साक्स, मार्शल : (२८ ऑक्टोबर १६९६–३० नोव्हेंबर १७५०). फ्रेंच सेनाधिकारी व युद्घशास्त्राचा सैद्घांतिक विवेचक. पूर्ण नाव हेर्मान मॉरिस कॉन्त द साक्स. सॅक्सनीतील (जर्मनी) गॉसलार गावी जन्म. इलेक्टॉर ऑफ सॅक्सनी व पोलंडचा राजा दुसरा फ्रेडरिक ऑगस्टस (इलेक्तॉर ऑफ सॅक्सनी) याचा हेर्मान मॉरिस हा अनौरस मुलगा. त्याची आई काउंटेस ऑरोरा फोनकोनिग्जमार्क ही असून मार्शल साक्स हा आपल्या पित्याप्रमाणेच अतिशय सामर्थ्यवान, जीवनाविषयी प्रचंड लालसा असलेला, एक बुद्घिमान सेनानी होता.
वयाच्या बाराव्या वर्षी मॉरिस साक्स हा सॅक्सन लष्करात भरती झाला.मार्लबरोचा ड्यूक व सॅव्हॉयचा यूजीन यांच्या हाताखाली मॉरिस मॉलप्लॅकेटच्या युद्घात सामील झाला. उत्रेक्तचा शांतता तह झाला, तेव्हा मॉरिसने फ्लँडर्स व पॉमरेनीया येथील चार स्वाऱ्यांत भाग घेतला होता. त्याचबरोबर त्याने एका घोडदळाच्या तुकडीचे नेतृत्वही केले होते. यूजीनच्या हाताखाली तुर्कांविरुद्घच्या लढाईत तसेच १७१७ मध्ये बेलग्रेड युद्घातही त्याने भाग घेतला होता. सैनिकी प्रशिक्षणात बंदुकीच्या नेमबाजीतील कौशल्य त्याने दाखविले. तो १७२० मध्ये पॅरिसला गेला. द्यूक द ओर्लिन्सच्या हाताखाली कॅम्प मार्शल पदावर रुजू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर सॅक्सन सैन्याचे नेतृत्व त्यास देऊ केले गेले, पण त्याने फ्रान्समध्येच राहणे पसंत केले. पोलंडच्या वारसा युद्घात (१७३३–३८) तो लेफ्टनंट जनरल ह्या पदावर होता.
तत्पूर्वी कुरलँडची डचेस ॲना आयव्हॅनोव्ह्ना(पुढे ती रशियाची राणी झाली) हिने मार्शल साक्सला कुरलँडचा ड्यूक म्हणून (प्रशिया व लॅटव्हिया यांमधील बाल्टिक ड्यूकच्या आधिपत्याखालील प्रदेश) १७२६ मध्ये नियुक्त केले तथापि त्याचा ॲनाशी विवाह होईल या भीतीने रशियनांनी १७२७ मध्ये साक्सची या प्रदेशातून हकालपट्टी केली. फ्रान्सला परतल्यावर साक्सने १७३२ मध्ये ‘माय रेव्हरीज’ (इं. शी., १७५६-५७ मध्ये प्रसिद्घ) या शीर्षकार्थाचा युद्घशास्त्रावरील एक मूलगामी ग्रंथ लिहिला. त्यात युद्घविषयक (सामरिक) प्रशिक्षण, दुर्गरक्षक सेना, सैन्यतळ व लष्करांचे संघटन यांविषयीची तंत्रशुद्घ माहिती आहे. पुढे पोलंडच्या वारसा युद्घात साक्सने फ्रेंच सैन्याकडून पोलंडचा तिसरा ऑगस्टस या आपल्या सावत्र भावाविरुद्घ घनघोर युद्घ केले.
