सामग्रीविज्ञान : विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रविद्या या क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे म्हणजे द्रव्यांचे स्वरुप, वर्तन आणि उपयोग यांच्या अभ्यासाला सामग्रीविज्ञान म्हणतात. यातूनच सामग्री अभियांत्रिकी ही विज्ञानशाखा पुढे आली. नियोजित किंवा ठरविलेल्या उपयोगांसाठी द्रव्यांवर प्रक्रिया करतात, त्यांच्या चाचण्या घेतात आणि नंतर त्यांची निवड करतात. या अभ्यासाला सामग्री अभियांत्रिकी म्हणतात. या दोन्ही परस्परपूरक असल्याने त्यांचा विचार एकत्रितच करतात. या दोन्ही संकल्पना १९६०–७० या दशकात पुढे आल्या. कारण अभियांत्रिकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांचे उपयोग करताना वाढत्या प्रमाणात वैज्ञानिक तत्त्वांचा आधार घेण्यात येऊ लागला. त्या आधी म्हणजे मुख्यतः दुसऱ्या महायुद्घाच्या आधी पूर्व अनुभवांच्या आधारे निरनिराळ्या द्रव्यांचा उपयोग होत असे. द्रव्यांचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये ही त्यांच्या आणवीय व सूक्ष्ममानीय संरचनेवर कशी आधारलेली असतात, हे समजून घेण्यावर सामग्रीविज्ञानाचे अध्ययन एकवटलेले असते. या सूक्ष्ममानीय संरचनेला सूक्ष्मसंरचना म्हणतात. अशा प्रकारे भौतिकीय रसायनशास्त्र व बहुवारिक रसायनशास्त्र या विज्ञान क्षेत्रांतून सामग्रीविज्ञानाची वाढ होत गेली तर धातुविज्ञान, प्लॅस्टिक अभियांत्रिकी व मृदीय द्रव्य अभियांत्रिकी या अभियांत्रिकी क्षेत्रांतून सामग्री अभियांत्रिकीची वाढ होत गेली.
सामग्रीचे प्रकार : अभियांत्रिकीय कामांच्या बाबतीत सामग्रीचे धातू, बहुवारिके आणि मृत्तिका द्रव्ये व काचा हेच मर्यादित मुख्य प्रकार आहेत. या द्रव्यांचे गुणधर्म त्यांच्यातील अणूंच्या संरचनात्मक मांडणीवर अवलंबू न असतात. पर्यायाने अणूंमधील रासायनिक बंधांच्या प्रकारानुसार द्रव्यांचे गुणधर्म ठरतात. याचा अर्थ धातूंचे गुणधर्म त्यांतील आणवीय बंधानुसार, बहुवारिकांचे सहसंयुजी बंधानुसार तर मृत्तिका द्रव्यांचे आयनी ( विद्युत् भारित अणू , रेणू वा अणुगट यांनी बनलेल्या ) बंधानुसार ठरतात. [⟶ पुंज रसायनशास्त्र रासायनिक संरचना]
धातू : इलेक्ट्रॉन रचनेनुसार सर्व मूलद्रव्यांची कोष्टकरुप मांडणी केली असून तिला ‘आवर्त सारणी’ म्हणतात. आवर्त सारणीतील बहुतेक मूलद्रव्ये आणवीय बंधन दर्शवितात, म्हणजे या मूलद्रव्यांचे स्वरुप धातूसारखे आहे. मिश्रधातू एकाहून अधिक मूलद्रव्यांची बनलेली धातू असते. तांबे, लोखंड आणि पितळ (तांबे व जस्त), कासे (तांबे व कथिल) व पोलाद (लोखंड व कार्बन) ही धातू व मिश्रधातू यांची सामान्य उदाहरणे आहेत. धातवीय बंधाचा संबंध इलेक्ट्रॉनांच्या चल ‘वायू’शी असतो. यामुळे धातूमध्ये विद्युतीय व ऊष्मीय संवाहकता आणि प्रकाशकीय परावर्तनक्षमता हे धातूचे गुणधर्म निर्माण होतात. धातूंमधील अणुंच्या स्फटिकी (म्हणजे नियमित व पुनरावृत्त) मांडणीमुळे त्यांचे वर्तन निश्चित होते. त्यांचे हे वर्तन सर्वसाधारण संरचनांमध्ये त्यांचा उपयोग करताना आकर्षक ठरते. पुष्कळ मिश्रधातू चांगले प्रबल असून त्यांना व्यवहारोपयोगी आकार देता येतो.
