सावयपण्णत्ति : (श्रावकप्रज्ञप्ति ). जैन श्रावकांच्या– म्हणजे गृहस्थांच्या–आचारधर्माचे निरूपण करणारा एक प्राचीन प्राकृत ग्रंथ. थोर जैन आचार्य ⇨ उमास्वाती (इ. स.पहिल्या–चौथ्या शतकांच्या दरम्यान) हे याचे कर्ते आहेत, असे परंपरेने मानले गेले आहे तथापि डॉ. हीरालाल जैन प्रभृती विद्वानांनी ह्या ग्रंथातील अंतःप्रामाण्याच्या आधारे ह्याचे कर्ते श्वेतांबर जैन लेखक ⇨ हरिभद्र (इसवी सनाचे आठवे शतक) हे असावेत असे मत मांडलेले आहे. ह्या ग्रंथात ४०१ गाथा असून त्यात पाच अणुव्रते, तीन गुणव्रते आणि चार शिक्षाव्रते ह्यांचे निरूपण केलेले आहे. उमास्वातींनी संस्कृतमध्ये श्रावकप्रज्ञप्ति लिहिली असणे शक्य आहे तथापि ती उपलब्ध नसल्यामुळे तिचा आणि ह्या ग्रंथाचा काय संबंध असू शकेल, ह्याबद्दल काही सांगता येत नाही.

 

तगारे, ग. वा.