सामंत, रघुवीर जगन्नाथ : (२४ डिसेंबर १९०९–१७ सप्टेंबर १९८५). मराठी साहित्यिक. शब्दचित्रे, कथा, कादंबरी, बालसाहित्य असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मूळ नाव रघुनाथ जगन्नाथ सामंत. ‘रघुवीर सामंत’ या नावाने, तसेच ‘कुमार रघुवीर’ ह्या टोपण नावाने त्यांनी लेखन केले. सामंतांचे बरेचसे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यांचे वडील लघुवाद न्यायालयाचे (स्मॉल कॉज कोर्ट) न्यायाधीश होते. त्यांच्या ठिकठिकाणी बदल्या होत असल्यामुळे रघुवीर यांचे माध्यमिक शिक्षण ठाणे, डहाणू, नासिक, पुणे, सांगली अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. १९२६ साली ते मॅट्रिक झाले आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला पण शिक्षणात खंड पडल्याने पुढे १९३४ मध्ये ते बी.ए. व नंतर बी.टी. झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या चिकित्सक समूह, शिरोडकर हायस्कूल, शारदाश्रम विद्यामंदिर, मराठा मंदिर वगैरे शाळांतून अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्यांनी उर्वरित जीवन लेखन, वाचन यांत व्यतीत केले. महाविद्यालयीन जीवनातच ते लिहू लागले होते. त्यांचे सुभान्या (१९२९) हे व्यक्तिचित्र त्र्यं. शं. शेजवलकरांच्या प्रगति साप्ताहिकात प्रसिद्घ झाले आणि शेजवलकरांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी घेऊन लेखनकार्यास वाहून घेतले. त्यानंतर हृदय (१९३२) हा त्यांचा शब्दचित्रसंगह प्रसिद्घ झाला. त्यात चौतीस शब्दचित्रे आहेत. शब्दचित्र या साहित्यप्रकाराचा प्रभाव त्यांच्या लेखनात विशेषत्वाने दिसून येतो. वाळूतील पावले (१९३४), ताडा (१९४६) हे त्यांचे काही कथासंग्रह होत. तारांगण ( चित्रबंधसंग्रह, १९४०) मध्ये शब्दचित्र आणि लघुनिबंध यांचा समन्वय त्यांनी साधला आहे, तर मासलेवाईक प्राणी (१९४०) मध्ये काही स्वभावचित्रे त्यांनी रेखाटली आहेत. जीवनगंगा (काहूर, १९४७), आम्ही खेडवळ माणसं (१९४८), आम्हाला जगायचंय (१९५४) आणि उपकारी माणसे (४ खंड १९३६–४४) ह्या त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या. त्यांनी चार खंडांत उपकारी माणसे (प्रवासातील सोबती-१९३६, अभ्र पटल-१९३८, आकाशगंगा-१९४० व घरोघरच्या देवी-१९४४) ही मोठी कादंबरी लिहिली. पहिल्या तीन कादंबऱ्यांत (खंडांत) अरुण ठाकूर या काल्पनिक कलंदर व्यक्तित्त्वाचा अंतर्बाह्य विकास हे प्रमुख सूत्र आहे आणि चौथी काहीशी तीन खंडांशी संबंधित, तरीही वेगळी आहे मात्र मुख्य कथानक व उपकथानके यांचे संबंध स्वतंत्रपणे अभ्यासावेत इतके दमदारपणे त्यात व्यक्त झाले आहेत. त्यांच्या संबंधांत तांत्रिकपणा व यांत्रिकपणा नसून जीवनवैविध्यावर प्रकाश टाकण्याचा उद्देश दिसतो. समीक्षकांच्या मते इतकी प्रदीर्घ आणि इतके सौष्ठव व सौंदर्य लाभलेली ही एक श्रेष्ठ साहित्यकृती होय. त्यांच्या अनुवादित साहित्यात टॉम सॉयरची साहसे (१९५७ मूळ लेखक ⇨मार्क टवे ), मॉबी डिकचा राक्षस (१९६२) ह्यांचा समावेश होतो. मडक्यातला न्याय (१९४३) आणि जलदेवतेचा न्याय (१९४४) ही त्यांनी बालवाचकांसाठी लिहिलेली पुस्तके असून ज्ञानपारिजात (दोन खंड) हा मुलांसाठी ज्ञानकोश संकलित केला. त्याला पारितोषिक मिळाले. आजची गाणी (१९३९), गीतज्योती (१९४४), रक्त नि शाई (१९४७) हे त्यांचे कवितासंग्रह एम्. व्हिटॅमिन (१९५७) हे त्यांचे नाटक आणि आदर्श कृषिवल (चरित्र, १९४६) हे चाकोरीबाहेरील ग्रंथलेखन होय. कौटुंब्रिक पार्श्वभूमी लाभलेले त्यांचे साहित्य आदर्शवादी, वास्तववादी व सोज्वळ आहे. त्यांनी एकूण तीस पुस्तके लिहिली.

 

सामंतांनी पारिजात (१९३४) आणि ज्योती (१९४०) ही दोन वाङ्‌मयीन मासिकेही सुरु केली आणि पारिजात प्रकाशनसंस्था काढली तथापि त्यांची मासिके जेमतेम वर्षभर चालली.

 

कुलकर्णी, अ. र.