सिंधी भाषा : सिंधी भाषा ही संस्कृतोद्भव असून भाषाकुले आणि त्यांमधील उपकुले या वर्गीकरणाच्या दृष्टीने विचार करता इंडो-आर्यन भाषासमूहामधील वायव्य गटातील ती भाषा आहे. व्राचड पैशाची ही जुनी अपभ्रंश प्राकृतभाषा सिंधीची पूर्वभाषा आहे.
पाकिस्तानमध्ये सिंधी भाषकांची संख्या १९९८ च्या जनगणनेनुसार सु. अडीच कोटी, म्हणजे पाकिस्तानच्या एकंदर लोकसंख्येच्या १४ टक्के होती. हे भाषक मुख्यत्वेकरुन सिंध प्रांतात राहणारे असून या प्रांताची ती अधिकृत शासकीय भाषा आहे. भारतामधील सिंधी भाषकांची संख्या २००१ च्या जनगणनेनुसार सु. २६ लाख आहे. हे भाषक प्रामुख्याने गुजरात (कच्छ), राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांत राहतात. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामधील बावीस अधिकृत भाषांपैकी ती एक भाषा आहे. जगातील इतर अनेक देशांमध्ये सिंधी भाषक विखुरलेले आहेत.
आठव्या शतकाच्या प्रारंभी सिंध प्रांतामध्ये इस्लामचा शिरकाव होण्यापूर्वीपासूनच सिंधी ही लोकव्यवहाराची भाषा म्हणून अस्तित्वात होती. कुराण चे भाषांतर पौर्वात्य भाषांपैकी सिंधीमध्येच प्रथम झाले (सु. आठवे व नववे शतक). अकराव्या शतकात पीर नूरुद्दीन आणि तेराव्या शतकात पीर सद्रुद्दीन या सूफी संतांनी सिंधी भाषेत रचना केल्या. पाचव्या शतकापर्यंत सिंध प्रांतामधील अनेक मान्यवर विद्वान धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान आणि अलंकारशास्त्र यांचे अध्यापन तत्कालीन विद्यालयांमधून करीत असत. चौदावे ते अठरावे शतक या काळामध्ये सिंधी ही एक महत्त्वाची साहित्यभाषा म्हणून मान्यता पावलेली होती. भिट्टचे ⇨ शाह अब्दुल लतीफ (१६८९–१७५२) हे या काळातील महत्त्वाचे सूफी कवी होते. १८४३ मध्ये ब्रिटिशांनी सिंध प्रांत काबीज केल्यानंतर सिंधी साहित्यातील आधुनिक कालखंड सुरु झाला. इंग्रजी व अन्य यूरोपीय भाषांमधून अनेक ग्रंथांची भाषांतरे सिंधी भाषेत झाली. विविध विषयांवर सु. ३५० पुस्तके लिहिणारे ⇨ कलीच बेग (१८५३–१९२९) हे या कालखंडातील सर्वांत महत्त्वाचे लेखक होत.
सिराइकी (उत्तर सिंध), विचोली (मध्य सिंध), लाड़ी (दक्षिण सिंध), थ़डेली (सिंधचे वाळवंट आणि राजस्थानचा जैसलमीर जिल्हा), लासी (कोहिस्तान हा बलुचिस्तानमधील प्रदेश) आणि कच्छिकी (गुजरातमधील कच्छ व काठेवाड प्रदेश ) या सिंधी भाषेच्या सहा प्रमुख उपभाषा आहेत. यांपैकी विचोली ही प्रमाणबोली म्हणून मान्यता पावलेली आहे. सिंधीच्या ध्वनिव्यवस्थेमध्ये ४६ व्यंजने आणि १६ स्वर आहेत. इतर इंडो-आर्यन भाषांपासून (किंबहुना इंडो-यूरोपीय भाषांपासून) वेगळे काढणारे सिंधीचे वैशिष्ट्य म्हणजे, तिच्यात ग, ज, ड, ब या अंतः- स्फोटक (इंप्लोझिव्ह) व्यंजनांचे श्वासात्मक उच्चारण होय. या व्यंजनांच्या उच्छ्वासात्मक आणि श्वासात्मक उच्चारणांमध्ये सिंधी भाषेत व्यवच्छेदक भेद आढळतो. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, सिंधीमध्ये व्यंजनान्त शब्द नाहीत. फार्सी व इंग्रजी या भाषांतून उसनवारी केलेल्या शब्दांचे उच्चार करताना स्वराचा हलकासा उच्चार केला जातो. सिंधीमधील शब्दघडणीच्या दृष्टीने शब्दांना पूर्वप्रत्यय आणि उत्तरप्रत्यय यांशिवाय मध्यप्रत्ययही लागतात, हे लक्षणीय आहे.
