अरुण मार्तंड साधु

साधु, अरुण मार्तंड : (१७ जून १९४१– ). ख्यातनाम मराठी साहित्यिक आणि पत्रकार. त्यांचा जन्म परतवाडा (अमरावती जिल्हा) येथे झाला. प्राथमिक शिक्षण परतवाडा येथे, तर माध्यमिक शिक्षण अमरावतीस झाले. नागपूर विद्यापीठाची बी.एस्सी. ही पदवी त्यांनी संपादन केली (१९६२). त्यानंतर त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला आणि ते पुण्यात आले. सुरुवातीस केसरीत वार्ताहर म्हणून काम केले. नंतर माणूस (साप्ताहिक), इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, स्टेट्समन या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत विविध पदांवर त्यांनी काम केले. फी प्रेस जर्नलचे संपादक, तसेच टाइम ह्या नियतकालिकाचे पश्चिम भारताचे ते स्ट्रिंनंगर प्रतिनिधी (वृत्तपत्राच्या नियमित कर्मचाऱ्यांपैकी नसलेला परंतु त्या वृत्तपत्रास बातम्या पुरवणारा) होते. १९९० मध्ये वृत्तपत्रसृष्टीतील नोकरी सोडून त्यांनी लेखनास व मुक्त पत्रकारितेस वाहून घेतले. १९९५ ते २००१ पर्यंत पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्याविभागात ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते.

साधूंचे लेखन विपुल आहे. राजकारण, समाजकारण, संस्कृती, साहित्य इ. विषयांवर त्यांनी स्फुट लेख लिहिले. त्यांच्या मुंबई दिनांक (१९७३) आणि सिंहासन (१९७७) या कादंबऱ्यांनी राजकीय कादंबऱ्यांचा मानदंड निर्माण केला. त्यानंतर बहिष्कृत (१९७८), स्फोट (१९७९), त्रिशंकू (१९८०), शापित (१९८०), विप्लवा (१९८५), शोधयात्रा (१९८९), झिपऱ्या (१९९०), तडजोड (१९९१) आणि मुखवटा (१९९९) या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्घ झाल्या. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी मुंबई दिनांक आणि सिंहासन ह्या दोन कादंबऱ्या विशेष गाजल्या. समकालीन राजकीय जीवनातील जीवघेणी सत्तास्पर्धा, सत्तेच्या पटावरील सोंगट्या खेळविताना केले जाणारे विधिनिषेधशून्य डावपेच आणि हे सारे चालू असताना जगण्याच्या धडपडीत रोज बळी जाणारा सामान्य माणूस ह्यांचे जिवंत आणि मर्मभेदक चित्रण साधूंनी ह्या कादंबऱ्यांत केलेले आहे. त्यांच्या दीर्घकाळच्या पत्रकारितेतील अनेक अनुभव प्रभावी साहित्यकृतींचा आकार धारण करून त्यांच्या ह्या कादंबऱ्यांतून प्रकटले. ख्यातनाम चित्रपट-दिग्दर्शक जब्बार पटेल ह्यांनी सिंहासन ह्या गाजलेल्या चित्रपटातून हे समकालीन वास्तव पडद्यावर साकारले (१९७९). त्रिशंकू ह्या कादंबरीतून साधूंच्या सखोल चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो.

 

कादंबरी लेखनाव्यतिरिक्त त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती अशा : कथासंग्रह : बिनपावसाचा दिवस (१९८३), एक माणूस उडतो त्याची गोष्ट (१९८४), मुक्ती (१९८६), मंत्रजागर (१९९३), ग्लानिर्भवति भारत (२००६) आणि बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती (२००८) नाटक : पडघम (१९८५) आणि ड्रॅगन जागा झाला (१९७२), फिडेल, चे आणि क्रांती (१९७२), तिसरी क्रांती (१९९५), ड्रॅगन जागा झाल्यावर (२००५) हे त्यांचे इतिहासकथनात्मक ग्रंथ काकासाहेब गाडगीळ आणि महाराष्ट्र (२००७) हे त्यांचे इंग्रजी ग्रंथ.

 

त्यांच्या साहित्यकृतींचे अन्य भाषांत अनुवाद झाले आहेत : मुंबई दिनांक (हिंदी, रशियन, युकेनियन), सिंहासन (हिंदी, मलयाळम्), विप्लवा (इंग्रजी), झिपऱ्या (हिंदी), स्फोट (हिंदी), शोधयात्रा (हिंदी) इत्यादी. तसेच साधू ह्यांनी काही ग्रंथांचे अनुवादही केलेले आहेत. उदा., प्रसिद्घ इंडो-अँग्लियन लेखक ⇨विक्रम सेठ ह्यांच्या अ सुटेबल बॉय ह्या कादंबरीचा मराठी अनुवाद शुभमंगल ह्या शीर्षकाने डॉ.जयसिंगराव पवार ह्यांच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज ह्याग्रंथाचा इंग्रजी अनुवाद इत्यादी. डॉ. जब्बार पटेल ह्यांनी निर्मिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपटाच्या लेखकांत अरुण साधू ह्यांचा समावेश होता.

 

अरुण साधू ह्यांना अनेक मानसन्मान लाभले : महाराष्ट्र राज्याचा वाङ्‌मयीन पुरस्कार (१९७७, १९८५ व १९९२), फाय फाउंडेशन, भैरूरतन दमाणी, न. चिं. केळकर ह्या पुरस्कारांचा त्यांत समावेश होतो. इंटरनॅशनल रायटर्स वर्कशॉप, आयोवा सिटी, अमेरिका येथे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. याशिवाय त्यांनी फ्रान्स व अफगाणिस्तान यांचे सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळातून दौरे केले. नागपूर येथे २००७ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

 

कुलकर्णी, अ. र.