सी.शिवराममूर्ति : (१५ जून १९०९— ६  फेब्रुवारी १९८३). विख्यात भारतीय कलातज्ज्ञ, कलेतिहासकार व प्राच्यविद्यापंडित. पूर्ण नाव कलंबूर शिवराममूर्ती. संस्कृत, शिल्पचित्रादी कला, पुराभिलेख व पुरातत्त्वविद्या, संग्रहालयशास्त्र, नाणकशास्त्र अशा अनेकविध विषयांच्या गाढ्या व्यासंगामुळे त्यांच्या कलाविषयक लिखाणामध्ये संदर्भांची समृद्घी व वैविध्यता दिसून येते.

सी.शिवराममूर्तिशिवराममूर्तींचा जन्म सालूर (आंध्र प्रदेश) येथे झाला. कलंबूर सुंदर शास्त्री ह्या संस्कृत पंडितांचे ते पुत्र होते. अप्पय्य दीक्षित (१५५४— १६२६) ह्या संस्कृत महापंडित ग्रंथकाराचा वारसा त्यांना वंशपरंपरेने लाभला होता. तमिळ ही त्यांची मातृभाषा. त्यांनी मद्रास विद्यापीठातून एम्.ए. ही पदवी संपादन केली. शिवराममूर्ती वृत्तीने धार्मिक होते. त्यांची पत्नी संपूर्णा ही सुविद्य व सुसंस्कृत घराण्यातील होती.

शिवराममूर्ती यांच्या संग्रहालयीन कारकीर्दीची व संशोधनकार्याची सुरूवात मद्रास येथील शासकीय संग्रहालयात पुरातत्त्व विभागाचे अभिरक्षक म्हणून झाली. तेथे संग्राहक व अभ्यासक म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केले. अनेक ठिकाणी सर्वेक्षण व अभ्यास करून त्यांनी संग्रहालयासाठी अनेक मूर्ती व शिल्पे यांचा संग्रह केला, तसेच त्यांवर विश्लेषक व विवेचक लिखाण केले. त्यांतून त्या शिल्पाकृतींवर व शिल्पावशेषांवर उद्‌बोधक प्रकाश टाकण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरातत्त्वीय सर्वेक्षण खात्याने त्यांची कोलकात्याच्या ‘इंडियन म्यूझीयम’मध्ये पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती केली. भारतातील पुरातत्त्वीय सर्वेक्षणाच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यानंतर नवी दिल्ली येथील ‘नॅशनल म्यूझीअम’  या राष्ट्रीय संग्रहालयात अभिरक्षक, साहाय्यक संचालक व संचालक अशा विविध पदांवर त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. त्यांनी तेथे नाणी तसेच भारतीय व आशियाई लिप्या यांचे तक्ते, कोष्टके इ. तयार केली. त्याचा फायदा संग्रहालयाला भेटी देणाऱ्या अभ्यासक संशोधकांना झाला. १९६६ पासून संग्रहालयाचे संचालक म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली व या पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्यूझीअम्स’  या संस्थेच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य, तसेच तिच्या ‘इंडियन नॅशनल कमिटी’  या शाखेचे अध्यक्ष होते.

