सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण : कोणत्याही वस्तूंची, घटनांची अथवा तत्त्वांची तसेच वनस्पती, प्राणी, व्हायरस व सूक्ष्मजंतू यांसारख्या जीवांची त्यांच्यामधील साम्ये आणि भेद यांच्यावर आधारलेली गटवारी करणे म्हणजे वर्गीकरण करणे होय. या वैविध्यपूर्ण गोष्टी लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने अशी वर्गवारी करतात. व्यापक अर्थाने असे वर्गीकरण करण्याच्या, परंतु नेमकेपणे जीवविज्ञान विषयक वर्गीकरणाच्या अभ्यासाला वर्गीकरणविज्ञान (टॅक्सॉनॉमी) म्हणतात. हा विषय सहजपणे लक्षात यावा म्हणून सुरुवातीला सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाची आणि नंतर त्याविषयीच्या अभ्यासाची (वर्गीकरणविज्ञानाची) माहिती दिली आहे. [→ प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरण वर्गीकरणविज्ञान].
विश्वात असंख्य प्रकारचे सूक्ष्मजंतू आहेत, ते ओळखता येण्यासाठी त्यांचे नामकरण करतात. सूक्ष्मजंतूंची नावे ठेवण्यासाठी त्यांच्यामधील समान गुणधर्मांचे वा गुणवैशिष्ट्यांचे संकलन वा एकत्रीकरण करतात. नंतर त्यांचे विभाग, वर्ग, गण, कुले, प्रजाती व जाती यांसारख्या गटात वर्गीकरण करतात. प्राणी व वनस्पती यांच्या वर्गीकरणाची पद्धत पुष्कळच सोपी आहे. कारण त्यांच्या आकारमानांवरून त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे संकलन सहजपणे करता येते व स्वाभाविक रीतीने त्यांचे वर्गीकरण होऊ शकते. त्या वर्गीकरणावरून त्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) समजण्यास अडचण पडत नाही. याउलट सूक्ष्मजंतूंच्या बाबतीत क्रमविकास आकारमानावरून ठरविता येत नाही. सर्वसाधारणपणे त्यांचा क्रमविकास अनुमानावरूनच ठरविला जातो, म्हणूनच त्यांचे वर्गीकरण स्वाभाविक असे होत नाही. असे असले तरी सूक्ष्मजंतूंच्या गुणवैशिष्ट्यांवरूनच कृत्रिम रीतीने त्यांचे वर्गीकरण करतात. त्यामुळे सूक्ष्मजंतूंच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करावा लागतो. सूक्ष्मजंतूंचा आकार, चलनक्षमता, निरनिराळ्या पर्यावरणांमधील (उदा., वायुजीवी व अवायुजीवी) बीजुकनिर्मिती (लाक्षणिक प्रजोत्पादक भागाची निर्मिती) यांसारख्या गुणधर्मांवरून सूक्ष्मजंतूंची गुणवैशिष्ट्ये समजतात. हे गुणधर्म स्थिर स्वरूपाचे किंवा कायम आढळणारे असतात, म्हणजे त्यांच्यात क्वचितच बदल होतो.
सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण करताना अनेक अडचणी येतात. नवीन सूक्ष्मजंतू संवर्धकावर वाढविला गुणधर्मांवरून त्याचे नामकरण केले आणि वर्गीकरणातील त्याचे स्थान निश्चित केले, तर यात वावगे काहीच नाही. मात्र संवर्धकावरील त्याची वाढ नष्ट झाली किंवा काळजीपूर्वक ठेवली गेली नाही, तर दुसऱ्या सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञाला तुलना करून पाहण्यासाठी अथवा त्याच्या गुणधर्मांचा पडताळा घ्यावयाचा असल्यास तो सूक्ष्मजंतू उपलब्ध असणार नाही. अशा प्रकारे त्याला या सूक्ष्मजंतूबद्दलच्या उपलब्ध असलेल्या माहितीवरच अवलंबून राहावे लागेल. शिवाय कधीकधी सूक्ष्मजंतूंचे हे नामकरण व सूक्ष्मजंतूंच्या गुणधर्मांचे वर्णन गोंधळात टाकण्यासारखे असते. यांशिवाय काही सूक्ष्मजंतूंच्या बाबतीत वर्गीकरणाच्या नियमांचे उल्लंघन झालेलेही आढळते. सूक्ष्मजंतूंचे काही गुणधर्म कायमस्वरूपाचे असतातच असे नाही, म्हणजे त्यांच्यात नंतर बदल झालेलेही आढळतात. काही सूक्ष्मजंतूंना नावे दिलेली आहेत. मात्र दुसऱ्या सूक्ष्मजंतूंना तीच नावे दिलेली दिसतात. याचा अर्थ भिन्न सूक्ष्मजंतूंची नावे एकच असलेली आढळतात. तसेच जंबुपार किरणांमुळे सूक्ष्मजंतूंमध्ये उत्परिवर्तन होते, म्हणजे त्यांच्या जनुकांमध्ये किंवा गुणसूत्रात यदृच्छया एखादी चूक वा बिघाड (बदल) घडून येतो. याचा अर्थ त्यांच्या जननिक सामग्रीत गुणात्मक किंवा राश्यात्मक बदल वा फेरमांडणी होऊन त्यांची गुणवैशिष्ट्ये आमूलाग्र बदलू शकतात [→ उत्परिवर्तन]. अर्थात अशा अडचणी असल्या, तरी सर्वसाधारणपणे सूक्ष्मजंतूंची बहुतेक गुणवैशिष्ट्ये कायम स्वरूपाची असून तसे गृहीत धरूनच त्यांचे वर्गीकरण करतात. असे वर्गीकरण सर्वमान्य झाले आहे.
वर्गीकरणाच्या पद्धती : सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाची पद्धत प्रथम ⇨ फेर्डिनांट यूलिउस कोन यांनी त्यांच्या आकारवैज्ञानिक (आकार व रचना यांसंबंधीच्या) अभ्यासावरून शोधून काढली. मात्र फक्त आकारवैज्ञानिक अभ्यास हा सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाचा अपूर्ण पाया ठरेल, असे त्यांनी निदर्शनास आणले. कारण समान आकाराच्या सूक्ष्मजंतूंची शरीरक्रियावैज्ञानिक आणि जीवरासायनिक गुणवैशिष्ट्ये परस्परांपासून भिन्न असू शकतात असेही त्यांच्या प्रथम लक्षात आले होते. त्या काळातील ते सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाचे आघाडीवरील अभ्यासक होते. नंतर १८९७ व १९०९ या सालांमध्ये या पद्धतीत सुधारणा होऊन सूक्ष्मजंतूंच्या आधुनिक वर्गीकरण पद्धतीचा पाया घातला गेला. या पद्धतीत सूक्ष्मजंतूंचे आकार, रचना, ग्रॅम-अभिरंजन, चलनक्षमता, बीजुक-निर्मिती, कोशिकांतर्गत (पेशी-अंतर्गत) क्रिया, जीवरासायनिक क्रिया इ. गुणवैशिष्ट्यांचा उपयोग करतात. या निरनिराळ्या गुणवैशिष्ट्यांची उपयुक्तता आणि त्यांचा अंतर्भाव करण्यातील अडचणी लक्षात घेऊन वर्गीकरणाच्या या पद्धतीबद्दल साधकबाधक चर्चा झाली. अमेरिकेतील सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांच्या समितीने वनस्पतींच्या वर्गीकरणाचे नियम लक्षात घेऊनच सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण केले. हे वर्गीकरण बर्गीज मॅन्युअल ऑफ सिस्टिमॅटिक बॅक्टिरिऑलॉजी या पुस्तकात १९२३ मध्ये प्रसिद्ध झाले. या वर्गीकरणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. नंतर वरचेवर याच्या सुधारित आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. सर्व जगात सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाची एकच व योग्य पद्धती अनुसरली जावी म्हणून १९४७ मध्ये सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय समितीने सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाचे नियम संमत केले. हे नियम सदर पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीमध्ये १९५७ मध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या आवृत्तीत दिलेली सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाची पद्धती त्याची पुढील आवृत्ती प्रसिद्ध होईपर्यंत आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली पद्धती मानतात.
वर्गीकरण पद्धतीची तत्त्वे : साधारणपणे प्रत्येक सूक्ष्मजंतूला सामान्यत: रूढ असलेले आणि आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले अशी दोन नावे असतात. यांपैकी सामान्य नावावरून सूक्ष्मजंतूच्या विशिष्ट गुणाचीच माहिती फक्त मिळते. उदा., क्षयरोगकारक सूक्ष्मजंतू. सामान्य नावावरून सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरणातील स्थान कळत नाही. आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या शास्त्रीय नावावरून सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरणातील स्थान म्हणजे त्याचे कुल, प्रजाती व जाती इत्यादींची माहिती मिळते. सूक्ष्मजंतूंचे शास्त्रीय नाव द्विनाम किंवा द्विपदनाम पद्धतीनुसार देतात. ही पद्धती ⇨ कार्ल लिनीअस या स्वीडिश निसर्गवैज्ञानिकांनी स्पीशिज प्लँटरॅम (१७५३) या आपल्या ग्रंथात वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी प्रथम वापरली. ही पद्धती सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणासाठीही उपयुक्त ठरली. या पद्धतीनुसार प्रत्येक सूक्ष्मजंतूची एक जाती मानली असून प्रत्येक जातीत सूक्ष्मजंतूचे नाव दोन शब्दांचे (पदांचे) असते. यांपैकी पहिल्या शब्दाने सूक्ष्मजंतूची प्रजाती किंवा वंश समजतो आणि दुसरा शब्द त्या सूक्ष्मजंतूच्या जातीचा निदर्शक असतो. प्रजाती दर्शविणारा शब्द हे नाम असून तो बहुधा लॅटिन भाषेतील शब्द असतो. कारण त्या काळात लॅटिन हीच बहुसंख्य सुशिक्षितांची भाषा होती. कधीकधी प्रजातीसाठी ग्रीक शब्दही वापरतात. जातिवाचक शब्द नाम किंवा प्रजातीचे विशेषण वा क्रियाविशेषण असतो. कित्येकदा जातीतही उपजाती (जातिका) व वाण अशी विभागणी केलेली असते. प्रथमच नमूद केलेल्या व गुणवैशिष्ट्यांचे वर्णन दिलेल्या जातीला प्ररूप जाती म्हणतात. जातींची सम गुणवैशिष्ट्ये एकत्रित केल्याने प्रजाती बनते. प्रजातींचे समगुण एकत्रित केल्याने कुल तयार होते. याच प्रकारे कुलांचे गण, अनेक गणांचे वर्ग, अनेक वर्गांचे संघ आणि शेवटी सृष्टी असे वर्गीकरण होते. दुधात आढळणाऱ्या सूक्ष्मजंतूचे वर्गीकरण यानुसार पुढीलप्रमाणे करता येते : सृष्टी-वनस्पती, उपसृष्टी-अपुष्प वनस्पती, विभाग-थॅलोफायटा (कायक वनस्पती विभाग, कोशिकामय व अवयवरहित), उपविभाग-हरितद्रव्यरहित, वर्ग-सिझोंमायसीटीज (संवर्धन विभाजनाने), गण-यूबॅक्टेरिएलीझ, कुल-लॅक्टोबॅसिलेसी, प्रजाती-स्ट्रेप्टोकॉकस, जाती-लॅक्टिस.
