्वी अफगाणिस्तानची पुष्कळशी निर्यात अखंड भारतातून होई. पाकिस्ताननिर्मितीनंतर तिच्यात बरीच घट झाली. मेंढ्यांची कातडी अमेरिकेला रवाना होतात. दीड ते अडीच लक्ष काराकुल मेंढ्यांच्या कातड्यांची निर्यात दर वर्षी होते. अफगाणी लोकरीच्या बदल्यात रशियाकडून गॅसोलिन मिळते. लोकर, कापूस, ताजी व सुकी फळे, अक्रोड, बदाम, कातडी, कमावलेली कातडी, कातडी कोट, गालिचे, हिंग, लाकूड ह्यांचीही निर्यात होते. कापड, चहा, साखर, पेट्रोलियम-पदार्थ, यंत्रे, मोटारी, लोखंडी सामान, रबराच्या वस्तू यांची आयात करतात.
१९६९-७० मध्ये ६१८ कोटी अफगाणी किंमतीची निर्यात झाली. त्यात ३८ टक्के रशियाला, १६ टक्के इंग्लंडला, ६ टक्के स्वित्झर्लंडला, ७ टक्के पाकिस्तानला व १९ टक्के भारताला झाली. एकूण आयात ९४१ कोटी अफगाणी किंमतीची झाली. त्यात रशियातून ३३ टक्के, अमेरिकेतून ६ टक्के, भारतातून ९ टक्के, चीनमधून ८ टक्के, प. जर्मनीतून ६ टक्के व जपानमधून १२ टक्के झाली. महत्त्वाचे निर्यात-पदार्थ कवचीची व इतर फळे ३५%, काराकुल कोकरांची कातडी १६%, लोकर ८%, कापूस ७% व गालिचे ८% होते.
‘अफगाणी’ हे चलनी नाणे असून ४५ अफगाणी = १ डॉलर, १०८ अफगाणी = १ पौंड असा त्याचा ठरलेला विनिमयदर आहे. डिसेंबर १९७३ मध्ये बाजारात १ डॉलरला ८५ अफगाणी व पौंडाला २०० अफगाणी असा चालू दर होता. १९७०-७१च्या अर्थसंकल्पात अंदाजे उत्पन्न ६,२६,९०,००,००० अफगाणी व खर्च ८,१७,५०,००,००० अफगाणी होता.
अफगाणिस्तानात लोहमार्ग नाहीत. वाहतुकीला उपयोगी नद्याही जवळजवळ नाहीतच. देशातील प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडलेली आहेत. काबूलमार्गे खैबरखिंडीतून पाकिस्तानपर्यंत सडक आहे. गझनीपासून गुमल व कुर्रम खिंडीतून जुने व्यापारी मार्ग जातात. हेरातहून इराणला इस्लामक्वालाद्वारा रस्ता जातो. रशियात अमुदर्यातून तेरमेझपर्यंत जलमार्गाने आणि हेरातपासून सडकेने कुश्क ह्या रेल्वेस्थानकाला जाता येते. देशातील प्रमुख ठिकाणांहून काबूलला जोडणारे रस्ते आहेत. १९६४ मध्ये हिंदुकुशाच्या सालंग खिंडीखाली मोठा बोगदा खणण्यात आल्याने काबूल ते मझर-इ-शरीफ अंतर १९३ किमी.ने कमी झाले. हल्ली पुष्कळसे रस्ते डांबरी केलेले असले, तरीही बर्फवृष्टीने अथवा पुरामुळे काही ठिकाणची वाहतूक बंद होते. नियमित बसवाहतूक असूनही उंट, गाढव इ. प्राण्यांचाही वाहतुकीसाठी वापर केला जातो. १९६५ मध्ये देशात सु. ६,७०० किमी. लांबीचे, मोटारींना योग्य असे रस्ते होते. १९६९ मध्ये प्रवासी वाहतुकीच्या मोटारगाड्या ३०,८०० व व्यापारी ट्रक १८,२०० होते. १९५५ मध्ये ‘अरियाना अफगाण’ विमान-कंपनीची (पॅन अमेरिकनचे ४९% भांडवल घेऊन) स्थापना झाली. देशातील प्रमुख शहरांशी व परदेशांशी तिची नियमित वाहतूक चालू असते. १९६० मध्ये कंदाहारला आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येऊन काबूलचा आंतरराष्ट्रीय विमानतळ मोठा करण्यात आला. देशातील प्रमुख शहरे व मोठी गावे दूरध्वनी व तारायंत्रांनी जोडलेली आहेत. रेडिओ-तारायंत्राद्वारे भारत, रशिया, अमेरिका व पाकिस्तान ही राष्ट्रे जोडलेली आहेत. हवाई टपालवाहतुकीचीही जलद प्रगती होत आहे. काबूलमध्ये नभोवाणी-केंद्र व कंदाहार, हेरात आणि मझर-इ-शरीफ येथे उपकेंद्रे आहेत. १९७२ मध्ये देशात २०,९६० दूरध्वनी व ७,००,००० रेडिओ होते.
