साक्षात्कार : ( रेव्हिलेशन ). साक्षात्कार याचा शब्दश: अर्थ ‘इंद्रियांनी ज्ञात होणे’, ‘प्रत्यक्षज्ञान किंवा ‘ईश्वराने प्रणीत केलेले’ असा होतो पण भौतिक पदार्थांच्या लौकिक प्रत्यक्षज्ञानाला मराठीत सहसा साक्षात्कार म्हटले जात नाही, तर एखाद्या अतींद्रिय वस्तूच्या होणाऱ्या, पण प्रत्यक्षज्ञानाप्रमाणे थेटपणे होणाऱ्या ज्ञानाला साक्षात्कार म्हटले जाते. कोणत्याही अतींद्रिय वस्तूच्या थेट ज्ञानाला नेहमीच ‘साक्षात्कार’ हा शब्द वापरला जात नाही, तर एखादे सर्वव्यापक स्वरुपाचे किंवा मूलभूत तत्त्व, एखादे उदात्त, विराट तत्त्व किंवा वस्तू यांच्या थेट ज्ञानाच्या बाबतीत साक्षात्कार हा शब्द वापरला जातो. उदा., ब्रह्मसाक्षात्कार, ईश्वरसाक्षात्कार, आत्मसाक्षात्कार.

साक्षात्कार ही सर्व धर्मांतील एक मूलभूत संकल्पना असून तिची उत्पत्ती ईश्वर वा देवत्व या कल्पनेत सामावलेली आहे. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये उत्पन्न व विकसित झालेल्या धार्मिक तत्त्वज्ञानांमध्ये संतांनी तसेच धर्मचिंतकांनी साक्षात्काराची कल्पना मांडलेली आढळते. बऱ्याचदा तिचे स्वरुप अवर्णनीय किंवा शब्दातीतही मानले गेले आहे. या दृष्टिकोनातून साक्षात्काराची सांगड गूढवादाशी ( मिस्टिसिझम ) घातली जाते. अध्यात्मवादी तत्त्वचिंतक ⇨ रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांनी ‘मिस्टिसिझम’ चे भाषांतर साक्षात्कारवाद असे करुन गीतातत्त्वज्ञानाची तसेच भारतातील अनेक संतांच्या तत्त्वज्ञानाची मांडणी ‘साक्षात्कार’ या संकल्पनेच्या अनुषंगाने केलेली दिसते. त्यांच्या मते ईश्वरसाक्षात्काराच्या स्पष्टीकरणासाठी अंत:प्रज्ञा ( इन्ट्यूइशन ) आवश्यक असून बुद्घी, भावना व संकल्पशक्ती या अंत:प्रज्ञेला साहाय्यभूत ठरतात.

विविध धार्मिक तसेच तात्त्विक संप्रदायांमध्ये जे साक्षात्काराचे स्वरुप वर्णिले गेले आहे, त्यांचा संक्षिप्त आढावा असा घेता येईल : वैदिक परंपरेतील केवलाद्वैत संप्रदायात निर्गुण निराकार ब्रह्मच तेवढे सत्य व मी (म्हणजे जीव ) ब्रह्मरुपच आहे, असा साक्षात्कार उपनिषदांतील महावाक्यांच्या आधारे होतो असे मानले असून त्याला अपरोक्षानुभूती म्हटले आहे [⟶ केवलाद्वैतवाद ]. विविध अद्वैती व द्वैती भक्तिसंप्रदायांमध्ये भक्तीच्या उत्कटतेतून ईश्वरसाक्षात्कार होतो व हा ईश्वरसाक्षात्कार ईश्वराशी ऐक्य ( सायुज्य ) किंवा जवळीक ( सामीप्य ) किंवा साम्य ( साद्दश्य ) साधणारा असतो असे मानले आहे. विश्वनिर्माता ईश्वर न मानणाऱ्या सांख्य तसेच पातंजलयोग दर्शनात चेतन पुरुषतत्त्व व अचेतन प्रकृतितत्त्व यांच्यातील भेदाचा साक्षात्कार अंतिम मानला असून त्याला केवलज्ञान तसेच विवेकख्याती म्हटले आहे. जैनदर्शनानुसार मुक्तजीव हा सर्वज्ञ होतो व त्याला होणारे हे पदार्थज्ञानाचे ज्ञान थेट असून ते कोणत्याही माध्यमाशिवाय होते असे मानले आहे. बौद्घ तत्त्वज्ञानानुसार सारे पदार्थ अनित्य व अनात्म आहेत, या जाणिवेतून तृष्णा नाहीशी होऊन परमशान्तीचा म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार होतो असे मानले आहे. माध्यमिक बौद्घ संप्रदायात मात्र ‘सारे वस्तुजात शून्य आहे म्हणजे स्वभावरहित आहे’, याचा म्हणजे शून्यतेचा साक्षात्कार हाच महत्त्वाचा आहे. याच संप्रदायाच्या प्रभावातून चीनमध्ये आलेला चॅन (Chain) व जपानमध्ये पसरलेला झेन संप्रदाय यांतही हा शून्यतेचा साक्षात्कारच अंतिम आहे. त्यांत हा साक्षात्कार तार्किक बुद्घीच्या व भाषेच्या पलीकडचा मानला आहे, तर चीनमधील ताओ संप्रदायात निसर्गाशी एकरुप होणे हे साक्षात्कारात अनुस्यूत आहे.

