सारळा दास : (सु. पंधरावे शतक). मध्ययुगीन ओडिया महाकवी. हा ओडिशाचा (ओरिसा) राज्यकर्ता कपिलेंद्रदेव (१४३६–६६) याचा समकालीन होता, असे मानले जाते. कनकबलिपूर (कनकपूर), जि. कटक येथे एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे मूळ नाव सिद्घेश्वर परिदा. सारळा देवीचा निस्सीम भक्त या अर्थी त्याने ‘सारळा दास’ हे टोपणनाव घेतले. तिच्या कृपाप्रसादामुळे आपल्याला कवित्वशक्ती प्राप्त झाली, अशी श्रद्घा त्याने आपल्या काव्यातून व्यक्त केली. सारळा दास हा ओडिया साहित्याचा यथार्थपणे जनक मानला जातो कारण त्याच्या आधी जरी ओडियामध्ये तुरळक प्रमाणात साहित्यनिर्मिती होत होती, तरी सारळा दास हा असा समर्थ कवी होता, की त्याने ओडियामध्ये समृद्घ व भरीव स्वरूपाचे वाङ्मय प्रथमतः निर्माण केले आणि ओडिया भाषेला वाङ्मयीन घाट प्राप्त करून दिला. सारळा दासाने तीन काव्यग्रंथ निर्माण केले : विलंका रामायण, महाभारत आणि चंडीपुराण. विलंका रामायण हे रामायणाच्या उत्तरकांडावर आधारलेले आहे. रामाने सीतेचा त्याग केलेल्या करुण घटनेपासून त्याचा कथाभाग सुरू होतो, तो सलगपणे कथनाचा प्रवाह पुढे सरकत मूळ रामायणाच्या शेवटापाशी थांबतो. विलंका रामायणाची तेलुगूमध्ये अनेक भाषांतरे झाली. मात्र त्याची निर्णायक आवृत्ती सच्चिदानंद मिश्रा यांनी सत्तरीच्या दशकात सिद्घ केली. ती १९८० मध्ये प्रकाशित झाली.
सारळा दासाची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणून त्याच्या महाभारताचा निर्देश केला जातो. महाभारताने त्याला सर्वश्रेष्ठ महान ओडिया महाकवी म्हणून ख्याती मिळवून दिली. ओडिशातील लोकजीवन, संस्कृती, साहित्य यांवर त्याचा सखोल ठसा उमटला आहे. हे महाभारत मूळ संस्कृत महाभारतावर आधारित असले, तरी सारळा दासाने त्यात बरेचसे बदल करून त्याचे पुनर्कथन केले आहे, तद्वतच त्याला स्थानिक संदर्भांची जोड दिली आहे. त्यामुळे ही जवळ जवळ स्वतंत्र साहित्यकृतीच झाली आहे. संस्कृत महाभारतातील मूळच्या अठरा पर्वांत तसेच त्यांच्या क्रमांतही बदल करण्यात आला आहे. पहिले व शेवटचे पर्व वगळता इतर पर्वांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. मूळ महाभारतातील अनेक प्रसंग व उपकथानके सारळा दासाने वगळली आहेत आणि नवीन प्रसंग व उपकथानके घातली आहेत. नवी उपकथानके, प्रसंग व पात्रे यांद्वारा कवीने आपल्या काळावर व तत्कालीन समाजजीवनावर टीका-टिप्पणी व भाष्ये केली आहेत.