सृष्टि : (विश्व). विश्वातील ब्रह्माचा सर्वव्यापीपणा म्हणजे सृष्टी होय, असे अध्यात्मात मानले जाते. आयुर्वेदात सृष्टीविषयीची संकल्पना पुढीलप्रमाणे आहे : जीव हे सृष्टीतील एक द्रव्य असून तो सृष्टीचाच एक घटक आहे. जीवाचे सर्व भाव व सर्व घटक सृष्टीमधीलच असतात. जड म्हणजे अचेतन आणि सजीव म्हणजे सचेतन हे सृष्टीचे दोन भाग आहेत. सजीवाचेही जड व आध्यात्मिक असे दोन भाग आहेत. जड म्हणजे दोषधातुमलादी पंचमहाभूतांचे विकार असून बुद्घी, मन, अहंकार इ. आत्म्याचे विकार आहेत. [→  सृष्टि व मानव].

 

पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते भारतीय दर्शनांमधील (तत्त्वज्ञानातील) एक संकल्पना आहे. पंचमहाभूते सृष्टीच्या म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीला कारण असलेली मूलतत्त्वे आहेत. सृष्टीच्या भौतिक घटकद्रव्यांचे वर्गीकरण करून सृष्टिनिर्मितीला कारणीभूत असणारी मूलभूत घटकद्रव्ये सांगण्याचा प्रयत्न जगातील बहुतेक दर्शनांमध्ये कमी-अधिक प्रमाणात केलेला आढळतो. उदा., ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये सृष्टीला कारणीभूत असलेली विविध मूलभूत तत्त्वे विशद केलेली आहेत. [→ विश्वोत्पत्तिशास्त्र].

 

न्याय, वैशेषिक, वेदान्त इ. भारतीय दर्शनांमध्ये पंचमहाभूते कशी निर्माण झाली यासंबंधीची चर्चा केलेली आढळते. छांदोग्य उपनिषदतैत्तिरीय उपनिषद  या उपनिषदांत सृष्टीच्या उत्पत्तीला कारण असलेल्या पंचमहाभूतांची शक्ती अचाट असल्याचे म्हटले आहे. शिवाय ही शक्ती मानवी संहारास कारण होते, असेही म्हटले आहे. म्हणून प्राचीन काळी पंचमहाभूते संतुष्ट होण्याकरिता त्यांची अनेक प्रकारे प्रार्थना करीत. तथापि, आधुनिक शास्त्रे पंचमहाभूतांना वश करून किंवा त्यांना काबूत आणून त्यांची शक्ती मानवाच्या कल्याणासाठी वापरण्याचे प्रयत्न करीत आहेत. [→ पंचमहाभूते].

 

विश्व व त्याची निर्मिती : आधुनिक वैज्ञानिक मतानुसार सृष्टी म्हणजे विश्व होय. वस्तुनिष्ठ रीतीने वर्णन करता येतील अशा खगोलशास्त्रीय (ज्योतिषशास्त्रीय गोष्टी, घटना, त्यांच्यातील परस्परसंबंध आणि ऊर्जा यांची सर्वंकषता किंवा गोळाबेरीज म्हणजे विश्व होय. अशा रीतीने विश्वामध्ये सर्व द्रव्य आणि प्रकाशासहित सर्व ऊर्जा येतात. थोडक्यात, अवकाशात व कालात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विश्वात अंतर्भाव असतो.

पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टी, सूर्य, सूर्यकुल व त्याच्यातील सर्व ग्रह, उपग्रह, लघुग्रह, उल्काभ, अशनी, धूमकेतू व आंतरग्रहीय द्रव्य तसेच सर्व तारे (रेडिओ तारे, क्ष-किरण तारे, न्यूट्रॉन तारे इ.), तारकासमूह, तारकागुच्छ, तारकासंघ, अभ्रिका, तेजोमेघ, नवतारे, अतिदीप्त नवतारे, आकाशगंगेसहित सर्व दीर्घिका, पल्सार, क्वासार, कृष्णविवरे इ. सर्व खस्थ पदार्थांचा सृष्टीमध्ये अंतर्भाव होतो. अब्जावधी तारे असणारी ‘आकाशगंगा’ ही आपली दीर्घिका सु. एक लाख प्रकाशवर्षे (सु. ९·४६ X १०१२ किमी.) एवढा व्याप असलेली आहे. दूरदर्शकांतून आकाशाच्या केलेल्या निरीक्षणांवरून आकाशगंगेत जेवढे तारे आहेत किमान तेवढ्या दीर्घिका अवकाशात आहेत, असे दिसून आले. यावरून सृष्टीचा प्रचंड व्याप लक्षात येईल. विश्वाचा व्याप मर्यादित आहे की नाही याची शास्त्रज्ञांना माहिती नाही. बहुतेक ज्योतिर्विदांच्या मते असाधारण तेजस्वी असलेले ⇨ क्वासार  हे बहुधा विश्वातील सर्वांत दूरचे खस्थ पदार्थ असू शकतील आणि ते पृथ्वीपासून सु. १६ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर असू शकतील. जेव्हा प्रकाश उत्सर्जन करणारा खस्थ पदार्थ निरीक्षकापासून दूर जातो, तेव्हा त्याला अधिक दीर्घ तरंगलांब्यांचा प्रकाश दिसतो. प्रकाशाच्या तरंगलांब्यांतील या बदलाला ताम्रच्युती (वर्णपटातील रेषा तांबड्या रंगाच्या बाजूकडे सरकणे) म्हणतात. क्वासारचे अंतर काढण्यासाठी ज्योतिर्विद त्याच्या तेजस्वीपणाबरोबर त्याच्या ताम्रच्युतीचा अभ्यास करतात. खस्थ पदार्थ निरीक्षकापासून किती गतीने दूर जात आहे, यावर त्याच्या ताम्रच्युतीचे मूल्य अवलंबून असते. अतिशय दूर असलेले क्वासार व दीर्घिका यांच्या ताम्रच्युती प्रचंड असतात. यावरून विश्व प्रसरणशील आहे, असे ज्योतिर्विद मानतात. याचा अर्थ विश्वाचा प्रत्येक भाग हा इतर प्रत्येक भागापासून दूर जात आहे. विश्वाच्या या मूलभूत वैशिष्ट्याचे स्पष्टीकरण विश्वाविषयीच्या विविध सिद्धांताद्वारे करण्याचे प्रयत्न केले जातात. अशा रीतीने ताम्रच्युतीचा शोध हा ⇨ विश्वस्थितिशास्त्र  आणि ⇨ विश्वोत्पत्तिशास्त्र  यांचा आधार ठरला आहे.