लोक व समाजजीवन : देशातील १७ टक्के वालुकामय व ३२ टक्के दुर्गम, पर्वतमय, लोकवस्तीला निरुपयोगी प्रदेश सोडल्यास उरलेल्या भागात लोकवस्तीचे प्रमाण दर चौ. किमी.ला ४३·४६ एवढे पडते. येथील लोकांना ‘अफगाण’ म्हणतात. लोक धाडसी, लढवय्ये, स्वतंत्र वृत्तीचे, उमद्या स्वभावाचे व आतिथ्यशील आहेत. संकटात सापडलेल्या शत्रूलाही ते मित्र समजतात व प्रसंगी त्याच्यासाठी प्राण द्यावयासही मागेपुढे पाहत नाहीत. ४,००० वर्षांपूर्वी मध्य आशियातून आर्यांनी येथे वसाहती केल्या असाव्यात. तदनंतरच्या काळात सिथियन, पार्थियन, यूएची, हूण, तुर्क, मोंगल इ. वंशाचे लोक येथे आले. ह्यामुळे भिन्नवंशीय लोकांचा भरणा येथे आढळतो.
पांडुवर्ण, लांबट डोके, काळे केस व डोळे, मोठे बाकदार नाक अशा वर्णनाचे पुश्तू, पख्तुनी वा पठाण हे मूळचे अफगाण समजले जातात. एकंदर लोकसंख्येत ह्यांचे प्रमाण ६० टक्के असून दुर्रानी, घिलझई, मोहमंद व शिन्वारा हे यांचे प्रमुख गट आहेत. दुर्रानी सध्या राजसत्तेवर आहेत. गोल डोक्याचे, सरळ नाकाचे, फिक्कट वर्णाचे इराणी-अरबी ताझिक ३१% आहेत. उझबेक पाच टक्के असून मोंगलवंशीय, हजारा व चहार ऐमाक तीन टक्के आहेत. यांशिवाय येथे काफर म्हणून ओळखले जाणारे फिकटवर्णीय नुरी, तसेच किरगीझ, बलुची, ब्राह्मनी, हिंदू व ज्यू लोकही राहतात. पठाण प्रामुख्याने पूर्व व आग्नेय भागात तसेच हेरात व सेस्तानमध्ये राहतात ताझिक मुख्यत: हेरात व काबूल भागात, उझबेक मध्य व उत्तर भागात, हजारा हे हजाराजातच्या पठारी भागात व नुरी ईशान्य भागात राहतात.
देशात सु. २० भाषा बोलल्या जातात. पुश्तू व फार्सी भाषांत राज्यकारभार चालतो. या दोन भाषा बोलणारे लोक ७५% आहेत. पठाणांची भाषा पुश्तू, ताझिकांची फार्सीमिश्र ताझिकी, उझबेकांची तुर्कीवरून आलेली उझबेकी व हजारांची फार्सी-तुर्की-मिश्र भाषा आहे नुरी दार्दिक भाषा बोलतात. यांशिवाय येथे किरगीझ, तुर्कमेनी, बलुची इ. भाषा बोलल्या जातात.
९९ टक्के लोक इस्लामधर्मीय असून त्यांतील ८० टक्के सुन्नी आहेत. मोगलवंशीय हजारा व इतर काही शिया पंथाचे आहेत व काही इस्माइली पंथाचे आहेत. नुरी या मूळच्या काफीर लोकांना १९व्या शतकाअखेर मुसलमान करण्यात आले. उंच लाकडी घरे, मृतांच्या लाकडी मूर्ती, गुलामांची पद्धत व धर्मविधीचे एक अंग म्हणून मेजवानी ही वैशिष्ट्ये नुरींमध्ये दिसतात. हे अगदी मूळचे लोक असावेत. मुस्लिमेतर एक टक्क्याहून कमी आहेत. मुल्ला- -मौलवींचा प्रभाव सर्वत्र दिसतो. हल्ली मात्र आधुनिक दृष्टिकोनातून धार्मिक अभ्यास व्हावा म्हणून खास शाळांचीही सरकारमार्फत सोय करण्यात आली आहे.
पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचा प्रभाव असून वडीलधाऱ्या माणसांना घरात मान दिला जातो. आपापल्या जमातीतच रोटीबेटी-व्यवहार केले जातात. खेडेगावातील घरे मातीच्या विटांची व सपाट छपरांची असतात. कित्येक घरांना तटबंदीही करण्यात येते. घरांभोवती द्राक्षे-सफरचंदांच्या बागा व फुलबागाही केलेल्या असतात. खेडेगावच्या मध्यवर्ती ठिकाणी बाजार भरतो. काही गावांत सार्वजनिक स्नानगृहेही असतात. खेडेप्रमुखास ‘मलिक’ किंवा ‘सरदार’ म्हणतात. गावकऱ्यांमार्फत ह्याची निवड होते. भटक्या लोकांची राहणी साधी व जीवन कष्टमय असते. हे लोक शेळ्या-मेंढ्या, गुरेढोरे पाळतात व चराऊ रानांच्या शोधार्थ भटकतात. उंट हे त्यांचे मुख्य वाहन. तंबू हेच ह्यांचे घर. ह्यांच्यात नजीकच्या नातलगांचे तंबू जवळजवळ ठोकलेले असतात. अशा समूहाला ‘काम’ व ‘काम’च्या समूहांना ‘खेल’ म्हणतात. एकूण लोकसंख्येच्या १० टक्के असलेल्या नागरी लोकांचे जीवन बरेच सुसंघटीत आहे. येथील स्त्रिया बुरख्याशिवायही हिंडताना दिसतात. खेड्यांपेक्षा शहरांमध्ये बहुपत्नीकत्वाची चाल जास्त दिसते. हल्ली मात्र ही रूढी कमी होत आहे.
अफगाणांच्या आहारात भात, रोटी, लोणी, चीज, मांस, कोंबडी, अंडी, कांदे, चहा यांचा वापर केला जातो. हंगामात कलिंगडे, काकड्या, द्राक्षे व इतर फळेही ते खातात. सुती लांब शर्ट, ह्यावर जाकीट, पायघोळ पायजमा, डोक्यावर पागोटे अथवा घट्ट टोपी, पायात जाड वहाणा किंवा बूट असा सर्वसामान्य अफगाणाचा पोशाख असतो. थंडीत हे रूदार कोट घालतात. डोंगराळ भागातील लोक कातड्याचेही कपडे थंडीत घालतात. अफगाणी स्त्रिया पायघोळ पायजमा व लांब झगा घालतात. शहरी भागात पाश्चात्त्य वेशभूषाही मुख्यत्वेकरून पुरुषांमध्ये रूढ होत आहे.
मलेरिया, देवी, क्षय, खुपऱ्या ह्यांसारख्या रोगांना आळा घालण्यात बरीच प्रगती होत आहे. आरोग्य-
-मंत्रालयातर्फे खास शासन-यंत्रणा कार्य करीत असून आधुनिक इस्पितळे व आधुनिक औषधांचा वापर करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे मलेरिया-निर्मूलन-मोहीम सुरू आहे. देशात काही रोगांच्या लशींच्याही उत्पादनास सुरुवात झालेली आहे. प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या वाढत आहे. कामगारांचे आरोग्य व हितरक्षण यांसाठी खास कायदे असून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य, विमा, गृहबांधणी इत्यादींसारख्या योजनाही केल्या जात आहेत. शिवाय समूहविकासयोजनेतर्फे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या घरबांधणीच्या व हवापाणी–आरोग्यविषयक कार्यक्रमांत सुधारणा होत आहेत. रेड-क्रॉससारखी ‘रेड-क्रेसंट’ ही संस्था येथे आहे. शिक्षण प्रारंभी मुल्लांच्या हाती होते. मशिदीत भरणाऱ्या या शाळांना ‘मक्ताब’ म्हणतात. हल्ली सरकारमार्फत सर्व देशभर सक्तीचे विनाशुल्क प्राथमिक शिक्षण मिळते. शिवाय पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्यही फुकट