मोगरे, गंगाधर रामचंद्र : (१८५७–१९१५). मराठी कवी. जन्म ठाणे जिल्ह्यातील शिरगाव येथे. मुंबईच्या एल्‌फिन्टन हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर प्रथम एका बँकेत आणि नंतर मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात त्यांनी नोकरी केली. कारकुनापासून पदोन्नती मिळवीत ते ग्रंथपाल झाले. इंग्रजी कवितेचा त्यांचा उत्तम व्यासंग होता.

विद्यार्थिदशेतच ते कविता करू लागले. महाराष्ट्रजनविलाप (१८८४), अभिनव कादंबरी (१८८६), मोगऱ्याची फुले (गुच्छ ५ १९०२–२०) हे मोगऱ्यांचे काव्यग्रंथ होत. महाराष्ट्रजनविलाप ही कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहिलेली विलापिका होय. अभिनय कादंबरी हा एका संस्कृत काव्याचा त्यांनी केलेला पद्यानुवाद. मोगऱ्याची फुले मध्ये त्यांच्या स्फुट कविता संगृहीत आहेत. त्यांच्या पाच गुच्छांपैकी तिसऱ्या गुच्छात मोगरे ह्यांची उपहासकाव्ये आहेत.

मोगरे ह्यांची काव्यशैली अत्यंत प्रसादपूर्ण आणि साधी असूनही डौलदार होती. विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींवर त्यांनी विलापिका रचिल्या. तथापि सादर गुणग्रहणापलीकडे विशेष भावना त्यांत उतरत नसे. त्यापेक्षा त्यांचे उपहासपर काव्य हे अधिक यशस्वी ठरले. मराठीतील उपहासपर काव्याचे ते जनक म्हणता येतील. ‘पदवीचा पाडवा’, ‘मेथाजीची मजलस’, ‘अभिनव धर्मसंस्थापना’ ही त्यांची ह्या प्रकारातील काही काव्ये. मोगरे ह्यांच्या उपहासकाव्यातील विचार सुधारणेस अनुकूल असून त्यातून मार्मिक विनोदास आवश्यक असणारे अर्थचापल्य आणि भाषाप्रभुत्व प्रत्ययास येते. यातच त्यांचे वेगळेपणही आहे.

जोग, रा. श्री.