त्यांनी भारतीय कलेच्या अनेकविध क्षेत्रांमध्ये पायाभूत संशोधन करून विपुल लिखाण केले. त्यांचा L‘ Art en Inde हा ग्रंथ प्रथमतः फ्रेंचमध्ये प्रसिद्घ झाला व नंतर त्याच्या जर्मन, इंग्रजी, स्पॅनिश व इटालियन भाषांतरित आवृत्त्या प्रसिद्घ झाल्या. या ग्रंथाला ‘दादाभाई नवरोजी’  पारितोषिक मिळाले. जवाहरलाल नेहरु अधिछात्रवृत्तीचे ते पहिले मानकरी होते (१९६८). त्याचे संशोधनपूर्ण फलित म्हणजे त्यांचा सर्वांत प्रसिद्घ व मौलिक असा श्रेष्ठ ग्रंथराज नटराज इन आर्ट, थॉट अँड लिटरेचर (१९७४). प्राचीनांनी ⇨नटराजा ची मूर्ती हा वैश्विक ऊर्जेचा आविष्कार मानला, तसेच नटराज हे जीवनशक्तीचे — उत्पत्ती, स्थिती व लय या अवस्थांचेही — प्रतीकात्मक रुप मानले. प्राचीनांच्या या धारणेविषयीचे विस्तृत विवेचन या ग्रंथात आहे. नटराजाची विविध नृत्यमुद्रांतील चित्र-शिल्पे-वाङ्‌मय व विचारधारा अशा सर्व घटकांचा प्राचीन काळापासूनचा संशोधनात्मक व चिकित्सक आढावा या ग्रंथात, विपुल चित्रपत्रांसह शिवराममूर्ती यांनी घेतला आहे. भारतीय मूर्तिविज्ञानाच्या (प्रतिमाविद्येच्या) संदर्भात हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. प्रतिमाविद्येच्या दृष्टिकोणातून गंगा –कन्सेप्ट अँड आयकॉनॉग्राफी  आणि श्री लक्ष्मी इन इंडियन आर्ट अँड थॉट   ही त्यांची पुस्तकेही संदर्भग्रंथ म्हणून महत्त्वाची आहेत. भारतीय भाविकांच्या मनातील गंगा-सरिता-देवतेची प्रतिमा, मंदिरांत आढळणाऱ्या गंगेच्या मूर्ती यांचा शिल्पशास्त्र व प्रतिमाविद्या या अनुषंगाने केलेला अभ्यास गंगेवरील ग्रंथात आहे, तर लक्ष्मीवरील पुस्तकात, ऋग्वेद, महाभारत, रामायण, कालिदासाचे रघुवंश   व मेघदूत, शंकराचार्यांची वचने तसेच पुराणांतील दाखले व संदर्भ विपुल प्रमाणात दिले आहेत. चित्र-शिल्पादी ललित कलांचा प्राचीन संस्कृत वाङ्‌मयाशी यथोचित अर्थानुबंध जोडण्यात, तसेच विशिष्ट चित्र-शिल्पाकृतींशी संबंधित असे वाङ्‌मयीन संदर्भ विपुल प्रमाणात उद्‌धृत करण्यात शिवराममूर्ती यांचा संशोधनात्मक व्यासंग प्रकर्षाने जाणवतो. ललित कला व वाङ्‌मय यांतील तौलनिक अभ्यासाच्या संदर्भात त्यांची कामगिरी अजोड व पथदर्शक स्वरूपाची आहे. त्यांच्या नटराज व लक्ष्मी यांवरील ग्रंथांबरोबरच, स्कल्प्चर इन्स्पायर्ड बाय कालिदास (१९४२), संस्कृत लिटरेचर अँड आर्ट : मिरर्स ऑफ इंडियन कल्चर (१९५५),एथिकल फ्रेग्रन्स इन इंडियन आर्ट अँड लिटरेचर,एक्स्‌प्रेसिव्ह क्वालिटी ऑफ लिटररी फ्लेवर इन आर्ट (१९७४) इ. संदर्भग्रंथ हे कला-वाङ्‌मयीन तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पुरालेखविद्या व नाणकशास्त्र हे विषय, त्यांना वाङ्‌मयीन संदर्भांची जोड देऊन अधिक लोकाभिमुख करण्यात शिवराममूर्तींचा वाटा मोठा आहे. त्या दृष्टीने त्यांची इंडियन एपिग्राफी अँड साउथ इंडियन स्क्रिप्ट्स  (१९५३), न्यूमिस्मॅटिक पॅरलल्स ऑफ कालिदास, एपिग्राफिकल एकोज ऑफ कालिदास इ. पुस्तके उपयुक्त आहेत. भारतीय कलेच्या विस्तृत इतिहासाचे कालानुक्रमे प्राचीन काळापासून विविध राजवंश, घराणी त्या त्या कालखंडांतील कलानिर्मिती व कलाशैली, तसेच सांस्कृतिक व प्रादेशिक वैशिष्ट्ये यांचा साद्यंत, सांगोपांग, विस्तृत व सचित्र परामर्श घेणारे दोन बृहद्ग्रंथ शिवराममूर्ती