सुपरबाजार : स्वयंसेवा तत्त्वावर चालविले जाणारे किरकोळ विक्रीचे मोठे भांडार. एकाच ठिकाणी व एकाच छताखाली ग्राहकांना हवा असलेला विविध प्रकारचा माल खरेदी करण्याची सोय सुपरबाजारात केलेली असते. ग्राहकाने दुकानात ठेवलेला माल स्वतःच पहावयाचा व विक्रेत्याच्या मध्यस्थीशिवाय स्वतःच हव्या त्या मालाची निवड करावयाची. ही स्वयंसेवा तत्त्वाची किरकोळ विक्रीपद्घत पहिल्यांदा अमेरिकेत १९१२ मध्ये सुरु झाली. तेथे दुकानासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवल्यामुळे नोकरवर्गाची (विक्रेत्यांची) नियुक्ती न करता विक्री करण्याची ही पद्घत विकसित करण्यात आली परंतु त्यावेळी ही दुकाने आकाराने लहान होती. अत्यंत मोठ्या प्रमाणावर विक्री करणारी या पद्घतीची दुकाने म्हणजे ‘सुपरमार्केट’ची वाढ १९३० सालानंतर झाली. ग्रेट ब्रिटन व इतर यूरोपियन देशांत या पद्घतीचा प्रसार १९५० सालानंतर झाला.
रॉम जे मार्किन (ज्युनियर) यांनी रिटेलिंग (१९७१) या आपल्या ग्रंथात स्वयंसेवा, रोखीची विक्री व मोठी उलाढाल ही सुपरबाजाराची तीन प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत. सुपरबाजाराचे प्राबल्य सुरुवातीला खाद्यपदार्थ व किराणा मालाच्या विक्रीसंदर्भात होते तथापि अलीकडील सुपरबाजारात ग्राहकांना लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू स्वतंत्र विभाग करून एकाच छताखाली मांडलेल्या असतात. सुपरबाजारात ठेवलेल्या वस्तू प्रामुख्याने अशा प्रकारच्या असतात, की ज्यांच्या खरेदीला विक्रेत्यांच्या सल्ल्याची, त्यांनी दिलेल्या माहितीची गरज नसते. आकर्षक वेष्टनातून सुव्यवस्थित पद्घतीने माल कपाटांच्या खणावर मांडून ठेवलेला असतो. वेष्टनावर मालाचे गुणधर्म व किमतीची निसंदिग्ध चिठ्ठी लावलेली असते. आपल्याला हवा असलेला माल खणातून उचलावयाचा व तेथे उपलब्ध असलेल्या छोट्या ढकलगाडीवर भरावयाचा. अशाप्रकारे दुकानाच्या विविध विभागातून हवी ती खरेदी केल्यावर माल घेऊन काऊंटरवर रोखीने अगर पतपत्र (क्रेडिट कार्ड) त्यासाठीच्या यंत्रात घालून (स्वाईप करून) मालाचे पैसे चुकते करावयाचे अशी ही पद्घत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक काऊंटर्सवर रोखपाल नियुक्त केलेले असतात. काही ठिकाणी रोखपालाऐवजी सेल्फ चेकआऊट मशिनच्या साहाय्याने पतपत्राचा वापर करून मालाची किंमत भरण्याची व्यवस्था केलेली असते.
सुपरबाजारात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याने व पुढारलेल्या देशांत ग्राहकवर्ग सजग (प्रामाणिक) असल्याने शक्यतो मालाची चोरी सहजासहजी कोणी करत नाहीत. विक्रेत्यांचा दबाव नसल्यामुळे ग्राहकांना मोकळे वाटते. ग्राहक अगोदर न ठरवता, ऐनवेळी माल आवडला म्हणून खरेदी केला, अशा रीतीने गरजेपेक्षा अधिक खरेदी करतात. सुपरबाजारात नोकरवर्गाच्या पगारावरील खर्च अल्प असल्याने व मालाची उलाढाल मोठी असल्याने वस्तूंच्या किमती कमी ठेवण्यावर भर दिला जातो. विक्री खर्चातील बचत, मोठ्या प्रमाणावर विक्री, मालाचा जलद उठाव व रोखीने विक्री या वैशिष्टयामुळे सुपरबाजार ही किरकोळ विक्रीची पद्घत मालकाला खूपच फायदेशीर ठरते परंतु त्यासाठी विस्तृत जागा, माल हाताळणी व साठवण यासाठी अद्ययावत व्यवस्था व नियंत्रण तसेच मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी प्रचंड भांडवल गरजेचे असते. व्यवस्थापनही कार्यक्षम असावे लागते. वातानुकुलित अशा या सुपरबाजारात दिवसेंदिवस ग्राहकांच्या सुखसोयींवर खर्च करण्याचा प्रघात पडू लागल्याने अशा भांडारांचा वरकड खर्च वाढलेला आहे.
विक्री व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवा तत्त्वावर चालविले जाणारे सुपरबाजार अमेरिकेत अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने वॉलमार्ट, टार्गेट, ट्रेडर जोज्, कास्ट्को होलसेल, अर्ल्बस्टन इनकार्पोटेड, मॅसीज इनकार्पोटेड व सेफ वे यांचा समावेश होतो. पैकी वॉलमार्ट या सुपरबाजाराच्या जगातील पंधरा देशांत सु. ८,५०० च्या वर शाखा आहेत. इंग्लंडमध्ये आल्दी, ॲस्दा, मार्कस् ॲण्ड स्पेन्सर व बूथस् ही सुपरमार्केटस् आघाडीवर आहेत. भारतात पूर्वी मुंबईसारख्या शहरात अपना बाजार, दिल्लीतील सुपरबाजार ही एखाद दुसरी दुकाने प्रसिद्घ होती. अलीकडे बिगबझार, हायको सुपरमार्केट, रिलायन्स फ्रेश, डी मार्ट, फूडवर्ल्ड, हायपर सिटी, स्पेन्सर्स रिटेल, मेट्रो इंडिया, स्पार हायपरमार्केटस् यांसारखे सुपरबाजार मोठ्या शहरांतून सर्वत्र दिसून येतात. जागतिकीकरण व आर्थिक उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे परदेशी थेट गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे धोरण असल्याने (२०१२) परदेशातील अनेक मोठे सुपरबाजार येऊ घातलेले आहेत.
चौधरी, जयवंत
“