अर्वाचीन सिंधीमध्ये संस्कृतमधून येणाऱ्या तत्सम व तद्भव शब्दांबरोबरच अरबी आणि फार्सी या भाषांमधून उसनवारी केलेल्या शब्दांचाही मोठा भरणा आहे. पाकिस्तानातील सिंधीवर अरबी आणि पर्शियन घटकांचा बराच प्रभाव आहे तर भारतामधील सिंधीवर संस्कृत व हिंदी यांचा प्रभाव आहे आणि या दोन भाषाभेदांमध्ये अधिकाधिक अंतर पडत आहे. उदा., पर्शियन-अरबीमधून आलेल्या शब्दांमध्ये ज्या व्यंजनांचे उच्चार अलिजिव्हेच्या वा पडजिभेच्या साहाय्याने (यूव्ह्यूलर) होतात, त्यांचे उच्चार भारतातील सिंधीमध्ये आता कंठ्य (व्हीलर) होऊ लागले आहेत.
सिंधीच्या लेखनासाठी अनेक लिप्यांचा वापर झालेला आहे. ब्रिटिश शासन येण्यापूर्वी व्यापाराच्या संदर्भात देवनागरी आणि लहंदा या लिपींचा, तर साहित्यिक आणि धार्मिक लेखनासाठी फार्सी-अरबी आणि गुरुमुखी यांचा वापर होत असे. लहंदा या लिपीमध्ये परिवर्तन करण्याचे दोन प्रयत्न खुदावादी आणि शिकारपुरी या नावाने ओळखले जातात, मात्र ते अयशस्वी ठरले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ब्रिटिश शासनाने अरबी लिपीवर आधारित लिपीला प्रमाण सिंधी लिपी म्हणून मान्यता दिली. या लिपीमध्ये सिंधीच्या ध्वनींचे लेखन करण्यासाठी १८ नवीन चिन्हे तयार करण्यात आली. आता ही लिपी पाकिस्तानात प्रमाण सिंधी लिपी म्हणून वापरली जाते. भारतामध्ये या लिपीव्यतिरिक्त सिंधीचे लेखन देवनागरी लिपीतही केले जाते.
मालशे, मिलिंद भट, विवेक
स्वरुप-विवेचन : सिंधी ही एक अभिजात, प्राचीन, स्वतंत्र आणि विपुल शब्दभांडार असलेली भाषा आहे. सिंधी ही संस्कृत-प्राकृत परंपरेतील इंडो-आर्यन भाषासमूहातील एक भाषा असून तिचे मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली या भाषांपेक्षा जुन्या प्राकृतशी, विशेषतः व्राचड अपभ्रंशाशी अधिक जवळचे नाते आहे (उदा., पाली व अर्धमागधीशी सिंधी भाषेचे जवळचे नाते आहे). या भाषांची पूर्वरुपे, ध्वनी आणि व्याकरणिक वैशिष्ट्ये सिंधीने इतर कोणत्याही भारतीय भाषेपेक्षा अधिक जपली आहेत. सिंधी भाषेचे गाढे अभ्यासक आणि विद्वान डॉ. अर्नेस्ट ट्रम्प यांनी १८७२ मध्ये लिहिलेल्या सिंधी ॲल्फाबेट अँड ग्रामर या ग्रंथात सिंधीची भाषिक वैशिष्ट्ये विशद केली आहेत. त्यांच्या मते सिंधीने व्याकरणरुपांचे वैपुल्य आणि विविधता अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात जतन केलेली आहे. तिने व्याकरणाची एक खास चौकट स्वतःसाठी उभारलेली आहे. अभिव्यक्तीतील सौंदर्य व आंतरिक सुसंगतीच्या बाबतीत ही चौकट इतर भाषांच्या तुलनेत जास्त सुनियोजित व प्रमाणबद्घ आहे.
