सामाजिक लोकशाही : (सोशल डेमॉक्रसी). एक राजकीय प्रणाली. ती प्रस्थापित राजकीय प्रक्रियांचा उपयोग करून समाजाचे भांडवलशाहीकडून समाजवादाकडे कमविकासी व शांततामय मार्गांनी संकमणाचा (स्थित्यंतराचा) पुरस्कार करते. ही संकल्पना ⇨कार्ल मार्क्स आणि ⇨फीड्रि एंगेल्स यांनी प्रतिपादिलेल्या सिद्घान्तावर आधारित आहे. तीत मार्क्सवादातील सर्वसामान्य पायाभूत कल्पनांचा काही भाग आहे तथापि संघर्षवाद व सर्वंकषवाद यांपासून ती पूर्णतः अलिप्त आहे. तसेच कामगार कांती तिला मान्य नाही.

सामाजिक लोकशाहीवादी चळवळ ही ऑगस्ट बेबल (१८४०– १९१३) या विचारवंताच्या प्रयत्नातून उद्‌भवली. त्याने विल्यम लिप्वनेख्ट (१८२६–१९००) या राजनीतिज्ञासमवेत जर्मन सोशल डेमॉकटिक लेबर (वर्कर्स) पार्टीची स्थापना केली आणि ती जनरल जर्मन वर्कर्स युनियन या पक्षात पुढे विलीन करून (१८७५) तिचे नामांतर सोशल डेमॉक्रटिक पार्टी ऑफ जर्मनी करण्यात आले. या पक्षाने जर्मनीतील संसदेत (राइक्स्टॅग) सर्वांत जास्त जागा जिंकल्या. परिणामतः यूरोप खंडातील देशांतून सामाजिक लोकशाही तत्त्वज्ञान प्रसृत झाले. बेबलची अशी धारणा होती की, सामाजिक लोकशाहीला अभिप्रेत असणारा समाजवाद हा सक्तीने न करता सनदशीर व विधिपूर्वक मार्गांनी प्रस्थापित व्हावा. सामाजिक लोकशाही या तत्त्वप्रणालीच्या प्रसार–प्रचारात जर्मन राजनीतिज्ञ व विचारवंत एदूआर्ट बेर्नश्टाईन (१८५०–१९३२) याचे योग दान मोठे आहे. तो मुळात मार्क्सवादी होता तथापि मार्क्सवादातील उणिवा त्याच्या लक्षात आल्याने त्याने मार्क्सवादात सुधारणा करून ही नवीन विचारसरणी प्रसृत केली. याचे सविस्तर विवेचन त्याच्या ईव्हलूशनरी सोशॅलिझम ( इं. भा.) या ग्रंथात आढळते. या ग्रंथात बेर्नश्टाईनने मार्क्सवादी तत्त्वज्ञानाला आव्हान दिले आहे. मार्क्सच्या ‘भांडवलशाही अखेरची घटिका मोजत आहे’, या मताचे खंडन करताना बेर्नश्टाईन म्हणतो की, “उद्योगधंद्यांची मालकी अत्यल्प भांडवलदारांकडून अधिकाधिक लोकांच्या हाती जात आहे आणि कामगारांचा सामाजिक दर्जाही सुधारत असून सार्वत्रिक मताधिकारामुळे ते आपले प्रतिनिधी निवडून देऊ शकतात जे कामगारांची बाजू समर्थपणे मांडू शकतील”. तात्पर्य बेर्नश्टाईन भांडवलशाहीचे उच्चटन या तत्त्वाशी सहमत नाही. त्याच्या मते वर्गसंघर्ष आणि वर्गविषमता या बाबी सामाजिक एकात्मतेला व प्रगतीला बाधक असून त्या नष्ट केल्या पाहिजेत. त्याकरिता सनदशीर मार्गाने सुधारणा करणे आणि आर्थिक पुनर्वितरणाचे कार्यक्रम राबविणे, हा उपाय तो सुचवितो. डावीकडे झुकलेली ही मध्यममार्गी विचारप्रणाली आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून भांडवलशाही व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे, हा तिचा मूळ उद्देश आहे. भांडवलशाही व्यवस्थेत सुधारणा केल्यास सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो, अशी या विचारप्रणालीची धारणा आहे. कल्याणकारी राज्य आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे, हा कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्याचा मुख्य उपाय असल्याचे व त्या आधारे भांडवलशाही व्यवस्थेत सुधारणा करण्याचे सामाजिक लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांचे धोरण आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ही एक उत्क्रां तवादी सुधारणा समाजवादाची चळवळ म्हणून उदय पावली. विसाव्या शतकात या चळवळीने मार्क्सवादाला स्पष्ट विरोध नोंदवून कांतिकारी समाजवाद आणि वर्गसंघर्ष हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे शाश्वत मार्ग नसल्याचे स्पष्ट केले आणि सामाजिक सुधारणा हाच योग्य मार्ग ठरविला. त्या आधारे यूरोपातील लोकशाही समाजवादी राजकीय पक्षांची ध्येयधोरणे कृतिकार्यक्र माद्वारे निर्धारित केली. सामाजिक लोकशाही आणि लोकशाही समाजवाद यांमध्ये यूरोपातील सामाजिक लोकशाहीवादी पक्षांनी फारसा फरक केला नव्हता. फक्त बोल्शेव्हिक साम्यवाद आणि स्टालिनवाद यांना विरोध करून भांडवलशाहीचे समाजऐवादी अर्थव्यवस्थेत सनदशीरपणे क्र माकक्रमाने रुपांतर करणे, हे सामाजिक लोकशाहीचे मध्यवर्ती सूत्र प्रतिपादिले. फ्रँक फुर्ट येथे भरलेल्या ‘सोशॅलिस्ट इंटरनॅशनल ‘च्या अधिवेशनात (१९५१) हे सूत्र निर्धारित करण्यात आले. ‘सोशॅलिस्ट इंटरनॅशनल’ ही सामाजिक लोकशाहीवादी पक्षांची संघटना असून तिच्या माध्यमातून या पक्षाची ध्येयधोरणे व कृतिकार्यक्र म निर्धारित केले जातात आणि मूलभूत हक्क आणि नागरी स्वातंत्र्य यांना विशेष प्राधान्य दिले जाते.

