साळुंखे, आण्णा हरी : (१ जून १९४३ – ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्घ विचारवंत, संशोधक व साहित्यिक. आ. ह. साळुंखे ह्या नावाने परिचित. सांगली जिल्ह्यातील तासगावजवळच्या खाडेवाडी ( सध्याचे शिवाजीनगर ) येथील एका शेतकरी कुटुंबात जन्म. एम्.ए. ( संस्कृत) झाल्यावर ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ ह्या विषयावर त्यांनी संस्कृतमध्ये पीएच्.डी. मिळविली (१९८७). सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृतचे सु. ३० वर्षे अध्यापन. मराठी विश्वकोशात तौलनिक धर्मशास्त्रांतर्गत अनेक नोंदींचे लेखन. त्याचप्रमाणे वैचारिक, संशोधनात्मक व ललित अशा ३६ ग्रथांचे लेखन.

 

आण्णाभारतीय संस्कृतीचे अभिजनात्मक आणि बहुजनात्मक असे द्वंद्वात्मक स्वरुप असून ह्या द्वंद्वात्मकतेमुळेच बहुजनसमाजावर सामाजिक, सांस्कृतिक गुलामगिरी लादली गेली. तसेच ह्या संस्कृतीचा इतिहास हा वैदिक-अवैदिक विचारपरंपरांमधील संघर्ष-संकराचा इतिहास असून अभिजनसापेक्ष व पक्षपाती इतिहासलेखनामुळे बहुजनांच्या खऱ्या इतिहासाची बहुश: उपेक्षा झाली, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे या इतिहासाची खंडनात्मक चिकित्सा आणि बहुजनकेंद्रित दृष्टिकोणातून इतिहासाची पुनर्मांडणी असे त्यांच्या वैचारिक लेखनाचे प्रमुख आयाम आहेत. मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती (१९९३), वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (१९९८), ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा (२००१), तुळशीचे लग्न : एक समीक्षा (२००१), परशुराम : जोडण्याचे प्रतीक की तोडण्याचे ? (२००९) हे त्यांचे ग्रंथ त्या दृष्टीने निर्देशनीय आहेत. त्यांतून खराखुरा म्हणून त्यांना अभिप्रेत असलेला भारताचा समाजशास्त्रीय इतिहास मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

 

धर्म व संस्कृतीच्या नावाखाली पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांवर इतिहासकालापासून होत असलेला अन्याय आणि त्यांचे होत असलेले शोषण त्यांनी हिंदू संस्कृती आणि स्त्री (१९८९), महाभारतातील स्त्रिया (२ भाग, १९९३ २००३) ह्यांसारख्या ग्रथांतून उघड केले.

 

बहुजनांचा आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि विधायक अस्मिता जागृत करण्यासाठी त्यांनी केलेल्या लेखनात आस्तिक शिरोमणी चार्वाक (१९९२), म. फुले आणि धर्म (१९९२), विद्रोही तुकाराम (१९९७), बळीवंश (२००५), सर्वोत्तम भूमिपुत्र : गौतम बुद्घ (२००७), एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई (२०१०), शिवराय : संस्कार आणि शिक्षण (२०१०) ह्या ग्रंथांचा समावेश होतो. आस्तिक शिरोमणी…मध्ये चार्वाकांच्या इहवादी, बुद्घिप्रामाण्यवादी आणि विधायक जीवनमूल्यांचे दर्शन त्यांनी घडविले आहे. बळीवंशात प्रल्हाद, कपिल, बळी ह्यांसारख्या जनहितैषी राजांच्या व तत्त्ववेत्त्यांच्या विचारसरणीचे आणि संघर्षाचे विवेचन त्यांनी केले आहे. सर्वोत्तम भूमिपुत्र…मधून त्यांनी आपल्या प्रागतिक समाजचिंतनातून बुद्घांनी पंथ-संप्रदायांच्या पलीकडे जाऊन सर्व मानवांसाठी त्यांचा जो व्यापक, कल्याणकारी असा वैचारिक वारसा निर्माण केला, तो सर्व समाजापर्यंत पोहोचविला आहे. संत तुकाराम ह्यांच्या व्यक्तिमत्त्वातील समाजनिष्ठ बाजू विद्रोही तुकाराम मध्ये त्यांनी प्रकाशात आणली. म. फुले…मध्ये त्यांनी फुल्यांची नैतिक मूल्याधिष्ठित धर्मसंकल्पना स्पष्ट केली आहे. एकलव्य…मध्ये त्यांनी बहुजनातील उपेक्षित, वंचित अशा तीन प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनाचे दर्शन घडविले आहे. शिवराय : संस्कार आणि शिक्षण या ग्रंथामध्ये त्यांनी शिवरायांची कुशाग्र बुद्घी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी केलेले प्रयत्न, ह्यांविषयी नवी माहिती दिलेली आहे.

 

धर्म की धर्मापलीकडे (१९९०), त्यांना सावलीत वाढवू नका (२००३), शंभर कोटी मेंदू , दोनशे कोटी हात (२००४) ह्यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, इहवाद, धर्मनिरपेक्षता इ. मूल्यांचा पुरस्कार केला आहे. त्यांची काही पुस्तके त्यांच्या समीक्षकांशी झालेल्या वादांतून निर्माण झाली आहेत. उदा., आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल (१९९५).

 

त्यांचा विवाह मधुश्री या युवतीशी झाला. त्यांना दोन सुविद्य मुलगे व एक मुलगी असून ती आपापल्या व्यवसायात कार्यरत आहेत. पत्नीच्या निधनानंतर (२०००) त्यांनी केलेल्या सर्जनात्मक लेखनात तुझ्यासह आणि तुझ्याविना ( आठवणी ) (२००१) तसेच अशी भेटत रहा तू (२००४) आणि जीवनाची सल वेदनेत (२००५) हे काव्य- संग्रह, ह्या पुस्तकांचा समावेश होतो. त्यांतून विरहवेदना आणि प्रीतीच्या भावार्द्रतेचे काव्यात्म दर्शन घडते.

 

त्यांनी काही इंग्रजी व संस्कृत ग्रंथांचे मराठी अनुवादही केले आहेत ते पुढीलप्रमाणे : स्वातंत्र्याचे भय (१९८८, एरिख फ्रॉम ), शीख धर्मातील धर्मनिरपेक्ष जाणिवा (१९८८, कर्तारसिंग दुग्गल ), नागार्जुन (१९९५, सच्चिदानंद मूर्ती ), शाहूचरितम् ( संस्कृत, २०१० लाटकरशास्त्री ).

 

ते महाराष्ट्रातील अनेक सामाजिक चळवळींशी निगडित आहेत. विचारवेध संमेलन, बेळगाव विद्रोही साहित्यसंमेलन, सोलापूर सत्यशोधक समाजाचे पस्तीसावे अधिवेशन ( गेवराई, जि. बीड ) इ. अनेक सामाजिक-साहित्यिक परिषदांचे आणि संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. अनेक सन्मान व पुरस्कार त्यांना मिळाले आहेत : महाराष्ट्र फाउंडेशनचा उत्कृष्ट वैचारिक लेखनाबद्दलचा पुरस्कार, राजर्षी शाहू पुरस्कार (२०१०), मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार (२०११). महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णहोत्सवी वर्षानिमित्त राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

 

लाटकर, मानसी