सुंता : पुरुषाच्या शिश्नमण्याभोवताली चिकटलेली त्वचा शल्यक्रियेने काढून टाकण्याच्या क्रियेला सुंता अशी संज्ञा आहे. शिश्नमण्याभोवतालच्या त्वचेतील ग्रंथींमधून एक प्रकारचा द्रव निर्माण होत असतो. या द्रव पदार्थामुळे त्वचा नरम राहण्यास मदत होते. स्नान करते वेळी शिश्नमण्यावरील त्वचा मागे सरकावून तो भाग स्वच्छ केला नाही, तर द्रव पदार्थ अधिक घट्ट होऊन त्याचे रुपांतर स्मेग्मा (पांढरा मल) या पदार्थात होते. स्मेग्मामध्ये हानिकारक जीवाणूंचा फैलाव होऊन त्या ठिकाणी त्वचेचा दाह निर्माण होण्याचा संभव असतो. याखेरीज या जागेच्या त्वचेवर विषाणुजन्य रोग आणि क्वचित प्रसंगी शिश्नाचा कर्करोग होऊ शकतो. लहान वयामध्ये शिश्नमण्याभोवतालची त्वचा जास्त प्रमाणात वाढल्यास मूत्रप्रवाह बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. या सर्व व्याधी टाळण्याच्या उद्देशाने सुंता करण्यात येते.

यहुदी व इस्लाम धर्मांनी आणि ख्रिस्ती धर्मातील काही पंथांनी ‘सुंता’ या पद्घतीला धार्मिक मान्यता दिली आहे. ही प्रथा केव्हापासून सुरू झाली, याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही. सुरुवातीला धातूंनी बनविलेल्या शस्त्रांऐवजी दगडापासून बनविलेली हत्यारे सुंता क्रियेमध्ये वापरली जात होती. यावरुन ही प्रथा अश्मयुगापासून अंमलात आणली जात असावी. यहुदी धर्मग्रंथांत सुंता हा धार्मिक विधी मूल जन्मल्यानंतर आठव्या दिवशी समारंभपूर्वक करावा असे सांगितले आहे. यहुदी लोक या समारंभाला ‘ ब्रिथ मिलाह’ असे म्हणतात. ईश्वर आणि ज्यू लोक यांच्यामध्ये ब्रिथ मिलाह हा एक करारनामा झाला आहे असे ते मानतात. यहुदी धर्माच्या प्रत्येक व्यक्तीला सुंता करून घेणे बंधनकारक आहे. हे बंधन यहुदी धर्म स्वीकारणाऱ्या परधर्मीयांनाही लागू आहे. अमेरिकेतील ज्यू मात्र परधर्मीयांसाठी लवचिक धोरण ठेवतात (त्यांना सुंता करणे सक्तीचे नाही). बायबलमध्ये देखील काही ठिकाणी सुंता यासंबंधी संदर्भ आढळतात.

सुंता ही पद्घत स्त्रियांमध्ये वापरली जाण्याचे शारीरिक दृष्ट्या काहीही प्रयोजन नाही. मात्र ही घातक प्रथा न्यू गिनी, ब्राझील, पेरू , मेक्सिको, ईजिप्त, मलेशियातील काही बेटे आणि मध्य आशियातील देशांमध्ये प्रचलित आहे. या देशांमध्ये ही पद्घत सर्व स्त्रियांसाठी सक्तीची नसली, तरी गटागटांमध्ये राहणाऱ्या काही जातिजमातींमध्ये ती रूढ आहे. या क्रियेमध्ये स्त्रियांच्या जननेंद्रियातील मध्यभागी असलेली शिश्निका (भगशिश्न), बृहत्‌भगोष्ठ आणि लघुभगोष्ठ [⟶ जनन तंत्र] यांचे जवळजवळ दोनतृतीयांश भाग कापले जातात. त्यानंतर बृहत्‌भगोष्ठाचा उर्वरित भाग टाके घालून जोडला जातो. या शल्यक्रियेनंतर योनीचे तोंड निमुळते होते आणि त्यामुळे मूत्रविसर्जनास त्रास होतो. जखम बरी झाल्यानंतर लैंगिक क्रिया त्रासदायक ठरते. स्त्री-पुरुषांनी सुंता करून घेतल्याखेरीज त्यांना प्रौढत्व प्राप्त होत नाही, असा गैरसमज पसरल्यामुळे ही प्रथा काही ठिकाणी चालू आहे.

गोगटे, म. ग.

सुंता शब्द ‘सुन्नत’ या अरबी शब्दाचा अपभ्रंश आहे. सुन्नतचा अर्थ ‘तरिका’ म्हणजे पद्घत असा होतो. त्याचा मूळ अर्थ म्हणजे पुरुषाच्या शिश्नाच्या टोकाचे समोर असणारे कातडे कापणे असा नाही परंतु तसे कातडे कापण्याची पद्घत अरबस्तानात आहे, म्हणून त्या अर्थाने, सुन्नतचा अपभ्रंश ‘सुंता’ हा शब्द बोलीभाषेत रूढ झाला आहे. त्यासाठी मूळ अरबी शब्द आहे, ‘खतना’ हा ‘खतान’ या शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ पुरुषी शिश्नाच्या टोकाचे कातडे कापणे असा आहे. या कातड्याला अरबी शब्द आहे ‘कुला’ ( जादा आलेले कातडे ).