यांनी सिद्घ केले : द आर्ट ऑफ इंडिया (१९७७, न्यूयॉर्क आवृ.) आणि मारिओ षुसाग्ली या सहलेखकासमवेत 5,000 इयर्स ऑफ द आर्ट ऑफ इंडिया. कलेतिहासाच्या अभ्यासकांसाठी हे ग्रंथ फार उपयुक्त व मौलिक आहेत. राष्ट्रीय संग्रहालयातील मूर्तिशिल्पांचा सचित्र, आस्वादक परिचय व त्या अनुषंगाने मूर्तिकलेचा संक्षिप्त इतिहास देणारे मास्टरपीसेस ऑफ इंडियन स्कल्प्चर (१९७१) हे शिवराममूर्तींचे पुस्तक प्राचीन मूर्तिकलेच्या अभ्यासकांना विशेष उपयुक्त ठरणारे आहे. त्याचा हिंदी अनुवाद सुंदरलाल श्रीवास्तव यांनी भारतीय मूर्तिशिल्प की उत्कृष्ट कृतियाँ (१९९६) या शीर्षकाने केला असून, तो रघुराजसिंह चौहान यांनी संपादित केला आहे. हिंदू देवदेवतांच्या प्रतिमाविद्येच्या संदर्भात, शिवराममूर्तींनी एफ्. एच्. ग्रेव्हली या सहलेखकासमवेत लिहिलेले नोट्स ऑन हिंदू इमेजीस हे पुस्तकही महत्त्वपूर्ण आहे. यांखेरीज त्यांची महत्त्वाची, संदर्भमूल्य असलेली ग्रंथसंपदा अशी : अमरावती स्कल्प्चर्स इन द मद्रास गव्हर्न्मेंट म्यूझीअम (१९४२), रॉयल कॉन्वेक्स्ट्स अँड कल्चरल मायग्रेशन्स इन साउथ इंडिया अँड द डेक्कन (१९५५), अर्ली ईस्टर्न चालुक्य स्कल्प्चर (१९५७), पॅनोरामा ऑफ जैन आर्ट, इंडियन ब्राँझ, चित्रसूत्र ऑफ द विष्णुधर्मोतर (१९७८) इत्यादी. त्याचप्रमाणे ॲप्रोच टू नेचर इन इंडियन आर्ट अँड थॉट  हे भारतीय कला व विचारप्रणालीमध्ये प्रतिबिंबित झालेला निसर्गाविषयीचा दृष्टिकोण विशद करणारे पुस्तक, तसेच भारतीय शिल्पकलेमधील पक्षी व प्राणी यांच्या प्रतिरुपणाचा मागोवा घेणारे बर्ड्‌स अँड ॲनिमल्स इन इंडियन स्कल्प्चर ही पुस्तकेही उल्लेखनीय आहेत. द पेंटर इन एन्शंट इंडिया   या त्यांच्या ग्रंथात त्यांनी प्राचीन भारतीय चित्रकला, मंदिरांतील व प्रासादांतील चित्रकाम यांचा आढावा घेतला आहे. स्टोरिया डेल्ला  स्कल्प्च्युरा नेल मोन्दो या कोशात्मक संदर्भग्रंथासाठी त्यांनी भारतावरील खंडाचे लेखन केले. ते स्वतः उत्तम चित्रकार व शिल्पकार होते. त्यांनी आपल्या अनेक पुस्तकांसाठी स्वतः रेखाचित्रे काढली. त्यांचा प्रगाढ संस्कृत व्यासंग, पुरातत्त्वीय संशोधन, मर्मज्ञ कलादृष्टी, तसेच कलाकृतीच्या सौंदर्यास्वादाला पूरक ठरणारे वाङ्‌मयीन संदर्भ विपुल प्रमाणात उद्‌धृत करण्याची हातोटी यांमुळे त्यांच्या लिखाणाला भारदस्तपणा, प्रामाण्य व संदर्भसंपन्नता लाभली असल्याचे दिसून येते.


डॉ. शिवराममूर्ती हे ग्रेट ब्रिटन व आयर्लंड येथील ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ चे सन्मान्य सदस्य होते. कांची कामकोटिपीठाचे शंकराचार्य यांनी त्यांना ‘विचित्र चित्त’ ही गौरवपूर्ण उपाधी बहाल केली होती. पद्मश्री (१९६८) व पद्मभूषण (१९७५) हे किताबही त्यांना लाभले. त्यांनी देशविदेशांत खूप प्रवास केला व अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतून मौलिक व्याख्याने दिली, ती नंतर ग्रंथरुपाने प्रकाशित झाली.

डॉ. शिवराममूर्ती हे नटराजावर व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन पावले. एशियाटिक सोसायटी, मुंबई यांच्यावतीने त्यांना त्यांच्या प्राच्यविद्या संशोधनकार्याच्या गौरवार्थ मरणोत्तर ‘कँपबेल मेमोरिअल’  सुवर्णपदक बहाल करण्यात आले.

इनामदार, श्री. दे.