सुराबाया : इंडोनेशियातील जावा तिमूर प्रांताचे मुख्य ठिकाण व प्रमुख नाविक केंद्र. ते जावाच्या ईशान्य किनाऱ्यावर मादुरा बेटाच्या समोर सुराबाया सामुद्रधुनीवर वसले आहे. लोकसंख्या २९,०००,०० (२०१२, अंदाजे). मास उपनदी शहराच्या मध्यातून वाहते. जाकार्ताच्या खालोखाल हे इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. ते जावा बेटावरील प्रमुख शहरांशी रेल्वे व रस्त्याने जोडण्यात आले आहे. शहराच्या उत्तरेस तांजुंगपेराक येथे विमानतळ आहे.
सुराबाया हे चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत पूर्व जावामधील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. ते पुढे डच ईस्ट इंडीज कंपनीच्या आधिपत्याखाली आले (१७२३–१९४२). दुसऱ्या महायुद्घकाळात (१९३९–४५) ते जपानच्या वर्चस्वाखाली होते. या काळात मित्रराष्ट्रांनी केलेल्या बाँबफेकीमुळे व नंतर इंडोनेशियाच्या स्वातंत्र्ययुद्घाच्या वेळी (१९४५–४९) शहराची वित्तहानी झाली. महायुद्घोत्तर काळात इंडोनेशियाचे मूळ राष्ट्रप्रेमी रहिवासी आणि इंग्रज सैन्यामध्ये जावा बेटांच्या वर्चस्वासाठी घनघोर युद्घ झाले (नोव्हेंबर १९४५).
तांजुंगपेराक हे सुराबायाचे बंदर शहराच्या उत्तरेस असून ते इंडोनेशियाच्या मुख्य नाविक तळांपैकी एक आहे. या बंदरामधून जावाची प्रमुख कृषी उत्पादने, साखर, कॉफी, तंबाखू, साग, कसाव्हा, रबर, मसाल्याचे पदार्थ, वनस्पती तेले आणि खनिज तेल उत्पादने निर्यात केली जातात. हे सिंगापूर व जाकार्ता या पूर्व आशीयायी बंदरांना जोडणाऱ्या जलमार्गावरील एक प्रमुख बंदर असल्यामुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशातील शहरांशी त्याद्वारे दळणवळण चालते. मच्छिमारीचा व्यवसायही येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. शहरात जहाजबांधणी, जहाजदुरुस्ती, रेल्वेइंजिने दुरुस्ती, कापडगिरण्या तसेच काच, बीअर, रसायने, सिगारेटी, पादत्राणे यांच्या निर्मितीचे कारखाने आहेत. उपनगरात तेलशुद्घीकरण कारखाना आहे. सुराबाया येथे सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा असून येथील एअरलांग्गा विद्यापीठात (१९५४) विधी, वैद्यक इ. विषयांच्या विद्याशाखा आहेत. तसेच आरमार प्रशिक्षण महाविद्यालय आणि तंत्रविद्या शिक्षणसंस्था विशेष ज्ञानार्जनासाठी कार्यरत आहेत.
शहरात भव्य मशीद (१८६८), डच राजपुत्र हेन्रिक याचा वसाहतकालीन किल्ला इ. प्रेक्षणीय वास्तू आहेत.
राऊत, अमोल