एखाद्या दिलेल्या वेळी विश्वाचा कोणताही भाग हा त्याच वयाच्या विश्वाच्या अन्य दुसऱ्या कोणत्याही भागासारखा असतो, या कल्पनेवर विश्वस्थितिशास्त्रीय सिद्धांत आधारलेले आहेत. आइन्स्टाइन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धांत हाही विश्वस्थितिशास्त्रीय सिद्धांताचा एक भाग आहे. पर्यायाने आइन्स्टाइन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धांत पुढील दोन गृहितांवर आधारलेला आहे. एक म्हणजे कोणताही संकेत प्रकाशाच्या गतीपेक्षा अधिक गतीने प्रवास करू शकत नाही आणि दुसरे गृहीत म्हणजे भौतिकीचे नियम विश्वात सर्वत्र तेच (न बदलणारे) असतात.

प्रसरणशील विश्व, संकोचनशील विश्व, स्पंदनशील (मागे-पुढे जाणारे) विश्व व स्थितिशील (स्थिर राहणारे) विश्व या विश्वाविषयीच्या प्रतिकृती वरील सिद्धांतांमधून पुढे आल्या. अगदी दूर असलेल्या दीर्घिकांच्या ताम्रच्युतींवरून ज्योतिर्विदांनी सांप्रत विश्व प्रसरण पावत असल्याचा निष्कर्ष काढला, परंतु भावी काळातील विश्वाचे एकूण वर्तन हे विश्वात असणाऱ्या द्रव्याच्या सरासरी घनतेवर अवलंबून असेल.

समजा विश्वात असणारे सर्व द्रव्य एकसारखे पसरलेले आहे. अशा परिस्थितीत अवकाशाच्या ७·६ घ. मी. एवढ्या घनफळात हायड्रोजनाचा सु. एक अणू असेल. असे विश्व अनावृत वा खुले असेल तसेच ते अखंडितपणे प्रसरण होत राहील आणि भविष्यात अनंत काळाने त्याची घनता शून्याच्या जवळपास पोहोचलेली असेल. दूरवरच्या भविष्यात स्थानिक समूहातील दीर्घिकाच केवळ जवळ असतील. इतर दीर्घिका अनंत अंतरापर्यंत दूर गेलेल्या असतील. अखेरीस सर्व ताऱ्यांमधील त्यांना तेजस्वीपणा देणारी सर्व ऊर्जा संपून गेलेली असेल, त्यामुळे तारे तेजोहीन होतील.


याउलट अवकाशात पसरलेल्या द्रव्याची घनता ७·६ घ. मी. अवकाशात १०० हायड्रोजन अणूएवढी जास्त असल्यास विश्व हे आवृत (परिसिमित) असेल. अशा प्रकारच्या विश्वाच्या अवकाशात पाठविलेली प्रकाशशलाका अनेक अब्ज वर्षांनी मूलस्थानी परत येईल. भविष्यात कोणत्या तरी वेळी, कदाचित २० ते ४० अब्ज वर्षांनी, विश्वाचे प्रसरण थांबेल. विश्वातील दीर्घिका परत एकत्र येण्यास सुरुवात होईल आणि विश्वाची घनता अखेरीस अनंताच्या जवळपास गेलेली असेल.

अशा प्रकारे विश्वातील सर्व दीर्घिका एकाच बिंदूत एकत्रित होऊन तयार झालेले यीलम नावाचे विश्वद्रव्य अतिघन अवस्थेत होते. या अवस्थेचा एका क्षणी महास्फोट (बिग बँग) झाला आणि सु. १४·७ अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती होऊन त्याच्या प्रसरणास सुरुवात झाली, असे प्रसरणशील विश्वाच्या परिकल्पनेत मानतात. हाती आलेल्या वैज्ञानिक पुराव्यांवरून विश्वाची निर्मिती व उत्क्रांती यांविषयीच्या या परिकल्पनेला सर्वाधिक मान्यता मिळाली आहे. महास्फोटातून फक्त प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि ती सर्व दिशांमध्ये पसरायला सुरुवात झाली. तथापि, ऊर्जेला आकार व आकारमान नसते, तर विश्वाला आकार व आकारमान कसे प्राप्त झाले, हा प्रश्न समोर आला. संहत किंवा संपृक्त रूपातील ऊर्जा कणाने दर्शवितात आणि पुंजसिद्घांतानुसार ऊर्जा उत्सर्जित होते, म्हणजे ऊर्जेचे पुंजकण असतात, असे म्हणता येते. मात्र महास्फोटानंतरच्या एक अब्जांश सेकंद एवढ्या अत्यल्प काळात द्रव्यमान नसलेले ऊर्जापुंज प्रकाशाच्या गतीएवढ्या गतीने (सेकंदाला सु. ३ लाख किमी. गतीने) इतस्ततः भटकत होते. १९६४ मध्ये ब्रिटिश भौतिकीविद पीटर हिग्ज यांनी महास्फोटानंतरच्या काही निमिषांमध्ये या ऊर्जेशिवाय अनेक मूलकणही निर्माण झाले, अशी परिकल्पना मांडली. गणितीय विश्लेषणाद्वारे त्यांनी या मूलकणांमध्ये बोसॉन प्रकारचे मूलकण निर्माण झाल्याचे म्हटले होते. (भारतीय भौतिकीविद सत्येंद्रनाथ बोस यांच्या पुंजगतिकीमधील संशोधनावरून एका मूलकणाला त्यांच्या नावावरून बोसॉन हे नाव दिले गेले). या बोसॉन मूलकणाचे द्रव्यमान हिग्ज यांनी प्रोटॉनाच्या द्रव्यमानाच्या १००–१२५ पट असल्याचे मानले होते. या मूलकणाला नंतर हिग्ज-बोसॉन हे नाव देण्यात आले. हिग्ज-बोसॉन मूलकणांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या क्षेत्राला हिग्ज-बोसॉन क्षेत्र म्हणण्यात येऊ लागले. हे विद्युत् चुंबकीय किंवा गुरुत्वीय यांसारख्या इतर मूलभूत क्षेत्रांहून भिन्न क्षेत्र आहे. हिग्ज-बोसॉन क्षेत्र अदिश आहे. म्हणजे त्याला परिमाण असते, परंतु दिशा नसते. महास्फोटानंतरच्या अत्यल्प काळात हिग्ज-बोसॉन क्षेत्र सर्वत्र पसरले होते. या क्षेत्रातून जाताना इतर मूलकणांची हिग्ज-बोसॉन कणांशी परस्परक्रिया झाली. यातून या इतर मूलकणांना द्रव्यमान प्राप्त झाले. तथापि, या क्षेत्रातून जाताना ज्या मूलकणांची हिग्ज-बोसॉन मूलकणांशी परस्परक्रिया घडली नाही, ते मूलकण द्रव्यमानहीन राहिले. उदा., फोटॉन (प्रकाशकण).