सिंधी लिपी : सिंधी भाषा ही दोन लिपींतून लिहिली जाते. एक अरबी (अरेबिक) लिपी व दुसरी देवनागरी लिपी. सिंधमध्ये राहणारे मुस्लिम सिंधी हे अरबी-सिंधी लिपीचाच वापर करतात. भारतात राहणारे हिंदू सिंधी लोक देवनागरी व अरबी-सिंधी या दोन्ही लिपी वापरतात. आज अरबी-सिंधी लिपी मागे पडली असून देवनागरी सिंधी लिपीचा वापर वाढतो आहे. सिंधीची उर्दूसारखी दिसणारी अरबी लिपी ही ब्रिटिश सरकारच्या आदेशानुसार कृत्रिम रीतीने तयार करण्यात आलेली आहे. १८४३ मध्ये ब्रिटिशांनी सिंध प्रांत काबीज केला. तेव्हा कोणतीही एक लिपी वापरात नव्हती. ब्रिटिशपूर्व काळात न्यायालयीन भाषा फार्सी होती. सिंधमध्ये अरबी लिपीबरोबरच देवनागरी, गुरुमुखी, ‘हटवाणकी ’ (मोडी लिपीसारखी दिसणारी ही लिपी व्यापारी लोकांत वापरात असायची) इ. लिप्याही प्रचलित होत्या. सिंधी भाषेतील सुरुवातीची व्याकरणाची पुस्तके आणि शब्दकोश मात्र देवनागरी लिपीत होते. याविषयी कॅप्टन जॉन स्टॅक यांनी सिंधी व्याकरण (१८४९) या आपल्या ग्रंथात म्हटले आहे, की सिंधीच्या मूळ स्वभावाशी देवनागरी लिपीच अधिक मिळतीजुळती आहे. एखादे स्वतंत्र अक्षर लिहावयाचे झाल्यास इतर लिप्यांपेक्षा ते देवनागरीतच लिहिणे अधिक शक्य आहे. म्हणूनच कॅप्टन स्टॅक यांनी इंग्लिश-सिंधी शब्दकोश (१८४९) व सिंधी-इंग्लिश शब्दकोश (१८५५) या आपल्या ग्रंथांत देवनागरी लिपीचा वापर केला.
सिंधमध्ये इंग्रजांना सिंधी शाळा सुरु करावयाच्या होत्या. त्या वेळेस लिपीचा असा प्रश्न उद्भवला, की हिंदू सिंधी व मुसलमान सिंधी ह्यांपैकी लोकांना कोणत्या लिपीतून शिक्षण देण्यात यावे ? सिंधी भाषेचे अभ्यासक तसेच हिंदू समाज हा देवनागरी लिपीचा पुरस्कर्ता होता तर मुस्लिम समाज हा अरबी लिपीचा आग्रह धरीत होता. १८५३ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सिंधी लिपी निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली.या समितीने सिंधीमध्ये काही अरबी व काही फार्सी लिपीतले वर्ण एकत्र करुन तिसरी एक वेगळी लिपी तयार केली. तीच सध्याची अरबी-सिंधी लिपी होय. या ‘ वर्ण-संकर’ लिपीत ५२ वर्ण आहेत. आधुनिक सिंधी वाङ्मय प्रामुख्याने याच लिपीत लिहिले गेले आहे. सिंधीच्या जुन्या लेखकांवरही याच लिपीचा पगडा आहे मात्र सिंधी भाषेच्या आविष्कारासाठी ही लिपी तोकडी ठरते. देवनागरी किंवा रोमन लिपीतले असंख्य शब्द अरबी-सिंधीत लिप्यंतर करताना या लिपीची मर्यादा लक्षात येते.संस्कृत श्लोक इ. या लिपीत आणण्यात अनेक अडचणी येतात.
अरबी लिपीबरोबर सिंधीचे देवनागरी रुपही प्रचलित आहे आणि भारतात ते दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. अनेक जुन्या व अभिजात ग्रंथांचे देवनागरीकरण करण्याचे कामही सध्या जोरात सुरु आहे. अरबी लिपीत छापलेल्या सिंधी पुस्तकांचा खप रोडावला आहे. नवीन पिढीला अशी पुस्तके वाचता येत नाहीत. वास्तविक पाहता देवनागरी ही सिंधी भाषेची अधिक वापरात असलेली लिपी आहे आणि तिच्या माध्यमातूनच भारतातील सिंधी लोकांच्या भावना व विचार व्यक्त होणे व वाचले जाणे सोयीचे आहे.