सूक्ष्मजंतूच्या जातीचे संशोधन करून तिच्या गुणवैशिष्ट्यावरून तिचे नामकरण करतात. जातीच्या शास्त्रीय नावापुढे नामकरण करणाऱ्या संशोधकाचे संक्षिप्त नाव लिहिण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर ज्या शास्त्रीय लेखनात या जातीचे वर्णन प्रसिद्ध झाले आहे, त्याचाही त्रोटक संदर्भ देतात. कित्येक वेळा जाती किंवा प्रजाती चुकीची दिलेली असल्याचे आढळल्यास तिचे नवीन नामकरण करतात आणि त्याच्यापुढे मूळ संशोधकाचे नाव कंसात देऊन त्यानंतर नवीन संशोधकाचे नाव देतात.
वर्गीकरणाच्या या पद्धतीमुळे इतर सूक्ष्मजंतूंच्या प्रसिद्ध केलेल्या गुणवैशिष्ट्यांवरून अज्ञात सूक्ष्मजंतूचा अभ्यास व संशोधन करण्यास मदत होते. त्यावरून त्याचे वर्गीकरणातील स्थान म्हणजे कुल, प्रजाती, जाती इ. काढता येतात. अशा प्रकारे त्याचे निसर्गातील अस्तित्व कळण्यास मदत होते. अशा वर्गीकरणामुळे निरनिराळ्या प्रजातींतील तसेच कुलांमधील कोशिकाक्रियाही समजतात.
निसर्गात आढळणाऱ्या सूक्ष्मजंतूंचे परस्परांशी असलेले नातेसंबंध समजण्यासाठी त्यांच्या ⇨ आनुवंशिकीचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. कारण ही तपशीलवार माहिती उपलब्ध होईपर्यंत सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण तात्पुरत्या स्वरूपाचेच राहणार आहे. मात्र तूर्त हीच वर्गीकरण पद्धती उपलब्ध असल्याने तिचा सर्वत्र वापर करतात. १९५० च्या सुमारास सूक्ष्मजंतूंच्या अंदाजे १,५०० जातींचा अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण केले होते. या वर्गीकरण पद्धतीत दिलेल्या गुणवैशिष्ट्यांच्या वर्णनावरून नव्याने संवर्धित केलेल्या सूक्ष्मजंतूचा अभ्यास व नामकरण करता येते आणि वर्गीकरणात त्याचे स्थान ठरविता येते. १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बर्गीज मॅन्युअल ऑफ सिस्टिमॅटिक बॅक्टिरिऑलॉजी या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाचा कुले व प्रजाती यांसह असलेला आराखडा पुढीलप्रमाणे दिलेला आहे. ह्या नियमपुस्तिकेमध्ये वेळोवेळी नवनवीन भर पडत गेली. त्यानंतर ह्या विज्ञानशाखेत झालेल्या वेगवान प्रगतीमुळे ती माहिती ग्रंथित करून नवे नियमपुस्तिका (मॅन्युअल) तयार करणे कठीण झाले. १९८५ मध्ये ती नियमपुस्तिका ४ खंडांत प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पहिला खंड १९८९ मध्ये प्रसिद्ध झाला. पुढील खंड २-३ वर्षांच्या अंतराने प्रसिद्ध झाले. २००१ मध्ये ह्या खंडाची दुसरी सुधारित आवृत्ती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. ही आवृत्ती ५ खंडांची असून त्यातील दुसऱ्या खंडात ३ उपखंड आहेत. प्रसिद्ध होणाऱ्या पाचव्या खंडाबरोबर सात विभागांत वर्गीकरण केलेले आराखडेही उपलब्ध होणार आहेत.
सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण
वर्ग – सिझोमायसीटीझ
. गण – स्यूडोमोनेडेली
. उपगण – ऱ्होडोबॅक्टिरिनी
. कुले – थायोऱ्होडेसी
. ॲथिओऱ्होडेसी
. क्लोरोबॅक्टिरिएसी
. उपगण – स्यूडोमोनेडिनी
. कुल – नायट्रोबॅक्टिरिएसी
. प्रजाती – नायट्रोसोमोनस
. नायट्रोसोकॉकस
. नायट्रोसोस्पिरा
. नायट्रोसोसिस्टीस
. नायट्रोसोग्लिआ
. नायट्रोबॅक्टर
. नायट्रोसिस्टीस
. कुल – मिथॅनोमोनेडेसी
. प्रजाती – मिथॅनोमोनस
. कुल – थिओबॅक्टिरिएसी
. प्रजाती – थिओबॅक्टिरियम
. थिओबॅसिलस
. कुल – स्यूडोमोनेडेसी
. प्रजाती – स्यूडोमोनस
. झँथोमोनस
. ॲसिटोबॅक्टर
. कुल – कॉलोबॅक्टिरिएसी
. प्रजाती – कॉलोबॅक्टर
. कुले – सायडरोकॅप्सेसी
. स्पायरील्लेसी
. प्रजाती – व्हिब्रिओ
. स्पायरिलम
. गण – क्लॅमीडोबॅक्टिरिएलीझ
. कुले – क्लॅमीडोबॅक्टिरिएसी
. पेलोप्लॉकॉसी
. क्रेनोट्रिकॉसी
. गण – हायफोमायक्रोबिएलीझ
. कुल – हायफोमायक्रोबिएसी
. गण- यूबॅक्टिरिएलीझ
. कुल – ॲझोटोबॅक्टिरिएसी
. प्रजाती – ॲझोटोबॅक्टर
. कुल – ऱ्हायझोबिएसी
. प्रजाती – ऱ्हायझोबियम
. ॲग्रोबॅक्टिरियम
. कुल – ॲक्रोमोबॅक्टिरिएसी
. प्रजाती – अल्कॅलीजिनीस
. ॲक्रोमोबॅक्टर
. फ्लॅव्होबॅक्टिरियम
. कुल – एंटेरोबॅक्टिरिएसी
. उपकुल – एश्चेरिकीई
. प्रजाती – एश्चेरिक्रिया
. ॲरोबॅक्टर
. क्लेबसिएल्ला
. उपकुल – एर्विनीई
. प्रजाती – एर्विनिया
. उपकुल – सिरेटीई
. प्रजाती – सिरॅटिया
. उपकुल – प्रोटीई
. प्रजाती – प्रोटियस
. उपकुल – साल्मोनेली
. प्रजाती – साल्मोनेल्ला
. शिगेला
. कुल – ब्रूसेल्लासी
. प्रजाती – पाश्चुरेला
. ब्रूसेल्ला
. हीमोफायलस
. कुल – बॅक्टिरॉयडेसी
. कुल – मायक्रोकॉकेसी
. प्रजाती – स्टॅफिलोकॉकस
. कुल – नायसेरिएसी
. प्रजाती – नायसेरिया
. कुल – लॅक्टोबॅसिलेसी
. उपकुल – स्ट्रेप्टोकॉकेसी
. प्रजाती – स्ट्रेप्टोकॉकस
. ल्युकोनोस्टॉक
. उपकुल – लॅक्टोबॅसिली
. प्रजाती – लॅक्टोबॅसिलस
. कुल – प्रोपिऑनीबॅक्टिरिएसी
. कुल – कॉरीनिबॅक्टिरिएसी
. प्रजाती – कॉरीनिबॅक्टिरियम
. कुल – बॅसिलेसी
. प्रजाती – बॅसिलस
. क्लॉस्ट्रिडियम
. गण – ॲक्टिनोमायसीटेलीझ
. कुल – मायक्रोबॅक्टिरिएसी
. प्रजाती – मायक्रोबॅक्टिरियम
. कुल – ॲक्टिनोमायसीटेसी
. प्रजाती – ॲक्टिनोमायसीज
. नोकॉरडिया
. कुल – स्ट्रेप्टोमायसीटेसी
. प्रजाती – स्ट्रेप्टोमायसीज
. कुल – ॲक्टिनोप्लॅनेसी
. गण – कॅरीओफॅनेलीस
. कुले – कॅरीओफॅनेसी
. ऑसिलोस्पायरेसी
. आर्थ्रोमिटेसी
. गण – बेगियाटोएलीस
. कुले – बेगियाटोएसी
. व्हिट्रीओसिल्लेसी
. ल्युकोट्रिकेसी
. ॲक्रोमॅशीएसी
. गण – मिक्झोबॅक्टिरिएलीझ
. कुले – सायटोफॅगेसी
. आस्लँजीएसी
. सोरँजीएसी
. पॉलीएंजिएसी
. मिक्झोकॉकेसी
. गण – स्पायरोकीटॅलीझ
. कुल – स्पायरोकीटेसी
. प्रजाती – स्पायरोकीटा
. कुल – ट्रेपोनेमॅटेसी
. प्रजाती – ट्रेपोनिया
. गण – मायकोप्लास्मोटेलीझ
. कुल – मायकोप्लास्मोटेसी
. प्रजाती – मायकोप्लास्मा
सिझोमायसीटीझ या वर्गाव्यतिरिक्त वरील पुस्तकात रिकेट्सियासारख्या अतिसूक्ष्मजीवांचेही वर्गीकरण दिले आहे. त्याचा समावेश सूक्ष्मजंतुविज्ञानात त्यांना स्वतंत्रपणे वर्ग देऊन केला आहे. ते वर्गीकरण पुढे दिले आहे [→ रिकेट्सिएलीझ].
