सुविधाधिकार : एखादी स्थावर मालमत्ता आपल्या मालकीची नसतानाही त्या मालमत्तेत आपल्याला काही अधिकार प्राप्त होतात. मालकी दुसऱ्याची असताना वेगळ्याच व्यक्तीला प्राप्त झालेल्या या अधिकारांना ‘सुविधाधिकार’ (इझ्मेन्ट राइट) असे संबोधिले जाते. असे अधिकार मुख्यतः आपल्या मालकीच्या मालमत्तेचा उपभोग घेणे सुकर व्हावे व शक्य व्हावे म्हणून निर्माण होतात. अशी सुविधा वहिवाटीने काही दिवस उपभोगिली म्हणजे तिला कायद्याने संरक्षित केलेल्या अधिकाराचे रुप प्राप्त होते. एकमेकाला लागून शेते असतील, तर सामान्यतः प्रत्येक शेताला सार्वजनिक रस्ता उपलब्ध असत नाही. त्यावेळी दुसऱ्याच्या शेतातून जाण्याचा प्रसंग येतो. आपल्या शेतात जाणे हे त्या शेताच्या मालकीचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतातून जाण्याचा अधिकार निर्माण होतो.
सुविधाधिकार विशिष्ट काळापर्यंत अबाधितपणे चालू असलेल्या वहिवाटीने प्राप्त होतो, तसेच तो करारानेसुद्घा अस्तित्वात येऊ शकतो. काही अधिकार कायद्याने निर्माण होतात. २० वर्षांपेक्षा अधिक काळ जाण्याची वाट, एखादी वहिवाट, नळ किंवा कालव्याद्वारे शेतातून पाणी घेऊन जाण्याचा अधिकार उपभोगला असेल, तर तो कायद्याने संरक्षित होतो. एखाद्या शेताला सार्वजनिक रस्ता लगत आहे परंतु त्यातील एक हिस्सा विकला तर कदाचित त्या हिश्श्याला रस्ताच राहात नाही. अशा वेळी त्या हिश्श्याचे खरेदीखत करताना त्याला दुसऱ्या हिश्श्यातून जाण्या-येण्याचा हक्क असेल असा करार करता येतो. काही वेळा हवा, प्रकाश इ.जीवनावश्यक गोष्टी सर्वांना मिळाव्यात म्हणून कायदे किंवा शासकीय नियम यांद्वारे काही बंधने घालण्यात येतात. उदा., माझ्या घरातील एखाद्या खिडकीतून मी २० वर्षेपर्यंत प्रकाश आणि हवा यांचा उपभोग घेत असेन, तर त्या उपभोगाला अडथळा करण्याचा अधिकार शेजाऱ्याला नाही. हवा आणि प्रकाश येण्यासाठी दोन घरांतील अंतर किती असावे, हे नियमांनी आणि आजवरच्या निवाड्यांनी ठरलेले असते.
सुविधाधिकार म्हणजे एका अर्थाने दुसऱ्याच्या मालकीहक्कावर अतिक्रमण असल्यामुळे तो काटेकोरपणे आणि मर्यादितपणे आणि गरजेपुरताच उपभोगावा लागतो. तो अमर्याद असत नाही. ‘इंडियन ईझ्मेन्ट ॲक्ट, १८८२’ ने भारतातील सुविधाधिकारांचे नियंत्रण झाले आहे.
चपळगावकर, नरेंद्र