लोखंडाच्या मिश्रधातू या अभियांत्रिकी उपयोगांत वापरल्या जाणाऱ्या प्रमुख मिश्रधातू आहेत. त्यांच्यामध्ये कार्बनयुक्त पोलाद, मिश्र पोलाद व ब्रिडाचे प्रकार येतात. अर्थात अभियांत्रिकीमधील बहुतेक धातवीय उपयोगांत लोखंडाच्या मिश्रधातू असतात. यांशिवाय इतर मिश्रधातूंचाही व्यापक उपयोग होतो. ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, टिटॅनियम, तांबे इत्यादींच्या मिश्रधातूंचाही अभियांत्रिकीय उपयोग केला जातो. तसेच जस्त, शिसे (कथिलाबरोबर डाखकामाची मिश्रधातू), टंगस्टनासारखे उच्च्तापसह धातू , सोने, चांदी व प्लॅटिनम यांच्याशी निगडित असलेल्या मिश्रधातूंचाही असा उपयोग होत असतो. [⟶ लोखंड पोलाद].
बहुतेक व्यापारी मिश्रधातूंचे स्वरुप स्फटिकी असते. तथापि जलद संस्करण तंत्रांमुळे अस्फटिकी किंवा चूर्णरुप धातू तयार होऊ शकतात, परिणामी त्यांच्यात आवर्ती स्फटिकी संरचना राहत नाही. यामुळे उच्च बल, उच्च विरुपणक्षमता व सर्वोत्कृष्ट प्रकारचा संक्षारणरोधी (रासायनिक झिजेच्या विरोधी) गुणधर्म हे लक्षणीय गुणधर्म चूर्णरुप धातूंमध्ये येतात. विमान किंवा अवकाशयान तयार करताना कमी वजन, कमी आकारमान परंतु उच्च बल असलेली द्रव्ये निवडतात. या द्रव्यांत मिश्रधातूही येतात. अशी सर्वांत योग्य द्रव्ये सामग्रीवैज्ञानिक ठरवितात. तसेच या सामग्रीचा या वाहनांत योग्य रीतीने वापर होत असल्याची खातरजमा सामग्री अभियंते करतात. त्यासाठी हे अभियंते संरचनात्मक दृष्ट्या लवचिक असलेल्या घटक द्रव्यांचे वायुगतिकीय भारांमुळे होणारे विरुपण व येणारी श्रांती (शीण) यांचे परीक्षण करतात. [⟶ धातु–१ मिश्रधातु].
बहुवारिके : ही अगदी थोडयच मूलद्रव्यांची बनलेली असतात. बहुवारिकांमध्ये बहुधा कार्बन व हायड्रोजन, शक्य तर ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्ल्युओरीन व सिलिका आणि थोडी इतर अधातवीय मूलद्रव्ये असतात. या मूलद्रव्यांमध्ये सहसंयुजी बंध असतात. कार्बन-कार्बन बंधयुक्त शृंखला (म्हणजे कार्बन कणा) असणारी बहुवारिके ही सर्वांत सामान्य बहुवारिके आहेत. पॉलिएथिलीन (C2H4)nहे सर्वाधिक सामान्य बहुवारिक आहे. या सूत्रातील n म्हणजे बहुवारिकीकरणाची मात्रा असून n या संख्येचे मूल्य सु. १,००० असून एवढी एकवारिके यात सहसंयुजी बंधाने जोडलेली असतात. इतर बहुवारिकांत ऑक्सिजन (उदा., ॲकिलिके ), नायट्रोजन (उदा., नायलॉन ), फ्ल्युओरीन ( उदा., फ्ल्युओरोपॉलिमर) आणि सिलिकॉन (उदा., सिलिकोने) ही मूलद्रव्ये असू शकतात.