वर्ग – मायक्रोटॅटोबायोटीस
. गण – रिकेट्सिएलीझ
. कुल – रिकेट्सिएसी
. उपकुल – रिकेट्सी
. प्रजाती – रिकेट्सिया
. उपकुल – एह्रलीशी
. प्रजाती – एह्रलीशिया
. उपकुल – वोल्बाची
. प्रजाती – वोल्बाचिया
. रिकेट्सिएल्ला
. गण – क्लॅमिडीएलीझ
. कुल – क्लॅमिडीएसी
. प्रजाती – क्लॅमिडिया
. कुल – बार्टोनेलेसी
. प्रजाती – बार्टोनेल्ला
. कुल – ॲनाप्लाझ्माटेसी
. प्रजाती – ॲनाप्लाझ्मा
. गण – व्हायरेलीस
वर्गीकरणविज्ञान : सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण, नामकरण आणि अभिज्ञान या सर्वांना मिळून सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरणविज्ञान म्हणतात. कधीकधी वर्गीकरणाचा सिद्धांत वा उपपत्ती दर्शविण्यासाठीही वर्गीकरणविज्ञान ही संज्ञा वापरतात. सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाची श्रेणीबद्ध किंवा क्रमपरंपरा असलेली प्रणाली तयार करण्याच्या हेतूने सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाचा अभ्यास करतात. सूक्ष्मजंतू हे प्रोकॅरिओटी या सृष्टीचे सदस्य असून त्यांच्या कोशिकांच्या (पेशींच्या) संरचनात्मक व जीवरासायनिक अद्वितीय विशिष्ट गुणधर्मांच्या वा गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात त्यांची व्याख्या करतात. कोशिकेच्या केंद्रकातील (कोशिकाक्रियांचे नियमन करणाऱ्या घटकातील) डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाचे (डीएनएचे) संघटन, केंद्रकाभोवतीच्या आवरणाचा (पटलाने बद्ध अशा स्वतंत्र कोशिकाद्रवी कोशिकांगांचा) अभाव आणि जीवद्रव्य कला (पटल) व कोशिका-भित्ती यांच्या काही घटकांचे रासायनिक स्वरूप हे अशा प्रकारचे अधिक लक्षात घेण्यासारखे विशिष्ट गुणधर्म आहेत. [→ सूक्ष्मजंतुविज्ञान].
सूक्ष्मजंतू अतिशय वैविध्यपूर्ण अशा अधिवासांमध्ये असतात. सूक्ष्मजंतूंच्या या समष्टींमधील व्यक्तिगत प्रकारांमध्ये शरीरक्रियात्मक क्षमतांचे वैविध्य आढळते. ते प्रकार लक्षणीय रासायनिक रचनांतरणे तडीस नेतात. या समष्टींचे घटक असलेल्या सूक्ष्मजंतूंचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी हे गुणधर्म वा गुणवैशिष्ट्ये ओळखणे आणि त्या सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण करणे गरजेचे असते. या सूक्ष्मजंतूंची वृद्धी वा संवर्धन करणे शक्य असल्याने त्यांना आधीच नामकरण झालेल्या जातीचे नाव लावता येते अथवा ज्याचे वर्गीकरण व नामकरण करायचे आहे असा नवीन जीव म्हणून त्याचे वर्णन करतात.
सूक्ष्मजंतूंमधील साम्ये आणि परस्परसंबंध ओळखून काढणे हा सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणाचा आधार आहे. जाती हा मूलभूत स्वरूपाचा वर्गीकरणात्मक गट आहे. याचा अर्थ जाती हे वर्गीकरणात उपयोगात आणले जाणारे सर्वांत लहान आणि क्रमविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे एकक आहे [→ जाति] . अभिज्ञानामध्ये उचित प्रकारे नामकरण झालेल्या एका प्रस्थापित गटाचा सदस्य म्हणून त्याच्या वर्णनात आलेल्या अनेक गुणवैशिष्ट्यांबरोबर तुलना करून एखाद्या सूक्ष्मजंतूंची ओळख पटविली जाते.
जाती : सूक्ष्मजंतूची जाती ही संकल्पना असून तिची व्याख्या करणे अवघड असते. म्हणजे मूलभूत वर्गीकरणात्मक गटनिर्मितीमधील तिचे कार्य लक्षात न घेता तिची व्याख्या करणे हे अवघड असे काम आहे. ही अस्पष्टता सूक्ष्मजंतुवैज्ञानिक मान्य करतात आणि एखादी जाती गौण गुणधर्मांमध्ये काही फेरबदल दर्शविणाऱ्या प्रतिरुपांचा (कृत्तकांचा) समूह दर्शवीत आहे असे कबूल करतात. जातीचे अभिज्ञान व नामकरण करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना वर्गीकरणात्मक गटाचे वर्णन करण्यासाठी सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांनी रीतसरमार्ग तयार केला आहे. परस्परांशी निकटचे साम्य असलेल्या उपलब्ध वाणांच्या (प्रकारांच्या) बाबतीत संरचनात्मक, रासायनिक, शरीरक्रियात्मक, जननिक आणि परिस्थितिवैज्ञानिक यांच्यासारख्या निश्चित करता येण्यासारख्या गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय (एकत्रीकरण) म्हणजे जातीचे वर्णन किंवा व्याख्या होय. निसर्गापासून विभक्त केलेले जीवाचे कोणतेही शुद्ध संवर्धन म्हणजे त्याचा वाण होय. असे जमविलेले वा संग्रहित केलेले वाण अभ्यास करण्यासाठी व तुलना करण्यासाठी संवर्धकांच्या (संरक्षित) रूपात प्रयोगशाळेत सांभाळून ठेवणे शक्य होते. वाणाचे वर्णन करणाऱ्या वैज्ञानिकाने याशिवाय एक वाणाचा नामनिर्देश करायला हवा आणि त्या जातीचा एक प्ररूप वाण (कायमचे उदाहरण) म्हणून संवर्धनाच्या संग्रहात जतन करून ठेवला पाहिजे. तसेच सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करणाऱ्या सर्वांना तो उपलब्ध असावा. जर तो प्ररूप वाण हरवला किंवा मृत झाला, तर पर्यायी वाणाचा (नवीन प्ररूपाचा) औपचारिक प्रस्ताव प्रसिद्ध (जाहीर) केला पाहिजे. सर्वसाधारणपणे सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण जिवंत प्रकारच्या नमुन्यांभोवती उभारले जाते. म्हणजे एखाद्या जातीतील प्ररूप वाण आणि जेव्हा या जातीत अंतर्भूत करण्यायोग्य असलेले व या प्ररूप वाणाशी पुरेसे सारखेपण असलेले इतर काही वाण मिळाले तर ते सर्व या जातीत येतात. संवर्धनक्षम नसलेली व सुयोग्य रीतीने जतन केलेल्या प्ररूप नमुन्याची आवश्यकता असलेली अशा व्यवच्छेदक जातीच्या वर्णनाची व नामकरणाची तरतूद केलेली आहे.
कार्ल लिनीअस यांनी प्रत्येक वनस्पतीचे व प्राण्याचे नामकरण करण्याची द्विपद नामपद्धती सुरू केली. या नामकरणाच्या पद्धतीत प्रजाती व जाती अशी दोन नावे असतात व म्हणून तिला द्विपद नामपद्धती म्हणतात [→ प्राणिनामपद्धति वनस्पतिनामपद्धति]. उचित रीतीने वर्णन केलेल्या नवीन जातींचे या पद्धतीनुसार नामकरण करतात. अशा प्रकारे बॅसिलस या प्रजातीमधील जातीचे नाव बॅसिलस सब्टिलिस असे होईल. अशा वर्गीकरणात्मक गटाचे असे शास्त्रीय नाव तिरप्या (इटॅलिक) अक्षरांत देतात. यावरून त्या जातीचे रीतसर वर्णन केलेले आहे, असे सूचित होते. उचित प्रजाती उपलब्ध नसल्यास इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ बॅक्टिरिया या संकेतावलीनुसार नवीन प्रजातीचे नाव ठेवावे लागते. शिवाय त्याबरोबर अंतर्भूत जातीचे मर्यादित वर्णन केलेले असते आणि या प्रजातीचा प्रातिनिधिक नमुना म्हणून प्ररूप जातीचा नामनिर्देश करावा लागतो.
वरील आंतरराष्ट्रीय संकेतावलीनुसार मान्य झालेले सर्वांत खालचा सार असलेले नामकरण म्हणजे उपजाती होय. उपजाती हा जातीचा उपविभाग असून त्यात जातीच्या वर्णनातील अन्यथा स्थिर असणाऱ्या गुणवैशिष्ट्यांमध्ये सुसंगत असे भेद मान्य केलेले असतात. उदा., बॅसिलस सिरिअस, एसएसपी मायकॉइडीस. तथापि काही प्रसंगी जातीचे याहून अधिक परंतु अनधिकृत उपविभाग उपयुक्त आहेत आणि त्याची विज्ञानाला मदत होते. उदा., विकृतिकारक जातीच्या रोगपरिस्थिति विज्ञानासाठी मदत होते. यानंतर जातीचा प्रकार म्हणून काही गुणवैशिष्ट्यांद्वारे वाणांच्या गटांना मान्यता देतात. हे गट जीववैज्ञानिक गुणधर्मावर (बायोव्हार जैव प्रकार), प्रतिजनविषयक बदलावर (सेरोव्हार-लस्य प्रकार), विकृतिकारकतेवर (पॅथोव्हार-रोगजनक प्रकार) किंवा विशिष्ट सूक्ष्मजंतुव्हायरसांविषयीच्या ग्रहणशीलतेवर (फॅगोव्हारभक्षिप्रकार) आधारलेले असू शकतात. या गुणवैशिष्ट्यांना नामकरण पद्धतीमध्ये अधिकृत दर्जा म्हणून मान्यता नाही.
