काव्य : सर्जनशील, ललित किंवा कलात्मक वाङ्मयाचे ज्या काही थोड्या स्थूल वाङ्मयप्रकारांत वर्गीकरण केले जाते, त्यात काव्य हा वाङ्मयप्रकार मोडतो.

काव्य हा वाङ्मयप्रकार फार प्राचीन असून तो अनेक वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये विविधपणे विकसलेला आढळतो. आजची आपली काव्याची व्याख्या प्राचीन, अर्वाचीन तसेच विविध कालखंडांमधील आणि विविध संस्कृतींमधील काव्याला लागू पडेल इतकी व्यापक असली पाहिजे.

काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे. `भाषेपासून’ व `भाषेत’ घडणे हे काव्याचे एक स्थूल वैशिष्टय आहे. पण याचा अर्थ एवढाच, की भाषा ही काव्याची पहिली अट होय. भाषेशिवाय काव्य असू शकणार नाही. भाषा हा काव्यरचनेचा आवश्यक घटक असून काव्याचा व्यवहार हा एक प्रकारचा भाषिक व्यवहार आहे.

भाषिक व्यवहार हे मनुष्यप्राण्याच्या जीवनशास्त्रीय वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. कारण भाषिक व्यवहार हा प्रतीकात्मक व्यवहाराचा एक प्रकार असून प्रतीकात्मक व्यवहारक्षमता हे मानवाचे खास वैशिष्ट्य मानले जाते. यामुळे मानवाच्या प्रतीकात्मक आणि भाषिक व्यवहारांमध्येही पुष्कळ विविधता आढळून येते. तेव्हा काव्याची व्याप्ती निश्चित करताना इतर भाषिक व्यवहारांपासून काव्य वेगळे ओळखण्याचे निकष आपल्याला शोधावे लागतात.

प्राचीन काळापासूनच अनेक संस्कृतींमध्ये भाषिक व्यवहारांमध्ये सापेक्ष छंदोमयतेनुसार गद्य आणि पद्य, अगेय आणि गेय असे फरक करण्यात आले. उच्चारलेल्या भाषेतील काही ध्वनिगुणांचा निवडकपणे आणि प्रकर्षाने उपयोग करून त्यांच्यात छंदव्यवस्था बांधण्यात येऊ लागली. उच्चारकाल, उच्चारित घटकांचे कालमानानुसार नियमन, अनुप्रास आणि यमकांद्वारा शब्दांमध्ये व ओळींमध्ये साम्य आणि साहचार्याचे संबंध प्रस्थापित करणे, अशा काही नियमांमधून छंदव्यवस्था विकसित केली गेली. प्रत्येक मानवी भाषेमध्ये, त्या त्या भाषेच्या गुणांनुसार, पण तत्त्वतः कोणत्याही भाषेला लागू करता येतील अशा संकल्पनांनुसार, छंदव्यवस्था विकसित झालेली आढळते.

अनेक प्राचीन व काही अर्वाचीन काव्यशास्त्रांमध्ये छंदोमयता हे काव्याचे व्यवच्छेदक वैशिष्टय मानले जाते. परंतु काही काव्यशास्त्री ते तसे मानण्याला कबूल नाहीत. त्यांच्यापैकी कित्येकजण `गद्यात’ ही `काव्य’ आहे, असे इतर निकष वापरून प्रतिपादन करतात तर काहींचे म्हणणे असे असते, की छंदोमयता ही काव्याची अट असली, तरी इतर महत्त्वाच्या अटी पाळल्याखेरीज `काव्य’ सिद्ध होत नाही.

काव्याच्या ज्या विविध संकल्पना आज अस्तित्वात आहेत, त्या वादग्रस्त असण्याची कारणे दोन प्रकारची आहेत व त्या दोन्ही कारणांचा काव्याच्या स्थूल व सर्वमान्य वैशिष्ट्यांशी संबंध आहे. पहिले कारण हे, की निव्वळ भाषिक व्यवहाराच्या पातळीवरसुद्धा काव्याची शब्दसंघटना व ती रचण्याचे आणि उलगडण्याचे संकेत हे दैनंदिन भाषिक व्यवहारापेक्षा निराळे व खास असतात. दुसरे कारण हे, की काव्याची अर्थसंघटना व ती रचण्याचे आणि उलगडण्याचे संकेत, हे सर्वसाधारण मानवी व्यवहारांपेक्षा निराळ्या व खास मूल्यकल्पनांना बांधलेले असतात.