बहुवारिके सर्वसाधारणपणे चांगले विद्युत् निरोधक असतात. कारण शेजारच्या अणुंमधील दिशादर्शी सहसंयुजी बंधांमुळे बहुधा विद्युत् संवाहनासाठी लागणारे ‘मुक्त’ इलेक्ट्रॉन उपलब्ध होत नाहीत. विद्युत् तारांवरील बहुवारिकी निरोधक द्रव्य हे याचे रोजच्या व्यवहारातील उदाहरण आहे. बहुवारिके प्रकाशकीय दृष्ट्या पारदर्शक असू शकतात. उदा., प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्या. पुष्कळ बहुवारिकांना हवा तो आकार देता येतो, या त्यांच्या आकार्यतेच्या गुणधर्मांवरुन प्लॅस्टिक हे नाव आले आहे.
बहुवारिके उच्च रेणुभार असलेल्या रेणूंची [उदा ., (C2H4) n मध्ये n चे मूल्य १०० पेक्षा जास्त] बनलेली असतात. या रेणूंच्या दरम्यान दुर्बल द्वितीयक अबंधक आंतरक्रि या होतात. यामुळे धातूंच्या तुलनेत बहुवारिके कमी बळकट असतात. तथापि पुष्कळ बहुवारिके अभियांत्रिकीय कौशल्य वापरुन पुरेशी बळकट व दृढ अशी बनविता येतात. शिवाय कमी घनता हे त्यांचे वैशिष्ट्य असते. या दोन गुणधर्मांऐमुळे अशी बहुवारिके ही परंपरागत संरचनात्मक धातूंना पर्यायी द्रव्ये म्हणून अधिकाधिक लोकप्रिय झाली आहेत. समकालीन स्वयंचलित वाहनांचे अभिकल्प पाहता धातूंना पर्यायी अशा बहुवारिकांची अनेक उदाहरणे देता येतील. [⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके].
मृत्तिका द्रव्ये व काचा : मृत्तिका द्रव्ये म्हणजे अधातवीय व अकार्बनी द्रव्ये होत. किमान एक धातवीय व किमान एक अधातवीय मूलद्रव्य यांचा रासायनिक संयोग म्हणजे मृत्तिका द्रव्य होय. यांतील अधातवीय मूलद्रव्यांमध्ये खास करुन ऑक्सिजन असून कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस व गंधक ही मूलद्रव्ये असू शकतात. ॲल्युमिनियम ऑक्साइड (A12O3) हे मृत्तिका द्रव्याचे सामान्य उदाहरण असून यात ॲल्युमिनियम या धातवीय व ऑक्सिजन या अधातवीय मूलद्रव्यांचा रासायनिक संयोग झाला आहे. वस्तुतः असे रासायनिक संयोग ही निसर्गातील मूलभूत प्रवृत्ती आहे. तीनुसार पर्यावरणातील अधातवीय मूलद्रव्यांचा धातवीय मूलद्रव्यांशी रासायनिक संयोग होत असतो. संरचनात्मक बांधणीसाठी ॲल्युमिनियम धातू टिकाऊ आहे. कारण त्याचे ॲनोडायझेशन होऊ शकते. म्हणजे त्याच्या पृष्ठभागावर पर्यावरणीय विक्रियेत ॲल्युमिनियम ऑक्साइडाचा पातळ थर तयार होतो. पर्यायाने या थरामुळे ॲल्युमिनियमाचे आणखी पर्यावरणीय ऱ्हास होण्यापासून संरक्षण होते.
धातवीय व अधातवीय अणुंमधील आयनी बंध बळकट असतो. ॲल्युमिनियम ऑक्साइडात ॲल्युमिनियम हा ऋणायन (A13+ ) व ऑक्सिजन हा धनायन ( O2- ) असतो. विरोधी विद्युत् भार असलेल्या या दोन आयनांमधील आकर्षण तीव्र असल्याने त्यांच्यातील आयनी बंध बळकट असतो. आयनी बंधाशी ऊष्मीय स्थैर्य निगडित असते. या ऊष्मीय स्थैर्यामुळे मृत्तिका द्रव्ये उच्च् तापमानविरोधी म्हणजे उच्च्तापसह असतात. ॲल्युमिनियमाचा वितळबिंदू ६६०० से. आहे, तर ॲल्युमिनियम ऑक्साइडाचा वितळबिंदू २,०२०० से. इतका जास्त आहे. या उष्णतारोधक गुणधर्मामुळे भट्ट्या व बाष्पित्रे यांसारख्या उच्च्तापसह साधनांत मृत्तिका द्रव्ये वापरतात. [⟶ उच्च्तापसह पदार्थ].