उच्चतर वर्गीकरणात्मक गट : नामकरणाच्या नियमांनुसार उच्चतर वर्गीकरणात्मक गटाची तरतूद वा सोय केली आहे. असे अनेक गट निर्माण करून वापरले जात आहेत. तथापि गुणवैशिष्ट्यांधील साम्यांवर (फेनोटाइपवर) आधारलेल्या वर्गीकरणातील व्यावहारिक योजनेमधील साहचर्यातून सूचित होणारे नातेसंबंध (परस्परसंबंध) फसवे ठरू शकतात, हे मान्य करावे लागते. काही वर्गीकरणात्मक गटांचे वर्गीकरणातील स्थान कोठे असते, हे माहीत नसल्याचे मान्य करणे हा अधिक चांगला मार्ग ठरू शकेल. प्रदत्त (माहिती) अपूर्ण असल्याने परिपूर्ण श्रेणीयुक्त (क्रमपरंपरा असलेले) वर्गीकरण टाळणे हे याचे फलित आहे. याऐवजी ‘ग्रॅम-ऋण वैकल्पिक अवायुजीवी दंड’, ‘विसर्पी सूक्ष्मजंतू’ किंवा ‘ग्रॅम-धन कोकाय’ यांसारख्या ठळक व सहजगत्या ठरविलेल्या गुणवैशिष्ट्यांची वाटणी व्यक्त करण्यासाठी देशी भाषेतील नावे शीर्षक म्हणून वापरून मान्यताप्राप्त वर्गीकरणात्मक गटांचे विभागांमध्ये समुच्चय करतात. क्रमविकासाच्या किंवा जातिवृत्ताच्या (जातीच्या वा प्रजातीच्या विकासाच्या इतिहासाच्या) भाषेत यांच्यासारखे गट तयार करण्याची क्रिया भिन्न असू शकेल. परंतु अभिज्ञानाच्या उद्देशाच्या दृष्टीने ते व्यावहारिक आहेत. अशा जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये (विभागांमध्ये) अनिश्चित संलग्नता असलेल्या एका वा अधिक प्रजातींचा अंतर्भाव करणे गरजेचे असते. या प्रजाती कोणत्याही एका कुलात किंवा उच्चतर वर्गीकरणात्मक गटात निर्देशित करणे शक्य नाही. परंतु किमान प्रकरणाच्या व्यापक व्याख्येशी या प्रजाती जुळणाऱ्या असतात. कोणत्याही पातळीवर असलेली परस्परसंबंधाची व्याख्या करण्याची जाण जशी अधिक येईल, तसे उच्चतर वर्गीकरणात्मक गटांचे स्थिर व उपयुक्त वैज्ञानिक वर्गीकरण विकसित होईल. ज्या वेळी आर्कीबॅक्टिरिया हा गट इतर सर्व सूक्ष्मजंतूंपासून ⇨ जातिवृत्ताच्या दृष्टीने वेगळा आहे हे मान्य झाले, त्या वेळी या वर्गीकरणाची सुरुवात झाली.
उच्चतर वर्गीकरणात्मक गटांची तात्पुरती मांडणी सुचविली असून ती पुढे दिली आहे. तिच्यासाठी पुढील काही विश्वासार्ह व मुख्य गुणवैशिष्ट्यांचा उपयोग करून घेतला आहे. कोशिका-भित्ती व तिची घटना (अंशत: ग्रॅम अभिरंजन विक्रियेने मान्य झालेली) किंवा कोशिका-भित्तीचा अभाव अथवा प्रकाशसंश्लेषण वा त्याचा अभाव ही ती काही गुणवैशिष्ट्ये होत.
उच्चतर वर्गीकरणात्मक गटांची तात्पुरती मांडणी :
सृष्टी : प्रोकॅरिओटी
विभाग I : ग्रॅसिलिक्युटे–ग्रॅम-ऋण सूक्ष्मजंतू
वर्ग I : स्कोटोबॅक्टिरिया–प्रकाश ऊर्जेचा उपयोग न करून घेणारे आणि वर्ग II शी जातिवृत्ताच्या दृष्टीने संबंधित नसलेले सूक्ष्मजंतू.
वर्ग II : प्रोटिओबॅक्टिरिया–प्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतू. हे सूक्ष्मजंतू त्यांच्या अप्रकाशसंश्लेषी, जातिवृत्तीय नातेवाईकांसह ऑक्सिजन निर्माण करीत नाहीत.
वर्ग III : ऑक्सिफोटोबॅक्टिरिया – ऑक्सिजनाची निर्मिती करणारे प्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतू. यांच्यात सायनोबॅक्टिरिया (पूर्वी यांना नील-हरित शैवले म्हणत) या नावाने ओळखले जाणारे प्रोकॅरिओट अंतर्भूत आहेत.
विभाग II : फर्मीक्युटे – ग्रॅम-धन सूक्ष्मजंतू.
वर्ग I : फर्मीबॅक्टिरिया – साध्या आकाराचे ग्रॅम-धन सूक्ष्मजंतू.
वर्ग II : थॅलोबॅक्टिरिया – ग्रॅम-धन, शाखायुक्त व दंडाकार सूक्ष्मजंतू.
विभाग III : टेनेरिक्युटे – कोशिका-भित्ती नसलेले सूक्ष्मजंतू.
वर्ग I : मॉलिक्युटे – टेनेरिक्युटांचा एकटा वर्ग मायकोप्लाझ्माज.
विभाग IV : मेंडोसिक्युटे – असामान्य संघटनांच्या भित्ती असलेले सूक्ष्मजंतू.
वर्ग I : आर्कीबॅक्टिरिया – भित्ती, पटल, लिपिडे आणि असामान्य किंवा नाविन्यपूर्ण संघटनाचे रिबोसो असलेले सूक्ष्मजंतू (यांमध्ये मेथॅनोजेनिक व हॅलोफिलिक सूक्ष्मजंतू येतात).
एक अपवाद वगळता वर्गीकरणातील स्थानांसाठी आकार किंवा रूप वापरलेले नाही, हे उघडच दिसते. आकारविज्ञान फसवे असते, याची अनेक उदाहरणे आधुनिक वर्गीकरणवैज्ञानिक अभ्यासांतून दिसून आली आहेत. तथापि २००७ सालापर्यंत इतर आनुषंगिक गुणधर्मांसह असलेले ग्रॅम अभिरंजन विक्रिया ही आर्कीबॅक्टिरिया या वर्गाचा अपवाद वगळता कोशिका-भित्ती असलेल्या सूक्ष्मजंतूंच्या सर्व गटांमध्ये सापेक्षतः विश्वासार्ह असल्याचे सिद्ध झाले आहे. निश्चयाच्या (निर्धारक) हेतूने करण्यात येणारे वर्गीकरण आणि वर्गीकरणविषयक चालू असलेल्या संशोधनातून हमखास निर्माण होईल अशी जातिवृत्तीय मांडणी यांच्यामधील दुवा म्हणून वरील प्रकारची मांडणी वापरता येणे शक्य आहे. नातेविषयक संबद्धता निश्चित करण्यासाठी न्यूक्लिइक अम्लांच्या क्रमविषयक प्रदत्ताचा उपयोग करून घेतल्यास त्यावरून पुढील गोष्टही स्पष्ट आहे. याचा अर्थ जांभळ्या व ऑक्सिजनन्यूनता असलेल्या प्रकाशसंश्लेषक सूक्ष्मजंतूंशी असलेले काही अप्रकाशसंश्लेषी ग्रॅसिलिक्युटांचे साहचर्य ठरविण्याची जातिवृत्तीय कारणे आहेत.
नील-हरित शैवालांचा (वैज्ञानिक भाषेतील सायनोफायटांचा) या वर्गीकरणात सायनोबॅक्टिरिया म्हणून केलेला अंतर्भाव हा या आधीपेक्षा कमी वादाचा मुद्दा ठरला. उचित रीतीने सक्रियित होऊ शकणारे, वर्णन करता येणारे आणि सूक्ष्मजंतुवैज्ञानिक पद्धतींनी प्रकारीकरण करता येणारे असे सूक्ष्मजंतू सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणात समाविष्ट करण्याच्या बाबतीत सर्वसाधारणपणे एकमत आहे. तसेच नामकरणाविषयीचा गोंधळ टाळण्यासाठी शक्य असेल तेव्हा वनस्पतिवैज्ञानिक संकेतावलीतही टिकून राहिलेली नावे वापरतात. नील-हरित शैवले केंद्रकाच्या संघटनामध्ये प्रोकॅरिओटिक असून त्यांना ग्रॅम-ऋण प्रकारच्या कोशिका-भित्ती असतात. त्यांच्यात म्युरिएन पेप्टिडोग्लायकन असते आणि त्यांचे रिबोसो प्रोकॅरिओटिकांमधील आकारमानाएवढे असतात. त्यांच्यात रिबोसोमल रिबोन्यूक्लिइक अम्ल (rRNA) असते. हे अम्ल खऱ्या सूक्ष्मजंतूंमधील या अम्लाशी सुस्पष्टपणे संबंध असलेले असते. तथापि अनेकांचे अजून संवर्धन (वृद्धी) केलेले नाही आणि निसर्गात त्यांची जटिल साहचर्ये (संघ) किंवा आकारवैज्ञानिक रूपांतरणे तयार होतात. म्हणून ते संरक्षित नमुन्यांसोबत वनस्पतिवैज्ञानिक वर्गीकरणातील जाती म्हणून ओळखले जातात. [→ शैवले ].
वर दिलेल्या यादीमधील प्रत्येक वर्गामध्ये एक किंवा अधिक गण असतात आणि जाती दर्शविण्याच्या दृष्टीने उचित असलेल्या श्रेणी (वर्गीकरणातील स्थाने) त्यांमध्ये असतात. म्हणून परमा या गुप्तरोगाला कारणीभूत असणाऱ्या नायसेरिया गोनोऱ्हिया या सूक्ष्मजंतूचे पूर्ण वर्गीकरणवैज्ञानिक वर्णन उदाहरणादाखल पुढीलप्रमाणे देता येईल :
सृष्टी | प्रोकॅरिओटी | प्रोकॅरिओटिक |
विभाग | गॅसिलिक्युटे | ग्रॅम-ऋण |
वर्ग | स्कोटोबॅक्टिरिया | अप्रकाशसंश्लेषी |
गण | गण निर्देशित केला नाही परंतु ग्रॅम-ऋण, ऑक्सिजीवी दंडाकार किंवा गोलाकार सूक्ष्मजंतूंबरोबरच्या गटात अंतर्भूत केला. | |
कुल | नायसेरिएसीई | प्रजातीने प्रकारीकरण केलेल्या कुलात समाविष्ट केला. |
प्रजाती | नायसेरिया | नायसेरिया (ट्रॅव्हिसॅन १८८५, १०५) |
जाती | नायसेरिया गोनोऱ्हिया | एन्. गोनोऱ्हिया |
(झॉप्फ १८८५)
(ट्रॅव्हिसॅन १८८५, १०६ AL) |
||
प्ररूप वाण, अमेरिकन टाइप कल्चर, कलेक्शन # १९४२४ |
सदर प्राप्त दर्जाचा (वर्गीकरणातील स्थानाचा) अर्थ पुढीलप्रमाणे लावतात : डब्ल्यू. झॉप्फ यांनी १८८५ मध्ये वर्णन केलेली आणि व्ही. ट्रॅव्हिसॅन यांनी आपल्या प्रबंधाच्या १०६ पृष्ठावर दुरुस्त केलेल्या ह्या जातीचे नाव ‘मान्यताप्राप्त याद्यांमध्ये’ अंतर्भूत केले आहे. कोणत्याही दर्जामध्ये योग्य ठिकाणी लावलेल्या या नावाचे तपशीलवार वर्णन यासारखे असते.
