सांता तेरेसा : (२८ मार्च १५१५–४ ऑक्टोबर १५८२). कॅथलिक ख्रिस्ती संन्यासिनी, धर्मसुधारक व लेखिका. तिचे पूर्ण नाव तेरेसा दे थेपेदा ई आखूमादा. सेंट तेरेसा ऑफ ॲव्हिला, सेंट तेरेसा ऑफ जेसुझ या नावांनीही ती परिचित आहे. स्पेनमधील ॲव्हिला येथे सधन कुटुंबात ती जन्मली. तिची आई वारल्यानंतर (१५३०) वडिलांनी तिला ‘अवर लेडी ऑफ ग्रेस कॉन्व्हेन्ट’ या विद्यालयात घातले पण प्रकृती बिघडल्यामुळे तिने दीड वर्षातच शाळा सोडली. तथापि अध्ययन काळात तिचा ऑगस्टिनियन जोगिणींशी संपर्क आला. शिवाय तिने प्राचीन धर्मवीरांच्या कथा वाचल्या. त्यांतून तिला संन्यासिनी होण्याची प्रेरणा मिळाली. दुखण्यातून उठल्यानंतरचा तिचा काळ तिने स्वीकारलेल्या जीवनमार्गाबद्दलच्या संभ्रमावस्थेत गेला तथापि १५३५ मध्ये तिचे मन त्याबाबत स्थिर झाले. तिने ॲव्हिला येथील ‘कार्मेलाइट कॉन्व्हेन्ट ऑफ द इन्कार्नेशन’ मध्ये प्रवेश केला. तिथे ती अठ्ठावीस वर्षे राहिली. १५५५ मध्ये ⇨सेंट ऑगस्टीन याचा Confessiones (३९७–४०१, इं. शी. ‘कन्फेशन्स’) हा ग्रंथ तिने वाचल्यानंतर तिला उपरती झाली. त्याचे वर्णन तिने ‘कन्व्हर्शन’ या शब्दात केले असून तिच्या मनात कार्मेलाइट मठाच्या पुनर्रचनेचे विचार दृढतर झाले कारण चौदाव्या-पंधराव्या शतकांत कार्मेलाइट पंथाच्या मूळच्या काटेकोर शिस्तबद्घ जीवनात काहीशी शिथिलता व स्वैराचार प्रविष्ट झाला होता. तो नाहीसा करण्याचा तिने निश्चय केला. मठातील संन्यासिनींनी पूर्णतः आपल्या आध्यात्मिक साधनेला वाहून घ्यावे अकिंचन राहून लोकांनी दिलेल्या दानांवर आपला चरितार्थ चालवावा, असा तिचा आग्रह होता. ह्या सुधारणांसाठी तिला पोपचा यथावकाश पाठिंबा मिळाला. तिने २४ ऑगस्ट१५६२मध्ये चार जोगिणींसह कडक शिस्तीचा कार्मेलाइट मठ ॲव्हिला येथे स्थापन केला आणि तो सेंट जोसेफला अर्पण केला. सुधारित कार्मेलाइट पंथाच्या संन्यासिनींसाठी तिने स्पेनमध्ये आणखी पंधरा-सोळा मठ स्थापन केले. काही वादविवादांमुळे तिच्या ह्या कार्यात काही अडथळेही आले पण तिने त्यांना यशस्वीपणे तोंड दिले. त्यासाठी आपल्या बिघडत गेलेल्या प्रकृतीचीही तिने पर्वा केली नाही.
तिने केलेले लेखन आजही मोठ्या प्रमाणात वाचले जाते. द वे ऑफ परफेक्शन (१५८३), द इंटिरिअर कासल (१५८८), स्पिरिच्यूअल रिलेशन्स: एक्स्क्लेमेशन्स ऑफ द सोल टू गॉड (१५८८), कन्सेप्शन्स ऑन द लव्ह ऑफ गॉड, बुक ऑफ द फाउंडेशन्स (१६१०), लाइफ ऑफ द मदर तेरेसा ऑफ जिझस (१६११)ह्या ग्रंथांचा त्यांत समावेश होतो. लाइफ ऑफ द मदर….हा तिचा आत्मचरित्रपर ग्रंथ तथापि तिच्या गूढ, आध्यात्मिक लेखनातही आत्मचरित्रात्मकता आढळून येते. बुक ऑफ द फाउंडेशन्स मध्ये तिने स्थापन केलेल्या मठांचे वर्णन आहे. ईश्वराकडे होणारा आत्म्याचा प्रवास हा तिच्या अन्य ग्रंथांचा विषय होय. तिची लेखनशैली साधी, सरळ, पारदर्शक आहे. ह्या साधेपणातूनच तिच्या शैलीचे सौंदर्य प्रकट होते. तिने काही निबंध व कविताही लिहिल्या असून तिची साडेचारशेहून अधिक पत्रे उपलब्ध आहेत.
पोप पॉल सहावे ह्यांनी ‘डॉक्टर ऑफ द चर्च’ हा बहुमान १९७० मध्ये तिच्यासाठी जाहीर केला. हा बहुमान प्राप्त करणाऱ्या दोन साध्वी (संन्यासिनी) असून दुसरी सेंट कॅथरिन ऑफ सिना होय. शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी व थोर मानवतावादी समाजसेविका ⇨ मदर तेरेसा यांचे सांता तेरेसा यांच्या नावानेच नामकरण करण्यात आले. रोमन कॅथलिक चर्चची एक थोर गूढवादी (मिस्टिक)संन्यासिनी आणि उच्च दर्जाच्या आध्यात्मिक साहित्याची लेखिका म्हणून सांता तेरेसाचे धर्मेतिहासात नाव कोरले गेले. बर्गॉस येथील पंधराव्या मठाचे उद्घाटन करून ॲव्हिलाला जात असताना आल्बा दे तॉर्मेस येथे कर्करोग बळावल्यामुळे ती निधन पावली. अखेरच्या दिवसांत गर्भाशयाच्या कर्करोगाने ती आजारी होती.
संदर्भ : Weber, Alison, Teresa of Avila and Rhetoric of Femininity, 1990.
देशपांडे, सु. र.