सातारा शहर : महाराष्ट्र राज्यातील एक इतिहास प्रसिद्घ शहर व जिल्ह्याचे मुख्यालय. ते अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी, किल्ल्याच्या उत्तर उतारावर वसले असून पुणे–बंगलोर या क्र.४ च्या राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस सु.१२० व कोल्हापूरच्या उत्तरेस सु. १३० किमी.वर आहे. लोकसंख्या १,२०,०७९ (२०११). याच्या पूर्वेस पाच किमी.वर माहुली येथे याचे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
सातारा किल्ल्याच्या नावावरून शहरास सातारा नाव पडले आहे. या नावाविषयी अनेक कथा-दंतकथा असून सातदरा, सप्ततारा, महादरा या शब्दांवरून हे आले असावे. काही तज्ज्ञांच्या मते येथील किल्ल्यावरील सप्तऋषींच्या मंदिरामुळे किंवा किल्ल्यास असलेले सतरा बुरूज वा द्वारे यांतील सतरा शब्दाचा अपभ्रंश होऊन सातारा हे नाव रुढ झाले असावे. किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. पुढे ते सातारा झाल्याचे शाहूकालीन पत्रव्यवहारातून आढळते.
साताऱ्याचा प्रथम लिखित उल्लेख बहमनी सुलतान पहिला मुहंमदशाह (कार. १३५८– ७५) याच्या पत्रव्यवहारात आढळतो. त्याने ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. बहमनी सत्तेचे विभाजन झाल्यानंतर हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली आला आणि छ.शिवाजी महाराजांनी काबीज करेपर्यंत तो त्यांच्या अखत्यारीत होता. या काळात किश्वरखान ह्या सरदाराने पहिल्या आदिलशाहची (कार. १५५७–८०) विधवा बेगम चांदबीबी ही निजामशाहशी संगनमत करीत असल्याच्या संशयावरून तिला सातारा किल्ल्यात कैदेत ठेवले (१५८२) परंतु त्याच वर्षी किश्वरखानाचा पाडाव झाल्याने तिची सुटका झाली. पुढे आदिलशाहीत दिलावरखान याने कटकारस्थाने केली, म्हणून त्यास या किल्ल्यात ठेवण्यात आले होते (१५९२). या किल्ल्यातच तो मरण पावला. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ह्या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणूनच केला जात असे. शिवाजी महाराजांनी २७ जुलै १६७३ रोजी हा ताब्यात घेतला. कर्नाटक मोहिमेच्या आधी १६७५ मध्ये ते आजारी पडले असताना त्यांचा दोन महिने या किल्ल्यात मुक्काम होता. याच काळात रघुनाथ हणमंते त्यांना भेटले आणि कर्नाटक मोहिमेची योजना निश्चित झाली. छ.राजारामांनी विशाळगडहून मराठ्यांची राजधानी येथे नेली (१६९८). त्यानंतर औरंगजेबाने १६९९ मध्ये तो काबीज करून त्यास अजमतारा हे नाव दिले. महाराणी ताराबाईंचे सरदार परशुराम त्र्यंबक यांनी मोगलांकडून तो परत मिळविला (१७०६) आणि त्याचे नाव अजिंक्यतारा असे करण्यात आले. छ. शाहूंनी मोगलांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर (१७०७) अजिंक्यतारा काबीज करून तेथे स्वतःस राज्य राज्याभिषेक केला (१७०८) आणि सातारा संस्थानची निर्मिती झाली. सातारा संस्थान विलीन होईपर्यंत (१८४९) तो सातारच्या राजांच्या ताब्यात होता.
किल्ल्यावर सांप्रत जुन्या वास्तूंचे अवशेष, मंगळाई, हनुमान व महादेव यांची मंदिरे, महाराणी ताराबाईंचा पडिक राजवाडा, तेलातुपाचे रांजण, तीन तलाव एवढेच जुने अवशेष आढळतात. शिवाय महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्घाची कथा आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन पाहावयास मिळते. किल्ल्याच्या माचीवर डफळ्यांच्या घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा हे शाहूकालीन अवशेष आहेत. किल्ल्यावर दूरदर्शन (१९८६) आणि आकाशवाणी (१९९२) यांची प्रक्षेपण केंद्रे असून त्यांची परिसीमा सातारा जिल्ह्यापुरती मर्यादित आहे.
