सिलिका गट : सिलिका या खनिजाचे रासायनिक संघटन सिलिकॉन डाय-ऑक्साइड (SiO2) असून याची विविध रुपे निसर्गात आढळतात, त्यांना सिलिका गट हे नाव आहे. क्वॉर्ट्‌झ, ट्रिडिमाइट, क्रिस्टोबलाइट, कोएसाइट, स्टिशोव्हाइट या स्फटिकी बहुरुपांत, ⇨ कॅल्सेडोनी सारख्या गूढस्फटिकी (अगदी सूक्ष्म स्फटिकमय) रुपांत, ओपलसारख्या सजल रुपात आणि चूर्णरुपातही सिलिका आढळते. यांच्या संयोगातून सिलिकेटे तयार होतात.

सर्वांत साध्या रुपात सिलिकेची रचनात्मक चौकट विद्युत् भाररहित असते व तिच्यात इतर संरचनात्मक एकके नसतात. तथापि सिलिका चौकटी जोडल्या जाऊन चतुष्फलक बनतात. अशा चतुष्फलकांत सर्व ऑक्सिजन अणू वाटून घेतले जाण्याचे आठ भिन्न प्रकार आहेत. त्याचबरोबर त्यांचे अखंड, विद्युत् भाररहित व त्रिमितीय जाळे निर्माण होते. भूमितीच्या मांडणीच्या या आठ तऱ्हा सिलिकेच्या आठ बहुरुपांशी जुळतात. यांपैकी दोन बहुरुपे कृत्रिम रीतीने संश्लेषणाद्वारे बनविली आहेत. या प्रत्येक बहुरुपाचा बाह्य आकार, आणवीय जालक ऊर्जा इ. बाबी त्याचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या असतात. मुख्यत्वे ऊर्जाविषयक बाबींवरुन कोणते बहुरुप स्थिर आहे, ते ठरते. अधिक उच्च तापमानाला स्थिर असलेल्या बहुरुपांमध्ये अधिकतर ऊर्जायुक्त अधिक व्यापक संरचना असतात.

सिलिकेच्या बहुरुपांचे तीन संरचनात्मक वर्ग आहेत. सर्वांत कमी सममिती व सर्वांत घट्ट जालक असलेला ‘क्वॉर्ट्‌झ वर्ग’, अधिकतर सममिती व अधिक खुली संरचना असलेला ‘ट्रिडिमाइट वर्ग’ आणि सर्वाधिक सममिती व सर्वांत व्यापक जालक असलेला ‘क्रिस्टोबलाइट वर्ग’ हे तीन वर्ग होत. या प्रत्येक वर्गाचे दुसऱ्या वर्गात रचनांतरण होऊ शकते. फक्त सिलिकॉन व ऑक्सिजन यांच्यातील बंध तुटून व चतुष्फलकाची एका नवीन आकृतिबंधात पुनर्मांडणी होऊन असे रचनांतरण होते. म्हणजे रचनांतरण ही अतिशय मंद प्रक्रिया आहे. तसेच इतर वर्ग असताना सर्व वर्ग मितस्थायी रुपात तेथे असू शकतात. तथापि प्रत्येक संरचनात्मक वर्गाची उच्च व नीच तापमानांमधील सुधारित रुपे (रुपांतरणे) असून, ती केवळ सिलिकॉन व ऑक्सिजन आयन जोडणाऱ्या बंधांची लांबी व दिशा या बाबतींत वेगळी असतात. म्हणून ही रचनांतरणे एका चांगल्या स्थिर व काटेकोर तापावर्तनाला (व्युत्क्रमी तापमानाला) जलदपणे व उलट्या दिशेत होतात. स्फटिकाचे प्रत्यक्ष तुकडे न होता याची पुनरावृत्ती घडू शकते.

क्वॉर्ट्‌झाचे ⇨ जमुनिया, सिट्रीन, ⇨ मार्जारनेत्री तसेच गुलाबी, धुरकट व दुधी क्वॉर्ट्‌झ इ. प्रकार आहेत. कॅल्सेडोनी, कार्नेलियन, सार्ड, क्रिसोपेज, अकीक, हेलिओट्रोप (ब्लडस्टोन) व ऑनिक्स हे गूढस्फटिकी प्रकार आहेत तर फ्लिंट, चर्ट, जॅस्पर, प्रेज क्रिस्टोबलाइट, ट्रिडिमाइट व ओपल हे कणमय प्रकार आहेत.

सिलिका गटातील खनिजे अग्निज, गाळाच्या व रुपांतरित या तिन्ही प्रकारच्या खडकांत आढळतात. औद्योगिक वापरातील या खनिजांचे निक्षेप (साठे) मुख्यतः ⇨ पेग्मटाइट खडकांमधील शिरांमध्ये आढळतात. तसेच ही खनिजे वाळूतही आढळतात. भारतात मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश इ. राज्यात ही खनिजे आढळतात.

साधी तसेच प्रकाशकीय काच व रासायनिक उद्योगांतील उपकरणांची काच, मृत्तिका व धातू या उद्योगांत आणि उच्चतापसह विटा, रंगद्रव्ये व कागद या उद्योगांत व घरबांधणीत तसेच मौल्यवान खडे म्हणून ही खनिजे वापरतात.

पहा : अकीक ऑनिक्स ओपल कॅल्सेडोनी कार्नेलियन क्वॉर्ट्‌झ चर्ट जॅस्पर फ्लिंट

ठाकूर, अ. ना.