अशा परिकल्पित हिग्ज-बोसॉन मूलकणाचे अस्तित्व सिद्घ करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी महास्फोटाच्या वेळी असलेल्या परिस्थितीसारखी परिस्थिती कृत्रिम रीतीने निर्माण करणे गरजेचे होते. विशेषतः ⇨ मूलकण  भौतिकीतील संशोधनासाठी यूरोपातील काही देशांनी एकत्र येऊन ‘यूरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च’ ही संघटना १९६४ मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या फ्रेंच नावातील शब्दांच्या आद्याक्षरांवरून ⇨ सेर्न  (CERN) हा संक्षेप पुढे आला. या संस्थेचे मुख्यालय जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे असून जुलै, २०१२ मध्ये वीस देश सदस्य, तीन देश सहसदस्य, भारतासह पाच देश आणि दोन आंतर-राष्ट्रीय संघटना निरीक्षक सदस्य होते. या संघटनेचे कार्य १६९ संस्था, ३७ देश व पाच खंडांत चालते. येथून मिळणाऱ्या प्रदत्ताचे (माहितीचे) संगणन करण्यासाठी जगभरातील हजारो संगणक ‘द ग्रिड’ नावाच्या जालकाने जोडले आहेत.

सेर्न संघटनेने फ्रान्स-स्वित्झर्लंड सीमेवर आल्प्स पर्वतात भूपृष्ठाखाली सु. १०० मी. खोलीवरील २७ किमी. लांबीच्या वलयाकार बोगद्यात आपली प्रयोगशाळा उभारली आहे. तेथे साधारणपणे एवढ्याच परिघाच्या वलयाकार पोकळ कड्याच्या रूपातील लार्ज हेड्रॉन कोलायडर नावाचा ⇨ कणवेगवर्धक  आणि इतर साधनसामग्री उभारली आहे. या कणवेगवर्धकात प्रोटॉनासारख्या विद्युत् भारित मूलकणांच्या शलाका निर्माण करून त्यांच्या समोरासमोर टकरी घडवून आणता येतात. या शलाकांच्या दिशा नियंत्रित करण्यासाठी सु. ९,३०० शक्तिशाली चुंबक वापरले असून ते थंड ठेवण्यासाठी द्रवरूप नायट्रोजन व द्रवरूप हीलियम वापरतात.

धन विद्युत् भारित प्रोटॉन द्रव्याचे मूलभूत घटक असून ते अधिक लहान मूलकणांचे बनलेले असतात. प्रोटॉनामध्ये द्रव्यमानयुक्त तीन क्वॉर्क मूलकण द्रव्यहीन ग्लुऑन मूलकणांनी एकत्र धरून ठेवलेले असतात. वरील कणवेगवर्धकात विद्युत् क्षेत्रातून जाणारे शलाकेतील प्रोटॉन एका सेकंदात ११,००० फेऱ्या मारतात आणि त्यांच्यात सु. ६० कोटी टकरी होऊ शकतात. यामुळे प्रोटॉनांची गती वाढत जाते. कणवेगवर्धकाच्या नळासारख्या वलयाकार कड्यामध्ये विरुद्घ दिशांमध्ये फिरणाऱ्या प्रोटॉन शलाका प्रकाशाच्या गतीच्या ९९·९९९९९९९१ टक्के गतीने प्रवेगित झाल्यावर चुंबकीय नियंत्रकामार्फत त्यांच्या दिशा बदलून त्यांच्यात टकरी घडवून आणतात. प्रोटॉनांमधील क्वॉर्क व ग्लुऑन परस्परांवर आदळून व स्फोट होऊन हिग्ज-बोसॉन मूलकण निर्माण करण्यासाठी लागणारी पुरेशी ऊर्जा निर्माण होते. हिग्ज मूलकणांचे द्रव्यमान प्रोटॉनाच्या द्रव्यमानाच्या १००–२०० पट असते. इतर मूलकणामध्ये क्षय (विघटन) होण्याआधी हिग्ज मूलकण एक अब्जांश सेकंद एवढा काळ अस्तित्वात असतात. हिग्ज मूलकण निर्माण होऊन त्यांचा होताना कणवेगवर्धकातील अभिज्ञातकांमध्ये उत्सर्जित कणांचे लेश वा खुणा सूचक त्रिमितीय प्रतिमांच्या रूपात (उदा., वलयाकार, मळसूत्राकार रेषा) मागे राहतात.

३० मार्च, २०१० रोजी ३·५ टेरा इलेक्ट्रॉन-व्होल्ट एवढ्या प्रचंड ऊर्जेच्या प्रोटॉन शलाकांमध्ये समोरासमोर टकरी घडवून आणल्या. त्यातून ७ टेरा इलेक्ट्रॉन-व्होल्ट एवढी प्रचंड व अपेक्षित असलेली ऊर्जा उत्पन्न झाली. कारण प्रोटॉन एकमेकांवर आदळून नष्ट होताना प्रचंड ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा सूर्याच्या तापमानाच्या लाखपट तापमानाएवढी होती आणि ती सर्व दिशांमध्ये एकसारखी विखुरली. अशा प्रकारे महास्फोटानंतर लगेचच असलेल्या परिस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झाली अशी सापेक्षता वर्तविण्यात आली.


४ जुलै, २०१२ रोजी केलेल्या अशाच प्रयोगातून प्रोटॉनाच्या सु. १२५ पट द्रव्यमानाचा (सु. १२६ गिगॅ इलेक्ट्रॉन-व्होल्ट) बोसॉन मूलकण आढळला. तेथील वैज्ञानिकांनी हा बोसॉन मूलकण हिग्ज-बोसॉन मूलकणासारखा असल्याचे सांगितले. कारण खऱ्या हिग्ज-बोसॉन मूलकणाची ओळख पटण्यासाठी पाच लक्षांश टक्क्याहून कमी चूक असणारे निरीक्षण करावयाचे आहे. शिवाय हिग्ज यांना अपेक्षित असलेले त्याचे इतर गुणधर्म त्या मूलकणाला आहेत की नाहीत, हे तपासायचे आहे या निरीक्षणांचे स्पष्टीकरण द्यायचे आहे आणि अपेक्षित ऊर्जेपेक्षा किंचित अधिक ऊर्जा, इतर काही मूलकणांचा अभाव या बाबी स्पष्ट करावयाच्या आहेत. थोडक्यात हाच पूर्णपणे हिग्ज-बोसॉन मूलकण आहे हे सिद्घ होण्यासाठी बरेच अध्ययन, संशोधन व सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) विश्लेषण होणे आवश्यक आहे. यासाठी तीन वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकेल, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.

 

हिग्ज-बोसॉन मूलकणाच्या अस्तित्वाचा शोध लागल्याने विश्वनिर्मितीचे म्हणजे सृष्टिनिर्मितीचे गूढ उकलण्यास मदत होईल. प्रसरणशील विश्वाच्या परिकल्पनेनुसार महास्फोटानंतर विश्व अविरतपणे प्रसरण पावत असून त्यातील प्रत्येक पिंड इतर पिंडांपासून दूर जात आहे. या शोधामुळे विश्वाच्या निर्मितीची वेळ, त्याच्या प्रसरणाची गती आणि त्याचे आकारमान शोधता येईल. द्रव्यमानामुळे निर्माण झालेल्या गुरुत्वाकर्षणाचा विश्वाच्या प्रसरणावर परिणाम होतो का हे शोधता येईल.