सिंधी भाषेची ठळक वैशिष्ट्ये : सिंधी भाषेची पूर्वपीठिका संस्कृत-प्राकृत भाषा आहे. आपल्याला माहीत असलेली सिंधी भाषा इ. स. ११०० च्या सुमारास स्वतंत्र भाषा म्हणून तयार झाली, असे ⇨भेरुमल मेहरचंद अडवाणी (१८७६–१९५३) म्हणतात (सिंधी बोलीअ जी तारीख, १९४१). सिंधीचा शब्दसंग्रह हा निरनिराळ्या स्रोतांतून आलेला आहे. सिंधी भाषेतील जवळजवळ सत्तर टक्के शब्द संस्कृत-प्राकृतमधून स्वीकारलेले आहेत. द्राविडी भाषांतील शब्दही सिंधीत सापडतात. परकीय आक्रमण आणि अरब लोकांच्या सिंधमधील सत्तेमुळे अरबी-फार्सी शब्दांनीही सिंधीत भर घातली आहे (सिंधच्या सिंधी भाषेत अरबी -फार्सी शब्द विपुल प्रमाणात आलेले आहेत). मात्र खरी सिंधी ही सिंधमधील ग्रामीण भागात व भारतातील सामान्य सिंधी लोकांत प्रचलित असलेली दिसून येते. सिंधीचे शब्दभांडार विपुल आहे आणि ती बोलणाऱ्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी सक्षम आहे. शरीरावयव, नातीगोती, सणवार, धार्मिक भावना, विविध प्राणी व वनस्पती इत्यादींचे वर्णन करण्यासाठी सिंधीत विपुल शब्द आहेत. पिकांच्या परिभाषेबाबत ती विशेष समृद्घ आहे. गवत व मासळीविषयक शब्दांचीही तीच स्थिती आहे. कौटुंबिक नातेसंबंध व्यक्त करण्यासाठी इतर भाषांत एकाहून शब्द वापरावे लागतात पण ते एकाच शब्दातून व्यक्त करणे, हे सिंधी शब्दसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. उदा., ‘ मारोटु ’ म्हणजे मामाचा मुलगा, मामेभाऊ ‘ पुफडु ’ म्हणजे आत्याचा नवरा ‘सौटु’ म्हणजे चुलतभाऊ, तसेच ‘उंट ’ या शब्दासाठी सिंधीमध्ये पंधरा पर्यायी शब्द आहेत.
मराठीशी सिंधी भाषेचे अगदी जवळचे नाते आहे. किंबहुना व्याकरणाच्या दृष्टीने मराठीशी साधर्म्य साधणारी सिंधी ही एकमेव भाषा आहे, असे म्हणता येईल. उदा., ‘ण’कारान्त क्रियापदे मराठीप्रमाणे सिंधी भाषेतच सापडतात (उदा., खाणे = खाइणु, पिणे = पिअणु , उठणे = उथणु , करणे = करणु इ.). महत्त्वाचे साधर्म्य म्हणजे, ‘आहे ’ हे क्रियापद फक्त मराठी आणि सिंधीतच वापरले जाते (उदा., माझे नाव राम आहे = मुंहिंजो नांउ राम आहे ’ भारत माझा देश आहे = ‘ भारत मुंहिंजो देशु आहे ’). त्याचप्रमाणे मराठी सर्वनामेही सिंधी सर्वनामांशी जवळीक साधणारी आहेत. उदा., हा, ही, हे या मराठी सर्वनामांना सिंधी पर्याय असे आहेत : ‘हीउ ’, ‘हीअ ’, ‘हीउ ’ (उदा., हे पुस्तक आहे = ‘हीउ पुस्तकु आहे ’ ही नदी आहे = ‘हीअ नदी आहे’ हा घोडा आहे = ‘हीउ घोड़ो आहे’). लछमन हर्दवाणीकृत मराठी-सिंधी शब्दकोशात (१९९२) मराठीशी साधर्म्य दर्शविणारे किमान ५,००० सिंधी शब्द आहेत.