उच्चतर वर्गीकरणात्मक गट आणि त्यांच्यातील जीवांचे प्रमुख दर्जे (श्रेण्या) वर उल्लेख केलेल्या व्यावहारिक गटांचे प्रतिनिधी आहेत. परंतु नवीन समज व दृष्टिकोनातील बदल यांच्यामुळे सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणात एकसारखा गतिमान बदल होत आहे. प्रमुख जैव बहुवारिके आणि प्रोकॅरिओटामध्ये होणारे फेरबदल यांचा पद्धतशीरपणे अभ्यास होत असून हे अभ्यास महत्त्वाचे आहेत.
गुणवैशिष्ट्यांचे स्वरूप : उपयुक्त वर्गीकरण करण्यासाठी सूक्ष्मजंतूंच्या कोशिकांच्या विश्वासार्ह म्हणजे स्थायी आकारांमध्ये पुरेशी विविधता आढळत नाही. तसेच अस्तित्वात असलेल्या जीवांना निर्देशित केलेल्या उच्चतर वर्गीकरणात्मक गटांमध्ये एकात्मीकरण करण्याच्या दृष्टीने जीवाश्मांच्या (शिळारूप प्राप्त झालेल्या जीवांच्या अवशेषांच्या) तुटक (खंडमय) नोंदी प्रभावी नाहीत. त्यांच्या अस्तित्वाचा सूक्ष्मदर्शकीय पुरावा आणि त्यांच्या काही क्रियांचा ३·८ X १०९ वर्षे इतक्या आधीच्या काळातील भूवैज्ञानिक पुरावा उपलब्ध आहे. मात्र त्यांचे जे काही निरीक्षण करणे शक्य झाले त्या सर्व बाबतींत साधे आकार आढळले आहेत उरलेल्या गोष्टी केवळ अनुमाने आहेत. त्यांच्या अनेक जीवाश्मरूपांना नावे दिली आहेत परंतु ही नावे बहुधा वनस्पतिवैज्ञानिक संकेतावली मधील नियमांना अनुसरून दिली आहेत.
सूक्ष्मजंतूंचे प्रजनन किंवा पुनरुत्पादन शाकीय पद्धतीने म्हणजे द्विभंजनाने वा मुकुलनाने होते. त्यांची जीवनचक्रे नसतात त्यांचे स्वरूप अधूनमधून कधीकधी घडणारे व साधे असते. त्यांची गंतुके (युग्मके, पक्व जननकोशिका) तयार होत नाहीत आणि संयुग्मन (दोन सूक्ष्मजंतुकोशिकांमध्ये संपर्क होऊन जननिक सामग्री एका कोशिकेतून दुसऱ्या कोशिकेत जाण्याची प्रक्रिया) हे त्यांच्या प्रजननातील नियमित असे कार्य नसते. वनस्पती व प्राणी यांच्या वर्गीकरणात उपयुक्त असलेल्या निश्चित बाबी त्यांच्यात उपलब्ध नसतात. यामुळे सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांना त्यांच्या गुणवैशिष्ट्याचे निरीक्षण करता येण्याजोग्या बाबीच्या आधारे सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण करणे भाग पडले. आकार, अभिरंजनविषयक गुणधर्म, चलनक्षमता, वृद्धीच्या गरजा, आधारद्रव्याचा (कार्यद्रव्याचा) उपयोग करून घेणे, ⇨ किण्वनातून तयार होणारे पदार्थ, राखीव द्रव्ये, ⇨ एंझाइमे, विषे वगैरे गुणवैशिष्ट्यांचे असे निरीक्षण करणे शक्य आहे. अशा रीतीने अस्तित्वात असलेल्या या गुणवैशिष्ट्यांची संख्या काहीशी मोठी आहे आणि दुर्दैवाने वर्गीकरणवैज्ञानिकांच्या दृष्टीने विशिष्ट जीवांसाठी गुणवैशिष्ट्यांची झालेली निवड ही पुष्कळदा सूक्ष्मजंतुवैज्ञानिकाला त्यांविषयी असलेल्या गरजेनुसार (हितसंबंधानुसार) ठरते किंवा तो अधिकाराने तसे सांगतो. उदा., वैद्यकीय सूक्ष्मजंतुवैज्ञानिकाला आवश्यक असलेल्या जीवांसाठी घ्यायच्या परीक्षा या त्याच प्रकारचे जीव अभ्यासणाऱ्या वनस्पतिरोगवैज्ञानिकाच्या परीक्षांपेक्षा भिन्न असतात किंवा याच्या उलटही घडू शकते. तथापि वापरता येण्याजोग्या परीक्षांमधील मोठी विविधता म्हणजे जीनोमचे (एखाद्या जातीच्या जननिक निसर्गदत्त देणगीचे किंवा गुणसूत्रांच्या एकगुणित संचाचे) म्हणजे व्यापक प्रमाणावर नमुने घेण्याचे काम आहे असे नंतर लक्षात आले. एका अर्थाने हे जननिक विश्लेषणाचे एक रूप आहे. त्यामुळे उपलब्ध जनुकांच्या (सरूप विधेच्या म्हणजे एखाद्या जीवाच्या निरीक्ष्य गुणवैशिष्ट्यांच्या) अभिव्यक्तीची नोंद होते. सूक्ष्मजंतूंच्या अगदी थोड्याच जातींच्या बाबतीत अधिकृत जननिक विश्लेषण वापरतात, परंतु आता हे काम अनेक प्रकारे केले जाते. उदा., न्यूक्लिइक अम्लांतील न्यूक्लिओटाइडांच्या अनुक्रमाचा अभ्यास व तुलना करून अथवा प्रथिनांमधील संरचनात्मक साम्ये ओळखून वा चयापचयाच्या (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींच्या) भागांमधील कार्यकारी साम्य ओळखून हे काम करतात. अशा तुलनांमधून मिळणारे निष्कर्ष यांचा अर्थ नातेसंबंध व जातिविकास (क्रमविकासाचा क्रम) यांच्या परिभाषेत लावता येण्याजोगा आहे. या अधिक नवीन मार्गांमध्येच बदलाची बीजे (मूळ कारणे) असलेली आढळतात.
वर्गीकरणविज्ञानातील आधुनिक मार्ग : या मार्गांमध्ये किंवा दृष्टिकोनांमध्ये अनेक नवीन तंत्रे वापरली जात आहेत.
संख्यात्मक वर्गीकरणविज्ञान : जीवाच्या निरीक्ष्य गुणवैशिष्ट्यांच्या विश्लेषणासाठी संख्यात्मक वर्गीकरणविज्ञान हा पहिला आधुनिक मार्ग आहे. यासाठी अधिक संख्येने (समजा १५०) परीक्षा कराव्या लागतात. म्हणजे अनुसंधान करावयाच्या सूक्ष्मजंतूंच्या अनेक वाणांपैकी प्रत्येक वाणावर या परीक्षा करणे गरजेचे असते. शिवाय यांबरोबर प्ररूप वाणांचे संग्रह व खरे संदर्भ वाण (५० पेक्षा कमी नाही) यांच्या परीक्षा कराव्या लागतात. हे दोन्ही प्रकारचे वाण ज्यांचा अभ्यास करण्यात येत आहे, त्या वाणांच्या गटांशी निकटपणे व दुरून सदृश (सारखे) असतात. त्यांच्यातील साम्ये व भेद यांच्या विश्लेषणासाठी सर्व वाणांपैकी प्रत्येकाची (संक्रियात्मक वर्गीकरणवैज्ञानिक घटकाची म्हणजे ऑपरेशनल टॅक्सॉनॉमिक युनिट किंवा ओटीयू याची) दुसऱ्या प्रत्येक वाणाशी तुलना करणे आवश्यक असते. यातून मिळणारा प्रदत्त मग गणनक्रियेवर आधारलेल्या साम्य कोष्टकात एकत्रित करता येतो. या ओटीयू घटकांच्या कोणत्याही जोडीसाठी गुणवैशिष्ट्यांपैकी ज्या गुणवैशिष्ट्यांत ते समरूप (धन वा ऋण) असतात, त्या गुणवैशिष्ट्यांची संख्या ही त्यांचे शतमान (टक्केवारी) म्हणून व्यक्त होते. इतर परस्परांशी जुळणारे गुणांक शक्य असतात. परंतु हा साधा जुळणारा गुणांक (SsM)
सूक्ष्मजंतुविज्ञानात सर्वाधिक वरचेवर वापरला जाणारा गुणांक आहे. संगणकाचा उदय झाल्यावरच अशी विश्लेषणे करणे शक्य झाले. संगणकामुळे साम्य कोष्टकात आणखी फेरफार करणे शक्य झाले. त्यामुळे वर्गीकरणवैज्ञानिक संरचनेचे खरे महत्त्व वाढले. निकटचे साम्य असणाऱ्या ओटीयू यांचे समूह वृक्षासारख्या रेखाकृतीत म्हणजे वृक्ष-आलेखात एकत्रित करणे शक्य झाले. या रेखाकृतीतील शाखाबिंदू समूहांचे प्रत्येक युग्मन (जोडी) अलग करणारे SsM दर्शवितात. पृथक्कृत (प्रकारीकृत) साधर्म्य आव्यूह (साचा) ही निष्कर्षांची (फलितांची) दुसरी उपयुक्त अभिव्यक्ती होय. या आव्यूहात समूह द्विमितीय रचनेत मांडतात आणि साम्य छटेने दर्शवितात. यामुळे समूहांचे सापेक्ष प्रमाण, आकारमान व विलगीकरण डोळ्यांनी ओळखणे शक्य होते. अशा रीतीने निर्माण झालेल्या आणि अलग करता येण्याजोग्या साम्य समूहांना फेनॉन म्हणतात. फेनॉन वर्गीकरणात्मक गटांशी एकसारखे येतात किंवा या दोन्हीचे साम्यकरण करता येऊ शकत नाहीत परंतु सु. ८० टक्के साम्य पातळीला तयार झालेल्या बहुतेक फेनॉनांमध्ये एखाद्या जातीचे सर्व किंवा बहुतेक सर्व प्रतिनिधी असतात. म्हणून ते वर्गीकरणविज्ञानाच्या दृष्टीने उपयुक्त असतात आणि त्यांच्यामुळे सरूप विधेच्या वस्तुनिष्ठ विश्लेषणाची एक पद्धती तयार होते. वर्गीकरणात्मक गटांच्या मूल्यनिर्धारणासाठी उपयुक्त असे हे काम पुढील अधिक तपशीलवार सांख्यिकीय विश्लेषणाला आधारभूत आहे. तथापि याचा अर्थ लावण्यासाठी चांगल्या पायाभूत वैज्ञानिक निर्धारणाची गरज असते. कोणत्याही गुणवैशिष्ट्याला गैरवाजवी महत्त्व न देणारे ॲडानसोनियन तत्त्व लागू करण्याच्या उघड उद्देशाकडे दुर्लक्ष करून हे काम करायला हवे. वस्तुत: संख्यात्मक वर्गीकरणवैज्ञानिक विश्लेषणातून पुढील उपयुक्त प्रतिलाभ होतो. वर्गीकरणासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी आणि अभिज्ञान यांच्यासाठी निवडलेल्या गुणवैशिष्ट्यांच्या विश्वासार्हतेचे अधिकृत मूल्यनिर्धारण होणे, हा तो लाभ होय.