हिग्ज-बोसॉन मूलकणांमुळे इतर मूलकणांना द्रव्यमान लाभते. त्यामुळे ऊर्जा स्थिरावली इतर मूलकणांना आकार व आकारमान प्राप्त झाले या मूलकणांच्या संमीलनातून नंतर तारे, दीर्घिका, ग्रहोपग्रह इ. सर्व खस्थ पदार्थ निर्माण झाले आणि सद्य स्थितीतील विश्व अस्तित्वात आले. या शोधामुळे अणूच्या संरचनेतील एक भक्कम दुवा लक्षात आल्याने हा शोध भौतिकीच्या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. [→  हिग्ज-बोसॉन मूलकण].

लार्ज हेड्रॉन कोलायडर, तेथील अभिज्ञातक, इतर उपकरणे, सुटे भाग इत्यादींच्या उभारणीत भारताचे योगदान लक्षणीय आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुंबई), राजा रामण्णा प्रगत तंत्रविद्या केंद्र (इंदूर) इ. संशोधन संस्था, तसेच त्यांच्यामार्फत भारतीय संशोधक व विविध उद्योगसमूह यांनी सदर प्रकल्पाला मदत केली आहे. तेथील काही शक्तिशाली चुंबक व ते थंड ठेवण्यासाठी लागणारा द्रवरूप नायट्रोजन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेने पुरविला आहे. शिवाय तेथील इलेक्ट्रॉनीय सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्या विकास व विश्लेषणात या संस्थेतील वैज्ञानिक सहभागी झाले आहेत. सेर्नच्या संगणकीय कामांतही भारतीय वैज्ञानिकांनी साहाय्य केले आहे.

काही शास्त्रज्ञांनी विश्वाविषयीचे इतर सिद्धांत सुचविले असून ते अगदी भिन्न कल्पनांवर आधारलेले आहेत. उदा., स्थिर-अवस्था सिद्धांत. विश्वाचा कोणताही भाग हा सर्व काळात इतर भागांसारखा असतो, या मतावर स्थिर-अवस्था सिद्धांत आधारलेला आहे. विश्वाचे प्रसरण होत असले, तरी द्रव्याची सरासरी घनता अवकाश किंवा काल यानुसार बदलत नाही, असे हा सिद्धांत मानतो. हे होण्यासाठी द्रव्य अखंडपणे निर्माण होणे गरजेचे असते. अखंडपणे निर्माण होणाऱ्या द्रव्यापासून नवीन दीर्घिका तयार होऊन त्या अनंत अंतरावर दूर गेलेल्या दीर्घिकांची जागा घेतात. काही इतर शास्त्रज्ञांच्या मते आइन्स्टाइन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धांत अपूर्ण आहे, म्हणून त्यांनी त्यात काही बदल सुचविले आहेत. प्रसरणशील विश्वाच्या बाबतीत या बदलांमुळे भिन्न गोष्टींचे भाकीत केले जाईल.

यांपैकी कोणता तरी अमूक एक सिद्धांत अचूक ठरू शकेल हे कोणालाच माहीत नाही. निरीक्षणात्मक ज्योतिषशास्त्र तसेच सैद्धांतिक भौतिकी यांच्यात प्रगती होईपर्यंत म्हणजे तिच्यातून निश्चित माहिती उपलब्ध होईपर्यंत शास्त्रज्ञांना प्रयत्न करावे लागतील. कारण यासाठी अवकाशातील द्रव्याची सरासरी घनता, विश्वाचे वय, अतिशय दूरच्या अंतरावरील ताम्रच्युतीचे वर्तन, तसेच आइन्स्टाइन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धांत, त्याचप्रमाणे भौतिकीमधील इतर मूलभूत सिद्धांत निर्दोष आहेत की नाहीत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

जीवसृष्टी : सृष्टीतील वस्तूंची चर (चेतन) व अचर (जड) अशी विभागणी प्राचीन काळापासून होत आली आहे. यांपैकी चेतनायुक्त विभागात सर्व सजीव व जड विभागात सर्व निर्जीव वस्तू येतात आणि हे दोन्ही विभाग मिळून चराचर सृष्टी बनते. सर्व प्रकारची जीवनकार्ये करण्याच्या दृष्टीने घडण किंवा रचना झालेल्या व्यक्तित्वाला जीव म्हणतात. वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव हे जीवांचे तीन मुख्य विभाग केले जातात.

वनस्पती : सर्वसाधारणपणे हरितद्रव्याचे अस्तित्व, कोशिकेच्या (पेशीच्या) दृढ भित्ती, विपुल दीर्घस्थायी क्रियाशील गर्भ ऊतक आणि चलनक्षमतेचा अभाव ही वनस्पतींची व्यवच्छेदक गुणवैशिष्ट्ये आहेत. केवळ सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने दिसू शकणाऱ्या सूक्ष्म वनस्पतींपासून ते निलगिरीसारख्या अतिशय उंच वनस्पती पृथ्वीवर आहेत. तसेच सूक्ष्म प्लवक वनस्पतींपासून ते वड व सेक्वोयासारख्या महाकाय वनस्पतीपर्यंतच्या असंख्य व विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. लक्षावधी जातींच्या वनस्पतींमुळे वनस्पतिसृष्टीमध्ये कमालीची विविधता आहे. वने, शेतातील पिके, वृक्ष, झुडपे, शोभिवंत वनस्पती, गवताळ प्रदेश, कुरणे, हिरवळी इत्यादींमुळे सामान्य माणसाला वनस्पतिसृष्टीचे वैविध्य परिचित आहे.

नेचे, शेवाळी, शैवले, कवके, प्लवक, यकृतका, शंकुमंत व पानझडी वृक्ष, सपुष्प व अपुष्प वनस्पती, बीजी व अबीजी वनस्पती, अपिवनस्पती, हरिता, सायकॅडे, गिंको, नीटमे, आमर (ऑर्किड) इ. वनस्पतींचे काही मुख्य प्रकार आहेत. [→ वनस्पति–२ वनस्पतींचे वर्गीकरण].

प्राणी : प्राण्यात हरितद्रव्य वा दृढ कोशिकाभित्ती नसतात. प्राण्याला जटिल कार्बनी पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. प्राण्यांची वाढ मर्यादित असते म्हणजे पूर्ण वाढ झाल्यावर नवीन अवयव निर्माण होत नाही. प्राणी चलनशील असून त्यांची संवेदनशीलता वनस्पतींपेक्षा पुष्कळच जास्त असते. प्राण्यांमध्येही खूप विविधता आहे. सामान्यपणे त्यांचे पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) असे दोन मुख्य गट करतात.

