साइकाकू : (१६४२–९ सप्टेंबर १६९३). जपानी कवी, कादंबरीकार व ख्यातकीर्त कथाकार. त्याच्या कथा-कादंबऱ्यांची गणना जपानच्या सर्वोत्कृष्ट साहित्यात केली जाते. त्याचे मूळ नाव हिरायामा टोगो. साइकाकू हे टोपणनाव धारण करण्यापूर्वी इहारा (इबारा) काकूई या नावाने तो प्रसिद्घ होता. त्याचा जन्म ओसाका येथे एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला. सुरुवातीस तो वडिलोपार्जित धंदा करीत असे पण तरुण पत्नीच्या निधनानंतर (१६७५) धंदा आपल्या कारकुनांच्या हवाली करून तो काव्यलेखनाकडे वळला. त्याने तिच्या स्मरणार्थ शेकडो कविता केल्या. तत्पूर्वी १६७३ मध्ये ओसाका येथील कवी संमेलनात तो सहभागी झाला होता. १५६ कवींनी रचलेल्या १०,००० काव्यपंक्तींतून त्याने ३०० कविता निवडून त्या प्रस्तावनेसह संपादिल्या. त्यात ⇨ हायकू या पारंपरिक काव्यप्रकारावर त्याने टीका केली. हायकू ह्या वैशिष्ट्यपूर्ण जपानी काव्यप्रकारातील कविता लिहिण्याचे शिक्षण त्याने दानरीन काव्यसंप्रदायातील निशियामा सोइन (१६०५–८२) ह्याच्याकडून घेतले. हायकू लेखनाच्या पारंपरिक नियमांच्या चौकटीत ह्या काव्यसंप्रदायाने स्वतःला बंदिस्त करून घेतलेले नव्हते. मुक्त काव्यशैलीवर त्याचा भर होता. यातून जपानमध्ये ‘सोईन्स दानरीन स्कूल’ नावाची काव्यशैली निर्माण झाली. त्याचप्रमाणे नैसर्गिक घटनांपेक्षा मानवी स्वभाव आणि मानवी नातेसंबंध ह्या विषयांवर ह्या संप्रदायातील कवींनी आपले काव्यलेखन मुख्यतः केंद्रित केलेले होते. समयस्फूर्त काव्यरचनेच्या तीन स्पर्धांत (१६७७, १६८० व १६८४) त्याने भाग घेऊन चकित करणारी काव्यरचना केली होती. १६८४ मध्ये त्याने २३,५०० काव्यपंक्ती रचल्याची नोंद आहे. अशा कवींमध्येही साइकाकू याची कविता, तिच्यातील कल्पनांच्या संपन्न प्रवाहामुळे ठळकपणे उठून दिसते तथापि, यथावकाश तो कवितेकडून कादंबरीलेखनाकडे वळला. कोशोकू इचिदाई ओतोको (१६८२, इं. भा. द लाइफ ऑफ ॲन ॲमोरस मॅन, १९६४) ही त्याची पहिली कादंबरी वास्तववादी आणि उकियोझोशी (वाहत्या जीवनाच्या कथा) पद्घतीने लिहिलेली आहे. दैनंदिन जीवनातले विषय आपल्या साहित्यकृतीसाठी निवडणे, हे ह्या पद्घतीचे लक्षणीय वैशिष्ट्य. या कादंबरीने त्याला नावलौकिक मिळाला. ह्या कादंबरीनंतर साइकाकू याने ह्याच पद्घतीच्या आणखी काही कादंबऱ्या लिहिल्या. ह्या कादंबऱ्यांचे स्थूलमानाने एकूण तीन वर्ग करता येतील: प्रेम ह्या विषयांवरच्या, तत्कालीन कुप्रसिद्घ स्त्रिया व व्यापारी वर्गाशी निगडित असलेल्या आणि संकीर्ण विषयांवरच्या. उपर्युक्त कोशोकू इचिदाई ओतोको ही पहिल्या म्हणजे प्रेमविषयक कादंबऱ्यांध्ये मोडते. कोशोकू निदाई ओतोको (इं. शी. ‘सन ऑफ द ॲमोरस मॅन’), कोशोकू इचिदाई ओन्ना (१६८६, इं. भा. द लाइफ ऑफ ॲन ॲमोरस वुमन, १९६३) ह्या कादंबऱ्याही स्त्री – पुरुषांधील प्रेमाभोवती, विशेषतः आसक्तीविषयी गुंफलेल्या आहेत तथापि नानशोकू ओकागामी (१६८७, इं. शी. द ग्रे ट मिरर ऑफ मेल लव्ह) आणि अन्य काही कादंबऱ्यांत त्याने सामुराईंच्या समलिंगी प्रेमाचा विषयही हाताळलेला आहे. सेकेन मुनेसनयो (१६९२, इं. भा.वर्ल्ड्ली मेंटल कॅल्क्युलेशन्स, १९७६) ही व्यापारी वर्गातील आर्थिक व्यवहारांशी निगडित असलेल्या कादंबऱ्यांपैकी एक असून ती त्याची अखेरची साहित्यकृती होय. संकीर्ण विषयांवरील कादंबऱ्यांत साइकाकू याची ओकिमियागे (१६९३, इं. शी. ‘साइकाकूज पार्टिंग गिफ्ट’) ही कादंबरी उल्लेखनीय आहे. ह्या सर्व कादंबऱ्यांतून मानवी जीवनाचे वास्तववादी दर्शन घडते. याशिवाय त्याने कोशोकू गोनिन ओन्ना (१६८६, इं. भा. फाइव्ह् विमेन हू लव्ह्ड लव्ह, १९५६) आणि निप्पोन आयतैगुरा (१६८८, इं. भा. द जॅपनीज फॅमिली स्टोअरहाउस, १९५९) ही दोन अन्य पुस्तके सिद्घ केली. कोशोकू गोनिन ओन्ना हे पुस्तक त्याच्या इतर साहित्यकृतींपेक्षा सकृतदर्शनी अधिक नाट्यमय असून त्यातील व्यभिचारासंदर्भातील पाच कथा सत्यघटनेवर आधारित आहेत.
साइकाकू याने कोशोकू इचिदाई ओतोको ह्या कादंबरीची मांडणी करताना अत्यंत मोजक्या शब्दांत मांडलेली लहानलहान पण परिपूर्ण अशी उपकथानके योजिलेली आहेत. हायकू लिहिताना केल्या जाणाऱ्या नेमक्या शब्दयोजनेचे स्मरण ही मांडणी करून देते. साइकाकूच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन मरणोत्तर झाले. त्यांतील काही भागाचे लेखनसंपादन त्याचा पट्टशिष्य होजो दानसूई (१६६३-१७११) याने केले आहे. त्याच्या बहुतेक कादंबऱ्यांचे इंग्रजीत अनुवाद झाले आहेत. ⇨ गेंजी मोनोगातारी लिहिणाऱ्या मुराशिकी शिकिबू हिच्या पाठोपाठ कथात्मक साहित्यातील समर्थ लेखक म्हणून साइकाकूचे नाव जपानी साहित्यात ख्यातकीर्त आहे.
ऐन उमेदीत त्याचे ओसाका येथे निधन झाले.
संदर्भ : Kodansha Ltd., Pub. Comp. Japan : An Illustrated Encyclopedia, Vol. 2, Tokyo, 1993.
हिसामात्सु , सेन्-इचि (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)