संगणकाच्या मदतीने अभिज्ञान करण्यासाठी लागणारे संगणकीय कार्यक्रम अस्तित्वात आहेत, असा संख्यात्मक वर्गीकरणविज्ञानाचा गर्भित अर्थ आहे. हे कार्यक्रम एक तर ओळखता येणाऱ्या फेनॉनांच्या रूपांत असतात किंवा संगणकात संग्रहित केलेले वर्गीकरण व महत्त्वाचे कार्यक्रम असतात. या दोन्ही पद्धतींचे पुढील क्षेत्रांमध्ये अनेक उपयोग होतात. प्रदूषण, विभक्तद्रव्यांच्या पुंजांशी निगडित असलेल्या कामांत (उदा., प्रदूषण, अवसाद इत्यादींच्या अभ्यासात) आणि निदानीय सूक्ष्मजंतुविज्ञानातील रोगजनक सूक्ष्मजंतूंच्या अभिज्ञानासाठीच्या स्वयंचलित पद्धतींमधील फलितांशी निगडित कामात या पद्धती वापरतात. संगणकीय विश्लेषणासाठी त्याच्या स्मृतीमध्ये समाविष्ट केलेल्या कृत्रिम महत्त्वाच्या बाबी आणि संदर्भ प्रदत्त या गोष्टी यांत्रिक मदतीशिवाय प्रयोगशाळेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या प्रात्यक्षिकातील गोष्टींपेक्षा फारच जटिल असू शकतात. अभिज्ञानामध्ये पर्यायी निदानीय शक्यता आणि संभाव्य अंदाज असू शकतात. अशा रीतीने प्रयोगिक सूक्ष्मजंतुविज्ञानात अंतःप्रज्ञेने घेतलेल्या निर्णयाला कृत्रिम महत्त्वाच्या बाबींनी पुष्टी देता येते. शैक्षणिक सूक्ष्मजंतुविज्ञानात नैसर्गिक किंवा जातिवृत्तीय वर्गीकरण विकसित करण्याच्या प्रयत्नांना अशी पुष्टी देणे शक्य होते.
रासायनिक वर्गीकरणविज्ञान : या विज्ञानशाखेत सूक्ष्मजंतूंच्या कोशिकेतील घटकांच्या रेणवीय आकृतिबंधाच्या (घडणीविषयीच्या) पद्धतशीर माहितीचा वर्गीकरणवैज्ञानिक समस्या सोडविण्यासाठी उपयोग करून घेतात. १९५०–६० या दशकापासून ही शाखा याचे समर्थ साधन ठरली आहे आणि रासायनिक वर्गीकरणाची अनेक दर्शकचिन्हे याद्वारे ओळखून काढली गेली आहेत. प्रोकॅरिओटीच्या दृष्टीने एकमेवाद्वितीय असलेले रेणू (उदा., म्यूरीन पेप्टिडोग्लायकन) किंवा सूक्ष्मजंतूंचे विशिष्ट गट (उदा., आर्कीबॅक्टिरियाची ईथर-संलग्न लिपिडे) यांच्यापासून ते प्रजातींच्या वा जातींच्या वैशिष्ट्यदर्शक चयापचयाच्या यंत्रणा किंवा चयापचयातून निर्माण होणारे पदार्थ असा या दर्शकचिन्हांचा व्यापक पल्ला आहे. ॲमिनो अम्ल विश्लेषण, बहुवारिकांचे अनुक्रमात्मक विश्लेषण, वायू व पातळ पटल ⇨ वर्णलेखन, किण्वनातून तयार होणारे पदार्थ व लिपिडे इत्यादींसाठी तंत्रे उपलब्ध असून ती तुलनेने साधी आहेत. यांच्यामुळे सूक्ष्मजंतुविषयक अध्ययन पद्धतशीरपणे करणे शक्य झाले. कोशिकाभित्तींच्या संघटनाचे जीवरासायनिक मूल्यनिर्धारण, पटलांचे लिपीड संघटन, आयसोप्रिनॉइड क्विनोनांचे प्रकार, निवडक प्रथिनांतील ॲमिनो अम्लांचे अनुक्रम आणि सायटोक्रोमसारख्या प्रथिनांची व अनेक बृहत् रेणूंची गुणवैशिष्ट्ये ठरविणे यांवर आधारलेल्या वर्गीकरणात्मक गटांच्या अधिक प्रभावी व्याख्या या अध्ययनातून पुढे आल्या.
रासायनिक वर्गीकरणविज्ञानाच्या विविध अशा सर्व मार्गांपैकी कोशिका-भित्तींच्या पेप्टिडोग्लायकनांच्या रसायनशास्त्रीय अध्ययनावर आधारलेला मार्ग सर्वाधिक अनुकरणीय मार्ग आहे. ही विषम बहुवारिके प्रोकॅरिओटीच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहेत. टेनेरिक्यूटीज व मेंडोसोक्यूटीज यांच्यातील वर्गीकरणात्मक गट वगळता ती अशा सर्व गटांत असतात. या अपवाद असलेल्या दोन्हींमध्ये कोशिका-भित्ती नसतात किंवा त्यांच्या कोशिका-भित्ती विलक्षण रीतीने रचलेल्या वा उभारलेल्या असतात. बहुसंख्य प्रजाती ॲमिनो अम्लांच्या बाबतीत जुळणाऱ्या वा सुसंगत आहेत. ॲमिनो-शर्करा बहुवारिक कण्याशी निगडित असलेली पेंटापेप्टाइडे आणि बळकट जाळ्यातील पेड आडव्या दिशेने जोडणारी म्हणजे आडवे दुवे असलेली अधिक साधी पेप्टाइडे ही या ॲमिनो अम्लांपासून तयार होतात. परंतु काही प्रजाती व गट (विशेषतः ग्रॅम-धन फर्मीक्यूटीजमधील) यांच्यात पेप्टिडोग्लायकन प्रकार असतात आणि हे प्रकार व्यवच्छेदक ॲमिनो अम्लांनी व्याख्यात (बद्ध) असून त्यांचे आडवे दुवे ॲमिनो अम्ले तयार करतात. रिबोन्यूक्लिइक अम्लाच्या विश्लेषणाच्या आधारे मान्य पावलेल्या जातिवृत्तीय गटांशी ही ॲमिनो अम्ले अनुरूप आहेत.
न्यूक्लिइक अम्लविषयक अध्ययने : परस्परसंबंद्धता किंवा नातेसंबंध याविषयीची माहिती तयार करण्याच्या व मध्यस्थी करण्याच्या दृष्टीने हे अभ्यास अतिशय खात्रीचे वा सक्षम आहेत. तसेच वर्गीकरणात्मक मांडणीच्या जातिवृत्तीय मूल्यनिर्धारणाच्या उपयोगाच्या दृष्टीने या अभ्यासांची क्षमता स्पष्ट आहे.
डीएनए-बेस (क्षारक) संघटनाचा प्रथम जाती व प्रजाती यांच्यासाठी उपयोग करून घेण्यात आला. हे संघटन सर्वांत साध्या पद्धतीने बेस जोड्यांपैकी एका जोडीचे प्रमाण [ ग्वानीन + सायटोसीन (मोल %) ] या रूपात व्यक्त करतात, येथपर्यंत ही माहिती उपयुक्त आहे. जाती व प्रजाती यांच्यासाठी असलेली मूल्ये जादा झाली, तर वर्गीकरणवैज्ञानिकांना हा गट एकट्या वर्गीकरणात्मक गटापेक्षा कदाचित अधिक गुंतागुंतीचा आहे, अशी सावध करण्यासाठी सूचना केली पाहिजे. [ग्वानीन + सायटोसीन (मोल %)] या प्रमाणापेक्षा एखादा वाण प्ररूप व संदर्भ वाणांपासून भिन्न असल्यास त्या वाणाची ओळख बहुधा चुकीची असते. याउलट एकसारखी मूल्ये ही ओळखीचे (अनन्यतेचे) माप (प्रमाण) नसते. कारण एकूण संघटनांचा संबंध न्यूक्लिओटाइडांच्या अनुक्रमानुसार होणाऱ्या मांडणीशी जोडता येत नाही.