प्रोटोझोआ (आदिजीव), पोरिफेरा (स्पंज), सीलेंटेरेटा (हायड्रा, समुद्रपुष्प), प्लेटिहेल्मिंथिस (पृथुकृमी, पट्टकृमी, यकृतकृमी), नेमॅटोडा (सूत्रकृमी, जंत), ॲनेलिडा (जळू, नीरीज), आर्थ्रोपोडा (खेकडे, शेवंडे, सहस्रपाद, गोम, विंचू, कोळी, कीटक, गोचीड, माइट), मृदुकाय (गोगलगायी, शंखधारी व शिंपाधारी प्राणी), एकायनोडर्माटा (तारामीन, भंगुरतारा, समुद्री अर्चिन, सागरी काकडी), हेमिकॉर्डेटा (बॅलॅनोग्लॉसस), कॉर्डेटा (यूरोकॉर्डेट, लॅन्सलेट, पृष्ठवंशी), मत्स्यवर्ग, उभयचर (बेडूक, भेक, न्यूट, सॅलॅँमँडर), सरीसृप (सरडे, साप), पक्षी (चिमण्या, कावळे, कबुतरे, पोपट, मोर, गरुड), स्तनी वर्ग (देवमासे, मॅनॅटी, शिंशुक, वटवाघळे, नरवानर, श्वापदे, मानव) इ. विविध प्रकारचे असंख्य प्राणी आहेत. [→ पाणि प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग].


सूक्ष्मजीव : सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसू न शकणाऱ्या आणि संरचना व कार्य साधे असलेल्या असंख्य प्रकारच्या जीवांच्या मोठ्या गटाला सूक्ष्मजीव म्हणतात. सूक्ष्मजंतू, रिकेट्सीई, यीस्ट, बुरशी यांसारखी लहान ⇨ कवके, शैवले, आदिजीव (प्रोटोझून), विवादास्पद व्हायरस हे मुख्य सूक्ष्मजीव आहेत. सूक्ष्मजीवांना वनस्पती वा प्राणी म्हणणे अवघड असते. म्हणून कधीकधी त्यांचा जीवकण (प्रोटिस्ट) या नावाचा स्वतंत्र विभाग करतात. याचा अर्थ काही जीव वनस्पतीसारखे व काही प्राण्यासारखे आहेत. [→ सूक्ष्मजीवविज्ञान].

जीवसृष्टीविषयीची माहिती पृथ्वीपुरतीच मर्यादित आहे. तथापि, पृथ्वी व तिचे वातावरण यांच्याशिवाय विश्वात इतरत्र जीव असल्यास त्यांना पृथ्वीबाह्य जीवसृष्टी म्हणतात. पृथ्वीबाह्य जीवविज्ञानात या जीवांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास करण्याचे प्रयत्न होत आहेत. [→ विश्वातील जीवसृष्टि].

 

सृष्टीतील सौंदर्य व विनाश : सृष्टीमध्ये अनेक सुंदर व विनाशकारी घटना, आविष्कार व गोष्टी आढळतात. अशा काही निवडक गोष्टी पुढे दिल्या आहेत. देवयानी, सप्तर्षी व कन्या या तारकासमूहांतील सर्पिल ⇨ दीर्घिका, शामशबल तारकासमूहातील सर्पिल दीर्घिकांची जोडी व नरतुरंग तारकासमूहातील असाधारण दीर्घिका अतिशय सुंदर दिसतात. अंतर्गत स्फोटामुळे ताऱ्याची दीप्ती अचानकपणे प्रचंड वाढते आणि नवतारा निर्माण होतो. अशा प्रकारे दीप्तीमध्ये यापेक्षा दहा हजार पट वाढ झाल्यास त्या ताऱ्याला अतिदीप्त नवतारा म्हणतात. अवकाशातील नवतारा व अतिदीप्त नवतारा या आविष्कारांचे दर्शन सुंदर व डोळे दिपवून टाकणारे असते. या विनाशक आविष्कारातून अवशेषाच्या रूपात सुंदर ⇨अभ्रिका  निर्माण होतात. उदा., १०५४ सालाच्या अतिदीप्त नवताऱ्याचा अवशेष असलेली क्रॅब अभ्रिका. अन्य प्रकारेही सुंदर अभ्रिका निर्माण होतात. उदा., मृग नक्षत्रातील अश्वशीर्ष, वीणा तारकासमूहातील कंकणाकृती व हंस तारकासमूहातील विरल अभ्रिका तसेच वासुकी तारकासमूहातील बिंबाभ्रिका. कृष्णविवर ही अवकाशातील विनाशकारी म्हणता येईल अशी गोष्ट आहे. कारण कृष्णविवर जवळ येणाऱ्या प्रकाशासह सर्व लहानमोठ्या खस्थ पदार्थांना गिळंकृत करू शकते. आकाशगंगा या आपल्या दीर्घिकेचे विविध भाग सुंदर दिसतात. व्याध मित्र यांसारखे तारे तसेच सप्तर्षी, मृग इ. तारकासमूह सुंदर दिसतात.

सूर्यावरील तेजःशिखा, डाग, त्याचा किरीट वगैरेंचे दर्शन सुंदर तसेच उग्रही असते. सूर्याचे कंकणाकृती ग्रहण देखणे असते. शिवाय खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी पूर्ण ग्रासाच्या सुमारास दिसणारा हिऱ्याच्या अंगठीसारखा आविष्कार अविस्मरणीय असतो. सूर्यबिंबावरून होणारे बुध व शुक्र यांचे ⇨ अधिक्रमण  लक्षणीय असते. सूर्यकुलातील ग्रहांपैकी शनीची विलोभनीय कडी, लालसर मंगळ व शुक्राच्या कला हे सुंदर आविष्कार आहेत. चंद्राच्या कला, पूर्णबिंब, शीतल चांदणे व ग्रहण या परिचित सुंदर गोष्टी आहेत. क्षणभर चमकून जाणारी उल्कारेषा, चंद्राएवढ्या मोठ्या दिसणाऱ्या व कधीकधी स्फोटक रूप घेणाऱ्या अग्निगोल नावाच्या उल्का आणि विशिष्ट वेळी विविध तारकासमूहांतून आल्यासारखी वाटणारी उल्कावृष्टी हे आकाशातील सुंदर आविष्कार आहेत. मोठे अशनी पडून लहान भूकंप होतात अशा अशनिपाताने वा अशनिवृष्टीने झाडे पडल्याचे वा जळून गेल्याचे उल्लेखही आहेत. तसेच लोणार सरोवराचे विवर ही अशनिपाताची निर्मिती असल्याचे मानतात.

