सायक्लोस्टोम : (गोलमुखी). अग्नॅथा वर्गातील सायक्लोस्टोमॅटा गणातील आदिम पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी. हे सर्वांत साधे, जबडा नसलेले, डोक्यावर एकच मध्य नासाद्वार असलेले आणि कॅल्शियम कार्बोनेट संयुगांनी बनलेला कूर्चायुक्त सांगाडा असलेले प्राणी असतात. यांचा उदय डेव्होनियन कल्पात (४२–३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात ) झाला असावा. तोंडाचा आकार वाटीसारखा असल्याने यांचे नाव ‘सायक्लोस्टोम’ पडले.

 

सायक्लोस्टोमांचे शरीर लांबट व दोन्ही टोकांस निमुळते होत गेलेले असते. डोके व धड गोलाकार असून शेपटी दोन्ही बाजूंनी चपटी झालेली असते. त्वचेत श्लेष्मल ( बुळबुळीत द्रव्य स्रवणाऱ्या ) ग्रंथी असल्यामुळे ती मऊ, बुळबुळीत व खवलेरहित असते. पर जोडीने नसतात. मध्यपर असून त्यामध्ये आधारासाठी अस्थीचे भाग असतात. धड व शेपटीतील स्नायूंची रचना इंग्रजी झेड (Z) अक्षराच्या आकाराप्रमाणे असते. अस्थिसंस्था कूर्चांपासून बनलेली असते. मणके (कशेरुक) हे अर्धकमानीसारखे असून ते पृष्ठरज्जूवर असतात.

 

पचन तंत्राच्या दृष्टीने पाहता सायक्लोस्टोमांचे तोंड वाटीसारखे असून ते चूषकाचे कार्य करते. मुखात शृंगाकार दात व जाड, खरबरीत जीभ असते. ते इतर माशांचे मांस खातात किंवा त्यांच्या शरीराला भोक पाडून स्वतःचे पोट भरेपर्यंत रक्त शोषून घेतात. यांची अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या परजीवी जीवनातून निर्माण झालेली आहेत. या प्राण्याची गसिका आतड्यात उघडते. यांना जठर नसते परंतु शोषण करणारा पृष्ठभाग वाढावा म्हणून आतड्याच्या आतील बाजूस आंत्रवलन पडदा असतो. आतडे, मूत्रमार्ग व प्रजोत्पादक परिवाह यांतून येणाऱ्या उत्सर्गासाठी अवस्कर हे कोटर (कोठी) नसते.

 

सायक्लोस्टोमांचे श्वसन क्लोमांमार्फत होते. क्लोमांच्या ५ ते ६ जोड्या गसनीच्या (घशाच्या) बाजूला कोष्ठासारख्या पिशवीत असतात. क्लोम-दरणाच्या १ ते १६ जोड्या असतात. रक्ताभिसरण तंत्रातील मुख्य घटक म्हणजे हृदय, रोहिण्या व नीला होत. हृदय दोन कप्प्यांचे बनलेले असते. त्यामध्ये अलिंद व निलय असे कप्पे असतात. शरीरातील रक्त नीलांमार्फत हृद्कोटरात येते. क्लोमांच्या भागात रोहिण्या असतात. उत्सर्जनाचे मुख्य इंद्रिय वृक्क (मूत्रपिंड) हे होय. ते लांबट आकाराचे व तांबूस किंवा किरमिजी रंगाचे असते.

 

या प्राण्यांत ⇨पोष ग्रंथी, ⇨अवटु ग्रंथी, ⇨अधिवृक्क ग्रंथी, अग्निपिंड व जननग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असतात. या ग्रंथींच्या कार्याचे सुसूत्रीकरण मेंदूकडून केले जाते. मेंदू व मेरुरज्जू या दोहोंचे मिळून तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था ) बनते. मेंदूत गंधखंड, प्रमस्तिष्क (मोठा मेंदू) व निमस्तिष्क (लहान मेंदू) असे भाग असतात. मेंदूपासून व मेरुरज्जूपासून निघणाऱ्या तंत्रिका यांचे मिळून परिसरीय तंत्रिका तंत्र बनते [⟶ तंत्रिका तंत्र ]. यांच्या संवेदनांगांमध्ये एक घाणेंद्रिय असून ते बाहेरील बाजूस नासाद्वार म्हणून उघडते. याद्वारे सभोवतालच्या पाण्याची परीक्षा केली जाते. डोळे कार्यरत किंवा अवशेष रुपात असतात. श्रवणेंद्रिये मस्तकाच्या उजव्या व डाव्या बाजूंस असतात. यांतील नर व मादी वेगवेगळे (एकलिंगी)असतात किंवा काहींत जनन तंत्राचे अवयव एकाच प्राण्यात असतात. जननग्रंथी मोठ्या, नलिकाविरहित व एकच असतात. फलन शरीराबाहेर होते.[⟶ लँप्री हॅगफिश].

 

काही प्राणिशास्त्रज्ञांच्या मते सायक्लोस्टोमॅटा हे निर्वंश होत जाणारे मासे असून ते मत्स्य वर्गापेक्षा वेगळे आहेत. अग्नॅथा या वर्गामध्ये निर्वंश झालेले ऑस्ट्रॅकोडर्म व जिवंत सायक्लोस्टोमॅटा या गणांचा समावेश केलेला आहे. स्टेनसिओ यांच्या मतानुसार सायक्लोस्टोमॅटा हे ऑस्ट्रॅकोडर्मपासून आणि लँप्री हे सेफॅलस्पिडपासून, तर हॅगफिश हे पेट्रास्पिडपासून निर्माण झाले असावेत. प्राणिशास्त्रज्ञ जर्विक यांच्या मतानुसार सायक्लोस्टो व ग्नॅथोस्टोम हे जवळचे गट आहेत. ग्नॅथोस्टोमांमध्ये आढळणाऱ्या काही वैशिष्ट्यांवरून ते सायक्लोस्टोमाच्या अगोदर निर्माण झाले असावेत. वरील मतांनुसार सायक्लोस्टोमांचे स्थान आजही वादग्रस्त असल्याचे स्पष्ट होते.

 

पहा: कॉर्डेटा मत्स्यवर्ग.

 

संदर्भ: 1. Bhamrah, H. S. Text Book of Chordates, New Delhi, 2000.

2. Chandy, M. Fishes, New Delhi, 1994.

 

पाटील, चंद्रकांत प.