सुब्रह्मण्य

सुब्रह्मण्य भारती : ( ११ डिसेंबर १८८२ – १२ सप्टेंबर १९२१). अर्वाचीन तमिळ काव्यात नवयुग निर्माण करणारे श्रेष्ठ कवी. जन्म एट्ट्यापुरम् (जि. तिरुनेलवेली) येथे. बालपणीच त्यांच्यातील शीघ्र कवित्वशक्ती दिसून आली. सुबोध, रसाळ वाणी व सर्जनशील प्रतिभा यांमुळे लहान वयातच त्यांना लोकप्रियता लाभली. ‘भारती’ (विद्यादेवी सरस्वती या अर्थी ) ही पदवी त्यांना लहान वयातच रसिकांनी बहाल केली. तिरूनेलवेली येथील हिंदू कॉलेजात त्यांनी काही काळ इंग्रजीचे शिक्षण घेतले. पुढे त्यांच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे (१८९८) ते शिक्षणासाठी बनारसला गेले व तेथे त्यांनी ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’मध्ये संस्कृत, हिंदी व इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. त्यानंतर ते एट्ट्यापुरम्‌ला परतले व तेथे त्यांनी दोन वर्षे राजदरबारी सेवाचाकरी केली. पण दरबारी कवीचा त्यांचा पिंड नव्हता. १९०४-०५ मध्ये भारतींनी मद्रासच्या स्वदेश मित्रन् या दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले, तसेच १९०६ नंतर ते इंडिया साप्ताहिकाचे संपादक झाले. कोलकात्याच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला ते गेले (१९०६) व तेथून परतताना त्यांनी भगिनी निवेदितांची भेट घेतली. त्या भेटीने ते विलक्षण प्रभावित झाले. भगिनी निवेदितांना त्यांनी गुरुस्थानी मानले व त्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रभक्ती, सामाजिक सुधारणा व स्त्रियांची उन्नती ही आपल्या आयुष्याची ध्येये मानून त्यांच्यासाठी आजन्म समर्पित वृत्तीने त्यांनी कार्य केले. भारतींनी काव्य हे जनजागृतीचे, समाजप्रबोधनाचे व समाजोद्घाराचे प्रभावी साधन मानले. त्यांनी काव्यातून राष्ट्रभक्ती, मातृभाषाप्रेम तसेच स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा व धैर्य ह्यांची शिकवण दिली. साध्या सोप्या भाषेत त्यांनी काव्यरचना केल्याने ते जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले व खऱ्या अर्थाने लोककवी बनले.

सुब्रह्मण्य भारतींची वाङ्‌मयीन जडणघडण अनेकविध संस्कारांतून व प्रभावांतून होत गेली. गोपाळकृष्ण भारती, रवींद्रनाथ टागोर, वॉल्ट व्हिटमन, शेली अशा अनेक देशीविदेशी साहित्यिकांपासून त्यांनी लिखाणाची स्फूर्ती घेतली. शेलीच्या काव्याचा तर इतका विलक्षण प्रभाव त्यांच्यावर होता, की ‘शेली-दासन्’ या टोपणनावानेही त्यांनी काही कविता लिहिल्या. प्राचीन वेदवाङ्‌मय व लोकसाहित्य यांचेही संस्कार त्यांच्या लिखाणात आढळतात.

