सायलोफायटेलीझ : वाहिनीवंत अबीजी वनस्पती विभागांपैकी (टेरिडोफायटा) सर्वांत साध्या व प्रारंभिक वनस्पतींच्या (वर्ग सायलोफायटीनी विभाग-सायलोफायटा किंवा उपसंघ सायलोप्सिडा) दोन गणांपैकी हा एक गण आहे. यातील जाती फक्त जीवाश्म (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) स्वरूपातच आढळतात. प्राचीन काळी सिल्युरियन ते उत्तर डेव्होनियन महाकल्पात (४२ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) व पूर्व कार्बॉनिफेरस कल्पात (सु. ३५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) या जाती बहुतेक दलदलीच्या ठिकाणी लव्हाळा व तत्सम ⇨ओषधीप्रमाणे वाढत असत. त्यांचे जीवाश्म स्कॉटलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, प. यूरोप, चीन व अमेरिकेतील काही भाग येथे आढळतात. यांवरून पूर्वी त्यांचा प्रसार बराच मोठा असावा. ह्या गणातील सर्वच प्रजाती व जाती अद्याप पूर्णपणे अभ्यासल्या नसल्याने त्यांची एकूण संख्या निश्चित माहीत नाही एकूण पाच कुले (आर्. क्रॉसेल यांच्या मते नऊ कुले) ओळखली जातात. यांमधील ऱ्हायनिया, हॉर्निआ, सायलोफायटॉन, ॲस्टेरोझायलॉन, झोस्टेरोफायलम, स्यूडोस्पोरक्नस इ. प्रजातींबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे.
सायलोफायटेलीझ गणातील जाती लहान व ओषधीय असून त्यांना भूमिस्थित (जमिनीतील) खोड होते परंतु त्यांवर मुळे नसून त्यांऐवजी साधी केसासारखी व शाखित उपांगे (मूलकल्प) शेवाळीतील प्रमाणे होती. यांशिवाय खोडापासून निघून हवेत वाढणाऱ्या (वायवी) फांद्या आणि त्यांवर कधी बारीक काटे किंवा काटेरी टोकांची साधी शिरा नसलेली लहान पाने व ⇨ त्वग्रंध्रे होती. काही वनस्पतींत जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या काही फांद्या बारीक, पर्णहीन व द्विशाखाक्रमी असून त्यांचे कार्य मुळांप्रमाणे असावे त्यांना ‘मूलदंड’ म्हणतात [⟶ सिलाजिनेलेलीझ]. खोड व फांद्या कमी-जास्त प्रमाणात द्विशाखाक्रमी असून वायवी फांद्यांच्या टोकांस १-२ बीजुककोश (बीजुके निर्मिणारे घटक) व त्यांत सारख्याच प्रकारची बीजुके (सूक्ष्म प्रजोत्पादक कोशिका) असत क्वचित फांद्यांच्या टोकांजवळ अनेक बीजुककोश विखुरलेले असत. गंतुकधारी पिढीबद्दल (लैंगिक प्रजोत्पादक अवयव निर्मिणाऱ्या अवस्थेबद्दल)निश्चित माहिती उपलब्ध नाही, तथापि पिढ्यांचे एकांतरण झाले असावे [⟶ एकांतरण, पिढ्यांचे]. खोडात आदिरंभ ⇨ रंभ असून ⇨ भेंडाच्या जागी प्रकाष्ठ व त्याभोवती ⇨ परिकाष्ठ असते. मराठी विश्वकोशात ‘पुरावनस्पतिविज्ञान’ या नोंदीमध्ये सायलोफायटॉन, ऱ्हायनिया, ॲस्टेरोझायलॉन आणि हॉर्निआ या प्रजातींतील वनस्पतींच्या आकृत्या दाखविल्या असून त्यांचे वर्णन दिलेले आहे.
कार्बॉर्निफेरस कल्पापर्यंत शेवाळींचे जीवाश्म आढळत नाहीत. त्यावरून सायलोफायटेलीझ व इतर वाहिनीवंत वनस्पती ⇨ शेवाळीपासून अवतरल्या नसून त्यांचे पूर्वज ⇨ शैवलांपैकी असावेत, असे मानतात. शैवले व सायलोफायटेलीझ यांमध्ये साम्य असून त्यांची संरचना शैवले व उच्च दर्जाच्या वाहिनीवंत वनस्पती यांना मध्यवर्ती असल्याचे मानतात.
पहा : पुरावनस्पतिविज्ञान वनस्पति, वाहिनीवंत अबीजीविभाग सायलोटेलीझ.
संदर्भ : 1. Arnold, C. A. An Introduction to Palaeobotany, New York, 1947.
2. Eames, A. J. Morphology of Vascular Plants, ower Groups, New York, 1936.
3. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. II, New York, 1955.
परांडेकर, शं. आ.