सुराकार्ता : इंडोनेशियातील जावा बेटावरील एक औद्योगिक, सांस्कृतिक व व्यापारी शहर. ते सोलो व कोटामाद्या ह्या नावांनीही प्रसिद्घ आहे. लोकसंख्या ५,३६,००० (२०१२). ते सोलो नदीकाठी मालांगच्या पश्चिमेस सु. ३७ किमी.वर वसले असून जावातील अन्य शहरांना रस्ते, रेल्वे व हवाई मार्गांनी जोडले आहे. डच ईस्ट इंडीज कंपनीच्या (१७२३–१९४२) वसाहतकाळात सुराकार्ता येथे वसाहतीची राजधानी होती. दुसऱ्या महायुद्घकाळात (१९३९–४५) जपानने ते पादाक्रांत केले. त्यानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाल्यावर (१९४९) ते इंडोनेशियात समाविष्ट झाले. शहरात दुतर्फा वृक्षांनी सुशोभित रुंद रस्ते असून रस्त्याकडेने आधुनिक वास्तुशैलीत बांधलेल्या वास्तू आढळतात. शहराच्या आसमंतात शेतीस उपयुक्त सुपीक जमीन असून तीत तंबाखू, भात, ऊस, नारळ, फळफळावळ, भाजीपाला व कसाव्हा ही पिके मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांची मुख्य बाजारपेठ सुराकार्ता होय. शहरात साखर कारखाने, सूतगिरण्या, कातडी कमावण्याचे उद्योग, यंत्रनिर्मिती, धातुकाम, ओतशाळा, फर्निचर आणि सिगारेट निर्मिती हे प्रमुख उद्योग असून बाटिक कापड निर्मितीसाठी हे विशेष प्रसिद्घ आहे. शहरात हस्तकलेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. स्थानिक कलाकार-कामगार कलात्मक जडजवाहीरांचे अलंकार, नक्षीदार मृत्पात्रे, काष्टशिल्पे, हस्तिदंती कलात्मक वस्तू , संगीतवाद्ये इ. बनवितात. सुराकार्ता हे एक इंडोनेशियातील जावनीज कला व संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र असून गेमलिन संगीत आणि छायानाट्ये (वायांग) यांसाठी ते विशेष ख्यातनाम आहे. प्रशस्त प्राकारयुक्त सुसुहुनान सुलतानचा राजवाडा (१७४५), मंगकुनेगरन राजाचे भव्य सभागृह (१७८८) आणि डच वसाहत काळातील किल्ला (१७७९) या मध्ययुगीन वास्तू प्रेक्षणीय असून किल्ल्याचा परिसर एखाद्या छोट्या नगराएवढा विस्तृत आहे. सध्या तेथे लष्कराच्या शिबंदीचे मुख्यालय आहे. सुराकार्तात युनिव्हर्सिटी ऑफ सिबेलस मॅरेट (१९७६) हे विद्यापीठ असून त्यात नऊ विद्याशाखा आहेत. सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या ते एक जावातील प्रगत शहर आहे. शहरात एक वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि साहित्य या जावानीज सांस्कृतिक जीवनाचे हे एक प्रमुख केंद्र आहे.
निगडे, रेखा