सावकारी आणि सराफी पेढीवाले : ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ क्राउथर यांच्या मते सावकार, सोनार आणि सराफी पेढीवाले हे आधुनिक बँकांचे पूर्वज आहेत. इ. स. पूर्वकाळात बॅबिलनमध्ये मंदिरातील पुजाऱ्यांनी बँक व्यवसाय सुरू केला, असेही चेकाही तज्ज्ञांचे मत आहे. खऱ्या अर्थाने बँक व्यवसायाचे पूर्वज सावकार आणि सराफ आहेत, असे म्हटले जाते. एखाद्या सराफाकडे विशिष्ट रक्कम ठेवल्यास, त्याबद्दलची पावती ठेवीदारास दिली जाई. ठेव ठेवलेली रक्कम मागणी करताक्षणीच परत करण्याचे आश्वासनदेखील या पावतीमध्ये दिलेले असे. श्रीमंत व्यक्ती, व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक आपल्याजवळील जादा रक्कम सराफाकडे ठेव म्हणून ठेवत व गरजेच्या वेळी आपल्या रकमेची मागणी करीत असत. लोकांचे पैसे सांभाळणे आणि मागताक्षणी त्यांना ते परत करणे, या सेवेबद्दल सराफ ठराविक मोबदला घेत असत. सराफांचे हे काम पैशाच्या रक्षकाचे असे. ठेवी ठेवणारे लोक क्वचितच आपले पैसे परत मागतात, अन्यथा हा पैसा बराच काळ सराफांकडे निष्क्रिय स्वरूपात पडून राहत असे. म्हणून हा पैसा जर किफायतशीर गुंतवणुकीसाठी वापरला, तर गरजू लोकांना कर्ज उपलब्ध होईल व आपल्यालाही व्याज मिळेल, हे सराफी पेढीवाल्यांच्या लक्षात आले  त्यामुळे त्यांनी जमा झालेल्या ठेवींचा पैसा कर्जाऊ देण्यास प्रारंभ केला. व्याज उत्पन्नाच्या आशेने सावकार आणि सराफी पेढीवाले ह्यांनी आपल्या व्यवसायाचा आकार वाढविला. लोकांनी त्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसा व संपत्ती सुरक्षिततेसाठी ठेवावी, असा प्रयत्न त्यांनी केला. यासाठी हळूहळू ठेवी ठेवणाऱ्यांना प्रलोभन म्हणून व्याज देण्याची प्रथा सुरू झाली. या बदलामुळे पैसा केवळ सुरक्षिततेसाठी ठेवींत गुंतविण्याऐवजी व्याजाच्या उत्पन्नाद्वारे जादा प्राप्ती मिळविण्याचे प्रलोभन निर्माण झाले. त्यानंतर सावकार आणि सराफी पेढीवाले यांच्याकडे पैसा व संपत्ती स्वरूपातील ठेवी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या. त्यामुळे त्यांचे कर्जव्यवहारही वाढले. ग्राहकांच्या पेढीशी असलेल्या व्यवहारांची रीतसर नोंद ठेवण्यासाठी सराफी पेढीवाले आपल्या ग्राहकांना पासबुक देऊ लागले. या पासबुकांमध्ये ठेवलेल्या ठेवी, ठेवींतील काढलेली रक्कम, दिलेले आणि परत केलेले कर्ज व व्याज यांची नोंद केली जात असे.

सराफ आणि सावकारांच्या व्यवहारांतील तत्परता, सचोटी व ग्राहकांकडे तातडीने लक्ष पुरविणे यांमुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला. सावकारांकडील ठेवपावती व्यवहारामध्ये पैशासारखी वापरली जाऊ लागली. प्रत्यक्ष पैसा न वापरता कर्ज देण्यासाठी अथवा फेडण्यासाठी या पावत्या वापरल्या जाऊ लागल्या. पूर्वीच्या काळी वापरात असलेल्या ब्रिटिश सराफी पावत्या आणि आधुनिक बँकेचे धनादेश यांमध्ये बरेच साम्य आढळते परंतु केवळ धनादेशाशी साम्य असणे एवढेच या पावतीचे महत्त्व नाही, तर ती पावती आधुनिक पतचलनाची जननीदेखील आहे.

भारतात पूर्वी सावकारांना सामाजिक प्रतिष्ठा तर होतीच, परंतु त्यांना राजकीय प्रतिष्ठाही होती कारण पुष्कळसे सावकार वेगवेगळ्या राजांना कोट्यवधी रूपयांचे कर्ज देत असत. निजाम, हैदर, टिपू, पेशवे वगैरे तत्कालीन राज्यकर्ते व त्यांची कर्जे आणि त्यांना कर्ज पुरविणारे सावकार इतिहासात प्रसिद्घ आहेत.

