सामोअन : सामोआ या स्वतंत्र बेट-समूहातील तसेच पूर्व सामोआतील एक प्रमुख आदिम जमात. त्यांची लोकसंख्या १,१६,२४८ होती (१९९१). त्यांची वस्ती मुख्यत्वे साव्हाई ई, तूतविला आणि ऊपोलू या बेटांवर आढळते. हे लोक उंचपुरे, तांबूस तपकिरी वर्णाचे, दणकट असून काळे कुरळे केस, रुंद चेहरा, टोकदार नाक ही त्यांची काही शारीरिक वैशिष्टये होत. ते मूलतः कॉकेशियन वंशाचे असून पश्चिमेकडील बेटांतील सामोअनांमध्ये पॉलिनीशियन छटा आढळतात. हे मलायो–पॉलिनीशियन भाषा-कुटुंबातील सामोअन बोली भाषा वापरतात. ख्रिस्ती मिशनरी एकोणिसाव्या शतकात या बेटांवर आल्यानंतर त्यांनी रोमन लिपीत यांच्या मौखिक कथा-कहाण्यांना लिखित स्वरूप दिले. हे मुख्यत्वे दर्यावर्दी असून मच्छीमारी व शेती हे त्यांचे प्रमुख व्यवसाय होत. प्रारंभीचे सामोअन हे निष्णात दर्यावर्दी होते आणि ते उत्तम होड्या-नावा बनवीत असत. टॅपिओका, रताळी, सुरण, केळी, आर्वी व नारळ ही त्यांची काही कृषिउत्पादने होत. ‘कवा’ ही त्यांची आवडती दारु मिरीच्या झाडापासून बनवीत. त्यांना अनेक वर्षे धातूचा उपयोग माहीत नव्हता. त्यामुळे ते भांडी व अवजारे लाकूड, दगड आणि नारळाची करवंटी यांपासून बनवीत. नारळाला त्यांच्या जीवनात विशेष महत्त्व होते. ते चटया, काथ्या बनवीत व तेल काढीत. त्यांच्या मच्छीमारीत गरी हे अर्धवर्तुळाकृती साधन विशेषत्वाने वापरले जाई.

सामोअनांची संयुक्त कुटुंबे असून त्यांच्या प्रमुखास मताई म्हणत. तो कुटुंबाच्या सर्वतोपरी कल्याणाला जबाबदार धरला जाई. पितृसत्ताक कुटुंबपद्घतीमुळे वारसाहक्क मोठ्या मुलाकडे जाई. पहिल्या शाखेतील पिढीला विशेष महत्त्व असून जमातीचे प्रमुख यांतून निवडले जात. त्यांची ‘माना’ शक्ती म्हणजे दैवी सामर्थ्य असते, अशी जमातीत सर्वसाधारण समजूत असे. होड्या बनविणे, गोंदकाम करणे, धार्मिक विधी करणे, सामाजिक रुढी इत्यादींचे प्रशिक्षण संघटित संस्थेमार्फत देण्यात येई. माना आणि तापू या संकल्पनांना सामोअनांच्या चालीरीतीत-जीवनात विशेष स्थान असे. जमातीचा प्रमुख व ज्येष्ठ मुलगा यांत अतिदैवी शक्ती असते, अशी त्यांची धारणा होती. वयात आलेल्या मुलामुलींचे विवाह होत. कुमारींना लैंगिक स्वातंत्र्य होते. स्त्री-पुरुषांत गोंदण्याची विशेष हौस आढळते.

सामोअनांची घरे लहान असून त्यांना ‘फाले’ म्हणत. ती लाकडाचा अधिकतर उपयोग करून बांधलेली असत. त्यांचा आकार अंडाकृती असून क्वचित ओसरी ठेवीत. त्यांच्या काही कलाकृती आता नष्ट झाल्या आहेत. विसाव्या शतकात बहुतेक सामोअनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल झाला असला, तरी मूळ जडप्राणवाद समूळ नष्ट झाला असे म्हणता येत नाही. त्यांच्या शिक्षणासाठी न्यूझीलंड व अमेरिकेने प्रागतिक योजना आखल्या असून शाळा, कृषी महाविद्यालये सुरु केली आहेत तसेच अनेक चर्च धर्मप्रसारासाठी बांधण्यात आली आहेत.

देशपांडे, सु. र.