सिंकोना : हिवतापावर अनेक वर्षे उपयोगात असलेले सुप्रसिद्घ औषध म्हणजे कोयनेल ( क्विनीन ) ज्या वृक्षांच्या सालीपासून काढले जाते, त्यांचे सिंकोना हे शास्त्रीय लॅटिन प्रजातिनाम आहे. या प्रजातीत सु. ४० सदापर्णी जाती आहेत. त्यांचे मूलस्थान द. अमेरिकेतील अँडीज पर्वतावर, कोलंबिया, एक्वादोर, पेरु व बोलिव्हिया येथे सस.पासून ७५०–२,७०० मी. उंचीवर आहे. त्यांपैकी काही ⇨ क्षुपे ( झुडपे ) व इतर लहान-मोठे वृक्ष आहेत. त्यांपैकी पाच प्रमुख जाती ( सिंकोना रोबस्टा, सिं. कॅलिसाया, सिं. सक्सिरुब्रा, सिं. कॉर्डिफोलिया व सिं. ऑफिसिनॅलिस ) असून त्यांचे काही संकरज प्रकार कोयनेलाकरिता लागवडीत आहेत.
पेरु देशात १६३८ मध्ये सिंकोना वृक्षाच्या सालीचा उपयोग प्रथम तेथील स्पॅनिश व्हाइसरॉय यांच्या पत्नीने (कौंटेस ऑफ चिंकोन ) हिवतापावर यशस्वी रीत्या केला. त्यानंतर १६३९ मध्ये हा ज्वरनाशक पदार्थ (फेब्रिफ्यूज ) स्पेन देशात आणला जाऊन स्वतः कौंटेस व जेझुइट धर्माप देशक यांनी त्याचा प्रसार केला त्यामुळे त्यास ‘पेरुव्हियन बार्क ‘जेझुइट बार्क ’ वगैरे नावे प्रचारात आली. पेरुमध्ये त्यास ‘क्किनक्किन्ना’ ( इं. बार्क ऑफ बार्क्स ) म्हणत त्यावरुन पुढे क्विनीन हे नाव औषधाला आणि ⇨ कार्ल लिनीअस यांनी दिलेले सिंकोना हे शास्त्रीय नाव त्या वृक्षप्रजातीला रुढ झाले. १८९४ मध्ये वृक्षांची रोपे व बिया पूर्वेकडील देशांत आणल्या गेल्या आणि जावा, म्यानमार, भारत, श्रीलंका, टांझानिया इ. काही देशांत मोठ्या लागवडी केल्या गेल्या. पुढे जमेका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया ह्या देशांतही लागवड करुन क्विनीनाचे उत्पादन सर्वत्र चालू झाले व हिवतापाविरुद्घ त्याचा उपयोग यशस्वी रीत्या चालू झाला. जावामध्ये सुधारित वृक्षसंवर्धन केल्याने लागवड व उत्पादन तेथे व्यापारी द्दष्ट्या सर्वांत अधिक प्रमाणात सुरु आहे. अलीकडे रासायनिक संश्लेषण पद्घतीने बनविले जात असलेले क्विनीन व तत्सम द्रव्ये निर्दोष असल्याने नैसर्गिक सिंकोना चे महत्त्व कमी झालेले आहे.
भारतात सिंकोनाच्या पुढील प्रमुख जाती लागवडीत आहेत : (१)सिं. कॅलिसाया ( व्यापारी नावे : कॅलिसाया बार्क, पेरुव्हियन बार्क ) ह्या जातीची लागवड निलगिरी आणि सिक्कीम येथे आहे (२) सिं. लेजरियाना (व्यापारी नाव : लेजर बार्क ) ही जाती प. बंगाल, आसाम व द. भारत येथे लागवडीत असून भारतात ती सर्वांत सामान्यपणे लावलेली आढळते (३) सिं. ऑफिसिनॅलिस ( व्यापारी नावे : क्राऊन बार्क, लोक्सा बार्क ) या जातीची लागवड निलगिरीत आढळते (४) सिं. सक्सिरुब्रा ( व्यापारी नाव : रेड बार्क ) ही जाती सातपुडा, सिक्कीम आणि द. भारत येथे लागवडीत आहे.