हे सावकार पैशाच्या देवाणघेवाणीबरोबर अनेकदा सराफीचा म्हणजे सोने-चांदी खरेदी-विक्रीचा व्यवसायही करत, म्हणून त्यांना सराफी पेढ्या असेही संबोधिले जात असे. मोगलांच्या व त्यानंतरच्या काळात या व्यवसायातील लोकांना भरभराटीचे दिवस आले होते. त्यांना सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. काही ठिकाणी या सावकारांना महसूल गोळा करणे, नाणी पाडणे किंवा सरकारी टाकसाळीवर देखरेख करणे असेही अधिकार दिलेले होते.

कौटिलीय अर्थशास्त्र, मनुस्मृती  वगैरे ग्रंथांतून तसेच प्राचीन संस्कृत नाटके आणि वाङ्‌मय यांमधून सावकार व सावकारीबद्दल अनेक उल्लेख आढळतात. यांवरून अगदी प्राचीन काळापासून भारतात सावकार व सराफी पेढ्या अस्तित्वात होत्या, हे लक्षात येते. या सराफी पेढ्यांना ‘एतद्देशीय बँका’ असे म्हटले जाई.

प्रदेशपरत्वे सावकार वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात. उदा., सराफ, श्रॉफ, चेट्टी, श्रेष्ठी, शेठ-सावकार, महाजन, खत्री, खोत, मालगुजार, गुजर, कोठीवाले इत्यादी. या सर्वांचा उल्लेख ‘एतद्देशीय बँका’ असा केला जातो. सुरुवातीला ब्रिटिश जेव्हा भारतात आले, तेव्हा तेसुद्घा भारतातील अशा प्रकारच्या पेढ्यांमार्फतच आपला व्यवहार करीत असत. परदेशांतून आयात केलेले सोने-नाणे या पेढ्यांमार्फत बदलून घेत असत. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्यासाठी या पेढ्यांचाच आधार घेतला जाई. एतद्देशीय बँका आपल्याजवळील भांडवलाचा मुख्यतः व्यवहारासाठी उपयोग करत. यामुळे त्यांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढू लागला. व्यवहार वाढल्यामुळे दूरदूरच्या ठिकाणी पेढ्यांमार्फत व्यवहार करणे आवश्यक झाले. यामुळे गावांतून किंवा शहरांतून पेढ्यांच्या शाखा काढण्यात आल्या. सावकारांच्या प्रतिनिधींमार्फत या शाखांचे काम पाहिले जात असे. या प्रतिनिधींना त्या त्या पेढीचे ‘गुमास्ते’ असे म्हटले जात असे. बहुधा सर्वच सावकारी पेढ्यांचा कोणता ना कोणता तरी इतर व्यवसाय असे. काही पेढ्या ‘व्यापार’ करत, काही ‘अडत’ करत, तर काही मोठे ‘जमीनदार’ असत. बहुतेक सावकारांचा सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असे. सावकारी, व्यापार, अडत, सोन्या-चांदीचा व्यवहार, शेती यांपैकी एक किंवा अनेक किंवा सर्व प्रकारचे व्यवहार एकाच ठिकाणी करणाऱ्या सावकारी पेढ्या असत.