अरबस्तानात उदयास आलेले ज्यू , क्रिस्ती आणि इस्लाम हे तीनही धर्म, मूळ पुरुष प्रेषित हजरत इब्राहिम (अब्राहम ) यांच्या वंशातील प्रेषितांनीच प्रस्थापित केले. त्यामध्ये सर्वप्रथम ‘खतना’ करणारे प्रेषित इब्राहिम हे होते. इमाम मालिकी यांनी संपादित केलेल्या मुअत्ता नावाच्या हदीस ( पैगंबरांच्या वचनांचे पुस्तक ) मध्ये याचा उल्लेख आलेला आहे. तो उल्लेख कुराणातील ‘सुरे बकर’ मधील पंधराव्या रुकूं (परिच्छेद ) वर आधारित आहे.

ही खतनाची प्रथा प्रेषित इब्राहिमपूर्व काळात हिब्रू जमातींत रू ढ होती. ती ईजिप्तमध्येदेखील असल्याचे हदीसमध्ये म्हटले आहे. एका हदीसमध्ये ग्रीक गणिती पायथॅगोरस ईजिप्तला गेला असताना, त्याला ‘खतना’ करून घ्यायला लागली, असे म्हटले आहे.

मिस्कान शरिफ या नावाच्या हदीस ग्रंथांत, अबू हुरेरा या इस्लाम धर्म संस्थापक महंमद पैगंबर यांच्या अनुयायांचा दाखला देऊन, पैगंबरांनी स्वच्छतेच्या दृष्टीने पाच गोष्टी अत्यावश्यक केल्याचे म्हटले आहे. त्या पाच गोष्टी म्हणजे (१) खतना करणे, (२) कमरेच्या खालील केस काढणे, (३) काखेतील (बगल) केस काढणे, (४) नखे काढणे, (५) मिशा कापणे. महंमद पैगंबरांनी मुलाच्या जन्मापासून आठव्या दिवसानंतर खतना करणे योग्य असल्याचे म्हटले आहे. आफ्रिकेतील काही टोळ्यांच्या प्रदेशात स्त्रियांच्या बाबतीतदेखील ही प्रथा दिसून येते परंतु इस्लाममध्ये तशी आज्ञा स्त्रियांच्या बाबतीत नाही.

टॉमस ह्युजिस संपादित डिक्शनरी ऑफ इस्लाम मध्ये खतना करून घेतलेल्या पाच प्रेषितांची नावे दिली आहेत. दर्रे-मुख्तार नावाच्या हदीसच्या पुस्तकात अशा १७ प्रेषितांची नावे आहेत.

जफर शरिफ लिखित कानून-इ-इस्लाम या १८३२ मध्ये लिहिल्या गेलेल्या पुस्तकातील पाचव्या प्रकरणात भारतीय मुसलमानांत असणारे सुंता करण्याचे विधी आणि समारंभ सविस्तर दिले आहेत.

बाल्यावस्थेत चौदा वर्षांपर्यंत सुंता करून घेण्याची धर्माने मुभा दिली आहे. हा धार्मिक विधी असल्यामुळे समारंभपूर्वक केला जातो. सुंता ही शल्यक्रिया समजून केल्यास त्यानंतर होणारे दाह आणि वेदना फार कमी प्रमाणात दिसून येतात.

सुंता करण्यात तज्ञ असलेल्या नाभिकाकडून सुंता करण्याची पारंपरिक पद्घती प्रचलित होती पण अलीकडे सुंता ही शस्त्रक्रियेच्या आधुनिक पद्घतीने करणे सोयीचे व सुलभ झाले आहे.

अरबस्तानचा प्रदेश वाळवंटमय आणि अत्यंत उष्ण असल्याने साहजिकच ही प्रथा रूढ झाली आहे. तीव्र उष्णतेमुळे बगलेत आणि जांघेत घाम येतो. शिश्नावरील जादा असणारे कातडे लघवी केल्यानंतर म्हणावे तितके स्वच्छ राहत नाही. परिणामतः उष्ण प्रदेशात त्यामुळे चर्मरोग होण्याची शक्यता असते. घामामुळेही खाज वगैरे सुटते. त्याचे शिश्नावर वाईट परिणाम होऊ शकतात. अरबस्तानात पाण्याची कमतरता असल्याने हे कातडे काढून टाकण्याची प्रथा निर्माण झाली आहे. लोकांच्या आरोग्यरक्षणासाठी त्या प्रथेचे रूपांतर धर्माज्ञेमध्ये झालेले आहे.

बेन्नूर, फकरुद्दीन

संदर्भ : 1. Hanif, N. Islam and Modernity, New Delhi, 1997.

2. Hughe, Thomas Patrick Dictionary of Islam, New Delhi, 1992.

3. Jafar, Sharif, Qanun-I-Islam, 1972.

4. Khan Mohammad I Experiencing Islam New Delhi, 1997.

5. Mujib, Mohammad, Indian Muslims, London, 1969.