मृत्तिका द्रव्यांचे स्वरुप सर्वसाधारणपणे स्फटिकी असते. धातू व मिश्रधातूंशी तुलना करता मृत्तिका द्रव्ये संरचनेच्या दृष्टीने अधिक जटिल असल्यामुळे त्यांचे यांत्रिकीय वर्तन ठिसूळ असे केले जाते. परिणामी अनेक संरचनात्मक आकृतिबंधांमध्ये मृत्तिका द्रव्ये वापरताना त्यांच्यावर मर्यादा पडतात.
चूर्णरुप धातूंचे रुपण (घडविण्याची क्रिया) करणे अवघड असते. मात्र काचेसारख्या चूर्णरुप वा अस्फटिकी मृत्तिका द्रव्याचे रुपण सापेक्षतः सोपे असते. कारण वितळलेल्या ऑक्साइडांच्या स्फटिकीभवनाची प्रक्रिया बरीच मंद असते. याचे सर्वांत सामान्य उदाहरण म्हणजे सिलिकेपासून (सिलिकॉन डाय-ऑक्साइड या खनिजापासून ) बनविण्यात येणाऱ्या काचा हे होय. अनेक सिलिकेट द्रव्ये वितळविल्यावर दृढ अवस्था येईपर्यंत थंड होऊ शकतात, मात्र असे झाले तरी त्या रसाची यद्दच्छ आणवीय संरचना टिकून राहिलेली असते. खिडक्यांची तावदाने व काचेची पात्रे अशा प्रकारे तयार होतात. वजनाला अनुसरुन असलेले त्यांतील घटक मूलद्रव्यांचे नमुनेदार प्रमाण असे असते : सिलिका (SiO2) सु. ७५ टक्के, सोडियम ऑक्साइड (Na2O) सु. १५ टक्के व कॅल्शियम ऑक्साइड (CaO) सु. १० टक्के.
मृत्तिका द्रव्ये व काचा यांच्या प्रक्रियणात हवेचे सूक्ष्म बुडबुडे निर्माण होऊन सच्छिद्रता येणे हा सामाईक विषय आहे. हे बुडबुडे म्हणजे प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरण्याची क्रिया) करणारी केंद्रे ठरतात आणि ३ टक्के सच्छिद्रतेमुळे पारदर्शक द्रव्याचे पूर्णतया अपारदर्शक द्रव्यात परिवर्तन होऊ शकते. सच्छिद्रतेमुळे अनेक मृत्तिका द्रव्ये खडूसारखी दिसतात, तसेच संरचनात्मक भाराखाली असलेले द्रव्य दुर्बलही होते. [⟶ काच मृत्तिका मृत्तिका उद्योग].
संमिश्र द्रव्ये : धातू , बहुवारिके व मृत्तिका द्रव्ये ही अणूंमधील बंधांवर आधारलेल्या मूलभूत प्रकारची संरचना द्रव्ये आहेत. अभियंत्यांनी अशी इतर अनेक प्रगत द्रव्ये तयार केली आहेत. वरील तीन द्रव्यांच्या सूक्ष्म पातळीतील संयोगांच्या आधारे ही प्रगत द्रव्ये बनविली आहेत. या प्रगत द्रव्यांच्या गटाला संमिश्र द्रव्ये म्हणतात. तंतुमय काच याचे परिचित उदाहरण आहे. काचेचे हे तंतू (व्यास काही मायक्रोमीटर) बहुवारिक आधारद्रव्यात जडवून एक संमिश्र द्रव्य बनविण्यात आले. अशा संमिश्र द्रव्यात सूक्ष्म काचतंतूंचे उच्च बल व बहुवारिक आधारद्रव्याची नम्यता (लवचिकपणा) या गुणधर्मांचा संयोग झालेला असतो. काचतंतूंशी तुलना करता शुद्घ काच अधिक ठिसूळ, तर शुद्घ एपॉक्सी दुर्बल असते. अधिक सुविकसित संमिश्र द्रव्यांमध्ये विविध बहुवारिकीय आधारद्रव्यांत पॉली (पॅरा-फिनिलप्टेरेथॅलामाइड ) तंतू व ग्रॅफाइट तंतू असतात. एपॉक्सी, पॉलिएस्टर, पॉलिईथरेथर, कीटोन आणि पॉलीफिनिल सल्फाइड ही या संमिश्र द्रव्यांमधील बहुवारिकीय आधारद्रव्ये आहेत.