काव्याची व्याप्ती सर्वमान्य होईल अशा रीतीने करण्याआड येणाऱ्या दोन मुख्य अडचणींचा उगम याप्रमाणे दोन निराळ्या क्षेत्रांत मोडतो. पैकी काव्याचे भाषाशास्त्र वस्तुतः भाषाशास्त्रीय ज्ञानाचे एक खास क्षेत्र म्हणून विकसित व्हावयाला पाहिजे. त्यात काव्याचा मूल्यनिरपेक्ष विचार करता येऊन काव्याच्या विविध व्यवस्थांचे नियामक संकेत दाखवून देता येतील. परंतु यात अडचण येते ती अशामुळे, की कला या नात्याने काव्य ही एक मूल्यसंकेतांवर आधारलेली व मूल्यलक्ष्यी व्यवस्था असते.काव्याचा श्रोता अथवा वाचक स्वतःच्या मूल्यनिग्रही व मूल्यलक्ष्यी उद्देशांनुसार समोरच्या काव्यावर स्वतः संस्कार करत असतो व त्याच वेळी त्या काव्याच्या स्वतःवर होणाऱ्या संस्कारांचे नियमन करत असतो. यामुळे वस्तुतः `हे काव्य आहे की नाही’ हा प्रश्न `हे चांगले काव्य आहे की ग प्रश्नापासून संपूर्णपणे वेगळा करता येत नाही अाणि हेच ‘काव्य’ ही संकल्पना वादग्रस्त ठरण्याचे मूळ कारण आहे.

कला या नात्याने काव्य ही एक मूल्यसंकेतांवर आधारलेली व मूल्यलक्ष्यी व्यवस्था असते, असे अगोदर विधान केलेले आहे त्याचे आता सविस्तर स्पष्टीकरण देता येईल. उदा., जेव्हा `काव्य म्हणजे रसात्मक वाक्य’ किंवा `काव्य म्हणजे प्रभावी भावनांचा उत्स्फूर्त महापूर’ अशांसारखी विधाने केली जातात तेव्हा असे गृहीत धरले जाते, की `रसनिर्मिती’ अथवा `भावनेचा आविष्कार’ ही काव्याच्या व्यवस्थेची `लक्ष्ये’ होय. या अर्थी काव्यरचना ही मूल्यसंकेतांवर आधारलेली व मूल्यलक्ष्यी व्यवस्था हो. समजा, वरीलपैकी एक व्याख्या एखाद्या वाचकाने मानली, तर समोरच्या काव्याचा आस्वाद घेताना किंवा त्याचा सांकेतिक अर्थ उलगडताना, भाषाशास्त्रीय नियमांबरोबरच तो रसाचा किंवा भावनेच्या आविष्काराचा शोध घेण्याचा आग्रह धरील. उलट समजा, `काव्य म्हणजे असामान्य कल्पनाशक्तीद्वारा विविध संदर्भांतील प्रतीकांना वा प्रतिमांना एकत्र गुंफणे’ अशी त्याची व्याख्या असली, तर रसाचा किंवा भावनेचा शोध न घेता तो प्रतीकांच्या व प्रतिमांच्या संघटनेचा शोध घेईल. अर्थात प्रत्यक्ष समीक्षा वा काव्याचा आस्वाद ही प्रक्रिया नेहमी इतकी सोपी नसते. काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक खास प्रकार असल्यामुळे काव्याच्या कोणत्याही वाचकाने व समीक्षकाने विविध प्रकारच्या काव्यरचना पाहिलेल्या असतात व त्यामुळे संकेत उलगडण्याच्या विविध पद्धती व एकाहून अधिक संमिश्र प्रकारचे मूल्याग्रह धरूनच तो समोरचे नवे काव्य बघत असतो. याप्रमाणे संकेतांच्या बहुविधतेमुळे आणि मूल्याग्रहांच्या संमिश्रतेमुळे काव्यसमीक्षा व काव्यास्वाद हे व्यवहार अतिशय व्यामिश्र असतात, हे साहजिकच आहे.