सुब्रह्मण्य भारतींचा काळ हा राष्ट्रीय स्वातंत्र्यआंदोलनाचा व सामाजिक सुधारणांचा होता. ह्या काळाचे तीव्र पडसाद त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व वाङ्‌मयनिर्मितीत दिसून येतात. त्यांनी आपल्या काव्यातून सामान्य जनतेला स्वातंत्र्यआंदोलनाची प्रेरणा दिली. उदा., ‘वंदेमातरम्’ ( बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ गीतावरुन स्फूर्ती घेऊन रचलेली कविता ), ‘अच्च मिल्ले’ (भय नाही) यांसारख्या राष्ट्रभक्तिपर कविता त्यांनी रचल्या. स्वदेश गीतांगळ (१९०८) व जन्मभूमी (१९०९) या काव्यसंग्रहांतील त्यांची देशभक्तिपर गीते विशेष गाजली. प्रखर राष्ट्रभक्ती, देशबांधवांविषयी उत्कट प्रेम व सामाजिक प्रश्नांची सखोल जाण ही त्यांच्या काव्याच्या आशयाची ठळक वैशिष्ट्ये होत. ते पुरोगामी व क्रांतिकारक विचारसरणीचे कट्टर समाजसुधारक होते. स्त्रीच्या ठायी असलेले सुप्त सामर्थ्य व विशाल मानवता ह्यांचा साक्षात्कार त्यांना भगिनी निवेदितांच्या प्रेरक सहवासात घडला. त्यातून त्यांनी भगिनी निवेदिता, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, गुरु गोविंदसिंग अशा महान देशभक्तांवर गौरवगीते रचली. तसेच ‘नेजं पोरुकदिल्ले’ ( ऊर फुटत आहे ), ‘पुटुमैपेण’ ( नवी नारी ) यांसारख्या मर्मभेदी कविता त्यांनी लिहिल्या. बहुसंख्य सर्वसामान्य स्त्रिया ह्या अशिक्षित, अबला, अत्याचारपीडित व परवशतेमुळे दुःखीकष्टी होत्या, त्यांच्याविषयी त्यांना अपार कणव होती व त्यांच्या उद्घारासाठी, स्वातंत्र्यासाठी व प्रबोधनासाठी त्यांनी आपली लेखणी झिजविली. समाजात कोणी दीनदुबळे, भुकेकंगाल राहू नये, अशा मानवतावादी भूमिकेतून त्यांनी लेखन केले. समाजातील अंधश्रद्घा, जातिभेद, स्त्रियांचे मागासलेपण, अशिक्षितपणा अशा दोषवैगुण्यांवर त्यांनी लेखनातून प्रखर हल्ला चढविला. पत्रकार म्हणूनही त्यानी मोठे कार्य केले. इंडिया साप्ताहिकाचे संपादक असताना त्यांनी जुलमी व अत्याचारी ब्रिटिश राजवटीविरुद्घ प्रखर व धारदार टीका करुन जनजागृती केली आणि ब्रिटिश सत्तेचा रोष ओढवून घेतला. परिणामी इंडिया साप्ताहिकावर बंदी घालण्यात आली. भारतींनी न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, आर्य इ. इंग्रजी नियतकालिकांतूनही लिखाण केले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते पाँडिचेरी या फ्रेंचांच्या वसाहतीत सटकले. तेथे ते योगी अरविंदांच्या प्रभावाखाली आले व त्यातून त्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची व अध्यात्माची गोडी लागली. त्यांनी इंडिया साप्ताहिक पुनश्च सुरू केले मात्र तमिळ प्रदेशात त्यावर बंदी होती अखेर १९१० मध्ये हे साप्ताहिक कायमचे बंद पडले. ह्यावेळी अत्यंत हलाखीची आर्थिक स्थिती व शारीरिक दुर्बलता ह्यांनी ग्रासलेल्या अवस्थेतही भारतींनी पांचाली शपथम् (१९१२), कुयिल पाट्टु (कोकिळ गीत, १९१२), कण्णन् पाट्टु (कृष्णगीते, १९१७) यांसारखी उत्तमोत्तम दर्जेदार व लोकप्रिय काव्ये रचली. अखेर ढासळलेली तब्बेत व खचलेली मानसिक अवस्था यांमुळे त्यांना १९१८ मध्ये मद्रासला परत यावे लागले. परतल्यावर त्यांना अटक झाली पण लवकरच सोडून देण्यात आले. १९२० च्या सुमारास ते परत स्वदेश मित्रन् दैनिकात काम करु लागले. ढासळलेल्या शारीरिक, मानसिक अवस्थेतच त्यांचे मद्रास येथे निधन झाले.