सिंधीची अन्य काही ठळक वैशिष्ट्ये अशी : (१) प्राकृतप्रमाणे सिंधीचे सगळे शब्द स्वरान्त असतात. (२) अकारान्त, इकारान्त व उकारान्त शब्दांच्या शेवटच्या अक्षरांचा उच्चार पूर्ण होतो. उदा., ‘ खट ’ (खाट) मध्ये ‘ ट ’ चा पूर्ण उच्चार केला जातो. ‘ सत ’ (सात), ‘ अठ ’ (आठ), ‘रामु’ (राम), ‘ गणेशु ’ (गणेश), ‘ चुल्हि ’ (चूल) इ. असंख्य शब्द असेच आहेत. (३) अकारान्त नामे बहुधा स्त्रीलिंगी असतात. उदा., ‘ नथ ’ (नथ), ‘लहिर ’ (लहर), ‘ जि॒भ ’ ( जीभ), ‘ लीक ’ (रेषा), ‘ खट ’ (खाट), ‘ संदूक ’ (पेटी), ‘ उस ’ (ऊन), ‘ कूंज ’ (क्रौंच), ‘ पकड़’ (पकड), ‘ बास ’ (वास स्वीकृती इच्छा नवस). (४) ओकारान्त नामे पुल्लिंगी असतात. उदा., ‘ घोड़ो ’ (घोडा), ‘ कुतो ’ (कुत्रा), ‘ काको ’ (काका), ‘ मामो ’ (मामा), ‘महीनो ’ (महिना), ‘ डो॒ डो॒ ’ (आजा, पितामह), ‘ नानो ’ (आजोबा, आईचे वडील), ‘ ठौंशो ’ (ठोसा). (५) आकारान्त आणि ऱ्हस्व-दीर्घ इकारान्त नामे बहुधा स्त्रीलिंगी असतात. उदा., ‘ माया’ (माया), ‘ छाया ’ (छाया), ‘ काया ’ (काया), ‘ जोइ ’ (जाया, बायको), ‘ माई ’ (बाई, स्त्री), ‘ लाई ’ (चिक्की), ‘ लठि ’ (लठ्ठ, काठी), ‘ लिडि ’ (लीद), ‘ फणी ’ (फणी), ‘ कंडि ’ (काटा, काटेझाड), ‘ कंडी ’ (काटेवृक्ष शमी वृक्ष). (६) ऱ्हस्व-दीर्घ उकारान्त नामे बहुधा पुल्लिंगी असतात. उदा., ‘ ग्रंथु ’ (ग्रंथ), ‘ घरु ’ (घर), ‘ सिजु ’ (सूर्य), ‘ रामु’ (राम), ‘ चंडु ’ (चंद्र), ‘ माण्हू ’ (माणूस), ‘ डाड़हूं ’ (डाळिंब), ‘ कामू ’ (आवळी). (७) भरतमुनी (इ. स. दुसरे शतक) यांनी आपल्या नाट्यशास्त्रात असे लिहिले आहे, की
‘ हिमवत्सिंधु-सौवीरान् ये जनाः समुपाश्रिताः।
उकारबहुलां तज्ज्ञस्तेषु भाषां प्रयोजयेत् ॥ ’
(हिमालय, सिंधु आणि सौवीर या प्रदेशांत जे लोक राहतात, त्यांच्या भाषांत नाटक लिहिणाऱ्याने ‘ उ ’ स्वराचा प्रयोग अधिक करायला पाहिजे).