सिंकोना प्रजातीतील वनस्पतींची पाने साधी, समोरासमोर, सोपपर्ण (तळाशी उपांगासह ) फुले पंचभागी, लहान, पांढरी किंवा गुलाबी, वर पसरट केसाळ, परंतु खाली नळीसारखी व सुगंधी असून ती परिमंजरी प्रकारच्या [⟶ पुष्पबंध ] फुलोऱ्यावर येतात. किंजपुटात दोन कप्पे व बोंडाची दोन शकले होतात. बोंडे (८–१७ मिमी. लांब) खालून वर तडकतात आणि त्यांत अनेक, लहान व सपक्ष ( पंखयुक्त ) बिया असतात. याची इतर सामान्य लक्षणे ⇨ रुबिएसी ( कदंब ) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
यलो बार्क व रेड बार्क ह्या नावांनी अनुक्रमे सिं. कॅलिसाया व सिं. सक्सिरुब्रा या जातींच्या साली ओळखल्या जातात. सालीत [⟶ वल्क ] क्विनीन, क्विनिडीन, सिंकोनीन व सिंकोनिडीन ही अल्कलॉइड द्रव्ये एकूण ६-७ टक्के असून त्यांमध्ये अर्धा किंवा दोनतृतीयांश भाग क्विनीन असते. द. अमेरिकेत मूळ व खोड या दोन्हींवरची साल काढून वापरतात. कधीकधी फक्त तोडलेल्या खोडावरची साल घेऊन उरलेला खुंट पुन्हा वाढू देतात. तिसरा प्रकार म्हणजे जीवंत झाडावरची साल दरवर्षी काढून वापरणे हा होय. सहा ते नऊ वर्षे वाढलेली झाडे क्विनीनच्या उत्पादनाकरिता उत्तम समजतात. जावा, भारत, बोलिव्हिया, ग्वातेमाला इ. ठिकाणी सिंकोना ची लागवड बरीच मोठी आहे. लागवडीकरिता जंगल स्वच्छ करुन घेतलेली उतार जमीन चांगली बियांपासून सावलीत प्रथम रोपे तयार करुन नंतर निश्चित ठिकाणी लावतात. जमेकात सस.पासून सु. १,६५० मी. उंचीवर व सरासरी वार्षिक तापमान सु. १५·५° से. असलेल्या प्रदेशात लागवड केली आहे. भारतात ऊटकमंड येथे ( निलगिरीत ) सस.पासून १,८००–२,५०० मी. उंचीवर व तमिळनाडूत नदुवत्तममध्ये सस.पासून १,०५०–१,८०० मी. उंचीवर लागवड केलेली आहे.
हिवतापाखेरीज आमांश व न्यूमोनिया रोगांच्या उपचारात व नेत्रधावनद्रवात ( डोळ्यांतील विकारात धुण्यास वापरावयाच्या प्रवाही औषधात ) क्विनिनाचा उपयोग करतात. काही कीटकनाशके व केशधावनद्रव यांत सिंकोनाची साल वापरतात. क्विनीन काढून राहिलेली साल कातडी कमाविण्यास उपयुक्त असते.
संधिवातातील वेदना कमी करण्यास व गुळण्यांकरिता क्विनीनयुक्त औषधे उपयुक्त ठरली आहेत. क्विनीन अधिक प्रमाणात घेतल्यास तात्पुरती किंवा कायमची बधिरता येते. त्यात अंधपणा, घेरी, मळमळ, शिसारी इ. लक्षणे दिसतात. गर्भवती स्त्रियांना व हृ दयविकार असलेल्या व्यक्तींना क्विनीन देणे टाळतात.
पहा : क्विनीन.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.
2. Jain, S. K. Medicinal Plants, New Delhi, 1968.
3. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. II, New Delhi, 1975.
कुलकर्णी, स. वि. परांडेकर, शं. आ.
“