सॅक्रामेंटो नदी: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्यातील एक प्रमुख व सर्वांत लांब नदी. लांबी सु. ६१५ किमी. उगमाकडील पीट या मुख्य उपनदीसह सु. ९६० किमी. एकूण जलवाहन क्षेत्र ७०,१८९ चौ. किमी. राज्याच्या उत्तर भागातील कोस्टरेंज पर्वतरांगांमधील क्लॅमथ डोंगररांगेत मौंट शॅस्टाजवळ सॅक्रामेंटो नदी उगम पावते. कॅस्केड व सिएरा नेव्हाडा रांगांमधून सॅक्रामेंटो शहरापर्यंत बरेचसे अंतर ही नदी प्रथम दक्षिण दिशेने वाहते व त्यानंतर नैऋत्येस वळून सॅन फ्रॅन्सिस्को उपसागराच्या स्वीसन बे खाडीस मिळते. त्या ठिकाणी सॅक्रामेंटो व सॅन जॉक्वीन नद्यांनी विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे. पीट, फीदर, अमेरिकन व मॅक्क्लाऊड या सॅक्रामेंटोच्या प्रमुख उपनद्या आहेत.
सॅक्रामेंटो हे नाव १८०८ साली गाब्रिएल मोरागा या फ्रेंच वसाहतकऱ्याने फीदर नदीला दिले होते परंतु कालांतराने मूळच्या रिओ दे सॅन फ्रॅन्सिस्को या मुख्य प्रवाहाला हे नाव पडले व तोच प्रवाह पुढे सॅक्रामेंटो नावाने रूढ झाला. १८४९ साली या नदीखोऱ्यामध्ये लागलेल्या सोन्याच्या शोधामुळे सुवर्णार्थी परकीयांचा अभूतपूर्व लोंढा या भागात आला व नदीखोऱ्यात अनेक शहरे वसली. या नदीच्या उत्तर भागात कॅस्केड व सिएरा नेव्हाडा रांगांदरम्यान निर्माण झालेली सॅक्रामेंटो व्हॅली व नदीचा त्रिभुज प्रदेश जगातील एक उत्कृष्ट कृषिक्षेत्र म्हणून प्रसिद्घ आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी १९३० च्या दशकात सेंट्रल व्हॅली प्रॉजेक्टची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे सॅक्रामेंटो नदीवर शॅस्टा (१९४५), केस्वीक आणि ऑरोव्हिल (१९६८) ही मोठी व प्रमुख धरणे बांधण्यात आली आहेत. त्यांद्वारा पूरनियंत्रण तसेच मध्यवर्ती नदीखोऱ्यातील शेती विकास व शहरांना आणि उद्योगधंद्यांना वीजपुरवठा इ. उद्देश साध्य झाले आहेत. सॅक्रामेंटो च्या फीदर या उपनदीवरही बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात आले असून त्यांद्वारा राज्याच्या दक्षिण भागाला वीज व पाणीपुरवठा करण्यात आला आहे. सॅक्रामेंटो नदीच्या पाण्याची पातळी जेव्हा वाढते, त्यावेळी मुखापासून आत रेड ब्लफ शहरापर्यंत सु. ४२० किमी. नदीचे पात्र नौकासुलभ असते. सॅक्रामेंटो हे या नदीवरील सर्वांत मोठे शहर असून तेथपर्यंत सागरगामी बोटींची वाहतूक चालते.
चौंडे, मा. ल.