या सावकारी पेढ्या पुढीलप्रमाणे कार्य करत असत: (१)ठेवी स्वीकारणे: सर्व पेढ्या वेगवेगळ्या मुदतींच्या, वेगवेगळे व्याजदर असलेल्या लहानमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारत असत. ठेवींवर अगदी प्रारंभी व्याज दिले जात नसे. पुढे मात्र अल्पप्रमाणात व्याज देण्यास सुरुवात झाली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात या ठेवींचा व्याजदर ३ ते ९ टक्के एवढा होता तसेच कर्जांवरील व्याजदर ९ ते १२ टक्क्यांपर्यंत होता. (२) चलनाची अदलाबदल करणे: दक्षिण आणि उत्तर भारतातील दोन राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या शहरांतील सावकारांचा चलनाची अदलाबदल करण्याचा व्यवहार बराच मोठा असे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना, ज्या राज्यात जावयाचे आहे त्या राज्याचे चलन बदलून घेणे आवश्यक असे. हा व्यवहारसुद्घा मोठ्या प्रमाणावर चालत असे. (३) हुंड्यांचा व्यवहार करणे: एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मोठी रक्कम पाठवावयाची असेल, तर ती हुंडीच्या स्वरूपात पाठविली जाई. कारण रोख रक्कम घेऊन प्रवास करणे कठीण व धोक्याचे असे. उदा., धनीजोग, हुंडी, शहाजोग, मुदती हुंडी, दर्शनी हुंडी इत्यादी. (४) स्थानिक लोकांना कर्जे देणे: स्थानिक लोक, व्यापारी, शेतकरी, जमीनदार इ. लोकांना त्यांच्या गरजेप्रमाणे लहानमोठ्या रकमांची व कमी-जास्त मुदतीची कर्जे देण्याचे काम या सावकारी पेढ्या करत. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा व पत यांनुसार कर्जाचा व्याजदर कमी-जास्त आकारला जात असे. कर्जाची रक्कम मोठी असल्यास दोन जामीन घेत असत. (५) देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला कर्जपुरवठा करणे: सावकारी पेढ्या सर्व प्रकारच्या व्यापाराला कर्जपुरवठा करीत होत्या. यांमध्ये देशांतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार यांचा समावेश असे. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचे नोकरसुद्घा या सावकारांकडून आवश्यकतेप्रमाणे लहानमोठ्या रकमांची उचल घेत असत. तसेच एका ठिकाणी गोळा झालेला महसूल दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी या सावकारी पेढ्यांची मदत घेतली जाई. (६) सोन्या-चांदीची खरेदी-विक्री: व्यवसायाचा एक भाग म्हणून या सर्व सावकारी पेढ्या सोन्या-चांदीची खरेदी-विक्री करीत असत कारण त्यावेळी प्रचारात असलेले चलन बहुधा या दोन धातूंचेच बनविलेले असे. त्यामुळे चलनाच्या दर्शनी किंमतीपेक्षा त्यांना धातूच्या किंमतींवर अवलंबून राहणे आवश्यक असे म्हणूनच त्यांना सोन्या-चांदीची देवाणघेवाण करणे आवश्यक होते. वरीलप्रमाणे सावकारी पेढ्या कार्य करीत असत. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांची पात्रता व सचोटी लक्षात घेऊनच कर्जाच्या अटी निश्चित केल्या जात. कर्ज घेणाऱ्यांची संपूर्ण माहिती या सावकारी पेढ्यांना असे. अशी माहिती नसेल, तर त्यांच्या विश्वासू हस्तकाकडून ती मिळविण्यात येई आणि त्यानंतरच व्यवहार केला जात असे. बहुधा लेखी वचनचिठ्ठीवर कर्ज देण्यात येई. सर्व प्रकारचे गहाणाचे व्यवहारही केले जात. कर्जदाराची पत व प्रतिष्ठा यांनुसार व्याजाचा दर निश्चित केला जात असे. व्यापारी हुंड्या ४ ते १२ टक्क्यांनी वटविल्या जात असत. सुरक्षित कर्जावरील व्याजदर ६ ते १८ टक्के, तर असुरक्षित कर्जावरील व्याजदर २० ते ५० टक्के एवढा असे.

स्वातंत्र्यपूर्व काळात या संदर्भातील कायद्यांच्या आधारे देशातील बहुसंख्य राज्यांनी सावकारी व सराफी पेढीवाल्यांसाठी स्वतंत्र कायदे केलेले आहेत. महाराष्ट्रात मुंबई मनी लेंडर्स ॲक्ट १९४६ नुसार खाजगी सावकारी करण्यासाठी संबंधितांना परवाना घ्यावा लागतो. परवाना न घेता व्यवसाय केल्यास किंवा कायद्यातील तरतुदींचा भंग केल्यास गुन्ह्यासाठी दोन महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा पाचशे रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा तसेच दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा पाचशे रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जाऊ शकतात. व्यवसाय-परवाना देण्यासाठी किंवा त्याचे नूतनीकरण करण्यासाठी सुरुवातीच्या काळात राज्य व जिल्हा पातळीवर निबंधकाची नियुक्ती केली जात असे. १९६१ पासून सहकारी संस्थांच्या सहनिबंधकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सहनिबंधकांनी आपल्या विभागातील खाजगी सावकारी करणाऱ्यांची नोंदवही (रजिस्टर) ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या संदर्भातील नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने केलेल्या पाहणीनुसार २००३ साली अहवाल सादर केला. त्यानुसार ग्रामीण भागातील जवळपास ७६ टक्के लोक खाजगी सराफांकडून भरमसाठ व्याजाने कर्ज घेत असल्याचे दिसून आले. कित्येकदा यांपैकी बहुसंख्य सावकारांकडे किंवा पेढ्यांकडे व्यवसाय करण्याचा परवानाही नसतो. परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्यांना कायदेशीर मार्गांनी कर्जाची वसुली करता येत नाही.

भोंग, गौतम