यावरुन असे दिसते, की इ. स. दुसऱ्या शतकात सिंध प्रांताच्या सिंधी भाषेत ‘ उ ’ स्वर मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. सिंधी भाषेचे हे वैशिष्ट्य आजदेखील टिकून आहे. उदा., ‘ माउ ’ (माय, आई), ‘ भाउ ’ (भाऊ), ‘ पीउ ’ (पिता, वडील), ‘ हथु ’ (हात), ‘ कनु ’ (कान), ‘ नकु ’ (नाक), ‘ अंबु ’ (आंबा), ‘ सिंधु ’ (सिंध) ‘ लिखणु ’ (लिहिणे), ‘ उथणु ’ (उठणे), ‘ खाइणु ’ (खाणे ), ‘ पिअणु ’ (पिणे ), ‘ जिअणु ’ (जिणे), ‘ पड़हणु ’ (पढणे). (८) हिंदीप्रमाणे सिंधी भाषेत लिंगे दोनच आहेत – पुल्लिंग व स्त्रीलिंग. (९) सिंधीत वचनेही दोनच आहेत – एकवचन व बहुवचन. (१०) ‘ ञ ’ आणि ‘ ङ् ’ ह्या संस्कृत व्यंजनांचा सिंधीत आजदेखील विपुल प्रमाणात वापर केला जातो. उदा., ‘ अञा ’ (अजून), ‘ वञणु ’ (जाणे), ‘ थञु ’ (स्तन्य, आईचे दूध), ‘ ज॒ञ ’ (वरात), ‘ वाङ्णु’ (वांगे), ‘ सिङु ’ (शिंग), ‘ आङुरि ’ (अंगुली, बोट), ‘ चङो ’ (चांगला), ‘ भञणु ’ (भंजणे), ‘ विञिणो ’ (विंजणा, पंखा), ‘ हिङु ’ (हिंग), ‘ मुङ् ’ (मूग), ‘ अङु ’ (अंग), ‘ अङ्रु ’ (अंगार), ‘ भुञणु ’ (भुंजणे, भाजणे), ‘ रङ्णु ’ (रंगणे), ‘ अङारो ’ (अंगारक, मंगळवार). (११) सिंधीमध्ये ग, ज, ड, ब हे नेहमीच्या ध्वनिव्यतिरिक्त निराळे ध्वनी आहेत. हे अंतःस्फोटक ध्वनी होत. ते त्या त्या अक्षराखाली रेषा देऊन दर्शविले जातात– ग, ज, ड, ब हे वर्ण फक्त सिंधी भाषेतच आहेत. ग, ज, ड, ब ह्या वर्णांचा उच्चार करतेवेळी नेहमीप्रमाणे हवा बाहेर न सोडता आत घेतल्यास हे उच्चार सहजपणे होतात.(१२) अकर्तृक कियापदे हे सिंधी भाषेचे अनन्यसाधारण व एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य होय. इतर भाषांत ते सहसा आढळत नाही. उदा., (१) ‘नदीअ में तरिजे थो ’ = नदीत पोहलं जातं. (२) ‘ पींघे में लुडि॒बो आहे ’ = झोपाळ्यात झोके खाल्ले जातात. (३) ‘ पकोड़ा तरिजनि पिया था ’ = भजी तळली जाताहेत. (४) ‘ कसिरत कबी आहे ’ = व्यायाम केला जातो. खरेतर अशा वाक्यांचे शब्दशः भाषांतर होऊ शकत नाही. हे रुप प्राचीन संस्कृतचे असून सिंधीत अजूनही टिकून आहे. (१३) सर्वनामीय शेवट फक्त सिंधीत आणि काही प्रमाणात काश्मीरी भाषेत आहेत. काही वेळेला तर एकाच क्रियापदामध्ये दोन शेवट जोडून कर्ता किंवा कर्म यांचे अर्थ व्यक्त केले जातात. असे शब्द जणू लघुलिपिलेखनाचे कार्य साधणारे आहेत. सिंधीचे हे फार मोठे वैशिष्ट्य मानावे लागेल. उदा.,(१) मारायाईमी ’ = त्याने मला (दुसऱ्याकडून) मारविले. (२) ‘ खारायाईमि ’= त्याने मला खाऊ घातले.
सिंधच्या भौगोलिक स्वरुपानुसार सिंधी भाषेचे सहा भेद केले असून, सध्या जी सिंधी भाषा भारत व सिंध प्रांतात बोलली व लिहिली जाते, ती मानक वा प्रमाण सिंधी भाषा आहे.
सिंधी भाषा सध्या दोन लिपींतून लिहिली जाते – देवनागरी व अरेबिक. भारतातील हिंदू समाज देवनागरीचा, आपल्या मूळ लिपीचा वापर करीत आहे व त्याचबरोबर अरबी-सिंधी लिपीचाही वापर करीत आहे. भारतातील सिंधी लोक आपल्या मातृभाषेचा दैनंदिन नित्याच्या व्यवहारात वापर करतात. शैक्षणिक व अन्य साहित्यिक संस्थांमधून दोन्ही लिपींचा वापर करण्याची मान्यता केंद्र सरकारने ९ मार्च १९५० पासून दिलेली आहे. सिंधमधील सिंधी मुसलमान अरबी-सिंधी लिपीतून व्यवहार करतात.
हर्दवाणी, लछमन
“