उत्तर वा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांत आकाशामध्ये अनेकदा वैशिष्ट्यपूर्ण बहुरंगी प्रकाश दिसतो. या सुंदर आविष्काराला ⇨ध्रुवीय प्रकाश म्हणतात. सूर्योदय व सूर्यास्त होताना आकाशात मनमोहक रंग दिसतात. त्या वेळी आकाशात ढग असल्यास या सौंदर्यात मोठी भर पडते. ढगांमधून येणारे प्रकाशकिरण हाही विलोभनीय आविष्कार असतो. तंतुस्तरी, तंतुराशी, मध्यस्तरी, मध्यराशी, वर्षास्तरी, गर्जन्मेघ इ. ढगांचे प्रकारही सुंदर निसर्गदृश्य असून त्यांच्यावर प्रकाश पडून ते अधिक सुंदर व रंगीबेरंगी दिसू शकतात. आकाशात क्षणभर चमकून जाणाऱ्या विजा सुंदर आकृती निर्माण करतात. मात्र असा तडिताघात विनाशकही ठरतो. हलक्या पावसाचा मंद शिडकावा सुखद वाटतो तर कोसळणारा मुसळधार पाऊस हानिकारक ठरू शकतो. ऊन-पावसाच्या एकत्र खेळात एकेरी व कधीकधी दुहेरी इंद्रधनुष्याचे दर्शन होते. ढगफुटीचा पाऊस नेहमीच विनाशकारी ठरतो. आळवाच्या पानांवरील थेंब मोत्याची आठवण करून देतात. सौम्य हिमवृष्टी आनंददायक ठरते, तर जोराची हिमवृष्टी वा हिमवादळ अनेक अडचणी निर्माण करते. करकापात (गारांचा वर्षाव) किंवा गारपीट हानिकारक ठरते.

 

पावसाचे जमिनीवर पडलेले पाणी ओढे, नाले व नद्या यांतून वाहताना त्याचा खळाळणारा तसेच शांत प्रवाहही नेत्रसुखद असतो तर अनिर्बंध प्रवाह पुराचे धोके निर्माण करतो. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, ॲमेझॉन, नाईल, काँगो, सिंधू, डॅन्यू व व्होल्गा यांसारख्या जीवनदायिनी नद्यांकाठी संस्कृती बहरली आहे. त्या उग्र रूपही धारण करतात. ह्‌वांग हो नदी चीनमध्ये सपाट प्रदेशातून वाहताना मोठ्या प्रमाणात गाळ साचून तिचा प्रवाह बदलल्याने खूप नुकसान होते, म्हणून तिला ‘अश्रूंची नदी’ नाव पडले. कधीकधी दामोदर नदीला ‘बंगालचे अश्रू’ म्हटले जाते. विशेषत: उपहिमालयाच्या भागात भूमिपाताने नद्या अडविल्या जाऊन तात्पुरती सरोवरे बनतात व ती फुटून हानी होते. नद्यांमुळे प्रपात, धबधबे, कुंभगर्त, दऱ्या, सरोवरे, घळी व त्रिभुज प्रदेश यांसारख्या सुंदर गोष्टी निर्माण होतात. शिवसमुद्रम्, गिरसप्पा व गोकाक (कर्नाटक), दूधसागर (गोवा), ठोसेघर (महाराष्ट्र), टीअर्स ऑफ ग्लेन (नॉर्दर्न आयर्लंड), योसेमाइट व यलोस्टोन (अमेरिका), एंजेल (व्हेनेझुएला), व्हिक्टोरिया (ऱ्होडेशिया-झँबिया), नायगारा (अमेरिका-कॅनडा) इ. परिचित धबधबे सुंदर आहेत. तेथे पर्यटनस्थळे निर्माण झाली असून काही ठिकाणी धबधब्यापासून वीजनिर्मिती होते. सरोवरांमुळेही सृष्टीच्या सौंदर्यात भर पडते. सुपीरिअर (अमेरिका-कॅनडा), बैकल (रशिया), मान (तिबेट-चीन), दल (श्रीनगर), चिल्का (ओरिसा), लोणार (बुलढाणा), वेण्णा (महाबळेश्वर), कास (सातारा) ही काही परिचित सरोवरे होत.

 

भूमध्य, उत्तर, बाल्टिक, काळा, एड्रिॲटिक, कॅरिबियन, अरबी इ. समुद्र, बंगालचा उपसागर तसेच पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, आर्क्टिक महासागर यांचा मिळून बनलेला जागतिक महासागर ही पृथ्वीची सुंदर वैशिष्ट्ये आहेत. महासागरांच्या द्रोणी, समुद्रकिनारे, पुळणी, खंडफळी, खंडीय उंचवटा, मध्यस्थ महासागरी पर्वतश्रेणी, सागरी पर्वत, खंदक, बेटे, गियो (सागरी पठारे), प्रवाळद्वीपे व प्रवाळभित्ती, अगाधीय टेकड्या व मैदाने, तळसरी, बांध, आखाते, भूशिरे, दांडे, गर्त, भाट, गाढ प्रदेश ही महासागरातील भूमिस्वरूपे सृष्टीतील चमत्कार आहेत. खारकच्छ, भरती-ओहोटी व सागरी लाटा या सृष्टिसौंदर्यात भर टाकणाऱ्या तसेच काही वेळा हानिकारक ठरणाऱ्या गोष्टी आहेत.


पर्वत, दऱ्या, खचदऱ्या, हिमनद्या, नद्या, त्रिभुज प्रदेश, वाळवंटे इ. भूमिस्वरूपांमुळे अवकाशातून पृथ्वी अतिशय सुंदर दिसते. घड्या पडून बनलेले, ठोकळ्या, घुमटी, ज्वालामुखी व अवशिष्ट या प्रकारचे विविध आकारांचे पर्वत, त्यांच्यावरील सुंदर वनश्री व हिमाच्छादित शिखरे यांच्यामुळे निसर्गसौंदर्य वाढते आणि पर्यटन व क्रीडा यांना चालना मिळते. उदा., हिमालय, सह्याद्री, विंध्य, सातपुडा, रॉकी, अँडीज, आल्प्स इत्यादी. डोंगरातील वा पर्वतांमधील लांबट, अरुंद व खोल दऱ्या, त्यांतील वनस्पती व जलप्रवाह यांमुळे त्या प्रदेशांचे सौंदर्य वाढते. विशिष्ट काळात सर्वत्र फुलांचा सडा पडल्यासारखी दिसणारी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उदा., काश्मीर) व पठारे (उदा., कास) ही खास सौंदर्यस्थळे आहेत.

 

काही प्रदेशांत नद्यांमुळे अतिशय खोल व अरुंद घळी म्हणजे कॅन्यन निर्माण होतात. कोलोरॅडो नदीची ३०० किमी.हून लांब व २·५ किमी.पर्यंत खोल ग्रँड कॅन्यन जगप्रसिद्ध आहे. महाबळेश्वरच्या ईशान्येस कृष्णेच्या उगमप्रवाहांनी कातळात ७०० मी. खोल कोरलेली घळ, गढवाल हिमालयातील भागिरथी नदीची निदरी आणि हिमालयातील सिंधू नदीची खोल कॅन्यन प्रेक्षणीय आहेत.

