सान व्हान दे ला क्रूथ : ( २४ जून १५४२–१४ डिसेंबर १५९१ ). स्पॅनिश कवी आणि गूढवादी तत्त्वज्ञ. जन्म स्पेनमधील फाँतीव्हेरॉस येथे. ‘सेंट जॉन ऑफ द कॉस’ ह्या नावाने प्रसिद्घ. ख्रिस्ती धर्माच्या कार्मेलाइट पंथात प्रवेश करून, कॅथलिक ख्रिस्ती संन्यासिनी ⇨सांता तेरेसा हिने कार्मेलाइट पंथात सुधारणा घडवून आणण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांत तो सहभागी झाला. उपासतापास, प्रार्थना, प्रभुचिंतन करीत संन्यस्त जीवन तो जगू लागला तथापि त्याच्या सारख्या सुधारणावादी व्यक्तींच्या विरोधात पंथातले अनेक जण होते. प्रथम १५७६ साली आणि नंतर १५७७ सालच्या डिसेंबरात पंथातल्या सुधारणाविरोधी लोकांनी त्याला धरुन कोठडीत डांबले. दुसऱ्या खेपेचा तुरुंगवास टोलोडो येथे होता. तेथे त्याचे हाल करण्यात आले. ते सोसत असतानाच त्याने कविता करावयास आरंभ केला असावा. १५७८ च्या ऑगस्टमध्ये त्याने ह्या कोठडीतून पलायन करून आपली सुटका करून घेतली.
त्याने लिहिलेल्या कविता फार थोड्या आहेत. त्यांतील मुख्यतः तीन कवितां वर थोर गूढवादी कवी म्हणून स्पॅनिश साहित्यातील त्याची कीर्ती अधिष्ठित आहे. ह्या तीन कविता अशा (सर्व इं. शी.) : ‘द स्पिरिच्युअल कँटिकल’, ‘द डार्क नाइट ऑफ द सोल’ आणि ‘द लिव्हिंग फ्लेम ऑफ लव्ह’. माणसाचे लक्ष विविध विषयांकडे ओढून घेऊन त्याचे मन अस्वस्थ करणाऱ्या लौकिक जगापासून दूर जावे, आत्मा आणि परमेश्वर ह्यांच्यातील उत्कट, शांतिमय ऐक्य साधावे, ही भावना या कवितांतून प्रकटलेली आहे. उन्नतीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत होणारा आत्म्याचा हा गूढ प्रवास आहे. जीवाला जडणारी एकेक आसक्ती दूर करीत गेल्यावर ख्रिस्ताने वधस्तंभावर भोगलेल्या वेदना आणि त्यानंतर त्याला प्राप्त झालेले माहात्म्य ह्यांच्या विलक्षण व्यक्तिगत अनुभवातून ह्या प्रवासात आत्मा जातो. भावगेयतेची एक अनन्यसाधारण उंची ह्या कवितांनी गाठलेली आहे. बायबलशी निगडित असलेल्या अनेक प्रतिमा तो प्रभावीपणे वापरतो आणि कधी एकच शब्द अनेकदा वापरून वेगवेगळ्या प्रतीकार्थांचा प्रत्यय देत राहतो.
त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वातली काही वर्षे अँडालूसिया येथे गेली. त्याच्या उपर्युक्त तीन कवितांवर त्याने गद्य भाष्ये लिहिली. त्या कविता समजून घेण्यासाठी ती उपयुक्त आहेत. २७ डिसेंबर १७२६ रोजी ख्रिस्ती संतांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.
उबेदा येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.