रशियन क्रां ती (१९१७) झाल्यानंतर सामाजिक लोकशाहीची चळवळ व तिचे तत्त्वज्ञान अधिक विशिष्टवादी झाले आणि काळाच्या ओघात तिचे स्वरूप मध्यममार्गी झाले. राजकीय सत्ता हे परिवर्तनाचे साधन असले, तरी तिचा दुरूपयोग होऊ नये त्याचप्रमाणे समता आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेची व्याप्ती केवळ आर्थिक क्षेत्रापुरतीच मर्यादित न ठेवता सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील समतेचाही त्यात अंतर्भाव असावा याशिवाय समान संधी व सामाजिक एकसंधता याही बाबींची पूर्तता व्हावी, असे निर्धारित करण्यात आले. ‘लाल गुलाब’ हे या चळवळीचे प्रतीक ठरविण्यात आले.

दुसऱ्या महायुद्घानंतर सामाजिक लोकशाहीवादी पक्ष यूरोपमधील काही देशांतून–विशेषतः पश्चिम जर्मनी, स्वीडन आणि ग्रे ट ब्रिटन (लेबर पार्टी ) यांतून–सत्तारुढ झाले आणि त्यांनी आधुनिक समाजकल्याण कृतिकार्यक्र मांचा पाया घातला. या पक्षांनी आपली पारंपरिक उद्दिष्टे आणि कार्यक्र मांत परिस्थित्यनुसार बदल केले असून मानवी हक्क आणि पर्यावरणाचे प्रश्न, जागतिक शांतता इत्यादींचा त्यांनी पुरस्कार केला आहे. पारंपरिक लाल आणि आधुनिक पर्यावरणवादी हिरवा रंग यांचा समन्वय साधला असून ‘लाल–हिरवा संमिश्रण’ निर्माण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.

सांप्रत सामाजिक लोकशाहीवादी चळवळीचे स्वरूप पारंपरिक अन्य चळवळींपेक्षा बऱ्याच अंशी प्रागतिक आहे. तिने राष्ट्रीयीकरण, सार्वजनिक न्याय, अनुदाने, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय आरोग्य, पर्यावरण संवर्धन, वित्तीय नियमन इत्यादींचा स्वीकार केला आहे. शिवाय काही प्रमाणात खाजगीकरण व उदारीकरण यांना प्रोत्साहन देऊन उपभोगवादाला, सामाजिक उद्दिष्टांना तो मारक ठरणार नाही, एवढी मोकळीक तिने दिली आहे.

पहा : मार्क्सवाद लोकशाही लोकशाही समाजवाद संसदीय लोकशाही.

देशपांडे, सु. र.