सारळा दासाने आपल्या महाभारतातून भगवद्गीतेसारख्या तत्त्वज्ञानपर ग्रंथाला वगळले आहे आणि त्याऐवजी व्यावहारिक चातुर्याची शिकवण देणाऱ्या अनेक नीतिबोधपर कथा समाविष्ट केल्या आहेत. सारळा दासाच्या या ओडिया महाभारताची पहिली निर्णायक आवृत्ती १९४० च्या दशकात आर्तबल्ल्व मोहंती यांनी सिद्घ केली आणि हा बृहद् काव्यग्रंथ ओडिशा शासनाच्या सांस्कृतिक व्यवहार खात्यातर्फे १९६० च्या दशकात प्रकाशित करण्यात आला. अलीकडेच ह्या महाभारताचा काही भाग, त्यात पाठशुद्घी व दुरुस्त्या करून के.सी. साहू यांनी पुनर्संपादित करून १९७८ मध्ये प्रकाशित केला. साहू यांनी चंडीपुराणही संपादित केले, ते १९८४ मध्ये प्रकाशित झाले. हे देवीभागवत या नावानेही ओळखले जाते. चंडीने महिषासुराचा वध केला, हा कथाभाग त्यात वर्णिला आहे. चंडीपुराण हे ओडिया भाषेतील पहिले अद्भुतरम्य काव्य म्हणता येईल. मार्कंडेय पुराणातील ‘देवी माहात्म्या’ची ही केवळ ओडिया आवृत्ती नव्हे. या काव्याला पार्श्वभूमी म्हणून कपिलसिंह व त्याची पत्नी नारखी यांची प्रेकथा लाभली असून ओडिशाच्या किनाऱ्यापासून ते श्रीलंकेच्या अरण्यापर्यंतची त्यांची भ्रमंती त्यात वर्णन केली आहे. सारळा दासाने महाभारताप्रमाणेच या ग्रंथातही विपुल स्थानिक संदर्भ दिले आहेत. ओडिशामध्ये मातृकामूर्तीचा (देवी) पूजासंपद्राय व शाक्तपंथ यांना जी लोकप्रियता लाभली, त्याची साक्ष या ग्रंथाच्या महत्तेवरून पटते.
सारळा दासाने संस्कृतवरून जरी उसनवारी केली असली, तरी त्याने त्यातून निर्मिलेले तीनही ग्रंथ त्याच्या स्वतंत्र प्रतिभेची, मौलिक सर्जनशीलतेची व उच्च कलात्मक दर्जाची साक्ष पटविणारे आहेत. ग्रंथराज महाभारताचा या संदर्भात विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. त्याचे तीनही ग्रंथ म्हणजे ओडिशाच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडविणारे उत्तम दस्तऐवज आहेत, असे म्हटले जाते. ओडिशाच्या गतकालीन वैभवशाली व गौरवास्पद साम्राज्याचे तसेच अंतर्गत ताणतणावांचे व कटकारस्थानांचेही सूचक दर्शन सारळा दासाच्या साहित्यातून घडते. पंधराव्या शतकातील ओडिशाच्या संघटित, दृढ ग्रामीण जनजीवनाचे तसेच अलंकरणप्रचुर, वाक्प्रचारयुक्त जिवंत बोलीभाषेचेही दर्शन सारळा दासाच्या साहित्यातून व शैलीतून घडते. त्याच्या कथासाहित्यातील असंख्य म्हणी, वाक्प्रचार ओडिया भाषेत प्रचलित झाले आहेत. उदा., ‘निडा विष्णू’ (लाकडी विष्णू म्हणजे निर्विकार मनुष्य), ‘तुलसीबन बाघ’ (तुळशी वनातला वाघ म्हणजे लुच्चा मनुष्य) इत्यादी. सारळा दासाच्या लिखाणातून दलितांविषयीचा कळवळाही प्रकट झाला आहे. उदा., महाभारतातील जरासंध व चंडीपुराणातील अंबिका चंडाळ यांसारखी उदात्त दलित पात्रे त्याने रंगविली आहेत. सारळा दासाच्या महाकाव्यातील उपाख्यानांचे कथन तसेच पात्रांचे स्वभाव रेखाटन वा संवादरचना यांतून नाट्यगुणांचे अस्तित्व जाणवते. सारळा दासाला ओडिशाचा महान राष्ट्रीय कवी मानले जाते.
इनामदार, श्री. दे.