 

नदी समुद्राला मिळते त्या भागात समुद्राच्या पाण्याचा नदीला विरोध होतो आणि तेथे खूप गाळ साचतो. नंतर नदीचा मंद प्रवाह अनेक शाखांनी समुद्रास मिळून त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. त्रिभुज प्रदेशांमुळे नवीन व सुपीक जमीन तयार होते. अशा भागात मोठी शहरे वसतात आणि बंदरे तयार होतात. 

भूसांरचनिक हालचालींमुळे भूकवचाचा मोठा भाग सामान्य पातळीच्या खाली खचून खंदकासारखी मोठी ⇨खचदरी  तयार होते. ओवेन्स दरी (कॅलिफोर्निया), जॉर्डन नदीचे खोरे आणि ऱ्हाइन नदीची खचदरी या प्रसिद्ध खचदऱ्या असून बैकल व टांगानिका ही सरोवरे अशा दऱ्यांमुळे समुद्रसपाटीपेक्षा खोल आहेत.

हिमनदीमुळे नदीपेक्षा अधिक झीज होऊन हिमगव्हरे, प्रशिखा, यू आकाराच्या व लोंबत्या दऱ्या, धबधबे, एस्कर (फिनलंड), ड्रमलीन, रोश मूतानी यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण निसर्गशिल्पे तयार होतात. कुंबा (हिमालय), सुसिस्मा व मालेस्पिना (अलास्का), ऱ्होन (आल्प्स), माइल्स या काही हिमनद्या आहेत.

पृथ्वीवरील वाळवंटे शुष्क, ओसाड व वालुकामय प्रदेश आहेत. त्यांत आडवे, अवग्रहकारी, पिरॅमिड, घुमटाकार, तारकाकार व अर्धचंद्राकार सुंदर वालुकागिरी तयार होतात. वाऱ्याने होणाऱ्या झिजेमुळे एकमेकींवर रचल्यासारख्या दिसणाऱ्या शिळा म्हणजे टॉर (मंगळूर, कर्नाटक) व मशरुम खडक (नॉर्वे) आढळतात. खडकाळ (हामाडा) व वालुकामय (अर्ग) ही वाळवंटी भूमिरूपे आढळतात. सहारा, अरेबियन, आटाकामा, ऑस्ट्रेलियन, पॅरागोनिया, सनॉरा, तुर्कस्तान, गोबी ही उष्ण वा कोरडी वाळवंटे आणि उ. अमेरिका व यूरेशियाचा उत्तरेचा अतिशीत पट्टा (टंड्रा), ग्रीनलंड ही थंड वाळवंटे मानतात. कारण हे निर्जन व वनस्पतिवृद्धीस अयोग्य प्रदेश आहेत. भारतात थर, कच्छ, राजस्थान इ. भागांत वाळवंटी प्रदेश आहेत.

भूकवचात कोणत्या तरी कारणाने क्षोभ उत्पन्न होऊन खडकांना अचानक धक्के बसल्याने कंपने निर्माण होऊन सभोवार पसरतात. याला भूकंप म्हणतात. उदा., कोयनानगर, लातूर, कच्छ इ. ठिकाणी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भूकंप झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भूकंपामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या त्सुनामी लाटा दीर्घ अंतरापर्यंत जातात आणि अनेकदा त्यांच्यामुळे अपरिमित हानी होते.

भूपृष्ठाला भेग वा नलिकाकार भोक पडून त्यातून स्फोटक वायूचा लोट, राख व तप्त शिलारस बाहेर फेकला जाणे म्हणजे ज्वालामुखी उद्रेक होय. किलाउआ (हवाई), व्हीस्यूव्हिअस (इटली), पारीकूटीन (मेक्सिको), माँ पले (वेस्ट इंडीज) व फूजियामा (जपान) हे काही प्रसिद्ध ज्वालामुखी होत. ज्वालामुखीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते. उदा. इटलीतील पाँपेई हे संपूर्ण शहर २४ ऑगस्ट ७९ रोजी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकामुळे ४·६ मी. खोल गाडले गेले. तसेच १९१४ मध्ये साकुराजिमा (जपान) ज्वालामुखी उद्रेकात एक शाळा ज्वालामुखीतील राखेखाली गाडली गेली होती. ज्वालामुखीमुळे नवीन पर्वत व भूकवच तयार होते, सुंदर बेटे निर्माण होतात व जमिनीला पोषक घटक मिळतात. तसेच ज्वालामुखी विवरातील सरोवरे, शूल, गिरदी लाव्हा, धूपमुखे, उन्हाळी, गायझरे, पाण्यावर तरंगणारा पमीस खडक इ. तयार होतात. अलास्कातील दशसहस्त्र धूपमुख दरी सुंदर धूपमुखांसाठी प्रसिद्ध आहे. माँ पले ज्वालामुखीचा शूल व क्वीबेकच्या (कॅनडा) उत्तरेस ३ किमी. व्यासाचे सुंदर वर्तुळाकार ज्वालामुखी विवर प्रेक्षणीय आहे. गायझर या नैसर्गिक कारंजामधून नियमित किंवा अनियमित कालावधीने गरम पाणी स्फोटाने वा जोराने कारंजाप्रमाणे ५० मी. उंचीपर्यंत बाहेर पडते. आइसलँड व न्यूझीलंडमध्ये अनेक गायझरे आहेत. अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये शंभराहून अधिक गायझरे असून त्यांपैकी ओल्ड फेथफुल या गायझऱ्यातून सु. दर तासाने ५ मिनिटांपर्यंत गरम पाणी ३०–५० मी. उंच उडत राहते. महाराष्ट्रातील वज्रेश्वरी, पाली, महाड, राजेवाडी, खेड, संगमेश्वर, राजापूर, उनवरे, टाकेद, कळवण, शहादे व उनपदेव येथील उन्हाळी प्रसिद्ध आहेत. धूपमुखे, उन्हाळी व गायझरे यांतून मिळणारे गरम पाणी आणि वाफ अनेक ठिकाणी वीजनिर्मिती, इमारती उबदार ठेवणे, रासायनिक उद्योग, रोगोपचार इत्यादींसाठी वापरतात.