न्यूक्लिइक अम्ल समजातता (कार्बनी संयुगांच्या मालेतील संयुगांत साम्य असण्याची आणि त्यांच्या गुणधर्मांत क्रमित बदल असण्याची स्थिती) प्रयोग पुढील कामासाठी बेतलेले असतात. एका जीवातील डीएनए किंवा आरएनए यामधील क्षारकांचा अनुक्रम आणि दुसऱ्या जीवातील हा अनुक्रम यांच्यामध्ये एकूण तुलनात्मक सारखेपणा किती आहे, ते या प्रयोगांत मोजतात. हे काम जीनोमिक डीएनएसह करणे शक्य असते. कारण योग्य रीत्या एकसारख्या ठेवलेल्या उच्च तापमानाने परस्परपूरक पेड एकेकट्या पेडांमध्ये अलग करणे शक्य होते आणि याहून कमी तापमानाला ते परत एकत्र केले जातात, याला पुनःसाहचर्य म्हणतात. अशा कोणत्याही एकट्या पेडात त्याच जीवाचे किंवा त्याच्याशी संबंधित जीवाचे उचित अनुक्रम असतात. पुनःसाहचर्य हे अनुक्रमांच्या एकूण साधर्म्याच्या प्रमाणात असते. याचे मापन संदर्भ डीएनएने घेतलेल्या चिन्हांकित सजातीय डीएनए (१०० टक्के मानून) तुलनेत परीक्षा जीवातून किरणोत्सर्गाने चिन्हांकित डीएनएचे शेकडा प्रमाण असे करतात. याच्या चांगल्या प्रस्थापित झालेल्या अनेक पद्धती असून त्यांची फलिते तुल्य असतात. एकपेडी आरएनए रेणूही पूरक डीएनए पेडाबरोबर संकरित होतील आणि साहचर्याचे मानक त्याचप्रमाणे काढणे शक्य आहे. परिणामी आरएनए/डीएनए साहचर्यामुळे दोन जीवांच्या जननिक साम्याच्या मूल्यनिर्धारणासाठी जातीच्या पूर्ण जननिक देणगीचा म्हणजे जीनोमचा वापर करणे शक्य आहे. जीनोमच्या अतिशय लहान भागाचे मूल्यनिर्धारण डीएनए/आरएनए समजाततेने करतात. त्यासाठी rRNA किंवा स्थानांतरण आरएनए (tRNA) वापरतात. सापेक्षत: थोडे सिस्ट्रॉन ते आरएनए अनुक्रम निश्चित करतात (सिस्ट्रॉन म्हणजे जननिक एकक किंवा डीएनएचा खंड असून हे खंड विशिष्ट पॉलिपेप्टाइडांसाठी संकेत तयार करतात). तथापि डीएनएमधील क्रमविकासविषयक व संदेशक आरएनए म्हणजे mRNA अनुक्रम हे Rrna किंवा tRNA च्या अनुक्रमांपेक्षा पुष्कळच अधिक जलद असतात. महत्त्व व क्रमविकास यांच्या दृष्टीने स्थिर असलेल्या कोशिकांगांची म्हणजे रिबोसोमांची जोडणी व कार्य tRNA ठरविते हे यांचे संभाव्य कारण आहे. रिबोसोमांमध्ये ओळखू येण्याजोगे व सर्व सृष्टीतील अगदी थोडे बदलणारे घटक असतात. परिणामी केवळ एखाद्या प्रजातीमधील नातेसंबंधाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी आणि जाती (७० टक्क्यांहून अधिक समजातता) व उपजाती प्रस्थापित वा अलग करण्यासाठी डीएनए/आरएनए समजातता उपयुक्त आहे. प्रजातींमधील परस्परसंबंधाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी डीएनए/आरएनए समजातता अधिक उपयुक्त आहे. कारण क्रमविकासाच्या त्या अवधीत याच्याशी निगडित असलेले समजातीय घटक अधिक उत्तम रीतीने टिकून राहिले. या तंत्रामध्ये मिळालेल्या अनुभवामुळे पुढील प्रत्यय बळकट झाला. जैव क्रमविकासाच्या स्थूल व्यापाचा अंतर्भाव असलेल्या परस्परसंबंधाचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी सर्व प्रकारच्या कोशिकांमध्ये सर्वत्र उपलब्ध असलेल्या अतिशय स्थिर असलेल्या निर्धारकांची (निर्णायक गुणांची) आवश्यकता असते.
जीवरासायनिक जातिवृत्तीय विश्लेषण हा सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणविज्ञानात घडलेला प्रगतीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अगदी भिन्न अशा वर्गीकरणात्मक वर्गांच्या 16S rRNA या अनुक्रमांधील (श्रेण्यांतील) साम्यांचे मूल्यनिर्धारण करू शकणाऱ्या पद्धती वापरात आल्याने या प्रगतीला स्पष्टपणे चालना मिळाली. 5S वा 23S यांच्याऐवजी 16S rRNA अनुक्रम निवडला. कारण तो विश्लेषणासाठी खूपच मोठा नाही आणि माहितीचा मर्यादित आशय पुरविण्याएवढा तो लहानही नाही. सी. आर्. वीसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेला हा दृष्टिकोन त्यांनी अनेक सूक्ष्मजंतूंसाठी वापरून पाहिला. सारत: किरणोत्सर्गाने चिन्हांकित केलेला व अलग केलेला 16S cRNA हा अनुक्रम T1 रिबोन्यूक्लिएज या एंझाइमाने कापला जाऊन लहान न्यूक्लिओटाइडे तयार झाली. यांतील प्रत्येक न्यूक्लिओटाइड अनुक्रमाचा शेवट ग्वानीन अवशेषाने होतो आणि द्विमितीय ⇨ विद्युत् संचारण केल्यावर किरणोत्सर्ग व स्थान यांच्यामुळे तो ओळखणे शक्य होते. पाच किंवा कमी अवशेष असलेल्या अतिशय आखूड तुकड्यांना उपयुक्त असे तुलनात्मक मूल्य नसते. परंतु सहा किंवा अधिक अवशेष असलेले तुकडे अनुक्रमातील असलेले म्हणून ओळखणे शक्य असून त्यांची नोंद ऑलिगोमरांच्या (दोन, तीन वा चार एकवारिकांनी बनलेल्या बहुवारिकांच्या) यादीत करता येते. नंतर ऑलिगोन्यूक्लिओटाइडांची प्रत्येक यादी व्यक्तिगत पातळीवर सर्व याद्यांशी ताडून पाहतात. यातून जीवांच्या प्रत्येक जोडीसाठीचा साम्य गुणांक (SAB) उपलब्ध होतो. या SAB मूल्यांच्या कोष्टकाचे वृंदविश्लेषण (एखादी व्यक्ती गटात किंवा वृंदात पडते की नाही हे ठरविण्याच्या हेतूने केलेले विश्लेषण) करतात. या विश्लेषणातून विलीन झालेल्या गटांच्या दरम्यानचे सरासरी सहलग्नता SAB मूल्य मिळते आणि हे वृक्षलेखक या आकृतीच्या रूपात व्यक्त करणे शक्य होते (पहा : संमिश्र वृक्षलेखक आकृती) सर्वांत दूरचे नातेसंबंध असलेल्या जीवांमध्ये सर्वसामान्य हेक्झॅमरापेक्षा (षट्वारिकांपेक्षा, ०·१०) सु. ५० ऑलिगोन्यूक्लिओटाइडांएवढे आधिक्य असते आणि निकटचे संबंध असलेल्या जीवांमध्ये सामान्यपणे ४०० एवढे आधिक्य आढळते. सरासरी सहलग्नता SAB मूल्यांमधील फरक हे जवळपास जातिवृत्तीय अलगीकरणाएवढे असतात, असे गृहीत धरणे शक्य आहे. वृक्षलेखक आकृतीमध्ये खोल विदरांनी (म्हणजे कमी SAB ने) अलग झालेले जीवांचे गट ही दीर्घकाळापूर्वीपासून स्वतंत्रपणे क्रमविकसित झालेले आहेत. वास्तविक काळाशी असलेला अचूक संबंध निश्चित नसतो. परिणामी प्रोकॅरिओटिक क्रमविकासाच्या मुख्य खोडापासून (बुंध्यापासून) आधीच्या काळात आर्कीबॅक्टिरिया अपसारित झाल्याचे (दूर गेल्याचे) लक्षात येते. पैतृक कृत्तकांपासून आलेली प्रमुख वंशजांची तिसरी शाखा पुढील असेल. तिच्यातील कोशिकाप्रकार सु. २००७ पर्यंत ओळखले गेलेले नव्हते. नंतर हे प्रकार हरितकणूंनी किंवा कलकणूंनी युक्त असलेल्या प्रोकॅरिओटांमुळे परोपजीवी होऊन ते यूकॅरिओटिक वनस्पती व प्राणी यांचे पूर्वज बनले. वीसे यांनी या तीन सहलग्नतांना ‘आद्य सृष्टी’ म्हटले होते. तथापि, इतरांच्या मते हे अकाली निर्देशन आहे.
विद्यमान खऱ्या सूक्ष्मजंतूंच्या मुख्य जातिवृत्तीय गटांची वंशपरंपरा मूल्य सु. ०·२२ रूपात व्यक्त होणाऱ्या मुख्य अलगीकरणापर्यंत मागे जाते. (आर्कीबॅक्टिरिया तसेच थोडे व अपूर्णपणे अभ्यास झालेले स्वतंत्र गट सोडून सूक्ष्मजंतूंना विद्यमान खरे सूक्ष्मजंतू मानतात). क्रमविकासाच्या शाखांच्या विभागणीचा नेमका क्रम गणिताने काढण्यासाठी पुष्कळच उच्चतर वियोजनाची गरज लागेल, असा याचा अर्थ होतो, चालू घडीला याचा परिणाम छोटा आहे. जातिवृत्तीय गण प्रस्थापित होऊ शकणे ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. यद्यपि सांप्रत अवघड व महाग असलेले यासाठीचे तंत्र संपूर्ण सृष्टीला लावता येईल असे आहे. केवळ प्रोकॅरिओटीला हे लावता येते असे नाही. गटांमध्ये असलेल्या प्रजातींमधील परस्परसंबंध तसेच या गटांचा वंशवृक्ष यांच्याविषयीची उपयुक्त माहिती या तंत्राद्वारे मिळते.
