सिंग, विजयकुमार : (१० मे १९५१– ). भारतीय भूसेनेचे चोविसावे सेनाप्रमुख आणि पहिले प्रशिक्षित कमांडो. त्यांचा जन्म लष्कराची परंपरा असलेल्या कुटुंबात पुणे येथे झाला. त्यांचे वडील भूसेनेत कर्नल हुद्यावर होते. त्यांचे मूळ गाव हरयाणा राज्यातील बापोरा (जि. भिवानी) होय. राजस्थानातील पिलानी येथील बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून लष्करी प्रशिक्षण घेतले (१९६५–७०) आणि जून १९७० मध्ये त्यांची राजपूत रेजिमेंट (काली चण्डी) क्रमांक दोनच्या पलटणीत निवड (कमिशन) झाली. या पलटणीची त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या सीमेवर नियुक्ती झाली. घुसखोरांना टिपण्यात आणि उच्च बर्फाळ प्रदेशातील लष्करी कारवाईत ते मातब्बर व अनुभवी होते. बांगला देशाच्या युद्घातही (१९७१) त्यांनी भाग घेतला. पुढे अमेरिकेच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून ते पदवीधर झाले. नंतर त्यांनी फोर्ट बेनिंग आणि कार्लिसल (पेनसिल्व्हेनिया) येथे रेंजरचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. द्वंद्वयुद्घाच्या प्रचालनात ते प्रथम आले होते.

 

भूसेनेच्या प्रमुखपदी पोहोचण्यापूर्वी त्यांनी लष्करात अनेक उच्च पदे भूषविली. त्यांपैकी ऑपरेशन पवन, ऑपरेशन परक्रम, अंबाला व जलंदर येथील भूसेनेचे नेतृत्व, भारतीय लष्करी चमूचे प्रशिक्षक (भूतान) वगैरे महत्त्वाची होत. ३१ मार्च २०१० रोजी त्यांची भूसेनेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. या पदावरुन ते ३१ मे २०१२ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी त्यांच्या जन्मसालाची तसेच त्यांनी लष्कराविषयी केलेल्या काही विधानांविषयी शासकीय स्तरावर आणि प्रसारमाध्यमांतून उलटसुलट चर्चा झाली आणि संरक्षण मंत्रालय व लष्करप्रमुख यांतील वाद वृत्तपत्रांतून विशेष गाजला. त्यांच्यानंतर विक्रम सिंग (कार. १ जून २०१२– ) हे लष्कराचे पंचविसावे प्रमुख झाले. ते ३१ मार्च १९७२ मध्ये शीख लाईट इन्फन्ट्रीत रुजू झाले. त्यांनी इंडियन मिलिटरी ॲकॅडेमीतून (आय्एम्ए) लष्करी प्रशिक्षण घेतले. तत्पूर्वी ते लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. त्यांनी श्रीनगर, आखनूर येथे मेजर जनरल म्हणून सेवा केली असून कारगिल युद्घाच्या वेळी ते मिलिटरी ऑपरेशन्स संचलनालयात होते आणि त्या लढाईची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याचे काम त्यांनी केले. या शिवाय त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यामधून मध्य अमेरिका व काँगोमध्ये पाठविण्यात आलेल्या सैन्यात स्पृहणीय कामगिरी केली.

 

विजयकुमार यांना त्यांच्या लष्करातील स्पृहणीय कार्यासाठी अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, युद्घ सेवा पदक, रँगर टॅब वगैरे पुरस्कार महत्त्वाचे होत. याशिवाय ११ मार्च २०११ रोजी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आर्मी वॉर कॉलेजमध्ये त्यांची इंटरनॅशनल फेलोज हॉल ऑफ फेममध्ये सन्मानपूर्वक नोंद झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा सन्मान मिळविणारे ते तेहतीसावे फेलो (अधिछात्र) असून भारताच्या लष्करातील पहिले अधिकारी होत.

 

गायकवाड, कृ. म.