साधुदास : ( १८८३/८४–६ एप्रिल १९४८). मराठी कवी, कादंबरीकार व चरित्रकार. मूळ नाव गोपाळ गोविंद मुजुदार. पाटणकर हेही त्यांचे आणखी एक आडनाव. जन्म, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सांगली येथे. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण बुद्घिबळाच्या खेळात लक्ष केंद्रित केल्यामुळे ते अर्धवट राहिले आणि ते सांगलीत कायम वास्तव्यास आले. प्रथम शिक्षक आणि नंतर मुद्रणाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांनी काव्यरचनेस आरंभ केला होता. रामोपासक कोटणीस महाराजांचा अनुग्रह त्यांना लाभला होता. त्याच संप्रदायातील साधुमहाराज यांचा दास म्हणून ‘साधुदास’ या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. ईश्वरश्रद्घा ही त्यांच्या कवितेमागील मुख्य प्रेरणा होती आणि संस्कृत साहित्यशास्त्राचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. रघुवंशाच्या अध्ययनाने रामचरित्रावरील महाकाव्ये लिहिण्याची स्फूर्ती त्यांना झाली. प्रभू रामचंद्र हे त्यांचे उपास्यदैवत होते. संपूर्ण रामकथा चार ‘विहारां’मध्ये–भागांमध्ये–आणण्याची त्यांची योजना होती तथापि वनविहार (१९१२), रणविहार (१९१४) आणि गृहविहार (१९२८) हे तीनच विहार ते पूर्ण करू शकले. पुरविहार हा चौथा विहार संकल्पातच राहिला. जुन्या मराठी पंडित कवींच्या तुलनेने रचनादृष्ट्या सरस ठरावी, अशी ही काव्यरचना आहे. ही काव्ये अलंकारप्रचूर असून त्यांचे भाषाप्रभुत्व त्यांतील वृत्तयोजनेतून दृग्गोचर होते तथापि त्यांचा भावनाविष्कार रामकथेवरील काव्यरचनेपेक्षा त्यांच्या स्तोत्रांमधूनच अधिक झालेला आहे. भीमशती, सीताशती, रामशती आणि सद्गुरुशती अशी संस्कृत पद्घतीची चार शतकस्तोत्रे त्यांनी रचिली आहेत. संस्कृत कवी ⇨जगन्नाथपंडितांच्या गंगालहरी ह्या प्रसिद्घ स्तोत्राप्रमाणे कृष्णालहरी नावाचे एक स्तोत्र त्यांनी लिहिले. ह्या स्तोत्राची रसवत्ता त्यांच्या महाकाव्यांपेक्षाही अधिक प्रासादिक आहे. त्यांची इतर स्फुटरचना निर्माल्यसंग्रह ह्या नावाने दोन भागांत प्रसिद्घ आहे (१९१८ १९२४). ह्यांखेरीज ‘महायुद्घाचा पोवाडा’ही (१९१८) त्यांनी रचिला. भाषा आणि अलंकार ह्यांप्रमाणेच वृत्तांवरही त्यांचे प्रभुत्व होते. अनेक प्रकारची वृत्ते त्यांनी सहजपणे हाताळली मात्र त्यांच्या काव्याचे विषय पूर्वपरंपरेने चालत आलेले होते. आपल्या काव्यरचनेसाठी संस्कृत साहित्यशास्त्राचे नियमही ते काटेकोरपणे पाळत. त्यांची स्फुट कविताही आधुनिक भावगीतसंप्रदायात बसणारी नाही. ह्यामुळे कवी म्हणून ते काहीसे दुर्लक्षितच राहिले.
त्यांनी पंधरा-सोळा कादंबऱ्यांतून मराठी साम्राज्याचा–विशेषतः उत्तर पेशवाई काळाचा व १७६७ ते १८१८ दरम्यानचा– इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे तथापि मराठेशाहीची अखेर–१ : पौर्णिमा-पूर्वरात्र (१९३१),उत्तररात्र (१९३२), मराठेशाहीचा वद्यपक्ष : प्रतिपदा-पूर्वरात्र व उत्तररात्र (१९३५)आणि द्वितीया पूर्वरात्र व उत्तररात्र (१९३९) एवढ्याच कादंबऱ्या त्यांच्या हातून पूर्णत्वास गेल्या. मराठीची सजावट : भाग-१ (१९२९) आणि भाग-२ (१९२९) ह्या त्यांच्या ग्रंथांत मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचे नमुने, व्याकरण, विरामचिन्हे, भाषाशैली इत्यादींचे विवेचन आहे. या पुस्तकाला न. चिं. केळकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. बुद्घिबळाचा मार्गदर्शक (१९२५) या त्यांच्या पुस्तकावरून त्या खेळाविषयीचे त्यांचे सखोल ज्ञान ज्ञात होते.
सांगली संस्थानाधिपतींनी त्यांना ‘राजकवी’ (१९२९) ही पदवी दिली. १९४१ साली कराड येथे भरलेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
अल्पशा आजाराने सांगली येथे त्यांचे निधन झाले.
जोग, रा. श्री.
“