सँप्रस, पीट : (१२ ऑगस्ट १९७१– ). विश्वविख्यात अमेरिकन टेनिसपटू. वॉशिंग्टन डी. सी. येथे जन्म. तो मूळ ग्रीक वंशीय असून सॅमी व जॉर्जिया सँप्रस या दांपत्याचा तिसरा मुलगा होय. त्याचे मूळ ग्रीक नाव पेट्रॉस (पीटर). सँप्रसच्या कुटुंबाने १९७८ मध्ये दक्षिण कॅलिफोर्नियात स्थलांतर केले. त्यानंतर सँप्रसने टेनिस खेळण्यास, वयाच्या सातव्या वर्षी सुरुवात केली. त्याचे असामान्य क्रीडानैपुण्य बालवयातच दिसून आल्याने त्याच्या पालकांनी त्याच्यासाठी क्रीडाप्रशिक्षकाची (कोच) नियुक्ती केली. पीटर फिशर या तज्ञ प्रशिक्षकाने १९८९ पर्यंत त्याला मार्गदर्शन केले. बालवयापासूनच रॉड लेव्हर हा टेनिसपटू सँप्रसचा खेळातील आदर्श होता. वयाच्या अकराव्या वर्षी त्याच्याशी भेट होऊन त्याच्याबरोबर खेळण्याची संधीही त्याला मिळाली. कनिष्ठ गटात प्रावीण्य संपादन केल्यावर वयाच्या सतराव्या वर्षी १९८८ मध्ये सँप्रस व्यावसायिक खेळाडू बनला. पुढच्या दोन टेनिस मोसमांत सातत्याने चमकदार कामगिरी करून त्याने सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू असा लौकिक मिळविला आणि १९९० ची अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकून जागतिक पातळीवरील सर्वोच्च यश संपादन केले. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारा, तो पुरुष-एकेरीतील सर्वांत लहान वयाचा खेळाडू ठरला.

सँप्रसच्या एकूण पंधरा वर्षांच्या कीडा-कारकीर्दीत (१९८८–२००२) त्याने पुरुष-एकेरी प्रमुख स्पर्धांमध्ये चौदा वेळा अजिंक्यपदे प्राप्त केली, हा पुरुष-खेळाडूंमध्ये जागतिक विक्रम मानला जातो. तसेच त्याने एकूण सात वेळा एकेरी विंबल्डन विजेतेपद मिळविले (१९९३–९५, १९९७–२०००). हा देखील एक विक्रम मानला जातो. त्याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद(१९९०, १९९३, १९९५, १९९६, २००२) तर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसस्पर्धेत दोन वेळा अजिंक्यपद (१९९४, १९९७) मिळविले मात्र फ्रेंच खुली टेनिसस्पर्धा त्याला एकदाही जिंकता आली नाही. सँप्रसने ऑगस्ट २००३ मध्ये अधिकृत क्रीडानिवृत्ती जाहीर केली. तत्पूर्वी २००० मध्ये ब्रिगेट विल्सन या युवतीबरोबर तो विवाहबद्घ झाला. त्यांना एक मुलगा आहे. सँप्रसचा टेनिस कोर्टवरचा तुल्यबळ श्रेष्ठ प्रतिस्पर्धी आंद्रे आगासी याच्याबरोबरचे त्याचे सामने विलक्षण रंगतदार, चुरशीचे व प्रेक्षणीय होत असत. परस्परांच्या प्रतिस्पर्धेत दोघांचाही खेळ विलक्षण खुलत असे व त्यांच्यातले सर्वोत्तम क्रीडानैपुण्य याप्रसंगी पणाला लागत असे. ‘असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स’ (ए. टी. पी.) च्या जागतिक क्रमवारीत १९८९ साली एक्क्याऐंशीव्या स्थानावर असणाऱ्या सँप्रसने एका वर्षात पाचव्या स्थानावर झेप घेतली, तर १९९३ साली जागतिक क्रमवारीत त्याने प्रथम मानांकन प्राप्त केले. १९९८ पर्यंत सलग सहा वर्षे त्याने हे जागतिक क्रमवारीतले प्रथम क्रमांकाचे अव्वल स्थान टिकवून ठेवले. ह्या कालावधीत त्याने एकूण अकरा प्रमुख स्पर्धांत अजिंक्यपदे मिळविली. तसेच १९९५ ची डेव्हिस कप स्पर्धा जिंकणाऱ्या अमेरिकन संघातील तो एक खेळाडू होता.

सँप्रस हा उजव्या हाताने खेळणारा अष्टपैलू टेनिसपटू असून, एक हाती पार्श्वहस्त (बॅकहँड) फटका हे त्याचे एक वैशिष्ट्य मानले जाते. जबरदस्त आक्रमक व सफाईदार आरंभखेळी (सर्व्हिस), जमिनीलगतचे जोरदार फटके, पुरोहस्त (फोरहँड) फटक्यांतला जबरदस्त जोश, आपली क्रीडाक्षेत्रसीमा (कोर्ट) सांभाळून विलक्षण चपळतेने चेंडू परतविण्याचे कौशल्य तसेच चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच फटकावण्याचे असाधारण कसब -विशेषतः नेटजवळील ड्रॉप्स -यांसारख्या त्याच्या खेळातील शैली-वैशिष्ट्यांमुळे तो जागतिक दर्जाचा श्रेष्ठतम पुरुष-खेळाडू मानला जातो. सँप्रस आणि आरांत्झा सँचेझ-व्हिकारिओ (स्पेन) यांच्या टेनिस खेळातील कर्तबगारीचा यथोचित गौरव न्यूपोर्ट, ऱ्होड आयलंड (अमेरिका) येथील सभागृहात समारंभपूर्वक २००७ मध्ये करण्यात आला. अनेक जेत्यांना मागे टाकत सँप्रसने जागतिक टेनिस विश्वात नोंदविलेली अजोड कामगिरी असंख्य क्रीडाशौकिनांच्या प्रशंसेस पात्र ठरली आहे.

इनामदार, श्री. दे.