संखेडाकाम: भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण फर्निचर -प्रकार. गुजरातमधील संखेडा या गावात प्राचीन काळापासून चालत आलेल्या पारंपरिक स्थानिक काष्ठकलेला अनुलक्षून संखेडाकाम ही संज्ञा रूढ झाली. हे अत्यंत सुबक, ठेंगणे, कलात्मक असे बैठे फर्निचर असते. त्यात वेगवेगळ्या आकार – प्रकारांच्या छोट्या बैठका, टेबले, घडवंच्या, कपाटे, स्टुले, झोपाळे, पाळणे, खुर्च्या, सोफासेटइ. फर्निचर – प्रकारांबरोबरच खेळणी, चहापानाची तबके, चालण्याच्या काठ्या यांसारख्या लाकडी वस्तूंचा समावेश होतो. संखेडा काम हे प्राय: सागवानी लाकडावर केले जाते. साग हे निसर्गत:च फिक्या रंगाचे लाकूड असल्याने त्याच्यावर लखलखीत गडद रंगाचे संखेडा काम विशेषत्वाने उठून दिसते. लाकडी वस्तू व फर्निचर यांवर लाख काम करून त्यांना सुंदर व आकर्षक रूप दिले जाते. आकर्षक रंगसंगती व नानाविध आकृतिबंध यांनी सजविलेल्या या फर्निचरला कथिलवर्ख देऊन अधिक शोभिवंत बनविले जाते. कथिलाची अत्यंत बारीक पूड रंगकामासाठी वापरली जाते. कुसुमी लाख ही या कामासाठी फार उपयुक्त ठरते. रंगीत पृष्ठभागावर या लाखेचा टिकाऊ लेप दिल्याने रंगकामाला सोनेरी चमक येते. संखेडा कामात लाकडावर प्रथम वर्खाचा थर देऊन नंतर त्यावर लाखेचा थर देण्यात येतो. संखेडाकामाने युक्त फर्निचर झगमगीत गडद रंगसंगती व चकाकी यांमुळे वेधक दिसते. त्यात वापरलेले रंग टिकाऊ व पक्के असतात. राजकोट जिल्ह्यातील जुनागढ, धोराजी, महुवा तसेच कच्छच्या काही भागांत संखेडा – लाखकामाचा वापरकरून विविध वस्तू व नानाविध प्रकारचे फर्निचर तयार केले जाते. विशेषत: जुनागढ व धोराजी येथील स्टँडचे पाळणे, सुबक नक्षीयुक्त कपाटे इ. वैशिष्ट्यपूर्ण आहेत. झुल्यांवरील व पाळण्यांवरील नक्षीदार, आलंकारिक आकृतिबंध, त्यांचा घाटदार आकार व त्यांवर केलेले रंगीबेरंगी, चमकदार संखेडा काम ही गुजराती फर्निचर – शैलीची वैशिष्ठ्ये होत. कच्छच्या काही भागांत संखेडाकामाने युक्त अशी काही स्वयंपाक पात्रेही तयार केली जातात व सर्रास वापरली जातात. संखेडा – फर्निचरला आता देश – विदेशांतूनही भरपूर प्रमाणात मागणी असून, ह्या स्थानिक कारागिरीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाही लाभली आहे.
इनामदार,श्री.दे.
“