संकमणावस्थेतील सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरणविज्ञान : अतएव सध्याच्या सूक्ष्मजंतूंच्या वर्गीकरणवैज्ञानिक पद्धती या अभिव्यक्त सरूप विधेवर आधारलेल्या व पूर्णपणे कृत्रिम वर्गीकरणांपासून (रचनांपासून) दूर जात असून त्या क्रमविकासात्मक नातेसंबंध व्यक्त करणाऱ्या व्यवस्थेच्या आदर्श स्थितीकडे जात आहेत. पुढील दोन गोष्टींमुळे ही क्रांती घडत आहे. एक म्हणजे ⇨ रेणवीय जीवविज्ञानात प्रगती घडून आली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संगणक तंत्रे उपलब्ध झाली आहेत. संगणक तंत्रांमुळे रेणवीय अनुक्रमांवरील माहिती निर्माण करणे, त्या माहितीची पद्धतिबद्ध मांडणी व रचना करणे आणि तुलना करणे शक्य झाले आहे. सर्वांत स्थिर आणि सर्वाधिक सावकाशपणे बदलणाऱ्या जटिल बृहत् रेणूंमधील घटक रेणूंच्या अनुक्रमांमध्ये क्रमविकासाच्या नोंदी सुरक्षित ठेवलेल्या असतात, याचे आकलन होण्यावरही सदर क्रांती अवलंबून आहे. या अनुक्रमांना ई. त्सूकरकँडल आणि एल्. पॉलिंग यांनी ‘सेमँटाइड्स’ (म्हणजे सेमँटाइडे) असे नाव दिले आहे. हे दोघे या अनुक्रमांना क्रमविकासाच्या इतिहासाचे दस्तऐवज असल्याचे मानतात. थोडे बृहत् रेणू संपूर्ण माहिती दर्शवू शकतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्यापैकी काही बृहत् रेणू हे जीवांच्या काही गटांतील (उदा., सायटोक्रोम c याच्या संरचनेत) रेणवीय मांडणीच्या सूक्ष्म पद्धतशीर स्थानच्युती व्यक्त करतात. जेव्हा वर्गीकरणाचे इतर प्रमुख विभाग बृहत् रेणूंच्या त्याच वर्गात स्पष्ट व्यवच्छेदन आढळत नाही तेव्हा इतर बृहत् रेणू एका विशिष्ट प्रमुख वर्गीकरणात्मक गटाच्या (उदा., ग्रॅम-धन सूक्ष्मजंतूंचे पेप्टिडोग्लायकन प्रकार) अनेक चामरांतील (वृक्षसदृश मांडण्यांमधील) प्रत्येकामध्ये व्यवच्छेदक रेणवीय बदल दर्शवितात. माहितीने भरलेले इतर बृहत् रेणू अनुक्रमामध्ये खूपच स्थानबदल व पर्यायाने बदल घडवून आणतात (उदा., गुणसूत्रीय डीएनए आणि mRNA). त्यामुळे ते बृहत् रेणू त्या जातीची किंवा प्रजातीची केवळ माहितीच देणारे नसतात. अगदी थोडे विशेषत: rRNA रेणू क्रमविकासाच्या काळात इतके स्थिर असतात की, नंतर त्यांच्यात काही सारखेपणा दिसू शकतो आणि जातिवृत्तीय व्यवस्थेत त्यांचा अंतर्भाव होतो. त्यांची उत्पत्ती कोठल्याही प्रकारची असली, तरी काही बिघडत नाही. यासाठी rRNA रेणूंचा मोठा भाग स्थिर असावा लागतो आणि तो काळानुसार अगदी सावकाशपणे बदलतो. यामुळे संकेतबद्ध न्यूक्लिओटाइड निर्धारकांपासून (विशेषकांपासून) रिबोसोमल प्रथिनांचे प्रभावी व महत्त्वाचे संघटन टिकवून ठेवण्याचे काम होते. अधिक स्थूल अशा अनेक गटांची प्रभावी मांडणी करणे शक्य झाल्याने वर्गीकरणात्मक गटांची जातिवृत्तीय मांडणी साध्य होईल, हे उघड आहे. त्याच अनुक्रम माहितीच्या आंतरप्रजातीय आणि अंतर्प्रजातीय परस्परसंबंध निरनिराळे करण्याच्या क्षमतेत जशी सुधारणा होईल, तशी वस्तुतः क्रमविकासात्मक विभेदनात सुधारणा होईल. विश्लेषणाचे तसेच माहिती हाताळण्याची तंत्रे जशी सुधारत जातील तसे 16S rRNA आणि 5S rRNA यांच्यापासून मिळणाऱ्या माहितीचे एकात्मीकरण अधिक मोठ्या व जटिल 23S rRNA पासून मिळणाऱ्या माहितीद्वारे शेवटी एकत्र केले जातील. प्रथिने व एंझाइमे यांच्या वाटचालीच्या अध्ययनातून क्रमविकासाविषयीच्या माहितीचे इतर स्रोत पुढे येत आहेत आणि त्याची फले rRNA पासून मिळालेल्या फलितांएवढी व्यापक नसली, तरी लहान व मोठ्या अशा दोन्ही विशिष्ट वर्गीकरणवैज्ञानिक गटांनी उपस्थित केलेल्या समस्या सोडविण्याच्या कामात या स्रोतांची भक्कम मदत होईल. सूक्ष्मजंतूंच्या रेणवीय जातिवृत्ताच्या भिन्न मार्गांमध्ये परस्परसंबंध आढळणे, ही उत्साहवर्धक गोष्ट ठरली आहे.
आकारवैज्ञानिक आणि शरीरक्रियावैज्ञानिक गुणवैशिष्ट्यांवर आधारलेल्या कृत्रिम प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टींमधील विन्यासांच्या (रचनांच्या) संदर्भात विरुद्ध दिशेने जाणारी उत्पत्तिनिष्ठ साहचर्ये ही रेणवीय वर्गीकरणविषयक अभ्यासाने उघड झाली. उदा., मायक्रोकॉकसाच्या काही जाती या मायक्रोकॉकस प्रजातीतील इतर जातींपेक्षा ऑर्थोबॅक्टर या प्रजातीशी अधिक निकटपणे संबंधित असल्याचे 16S rRNA याद्यांवरून सूचित होते. जांभळ्या प्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतूंचे सुस्पष्ट रूपाचे तीन जातिवृत्तीय गट आहेत. या प्रत्येक गटाचे चांगल्या परिचित असलेल्या विविध ग्रॅम-ऋण प्रजातींच्या प्रतिनिधींशी स्पष्ट नातेसंबंध असल्याचे दिसून येते. यांपैकी काही प्रजाती किमान दोन गटांचे प्रतिनिधित्व करतात. अप्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतूंचे विविध प्रकार प्रकाशसंश्लेषी सूक्ष्मजंतूंपासून निष्पन्न झाले. या आश्चर्यकारक शक्यतेमुळे एखाद्याला प्रकाशसंश्लेषण हा आधीचा व एकमात्र प्रगतीचा टप्पा आहे, या पूर्वग्रहाचे स्मरण होईल. या व इतर आश्चर्यकारक साहचर्यांविषयीच्या निष्कर्षांसाठी पुढील गोष्टी आवश्यक वाटतील. यासाठी विश्लेषणाच्या भिन्न पद्धती वापरून मिळणाऱ्या माहितीशिवाय आतापर्यंत शक्य असलेल्या संदर्भ संवर्धकांपेक्षा पुष्कळच अधिक संदर्भ संवर्धकाचीही गरज भासेल परंतु आकारविज्ञान व शरीरक्रियाविज्ञान यांची वर्गीकरणासाठीची परंपरागत गुणवैशिष्ट्ये यांची नैदानिक सूक्ष्मजंतुविज्ञानातील उपयुक्तता लक्षात घेतली, तरी या गुणवैशिष्ट्यांमुळे काही वर्गीकरणवैज्ञानिक अडचणी समोर येतात.
एखाद्या जीवाचे अभिज्ञान म्हणजे ओळख पटविण्याचे काम शक्य करणारे व्यावहारिक वर्गीकरण किंवा महत्त्वाची गोष्ट जातिवृत्त किंवा जातिविज्ञान व्यक्त करू शकणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. अचूक जातिनिश्चितीपर्यंत पोहोचू शकणे, ही आवश्यक गोष्ट आहे. वस्तुतः आहे त्या परिस्थितीत जातिवृत्तीय निर्देशनासाठी आवश्यक असलेले अनुक्रम व त्यासारखी गुणवैशिष्ट्ये खूपच गुंतागुंतीची असून जातीच्या निश्चितीकरणाची व्यावहारिकता साध्य होण्याच्या दृष्टीने ती पुरेशी नाहीत. म्हणून व्यावहारिक आणि शैक्षणिक या दोन्ही वर्गीकरणांची गरज भासणार आहे. ही पूर्णपणे शक्य कोटीतील गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने ती वेळेच्या आधीच आलेली आहे. सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांच्या सर्व गरजा वर्गीकरणविज्ञानाने भागविणे शक्य झाले पाहिजे आणि त्या गरजा भागवायलाच हव्यात. तसेच वर्गीकरणविज्ञानामुळे सर्वोत्कृष्ट प्रभावी जाण वा समज निर्माण होण्यासाठी व व्यावहारिक गरजांसाठी नवीन ज्ञान संकलित होणेही गरजेचे आहे.
पहा : जाति; जातिवृत्त; प्राणिनामपद्धति; प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग; प्राण्यांचे वर्गीकरण; वनस्पतिनामपद्धति; वनस्पतींचे वर्गीकरण; वर्गीकरणविज्ञान; व्हायरस; सूक्ष्मजंतुविज्ञान; सूक्ष्मजीवविज्ञान; सूक्ष्मतंत्रे, जीवविज्ञानीय.
संदर्भ : 1. Brew, R. S.; Murray, E. G. D.; Smith, N. R. Bergey’s Manual of Determinative Bacteriology, 1957.
2. Carlile, M. J.; Collins, J. E. Moseley, B. E. B., Eds., Molecular and Cellular Aspects of Microbial Evolution, 1981.
3. Gerhardt, P. et al, Eds., Methods for General and Molecular Bacteriology, 1993.
4. Holt, J. G. Krieg, N. R., Eds., Bergy’s Manual of Systematic Bacteriology, Vol. I, 1993.
5. Lapage, S. P. et al, Eds., International Code of Nomenclature of Bacteria, 1975.
6. Skerman, V. B. D. et al, Eds., Approved Lists of Bacterial Names, 1989.
7. Sneath P., Ed., Bergey’s Manual of Systematic Bacteriology, Vol. II, 1986.
8. Staley, J. T., Ed., Bergey’s Manual of Systematic Bacteriology, Vol. III, 1989.
9. Williams, S. T., Ed., Bergey’s Manual of Systematic Bacteriology, Vol. IV, 1989.
10. Zubay, G. Genetics, 1987.
ठाकूर, अ. ना.