तमिळ काव्याचे पुनरुज्जीवन करुन त्यात त्यांनी जोश व गुणवत्ता आणली व त्यायोगे तमिळ काव्याचा पोत बदलून टाकला. त्यांच्या काव्यात मुख्यत्वे राष्ट्रप्रेम, भक्तिभाव व तत्त्वज्ञान या विषयांचा आविष्कार साध्या, सोप्या व प्रभावी शैलीत आढळतो. भाषासौंदर्य, समर्पक शब्दयोजना, सूचक अर्थ व प्रभावी आशय ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये त्यांच्या गद्य लिखाणातही आढळतात. समीक्षा, अनुवाद, टिपणे व सूत्रे हे त्यांचे गद्य वाङ्‌मय. त्यांनी तमिळमध्ये प्रथमच गद्यकाव्य लिहिले. जाज्वल्य देशभक्ती व प्रखर राष्ट्रवाद काव्यातून प्रकट करणारे ते सर्वांत आद्य तमिळ कवी मानले जातात. देशाच्या विविधतेतील एकात्मता त्यांनी काव्यातून व्यक्त केली. स्वातंत्र्य, समता व बंधुता ह्या मानवतावादी मूल्यांचा उद्‌घोष त्यांनी काव्यातून केला.

सुब्रह्मण्य भारती हे तमिळ बाल साहित्याचेही जनक मानले जातात. त्यांची पापा पाटुपुदियआत्तिशूडि ही बालगीते मुलांमध्ये अतिशय प्रिय आहेत. पांचाली शपथम् या काव्यात त्यांनी प्राचीन व वर्तमानकालीन प्रवृत्तींचा समन्वय साधला. त्यातून प्राचीन कथांचे नवे अन्वयार्थ लावण्याच्या प्रेरणेला चालना मिळाली. कण्णन् पाट्टु हे उत्तुंग कल्पनाशक्तीने युक्त असे भक्तिकाव्य असून त्यात कृष्णाला सखा, माता-पिता, राजा-सेवक, गुरू -शिष्य, बालक, प्रियकर व दैवत अशा विविध रूपांत कल्पून गीते रचली आहेत. ज्ञानरथम् हे त्यांचे सर्वश्रेष्ठ गद्य लिखाण होय. ह्या कलाविषयक ग्रंथात त्यांच्या अलौकिक कल्पनाशक्तीची झेप दिसून येते. काव्याप्रमाणेच गद्याचाही गतिमान विकास त्यांच्या लिखाणाने घडवून आणला. त्यांनी विविध विषयांवर माहितीपूर्ण व स्फूर्तिप्रद निबंध लिहिले, लघुकथाही लिहिल्या. प्रगतशील नव्या साहित्याला अनुकूल व पोषक अशी लोकाभिरुची घडविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी तमिळमध्ये अनेक उत्तमोत्तम अनुवाद केले. उदा., विवेकानंदांची व्याख्याने, अरविंदांचे लेख, वेदांतील काही ऋचा, पातंजल योगसुत्रां तील समाधिपाद, भगवद्‌गीता इत्यादी. त्यांच्या ह्या अनुवादित कृतींची गणना अभिजात तमिळ साहित्यात केली जाते. उत्तरकालीन ⇨ भारतीदासन् (१८९१–१९६४) व नामक्कळ रामलिंगम् पिळ्ळै (१८८८–१९७३) ह्या कवींवर भारतींचा प्रभाव जाणवतो. सुब्रह्मण्य भारतींनी पांडित्याच्या संकुचित विश्वात बंदिस्त होऊन पडलेले तमिळ साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यास अमाप लोकप्रियता मिळवून दिली, तसेच सर्वसामान्यांच्या प्रचलित जिवंत भाषेत ते आणले, ही त्यांची कामगिरी अजोड मानली जाते.

संदर्भ :1. Sundarm, P. S. Poems of Subramania Bhararti, Delhi, 1982.

२. शर्मा, क. म. शिवराम, संपा.-अनु. कवि-श्री माला : सुब्रह्मण्य भारती, वर्धा, १९६२.

इनामदार, श्री. दे.