मिळते. मोफत तांत्रिक-माध्यमिक शिक्षणाची सोय फक्त शहरांतून आहे. काबूल विद्यापीठात (स्थापना १९३२) अनेक शाखांतील उच्च शिक्षणाची सोय आहे. १९६३ मध्ये जलालाबाद येथे स्थापन झालेल्या नानगरहर विद्यापीठात तूर्त वैद्यकीय शिक्षणाचीच सोय आहे. तंत्रविद्यासंस्था, शेतकीशाळा, अध्यापन-प्रशिक्षण-महाविद्यालय व अनेक धर्मशिक्षण-संस्थाही येथे उघडण्यास आल्या आहेत. उच्च शिक्षणाकरिता परदेशात जाण्यासाठीही सरकारमार्फत शिष्यवृत्या दिल्या जात्यात. १९६९-७० मध्ये प्राथमिक शाळांत ५,००,६६५ विद्यार्थी व ११,५२३ शिक्षक माध्यमिक शाळांत ८३,५२९ विद्यार्थी व ३,३५२ शिक्षक धंदेशिक्षणाच्या शाळांत ६,१३८ विद्यार्थी व ५७८ शिक्षक शिक्षक-प्रशिक्षण-शाळांत ९,४९१ विद्यार्थी व ५८९ शिक्षक उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी ५,६८० व शिक्षक ८८१ होते. मुलींसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा वेगळ्या असून विद्यापीठात त्यांच्यासाठी साहित्य व शास्त्र अशा वेगळ्या शाखा आहेत. देशात पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण १०% असून स्त्रियांमध्ये तर ते फारच कमी आहे. साक्षरता-प्रसारासाठी नभोवाणी व इतर सरकारी आणि खाजगी संस्थाही कार्य करीत आहेत. युनेस्कोकडून ३० वर्षांच्या शिक्षणविकास योजनेसाठी मदत मिळत आहे.
काव्य, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, इतिहास इ. क्षेत्रांतील प्राचीन साहित्य प्रामुख्याने फार्सी भाषेतच लिहिलेले आहे. गझनवीच्या अंमलात अन्सारी (मृ. सु. १०४९) हा राजदरबारी कवी होता. याच कालखंडात ⇨फिर्दौसीने (सु. ९३५–१०२०) शाहनामा महाकाव्य लिहिले. तैमूरलंगच्या काळात जामी (१४१४–९२) याने साधुसंतांच्या जीवनावर कुराणातील तत्त्वांवर आधारित, प्रणयात्मक व अद्भुतरम्य प्रसंगांवर सु. शेहेचाळीस ग्रंथ लिहिले. हाफिझ अबू (मृ. १४३०) ह्याने जगाचा इतिहास लिहिला व शरफद्दीन अली याझ्दी (मृ. १४५४) ह्याने तैमूरलंगच्या बहादुरीविषयी बखर लिहिली आहे. पुश्तू भाषेतील साहित्यासंबंधीचे पुरावे आठव्या शतकापासून मिळतात. परंतु ह्या भाषेतील थोर साहित्यिक मात्र सतराव्या शतकात होऊन गेले. मोगलांच्या पारतंत्र्यात जखडलेल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तळमळीने लिहिणारा खुशहलखान खतक (ज. १६१३) राष्ट्रीय कवी मानला जातो. अब्दुल रहमान ह्याचे ग्रंथ लोकांचे धार्मिक श्रद्धास्थान बनले आहेत.
मुद्रणस्वातंत्र्य मर्यादित असून वृत्तपत्रे व मासिके सरकारमार्फत वा परवानगीने चालतात. त्यांना राजकीय मते प्रदर्शित करता येत नाहीत. ५,०००-१५,००० खपाची अनिस, हैवाद व इस्लाह ही तीन प्रमुख वृत्तपत्रे काबूलमध्ये निघतात. यांशिवाय येथे काही स्थानिक वृत्तपत्रे व नियतकालिके आहेत. परकीयांना बातम्या प्रकाशित करण्यास बंदी आहे. सरकारविरोधी व धर्मविरोधी परकीय वृत्तपत्रांना देशात परवानगी नाही. नवीन संविधानसुधारणांनुसार ही परिस्थिती बदलत आहे.
