सॅक्सफोन : सुषिर वाद्यगटातील प्रमुख पाश्चात्त्य वाद्य. त्याच्याशी साधर्म्य असलेली, वेगवेगळ्या आवाज-पल्ल्यांनुसार लहान-मोठ्या आकार-प्रकाराची अनेक वाद्ये सॅक्सफोनच्या वर्गात मोडतात. ॲडॉल्फ (ऊर्फ अँटोनी जोसेफ)सॅक्स (१८१४–९४) हा बेल्जियन वाद्यकार सॅक्सफोन या वाद्याचा जनक होय. त्याने बासरी आणि क्लॅरिनेट या वाद्यांचा अभ्यास ब्रू सेल्स संगीत विद्यालयात केला. १८४० च्या सुमारास त्याने सॅक्सफोन हे वाद्य तयार केले. तो १८४२ मध्ये पॅरिसला गेला. तिथे १८४६ मध्ये त्याला या वाद्याचे एकस्व मिळाले. सॅक्सच्या नावावरूनच ह्यावाद्याला ‘सॅक्सफोन’ हे नाव मिळाले. अल्पावधीतच हे वाद्य लष्करी बँडमध्ये लोकप्रिय झाले. ⇨ क्लॅरिनेट या वाद्याशी त्याचे बरेचसे साधर्म्य आहे. या वाद्याची रचना व नादध्वनी क्लॅरिनेटप्रमाणेच असतो पण सॅक्सफोनचा नादध्वनी जास्त खोल व अधिक मंजूळ असतो. एकेरी, आपटती, जाड जिव्हाळी पितळी शंक्वाकार नळी व कळचाव्या हे या वाद्याच्या रचनेतील प्रमुख भाग होत. या सारखेच पण दुहेरी जिव्हाळीचे वाद्य म्हणजे सारूसोफोन होय. बॅगपाइप हा सॅक्सफोनशी साधर्म्यदर्शक वाद्यप्रकारही प्रचलित आहे. सॅक्सफोन या वाद्याचे आवाज-पल्ल्यानुसार अनेक प्रकार आहेत- त्यांपैकी सोप्रानो, बॅरिटोन, टेनर, ॲल्टो या प्रकारांचा विशेष उल्लेख करता येईल. सोप्रानो सॅक्सफोन हा साधारणतः आकाराने सरळ असतो पण अन्य सॅक्सफोन तळाशी वक्राकार असतात व ते वाजविताना साधारणपणे उभे धरले जातात जेणेकरून वक्राकार भाग वरच्या दिशेला वळलेला दिसतो. सॅक्सफोनचा वरच्या बाजूचा बाकदार भाग(क्रु क) हा अलग काढता येण्याजोगा असतो. वाजविताना तो जागच्याजागी- म्हणजे बेलच्या विरुद्घ दिशेला, वादकाच्या तोंडाकडे – असतो. नळीच्या बाजूने विशिष्ट अंतरावर साधारणतः चोवीस रंध्रे असतात, ती कळयंत्रणेने नियंत्रित केली जातात. सॅक्सफोन हे आधुनिक पाश्चात्त्य वाद्यांतील एक प्रमुख वाद्य आहे. कालांतराने सिंफनी वाद्यवृंदात या वाद्याचा समावेश झाला तथापि संगीत-सभांतून या वाद्याचा मर्यादित वापर केला जातो. ⇨ जॅझ संगीतातही या वाद्यास प्रमुख स्थान मिळाले. लेस्टर यंग, कोलमन हॉकिन्स, चार्ली पार्कर, सोनी रोलिन्स, जॉन कोल्ट्रे न वगैरे काही ख्यातकीर्त जॅझ सॅक्सफोनवादक होत.
इनामदार, श्री. दे.
“