कोणत्याही दोन कविता एकमेकींसारख्या नसतात, पण त्या तशा आहेत असे आपण मानून चालतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच कोणत्याही एका कवितेची संघटना व तिचे मूल्य कोणत्याही दोन वाचकांच्या लेखी सारखे नसते, पण तसे ते मानून चालतात, हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा, की काव्याच्या संकल्पना कितीही विविध वाटल्या, तरी त्यांच्या विविधतेला मनुष्याच्या ग्रहणशक्तीने व मनुष्याच्या ग्रहणपद्धतींमधल्या मूलभूत साम्याने मर्यादा घातलेल्या आहेत. तसेच प्रथमदर्शनी माणसांचे विविध मूल्याग्रह अगणित भासले, तरी काही मर्यादित संकल्पनांच्या आवाक्यात ते सर्व आणण्याचा आपण प्रयत्न करीत असतो.

यामुळे काव्यरचनेचे संकेत जरी आपल्याला सकृद्‌दर्शनी अनंतविध, अत्यंत अपूर्व आणि व्यक्तिविशिष्ट वाटले, तरी त्या संकेतांचे आपण काही मर्यादित संदर्भाच्या आवाक्यात नियमन करतो. यामुळेच ली पो, कालिदास, दान्ते, शेक्सपिअर, रॅंबो, केशवसुत किंवा व्हॉझ्नेसेन्स्की अशा विविध भाषांतील, विविध काळांतील, विविध संस्कृतींंमंधील व विविध मूल्यलक्षी कवींच्या कविता जेव्हा समीक्षक वाचतात तेव्हा दोन प्रकारे त्यांच्या समीक्षाप्रक्रियेचे संदर्भ मर्यादित होतात : (१) त्या त्या कवीच्या सांकेतिक रचनेच्या भाषिक वैशिष्ट्यांनुसार व नियमांनुसार आणि (२) त्या त्या समीक्षकाला ठाऊक असलेल्या एकूण संकेतनियमांनुसार व त्याच्या मूल्याग्रहांनुसार. कवितेच्या शैलीशास्त्राचा (अथवा जुन्या भाषेत अलंकारशास्त्राचा व तत्सम अभ्यासविषयांचा) विचार केल्यास असे आढळते, की कवितेचे `व्याकरण’ सर्वसामान्य भाषिक व्यवहारांच्या व्याकरणाच्या संदर्भांत राहूनदेखील व्यवस्थित रीत्या ते व्याकरण मोडते. जसे अपेक्षित शब्दक्रमांविरुद्ध कोलांटी घेऊन किंवा अपेक्षित अर्थसंदर्भ डावलून दोन असंबंधित अर्थसंदर्भ एकत्र आणून. असे असूनही, काव्याला स्वतःचे `व्याकरण’ असते आणि `शैलीशास्त्र’ अथवा `सापेक्ष शैलीशास्त्र’ म्हणजे या व्याकरणाचा पाया.

हीच गोष्ट काव्याविषयीच्या मूल्याग्रहांविषयी म्हणता येईल. भावनांचे किंवा अर्थांचे निवेदन, मुक्त किंवा सप्रयोजक प्रतिमानिर्मिती अशांसारखे काव्याचे नाना निकष मानले गेलेले आहेत. ह्या निकषांमागे असलेल्या संकल्पनांची संख्या मर्यादित आहे, पण त्यांतील संकल्पनांची श्रेणी विविध मूल्याग्रहांनुसार विविध प्रकारे लावता येते, त्यातल्या काही निवडक संकल्पनांचा समुच्चय आग्रहाने स्वीकारता वा नाकारता येतो व याप्रमाणे मर्यादित घटकसंकल्पनांना धरूनसुध्दा विविध प्रकारच्या समीक्षाव्यवस्था व मूल्यव्यवस्था प्रतिपादता येतात. याप्रमाणे काव्याच्या संदर्भांच्या व घटकांच्या संकल्पना मर्यादित आहेत पण त्यांच्या विविध संमिश्रणांमधून विविध व्याख्या व समीक्षापद्धती निर्माण होत असतात. हे ओळखल्यास काव्याची व्याप्ती निश्चित करणे जड जाणार नाही.

पहा : अलंकार, साहित्यातील ओड कथाकाव्य खंडकाव्य, मराठी गीत छंदोरचना ध्वनिसिद्धांत निर्यमक कविता प्रतिमा व प्रतिमासृष्टि प्रतिमावाद प्रतीकवाद बॅलड भावगीत महाकाव्य रससिद्धांत लोकगीते वात्रटिका विडंबिका विलापिका शिशुगीत सुनीत स्तुतिपर गीते.

चित्रे, दिलीप