अंदमानी भाषा समूह : या भाषा बोलणारे अंदमानातले मुळचे रहिवासी नेग्रिटो वंशातले असून त्यांचे मलेशियन द्वीपकल्पातील समाङ या जातीशी मानववंशादृष्ट्या साम्य दिसते. ते झपाट्याने कमी होत आहेत. त्यांची संख्या १८५८ साली ४,८०० होती, १९०१ मध्ये १,८८२ आणि १९३१ मध्ये ४६० होती तर १९६१ च्या जनगणने नुसार ती फक्त ५ होती. 

संस्कृती व भाषा यांच्या दृष्टीने या लोकांचे तीन भाग होतात: उत्तर, मध्य (दक्षिण अंदमान) आणि दक्षिण. यांतला दक्षिणेकडचा भाग अत्यंत जुनाट आणि इतरांपासून तुटलेला आहे. 

वर्णपध्दती :

 

स्वर  

:

अ,

आ,

इ,

ई,

उ,

ऊ,

ए,

एऽ,

ॲ,

ओ,

ओऽ 

 
 

व्यंजने 

:

   

क 

ग 

ङ 

         
         

च 

ज 

ञ 

         
         

त 

थ 

द 

न 

         
         

प 

ब 

म,

य,

र,

ल,

व,

ह 

रूपपद्धती : शब्दांना कोणताही विकार होत नाही. त्यांचे वाक्यातले कार्य उपसर्ग व प्रत्यय यांच्या मदतीने सिद्ध होते. काही प्रत्ययांनी क्रिया आणि तिचा संदर्भ स्पष्ट होतो. पुढील प्रत्यय विशेष वापरात आहेत : कर्ता किंवा क्रिया दाखविणारा –ङ, वर्तमान-भविष्यदर्शक-के, भूतकालदर्शक-रे, भविष्यदर्शक-बो, उदा., मेद तिदन्-ङ ब – ‘आम्ही जाणणे नाही’ मामि-‘झोप!’ मामी-ङ  बेऽदिग्–‘झोपत’ दोऽल्-मामिरे- ‘मी झोपलो ’ मेद बोऽदो-दोऽगा मामि-रे–‘आम्ही दिवसभर झोपलो’, दोऽल मामिङ बो-‘मी झोपीन’.

इतर प्रत्यय मराठीतल्या शब्दयोगी अव्ययाप्रमाणे वापरले जातात : – ईआ, – बीआ ‘–चा’ –लेन  ‘–त’ – लत् ‘–कडे’ – ल ‘–ने’ –ऊल् , –लेब् ‘–साठी’ – ते ‘ –पासून, –पेक्षा’ इ. : बीर एऽरेम् लेन आज कारज् ङ. लेब् कातिकरे –‘बीर अरण्यात मध गोळा करण्यासाठी गेला ’ वोऽलोग तेक् बीर अब्-केऽ लिअ – ‘ वोलोगपेक्षा बीर लहान आहे.’ 

उपसर्ग वर्गनिश्चितीचे कार्य करतात. वस्तूंचे वर्गीकरण प्रथम सचेतन व अचेतन असे असून सचेतनात मानव व मानवेतर प्राणी असा भेद केला जातो. काही शब्द उपसर्गाशिवाय वापरताच येत नाहीत, उदा., शरीराचे अवयव : ओऽत – चेऽत् ‘डोके’, नुसते चेऽत् नाही.  

प्रतिषेधवाचक शब्द दा-के हा आहे : ङो ताप्के दाके – -‘ तू चोरू नकोस ’. नकारवाचक ब आहे. प्रश्नवाचक विधान अन् या शब्दाने सुरू होते.

वाक्यपद्धती : वाक्ये साधारणपणे छोटी व स्वतंत्र असतात. पण क्वचित जोडशब्द वापरून जोडलीही जातात. उदा., बेदरे हा जोडशब्द दोन वाक्यांच्या मध्ये येऊ शकतो. त्याचा अर्थ ‘कारण, म्हणून’ असा होतो.

या भाषेत स्वतंत्र संख्यावाचक शब्द नाहीत.ऊब-‘एक’ याचा मूळ अर्थ ‘खरा’ असा आहे, तर ‘दोन’ या अर्थाच्या ईक्पोsर या शब्दाचा ‘पुष्कळ’ असाही अर्थ होतो. बऱ्याचशा संख्या हावभावाच्या मदतीने व्यक्त होतात.

उतारा : ओऽन मेऽत बारैज् लेन् ऊचिन –ओऽल ओको–ली–के आ मर् आर्दूरू एऽर ल्–आर्लूआ लेन् जाल–के. कातो चाङ् तोऽर्ङ. अन दरङ. लेन् एकार नैकन् ओऽगर ल ईक्पोऽर प्लि–के. तार् – ओऽलोओ–लेन् ता ओऽरोक् –ङ बेऽदिग् थी तोऽलत् – ङ ल् – एब् तोऽलोबोइचो लत् वीज् – के.   

अर्थ : जेव्हा आमच्या गावात कोणीतरी मरतो तेव्हा आम्ही सगळे ओसाड जागी जातो. तिथे पानांनी विणलेल्या किंवा पानांनी झाकलेल्या झोपडीत रिवाजाप्रमाणे दोनएक महिने राहतो. नंतर अस्थी गोळा करून तोलोबोइचोला शोकनृत्य करण्यासाठी परततो.

संदर्भ : Meillet, A. Cohen, M. Less Langues du Monde, paris, 1952.

कालेलकर, ना. गो.