सिक्कीम मणिपाल विद्यापीठ : सिक्कीम राज्यातील गंगटोक येथील प्रगत सार्वजनिक-खाजगी विद्यापीठ. स्थापना १९९५ मध्ये विधिमंडळाच्या अधिसूचनेनुसार झाली. विद्यापीठाचे उद्दिष्ट नवप्रवर्तनातील श्रेष्ठता–विशेषतः आरोग्य, अध्ययन आणि संशोधन यांच्या सुविधा, वैद्यक शिक्षण आणि तंत्र व विज्ञान शिक्षण यांची उपलब्धता करुन देणे हे आहे. यासाठी सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मजितर-रंगपो) आणि वैद्यक महाविद्यालय (गंगटोक) ह्या घटकसंस्था कार्यरत असून त्यांतून तांत्रिक शिक्षणाशी संबंधित संगणकशास्त्र तसेच वैद्यकशास्त्रातील सर्व शाखांचे विषय शिकविले जातात. याशिवाय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट, केटरींग टेक्नॉलॉजी, अप्लाइड न्यूट्रिशन ही संलग्न महाविद्यालये आहेत. शिवाय मानव्यविद्याशाखांतर्गत सामाजिक शास्त्रांचेही शिक्षण यातून दिले जाते. या नियमित शिक्षणाव्यतिरिक्त अंतर किंवा दूर शिक्षणाची सोयही विद्यापीठात असून ते सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी डिस्टन्स एज्युकेशन या संस्थेद्वारे दिले जाते. फोर्ब्झ नियतकालिकाने अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांत ह्या विद्यापीठाला दुसरा सर्वोत्तम पुरस्कार दिला आहे (२०१०). सिक्कीम राज्याचे राज्यपाल या विद्यापीठाचे कुलपती असतात. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून या विद्यापीठास मान्यता मिळाली असून पूर्वोत्तर राज्यांतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, आरोग्य शिक्षण आणि वैद्यकशास्त्र या विषयांतील उच्च शिक्षण देण्यास हे विद्यापीठ कटिबद्घ आहे.
भटकर, जगतानंद