सर्वच संमिश्र द्रव्ये तंतूंनी प्रबलित केलेली नसतात. एकत्रित संमिश्र द्रव्यांमधील आधारद्रव्यांत कण जडविलेले असतात. काँक्री ट हे असे एकत्रित संमिश्र द्रव्य होय. कारण त्यात सिमेंटमध्ये (कॅल्शियम ॲल्युमिनोसिलिकेटात) खडी व वाळू हे कण जडविलेले असतात. कोबाल्टाच्या आधारद्रव्यात टंगस्टन कार्बाइडाचे कण जडवून बनविलेले संमिश्र द्रव्य कर्तक हत्यारे तयार करण्यासाठी वापरतात. [⟶ संमिश्र द्रव्ये].
अर्धसंवाहक : अनेक संरचनात्मक द्रव्यांची वर्गवारी वर उल्लेखिलेल्या चार प्रकारांत करता येणे शक्य आहे. आणवीय बंधनाऐवजी विद्युतीय संवाहकतेच्या आधारेही द्रव्यांचे वर्गीकरण करता येते. अशा विद्युतीय संवाहकतेवर आधारलेल्या वर्गीकरणामुळे अर्धसंवाहक द्रव्ये हा द्रव्यांचा पाचवा प्रकार उपलब्ध होतो. धातू व मिश्रधातू विजेचे चांगले नमुनेदार संवाहक आहेत तर बहुवारिके, मृत्तिका द्रव्ये व काचा ही नमुनेदार विद्युत् निरोधक द्रव्ये आहेत. संमिश्र द्रव्यांचे विद्युतीय गुणधर्म त्यांच्या घटकद्रव्यांच्या गुणधर्मांच्या सरासरी गुणधर्मांसारखे असतात. बेल लॅबोरेटरीजमध्ये १९४८ मध्ये ⇨ट्रँझिस्टरचा शोध लागला. ट्रँझिस्टर हे सहसंयुजी बंधाने बद्घ झालेले अर्धसंवाहक असतात. त्यांची विद्युत् संवाहकतेची पातळी धातू आणि बहुवारिके व मृत्तिका द्रव्ये यांच्या दरम्यानची असते. आधुनिक तंत्रविद्येत ट्रँझिस्टरांच्या कामाचे वा उपयोगाचे महत्त्व वाढत गेले आहे. सिलिकॉन हे अर्धसंवाहक द्रव्याचे प्रमुख उदाहरण आहे. सिलिकॉन हा आधुनिक घन अवस्था इलेक्ट्रॉननिकीच्या क्षेत्रातील मध्यवर्ती महत्त्वपूर्ण घटक आहे [⟶ इलेक्ट्रॉननिकी घन अवस्था भौतिकी]. ⇨जर्मेनियम रासायनिक दृष्ट्या सिलिकॉनासारखा अर्धसंवाहक असल्यामुळे ⇨इलेक्ट्रॉननीय प्रयुक्त्यांमध्ये त्याचाही वापर व्यापकपणे केला जातो. ⇨आवर्त सारणीत सिलिकॉन व जर्मेनियम या मूलद्रव्यांच्या जवळ असलेल्या मूलद्रव्यांच्या संयुगांमध्येही पुष्कळदा अर्धसंवाहकता हा गुणधर्म आढळतो. उदा., गॅलिक आर्सेनाइड (GaAs) हे उच्च तापमान एकदिशकारक व लेसर द्रव्य आहे. [ अर्धसंवाहक].