ख्रिस्ती धर्मानुसार पवित्र जीवन जगण्याचे उद्दिष्ट याच जगात साक्षात्कारावस्था मिळविणे हे नाही पण व्रतस्थ जीवन व ईश्वरचिंतनाच्या माध्यमातून स्वर्गीय जीवनाची चव ( फोअरटेस्ट ) याच जगात चाखणे शक्य आहे, असे ख्रिस्ती साक्षात्कारवादी मानतात. ख्रिस्ती साक्षात्कारवादावर ⇨प्लोटायनस च्या (२०५–२७०) ⇨नव-प्लेटो मत वादाचा मोठा प्रभाव दिसतो. माइस्टर एक्‌हार्ट (१२६०–१३२८), ⇨ सांता तेरेसा ( तेरेसा ऑफ ॲव्हिला या नावानेही प्रसिद्घ, सोळावे शतक ), जॉन ऑफ द क्रॉस ( सोळावे शतक ) या ख्रिस्ती साक्षात्कारपर चिंतनाला योगदान देणाऱ्या काही ठळक व्यक्ती आहेत.

इस्लामी साक्षात्कारवादी पंथाला सूफी पंथ म्हटले जाते. कुराणातील ‘अल्ला म्हणजे स्वर्ग व पृथ्वीचा प्रकाश आहे’ ही संकल्पना तसेच ईश्वरविषयक उत्कट प्रेम या संकल्पनांचा वापर सूफी संतांनी आपल्या साक्षात्कारवादात करुन घेतला. अनेक सूफी संतांवर औपनिषदिक तत्त्वज्ञानाचा प्रभाव असावा असे अभ्यासक मानतात. [⟶ सूफी ].

विविध धर्मसंप्रदायांत वर्णिलेले साक्षात्काराचे वर्णन एकसारखे नाही कारण त्या त्या संप्रदायाच्या सत्ताशास्त्रीय चौकटीनुसार साक्षात्काराचा अन्वयार्थ वेगवेगळा लावला गेलेला दिसतो. साक्षात्कारात निखळ अनुभूती आणि कल्पना किंवा भास यांची सरमिसळ झालेली असू शकेल पण साक्षात्कारात्मक अनुभूतीची अशी चिकित्सा करणे साक्षात्कारवाद्यांना मान्य होत नाही.

संदर्भ : 1. Eliade, Mircea, A History of Religious Ideas, 3 Vols. Chicago, 1986.

2. Farmer, Herbert H. Revelation and Religion: Studies in the Theological Interpretation of Religious Types, New York, 1954.

३. तुळपुळे, शं. गो. गुरुदेव रानडे : चरित्र आणि तत्त्वज्ञान, पुणे, १९८३.

गोखले, प्रदीप