छत्रपती शाहूंनी किल्ल्याच्या पायथ्याशी शाहूनगर वसविले (१७२१). तेच सांप्रत सातारा शहर असून तत्कालीन कागदोपत्री त्याचा उल्लेख, ‘सर्व कारखाने किल्ला साताऱ्यावरी ठेवून वरता वाडा वाचविला. शाहू तलाव म्हणून तळे केले. काही लोक वरती, काही लोक खाली रहावे असे केले. खाली शाहूनगर त्यास व वाड्यास पाणी खर्चास नाही म्हणून यवतेश्वरावरून नहर बांधून आणले’ असा आढळतो. छ. शाहूंनी अदालत वाडा, तख्ताचा वाडा व रंगमहालाचा वाडा इ. वास्तू बांधल्या. तख्ताच्या वाड्यामध्ये त्यांचे सिंहासन (तख्त) होते. शाहूंच्या सरदार-सावकारांनी शहरात अनेक वाडे बांधले. त्यांपैकी बरेच वाडे १७५३ मध्ये होळीच्या रात्री आग लागून जळाले, अशी पुरंदरे रोजनिशीत नोंद आहे. पुढे रंगमहालाचा वाडाही १८४७ मध्ये जळाला मात्र प्रतापसिंह (कार. १८०८–३९) यांनी भवानी पेठेत नवीन वाडा बांधला (१८२४) आणि जुना वाडा बाळासाहेब सेनापतींस विकला. पुढे आप्पासाहेबांनी नवीन राजवाडा बांधला (१८४४). जुन्या राजवाड्यात ‘प्रतापसिंह हायस्कूल’ असून नव्या राजवाड्यात २००३ पर्यंत शासकीय कार्यालये व जिल्हा न्यायालय होते. आता त्यासाठी स्वतंत्र इमारती बांधण्यात आल्या आहेत. जुन्या-नव्या राजवाड्यांतून भित्तिचित्रे काढलेली असून काष्ठशिल्पाचे, विशेषतः कोरीव नक्षीकामाचे नमुने दृष्टोत्पत्तीस येतात. जुन्या राजवाड्यातील सभागृहात काही पौराणिक कथानकांवर आधारित भित्तिचित्रे असून त्यांत मानवी आकृत्यांना प्राधान्य दिले आहे व झाडे, वेली केवळ प्रतीकात्मक दाखविली आहेत. सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, अमृतमंथन इ. कलात्मक चित्रांतून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन होते तर नवीन राजवाड्यातील सभागृहात रामायण-महाभारतातील कथानकांवर तसेच पौराणिक कथांवर आधारलेली भित्तिचित्रे आहेत. यांत हनुमान, शेषशायी विष्णू, समुद्रमंथन, रामपंचायतन, सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, गोपींसह कृष्ण, नृत्यमग्न शिव, मल्ल वगैरेंची उल्लेखनीय भित्तिचित्रे आहेत.
शहरात वारांच्या नावांच्या पेठांव्यतिरिक्त रामाऊचा गोट, यादव गोपाळ पेठ, व्यंकटपुरा, चिमणपुरा, दर्गापुरा, केसरकर पेठ, राजसपुरा, पंतांचा गोट, रघुनाथपुरा, मल्हार पेठ, भवानी पेठ इ. पेठा असून त्या भागांस ऐतिहासिक व्यक्तिनामांवरून नावे पडली आहेत. शहरात अनेक मंदिरे असून त्यांपैकी जलमंदिर (भवानी), कोटेश्वर, कृष्णेश्वर, विश्वेश्वर, राममंदिर, विष्णुमंदिर, शंकर, बहिरोबा, ढोल्या गणपती, खिंडीतील गणपती, उत्तर चिदंबरम् नटराज (१९८५), महानुभाव मठ (१९१२) वगैरे प्रसिद्घ आहेत. शाहूंनी झेबुन्निसाच्या (औरंगजेबाची मुलगी) स्मरणार्थ डोला सुरू केला व अदालत वाड्यापलीकडे खतीबाचे घर व मशीद बांधली. यांशिवाय शहरात लहानमोठ्या नऊ मशिदी आहेत.
सातारची नगरपालिका (१८५३) शहरास पाणीपुरवठा, जलनिःसारण, स्वच्छता, रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, पर्यावरण इत्यादींचे नियोजन करते. यवतेश्वर व महादरा येथून शहरास नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. १८८६ मध्ये कास तलाव बांधण्यात आला आहे.कास तलावातून बिडाचे नळ टाकून विशिष्ट उंचीवरून पाणी खाली पडेल अशी व्यवस्था १९३५ मध्ये नगरपालिकेने केल्यानंतर तेथे ‘सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी’ने वीजनिर्मिती सुरू केली. भारतातील हे पहिले लहान प्रमाणातील जलविद्युत्केंद्र होय.
शहरात जिल्हा शासकीय कार्यालये असून दोन शासकीय रुग्णालयांसहित अनेक वैद्यकीय रुग्णालये आहेत. रयत व स्वामी विवेकानंद या दोन प्रसिद्घ शिक्षणसंस्थांची कार्यालये व त्यांच्या शैक्षणिक संस्था असून इतर काही मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळाही आहेत. येथील सैनिकी विद्यालय (१९६१) हे भारतातील जुन्या विद्यालयांपैकी एक आहे. गौरीशंकर अकादमी अभियांत्रिकी महाविद्यालय माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण प्रदान करीत आहे. शहरात लहानमोठी अनेक ग्रंथालये असून छ. प्रतापसिंह भोसले (नगरवाचनालय १८४९) ग्रंथालय व छत्रपती सुमित्राराजे भोसले ग्रंथालय ही त्यांपैकी दोन प्रमुख होत. स्वातंत्र्यपूर्व काळात शहरातून अनेक वृत्तपत्रे-नियतकालिके प्रसिद्घ होत असत. त्यांपैकी ऐक्य (१९२३)व ग्रामोद्घार (१९३५) अद्यापही प्रसिद्घ होतात. शिवाय सकाळ, पुढारी, तरुणभारत, सामना, लोकमत यांच्या सातारा आवृत्त्या येथून निघतात. शहराजवळच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची वसाहत आहे.
शहरात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, चार भिंती, अजिंक्यतारा, अनेक राजवाडे व त्यांतील भित्तिचित्रे, यवतेश्वर वगैरे काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
पहा : भोसले, प्रतापसिंह शाहू, छत्रपति (सातारा) सातारा जिल्हा सातारा संस्थान.
संदर्भ : 1. Apte, B. K. Maratha Murals, Bombay, 1988.
2. Basu, B. D. Story of Satara, Bombay, 1963.
3. Duff, James Grant, History of the Marathas, Delhi, 1990.
4. Parasnis, D. B. Notes on Satara, Bombay, 1919.
५.मंत्री, रमेश, सुंदर सातारा, सातारा, १९८६.
६.माटे, गो. रा. असा घडला सातारा जिल्हा, सातारा, १९८८.
देशपांडे, सु. र.
“