अंकित राष्ट्रे : एखाद्या बलिष्ठ राष्ट्राकडून ज्या राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण व अंतर्गत शासनपद्धती ठरविली जाते, अशा राष्ट्रांना ‘अंकित राष्ट्रे’ म्हणतात. अशी राष्ट्रे तत्त्वत: स्वतंत्र असली तरी त्यांच्या अंतर्गत घडामोडींवर प्रबळ राष्ट्रांचे सर्वंकष स्वरूपाचे नियंत्रण असते. अंकित राष्ट्रांना आपले धोरण किंवा निर्णय नियंत्रण प्रबळ राष्ट्राचे हिताहित पाहून ठरवावे लागते. 

दुसऱ्या महायुद्धकाळात अनेक देशांची आर्थिक उत्पादनक्षमता कमी झाली होती व लष्करावर अधिक खर्च होत होता. युद्धोत्तर काळात बेकारी व दारिद्र्य यांमुळे सर्व राष्ट्रांत अस्थिरता निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन सत्तागटांची उघड स्पर्धा सुरू झाली होती. ह्या गटांनी आपली सत्ता वाढविण्याचे यत्न सुरू केले. आर्थिक मदत, कर्जे, तत्त्वज्ञानांचे आवाहन, अशा अनेक उपायांचा अवलंब करण्यात आला. 

आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाच्या संदर्भात बड्या राष्ट्रांशी मिळते-जुळते संबंध ठेवणे व स्वत:च्या देशाचे परराष्ट्रीय धोरण बड्या राष्ट्राला अनुकूल ठेवणे ही अंकित राष्ट्राची प्रमुख लक्षणे होत. 

आशियात आऊटर मंगोलिया व यूरोपात बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, पूर्व जर्मनी ही रशियाची अंकित राष्ट्रे समजली जातात. दक्षिण (लॅटिन) अमेरिकेतील बहुतेक राष्ट्रे अमेरिकेची अंकित राष्ट्रे समजली जातात.

भिडे, ग. ल.