क्वॉर्ट्‌झ, हिरा, माणिक, पाचू, नील इ. रत्नांचे सुंदर व विविधरंगी स्फटिक, झिओलाइटांचे सुंदर स्फटिकसमूह, नॉर्दर्न आयर्लंडमधील खडकांच्या स्तंभांचा तयार झालेला जायंट्स कॉजवे, राजस्थानात चितोडगढ येथील सुकेत शेल खडकांतील चौकोनी संधी, न्यूझीलंडमधील वैपा धरणालगतचे खडकांतील स्तंभाकार संधी, अश्मीभूत वनाचे उद्यान (ॲरिझोना), असंख्य प्राण्यांचे सुंदर जीवाश्म, जीवाश्मरूप झालेल्या सुंदर भूमितीय आकार निर्माण करणाऱ्या चिखलातील भेगा, अंबरमध्ये टिकून राहिलेले कीटकांचे जीवाश्म, निरनिराळ्या ठिकाणच्या (उदा., शेदार) गुहांमधील चुनखडीचे स्तंभ, झुंबरे व पडदे, उटामधील रेनबो व व्हर्जिनियातील नैसर्गिक पूल, खडकांवरील तरंगचिन्हे तसेच वनस्पतींच्या पानाफुलांचे शिलाभूत ठसे वगैरे असंख्य सुंदर, आश्चर्यकारक व चमत्कार वाटतील अशा गोष्टी सृष्टीत आहेत.

जीवसृष्टीमुळेही सृष्टिसौंदर्यात भर पडत असते. वने, वनश्री, गवताळ प्रदेश, कुरणे, भूछत्रे, पाण्यातील वनस्पती व कीटकभक्षी वनस्पती हे सृष्टिसौंदर्याचे घटक आहेत. रंग, आकार, आकारमान, अग्र, कडा, देठ इ. बाबतीत पानांमध्ये खूप विविधता असल्यामुळे ती सुंदर दिसतात. फुलांमध्येही अशाच प्रकारचे वैविध्य आढळते. गुलाब, लिली, ट्यूलिप, केशर, कोरांटी, बोगनवेल, झेंडू, जास्वंद, शेवंती, पावडर पफ, बिगोनिया, कमळ, कृष्णकमळ, पान्सी, थिसल, मे फ्लॉवर, सर्पगंधा, ऱ्होडोडेंड्रॉन, गुलमोहोर, दारुहळद इ. असंख्य सुंदर फुले आहेत. फळे विविधरंगी, भिन्न आकार व आकारमानांची असल्याने सुंदर दिसतात. उदा., जांभूळ, आंबा, स्ट्रॉबेरी, रासबेरी, सप्ताळू, लिची, खजूर, चेरी, टोमॅटो, अलुबुखार, द्राक्षे, संत्रे इत्यादी.

प्राण्यांच्या बाबतीतही आकार, आकारमान, रंग, रूप, वर्तन इत्यादींमध्येही मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. व्हाइसरॉय, झीब्रा, जायंट मॉनर्क, अपोलो, रेड ॲडमिरल, जंगल किंग, कॉमन कॉपर, कॉमन बर्ड विंग, कैसर-इ-हिंद, कॉमन पीकॉक ही सुंदर फुलपाखरे हंस, कुरव, दर्वीमुख, फ्लेमिंगो, कोंबडा, ॲल्बट्रॉस, हपू, खंड्या, पाणकोंबडी, मोर (पिसारा), शिखाधारी व सोनेरी गरुड, ऑस्प्रे, बर्ड ऑफ पॅराडाइज (शेपट्या), पोपट, काकाकुवा, सूर्यपक्षी, चातक, बुलबुल, पेंग्विन, वीणा, तांबट, दयाळ, हळदी, तितर, हमिंग बर्ड, हिरवा पारवा, धनेश इ. सुंदर पक्षी व त्यांची पिसे ट्यूना, सी ड्रॅगन, गाय मासा, घोडा मासा, ब्ल्यू गिल, सागरी पर्च, टुकमेन, डॉल्फिन, सामन, कॉड, तांबूसा, शार्क इ. अनेक जलचर प्राणी भुंगेरे, कीटक, वाघ, सिंह, चित्ता, मांजर, कुत्रा, झीब्रा, माकड, उंट, गाय, बकरी, मेंढी, कृंतक प्राणी, सरडे, साप, खार, याक, मुंगूस, मगर, कासव, बेडूक इ. असंख्य प्राणी सृष्टिसौंदर्यात भर घालतात मात्र काही प्राणी हानिकारकही आहेत. उदा., काही कीटक, उंदीर, श्वापदे वगैरे. आकार, आकारमान, कलाकुसर, रंग इत्यादींच्या बाबतींत खूप विविधता असणारी प्राण्यांची कवचे उदा., शंख, शिंपले, नॉटिलस, शाळीग्राम वगैरे.

थोडक्यात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व क्वार्क यांसारखे अणूपेक्षा सूक्ष्म ते दीर्घिकांच्या बृहत्‌समूहासारखे अतिप्रचंड घटक असलेली सृष्टी अनादि-अनंत वाटते. या घटकांची आणि एकूणच समग्र सृष्टीची निर्मिती, स्थिती व लय विशद करणारे निरनिराळे सिद्धांत व ते सूचित करणाऱ्या प्रतिकृती पुढे आल्या आहेत. पृथ्वीवरील अतिसूक्ष्म ते महाकाय जीवांमुळे सृष्टी सुंदर व वैविध्यपूर्ण बनलेली आहे तसेच सृष्टीत विविध प्रकारच्या अनेक विनाशक गोष्टीही आहेत. अशा प्रकारे सृष्टी जेवढी रौद्र व भीषण आहे, तेवढीच ती जीवनदायिनी व नितांत सुंदरही आहे. (चित्रपत्रे).

पहा : विश्वस्थितिशास्त्र विश्वोत्पत्तिशास्त्र.

ठाकूर, अ. ना.


नरतुरंग तारकासमूहातील ढगासारखी भासणारी लॅगून अभ्रिकाएआर्‌पी २७३ दीर्घिका : 'नासा'ने हबल दूरदर्शकातून टिपलेले छायाचित्र.निसर्गसुंदर पृथ्वी : अपोलो-११ अवकाशयानाने चंद्राजवळून घेतलेले छायाचित्र.उत्तर ध्रुवीय प्रकाश : पृथ्वीच्या ध्रुवप्रदेशातील आकाशात दिसणारा एक वैशिष्ट्यपूर्ण निसर्गाविष्कार.ग्रँड कॅन्यन, ॲरिझोना राज्य, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. विनाशकारी घूर्णवाती वादळाचे एक दृश्य


भीमपंखी : भारतातील सर्वांत मोठे फुलपाखरूस्वयंप्रकाशी काजवा : प्राणिजन्य जीवदीप्तीचे एक उदाहरण.लांब जिभेने नाकतोड्याला पकडणारा वैशिष्ट्यपूर्ण सरडगुहिराटॅरँट्युला : बेडूक, उंदीर, पंक्षी इत्यादींवर उपजीविका करणारा कोळी.मेंढीपेक्षा लहान, ५३ सेंमी. उंचीचा प्रौढ घोडा.

जगातील सर्वांत कमी उंचीचा पुरुष (५४.६ सेंमी.) व स्त्री (६२.८ सेंमी.).लाल भोपळा, वजन २२३ किग्रॅ.

२५३ सेंमी. उंचीचा प्रौढ पुरुषतीन महिन्यांपेक्षा कमी काळात ३० मी. उंच राढणारा बांबू