सामग्रीविज्ञानातील प्रगतीचे टप्पे : सामग्रीविज्ञान व सामग्री अभियांत्रिकी यांचे क्षेत्र गतिमान व वर्धिष्णू असे आहे. सामग्री वैज्ञानिक नवीन द्रव्ये व प्रकियेची नवी तंत्रे विकसित करीत असतात तर सामग्री अभियंते या नवीन गोष्टींचा उपयोग नवनवीन अभियांत्रिकीय नमुन्यांमध्ये व संरचनांमध्ये सतत करीत असतात. उदा., विद्युत् रोध शून्य असलेली विशिष्ट अतिसंवाहक द्रव्ये सुधारित सेल्युलर टेलिफोनच्या (भ्रमण दूरध्वनीच्या ) तळावरील स्थानकांवर पातळ पटलाचे छानक ( गाळण्या ) म्हणून वापरतात. सूक्ष्मविद्युत्-यांत्रिक प्रणाल्यांमध्ये (मायकोइलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टिम्सMEMS ) सूक्ष्मदर्शकीय मानाच्या वेगबदल (गिअर) प्रणाल्या असतात. या वेगबदल प्रणाल्या ⇨संकलित मंडलांसाठी विकसित केलेल्या तंत्रविद्यांच्या मदतीने घडविण्यात आल्या. शेवटी सूक्ष्मातीत (नॅनो) तंत्रविद्येचा संबंध नॅनोमीटर (१० –९मी.) मानावर विकसित केलेल्या संरचनांशी येतो. म्हणजे सूक्ष्मातीत तंत्रविद्येचा संबंध मायकोमीटर (१०–६मी.) मानाच्या संरचनांशी येत नाही. यातून सूक्ष्मातीत द्रव्ये निष्पन्न होतात. अधिक भरड मानाच्या द्रव्यांच्या तुलनेत सूक्ष्मातीत द्रव्यांच्या यांत्रिक, विद्युतीय, चुंबकीय, ऊष्मीय व प्रकाशकीय गुणधर्मांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. [⟶ अतिसंवाहकता सूक्ष्मातीत तंत्रविद्या].
भारतामध्ये सामग्रीविज्ञान व सामग्री अभियांत्रिकी या क्षेत्रांमधील संशोधन १९६० मध्ये कोडीहळ्ळी (बंगलोर) येथे स्थापन झालेल्या नॅशनल एरॉनॉटिकल रिसर्च लॅबोरेटरी या प्रयोगशाळेत होत असते. येथील सामग्रीविज्ञान विभागात पुढील गोष्टी नजरेसमोर ठेवून मूलभूत स्वरुपाचे व अनुप्रयुक्त ( व्यावहारिक उपयोगांविषयीचे ) संशोधन करतात : वैमानिकी-अवकाश उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त असलेली नवीन व अधिक प्रगत सामग्री आणि संमिश्र द्रव्ये तयार करणे तसेच या सर्व द्रव्यांच्या विश्लेषणाच्या, परीक्षणाच्या व वैशिष्ट्यीकरणाच्या पध्दती विकसित करणे आणि नाविन्यपूर्ण जोडणी तंत्रे तयार करणे. तंतूंनी प्रबलित केलेल्या प्लॅस्टिकांसाठी येथे मार्गदर्शी संयंत्र उभारले आहे. तसेच येथील प्रचालन विभागाने घूर्णी-यंत्रसामग्री व ज्वलन यांसाठी बहुविध सुविधा उभारल्या आहेत. प्रत्यक्ष वापर करणारे उद्योग आणि इतर संशोधन संस्थांच्या सहकार्याने या प्रयोगशाळेत भावी संशोधन व विकास यांविषयीची कामे हाती घेण्यात येतात [⟶ राष्ट्रीय प्रयोगशाळा].
पहा : अर्धसंवाहक काच धातु–१ धातुविज्ञान पदार्थांचे बल प्रतिकृति प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके बांधकामाची सामग्री रेझिने वैमानिकी वैमानिकीय अभियांत्रिकी संमिश्र द्रव्ये सूक्ष्मातीत तंत्रविद्या.
संदर्भ : 1. Ashby, Materials Selection in Mechanical Design, 1999.
2. Callister, W. D. Jr. Materials Science and Engineering : An Introduction, 2003.
3. Shackefford, J. E. Introduction to Materials Science for Engineers, 2005.
4. Smith, W. F. Foundations of Materials Science and Engineering, 2005.
5. White, M. A. Properties of Materials, 1999.
ठाकूर, अ. ना.
“