कला, क्रीडा इ. : येथील कलेवर विविध संस्कृतींची छाप पडलेली दिसते. प्रारंभ-कालातील कलाकृतींवर हडप्पा, बॅक्ट्रियन, सॅसॅनियन, ग्रीक आदी कलांचा पगडा आहे. खैबरखिंडीपासून ते बाल्खपर्यंतच्या प्राचीन मार्गांच्या आसपासच्या उत्खननात कुशाणकालीन स्तूप, संघाराम आदी बौद्ध वास्तू आढळल्या आहेत. कित्येक वस्तूंची बांधणी ⇨तक्षशिलेकडील वास्तूंशी मिळतीजुळती आहे. त्यांवरील चुन्याच्या गिलाव्याचे काम उत्कृष्ट आहे. फोंडुकिस्तान व बामियान या ठिकाणी गांधार-पद्धतीची दगडी कोरीव शिल्पे व रंगविलेल्या मूर्ती सापडतात. बामियान लेण्यातील बुद्ध-मूर्ती सु. ५३ मी. उंचीची आहे. तेथील भित्तिचित्रकला अजंठासदृश आहे. इस्लामी आक्रमणांनंतर ह्या कलाकृती नष्ट झाल्या वा दुर्लक्षिल्या गेल्या. इस्लामी कालखंडातील अनेक कलावशेष गझनी, कलाबुस्त, हेरात, मझर-इ-शरीफ व बाल्ख भागांत विशेषत्वाने आढळतात. मशिदी, कबरी, मिनार ह्या वास्तूंवर इराणी पद्धतीची छाप असून त्यांच्या भोवताली तोरणपंथाची उघडी भव्य आवारे, टोकदार कमानींची उंच द्वारे असून नक्षीकामासाठी काचमीना-विटांचा उपयोग केलेला आहे. बाराव्या शतकात गझनी येथील महंमदाने बांधलेला मिनार गतवैभवाची साक्ष देतो. पंधराव्या शतकापासून हेरात हे कलाकेंद्र बनले. बिहजाद, कासीमअली आणि नासरअली अबुल माली ह्यांनी ऐतिहासिक व काव्यात्मक प्रसंगांवर रंगविलेल्या सूक्ष्माकारी चित्राकृती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पंधराव्या व सोळाव्या शतकांच्या सुमारास सुलेखनकला उच्च दर्जास पोचली होती. ह्याच काळात गालिचे व वस्त्रेही कलात्मकतेने निर्मिली जात. विसाव्या शतकातील कलेवर बहुतांशी पाश्चात्त्य कलापद्धतीचीच छाप दिसते. काबूल संग्रहालयात बौद्धकालीन बऱ्याच अमोल कलाकृतींचा संग्रह केलेला आहे. त्यात अनेक ठिकाणच्या दगड, ब्राँझ, हस्तिदंत इ. कलाकृती आहेत. गझनी, कंदाहार, मझर-इ-शरीफ, हेरात येथे प्रांतिक संग्रहालये आहेत.
येथील संगीत, प्रामुख्याने लोकसंगीत, पौर्वात्य पद्धतीशी जुळते आहे. झिथरसारखी तंतुवाद्ये व चर्मवाद्यांचा समुच्चय वापरतात. अफगाणांना नृत्य व संगीताची बरीच आवड आहे. ‘अट्टन’ हे त्यांचे राष्ट्रीय नृत्य होय. प्रतिस्पर्धी घोडेस्वार-संघांनी खड्ड्यातील बकऱ्याचे किंवा वासराचे धड विशिष्ट ठिकाणी नेण्याचा‘बुझ काशी’, तसेच दोन्ही संघांतील सर्वांनी लंगडी घालून खेळायचा ‘घोसाई’हे खेळ बरेच लोकप्रिय आहेत. खेडुतांना कुस्त्यांचा शोक असतो. शहरातून बेसबॉल, हॉकी, फुटबॉल इ. पाश्चात्त्य खेळांचाही प्रसार होत आहे. २१ मार्चचा ‘नो रूझ’ हा नववर्षदिन, ऑगस्टमधील ‘जश्न-ई-इस्तेक्लाल’ हा स्वातंत्र्योत्सव व रमजान ईद आदी सणही उत्साहाने साजरे केले जातात.
महत्त्वाची स्थळे : प्राचीन काळापासून पाश्चिमात्य व पौर्वात्य देशांतील व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण ज्या खुष्कीच्या मार्गाने होत आली, त्यावरील अफगाणिस्तान हा महत्त्वाचा टप्पा होताम्हणूनच येथे अनेक संस्कृतींचे ठसे उमटलेले दिसतात. बामियान, बेग्राम येथील बौद्ध लेणी जगप्रसिद्ध असून मोंगल अवशेष असलेली गझनी, हेरात, मझर-इ-शरीफ इ. अनेक शहरे प्रेक्षणीय आहेत. काबूल हे राजधानीचे शहर असून मझर-इ-शरीफ, कंदाहार ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. बाघलान येथे साखरेचा कारखाना असून गुलबहार व पुल-इ-खुमरी येथे कापडगिरण्या आहेत. हेलमंड-प्रकल्पामुळे व पंचवार्षिक योजनामुळे अफगाणिस्तानचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे.
दिवाकर, प्र. वि.
“