नोव्हेंबर १७४१ मध्ये ऑस्ट्रियन वारसा युद्घात फ्रान्सने प्रशियाशी ऑस्ट्रियाविरुद्घ हातमिळवणी केली. त्यानंतर सहा महिन्यांच्या अंतराने साक्सने बोहीमियावर आक्रमण केले आणि प्राग जिंकून घेतले. या संघर्षात अद्यापि ग्रेट ब्रिटन गुंतला नव्हता, तरीसुद्घा जानेवारी १७४४ मध्ये फ्रेंच राजा पंधरावा लूई याने साक्सला फ्रेंच सैन्याचा कमांडर केले. त्यानंतर लूईने ग्रेट ब्रिटनबरोबरच्या युद्घाची औपचारिक घोषणा केली आणि साक्सला मार्शल म्हणून बढती दिली. साक्स व फ्रेंच राजा यांच्या सैन्याने ऑस्ट्रियन-नेदर्लंड्सवर चढाई केली. या युद्घात राजाने रणांगणावर आज्ञा देण्याचे सर्व अधिकार साक्सला दिले.
साक्सने मे १७४५ मध्ये तूर्ने शहराला पूर्ण वेढा दिला. जेव्हा ब्रिटिश सैन्य वेढा उठविण्यासाठी पूर्वेकडून आले, तेव्हा साक्सने फाँतेन्वाच्या युद्घात निर्णायक पराभव केला (११ मे १७४५). त्यानंतर त्याने तूर्ने, घेंट, ब्रूजेस, ऑडेनार्द, ऑस्तेंदे, अँटवर्प व ब्रूसेल्स ही शहरे एकामागून एक काबीज केली. फ्रेंच राज्यक्रांती उद्भवण्यापूर्वीचा (१७८९) हा फ्रान्सचा अंतिम महान विजय होता. ह्या लढाया आणि त्यानंतरची ११ ऑक्टोबर १७४६ ची राउकाउक्सची (लीजजवळ) लढाई जिंकली. या लढाईमुळे ऑस्ट्रियन-नेदर्लंड्सची मोहीम पूर्णत्वास आली. या कुशल सामरिक कर्तृत्वामुळे पंधराव्या लूईने साक्सला तहह्यात शँबॉर गाव व गढी नजराणा म्हणून भेट दिली. तसेच साक्सची मार्शल जनरल पदावर नियुक्ती केली (जानेवारी १७४७). त्यानंतर त्याने हॉलंडवर आक्रमण केले आणि दोस्तांच्या सैन्याचा मास्ट्रिचजवळच्या लॉफिल्डच्या युद्घात पराभव केला (२ जुलै १७४७).
साक्सने कापडाने आच्छादित चापाच्या बंदुका तसेच तोफा यांचा सैनिकांसाठी वापर रूढ केला. त्याने पायदळाबरोबर वाहून नेता येईल अशा एका तोफेचा शोध लावला. सैन्याला तालबद्घ हालचाली (संचलन) करण्यास (जी पद्घत रोमन सेनांच्या काळापासून लोप पावली होती) तसेच सैन्याच्या रेषीय युद्घविषयक हालचाली व शत्रुपक्षावर आकस्मिक हल्ला करण्याच्या उद्देशाने सैन्याच्या रांगा तयार करणे, हे साक्सने शिकविले आणि बरोबर शंभर वर्षांनंतर जगभर ही पद्घत रूढ झाली.
साक्स चँबोर्ड गावातील आपल्या गढीमध्ये आपला उत्तरकाल व्यतीत करीत असताना तिथेच त्याचे निधन झाले. युद्घभूमीवर अतिशय मोठे शौर्य गाजविणारा मार्शल साक्स हा स्वैराचारी व बदफैली म्हणूनही तितकाच कुप्रसिद्घ होता. साक्सचा नातू मॉरिस द्यूपँ हा फ्रेंच कादंबरीकर्त्री ⇨ झॉर्झ सांद (१८०४–७६) हिचा पिता होय.
संदर्भ : White, Jon E. M. Marshal of France : The Life and Times of Maurice, Comte de Saxe, New York, 1962.
गद्रे, वि. रा.