श्वेतकोशिकार्बुद : ‘रक्ताचा कर्करोग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विकारामध्ये श्वेतकोशिकांची (पांढऱ्या पेशींची) अनिर्बंध निर्मिती होत असते, इतर सर्व प्रकारच्या कर्करोगाप्रमाणेच ही विकृती असली, तरी अनियंत्रित प्रमाणात वाढणार्‍या या कोशिका इतरत्र न जाता केवळ रक्तातच प्रचंड प्रमाणात सोडल्या जातात, हे या विकाराचे वैशिष्ट्य आहे [⟶ कर्करोग]. रक्तातील सर्व प्रकारच्या कोशिकांपैकी (लाल म्हणजेच रक्तकोशिका, बिंबाणू आणि श्वेतकोशिका) फक्त श्वेतकोशिकांची निर्मिती अनियंत्रित होऊ लागते. श्वेतकोशिकांचा कोणता उपप्रकार नियंत्रणमुक्त होतो, त्यानुसार रोगाची वर्गवारी केली जाते.

कर्करोगाच्या अन्य प्रकारांप्रमाणेच रक्तातील या कर्करोगाचे निश्चित कारण सांगता येत नाही. बहुक्षम स्कंधकोशिकांपासून श्वेतकोशिकांच्या ज्या तीन मुख्य मालिका निर्माण होतात (लसीका कोशिकीय,मज्जाभ किंवा कणिकाकोशिकीय आणि एककेंद्रकी  किंवा महाभक्षी कोशिकीय) त्यांतील कोणत्याही एका मालिकेतील अगदी सुरूवातीच्या म्हणजेच पूर्वगामी कोशिकांपैकी एखादया कोशिकेत एकाएकी काही उत्परिवर्तन (अचानकपणे बदल) झाल्यामुळे तिच्यापासून मोठया प्रमाणात अकार्यक्षम आणि विकृत कोशिकांचे जनन होऊ लागते. एकासारख्या एक दिसणाऱ्या आणि रोगप्रतिरक्षेच्या कार्याची कोणतीही क्षमता नसणाऱ्या या कृत्तकांचे (क्लोनांचे) आगमन रक्तात मोठया प्रमाणात होऊ लागल्यावर त्या मालिकेतील नेहमी आढळणाऱ्या कोशिकांचे प्रमाण घटू लागते. इतर मालिकांच्या निर्मितीवरही याचा अनिष्ट परिणाम होतो, रक्तकोशिकांची संख्याही घटते. [ ⟶ रक्त].

कोशिकांमधील उत्परिवर्तकाचे स्वरूप जाणण्यासाठी केलेल्या संशोधनात विविध गुणसूत्रांमधील (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमधील) संरचनात्मक दोष आढळून आले आहेत. गुणसूत्राचा क्रमांक, त्यातील दोष आणि रोगाचे दृश्य स्वरूप यांचा परस्परसंबंध लावण्यात अभ्यासकांना बरेच यश मिळाले आहे. तरीही हे दोष निर्माण होण्यामागील कारणांचा शोध अजून अपूर्णच आहे. प्राण्यांमधील काही श्वेतकोशिकार्बुदांची निर्मिती विषाणुजन्य (व्हायरसजन्य) असू शकते हे प्रयोगान्ती सिद्ध झालेले आहे. मानवी रोगांपैकी प्रौढ व्यक्तींमध्ये आढळणारा एक दुर्मिळ प्रकार (‘प्रौढ टी-कोशिका श्वेतकोशिकार्बुद’) एचटीएलव्ही (HTLV)नावाच्या एड्स विषाणूशी साम्य असणार्‍या विषाणूंमुळे होतो, असे मानले जाते. हा विषाणू टी प्रकारच्या लसीका कोशिकांवर [⟶ लसीका तंत्र] आक्रमण करतो. विषाणूंप्रमाणेच किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थांचा संपर्क हेही एक महत्वाचे कारण रक्तकर्कासाठी जबाबदार धरले जाते, जपानमधील अणुबॉंबच्या स्फोटानंतर तेथील लोकसंख्येत या विकाराचे प्रमाण कित्येक पटींनी जास्त झाले. अणुऊर्जा आणि इतर किरणोत्सर्गी क्षेत्रांमधील संशोधन व उदयोगात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही हे प्रमाण अधिक आढळते. त्यामुळे त्यांच्या नियमित रक्त तपासण्या केल्या जातात. बेंझीनसारखी रासायनिक द्रव्ये आणि काही कर्करोगनाशक औषधे यांच्या संपर्कामुळेही रक्तातील कर्करोगाचा धोका वाढतो असे दिसते. डाऊन सिंड्रोम (लक्षणसमूह), फँकोनी सिंड्रोम यांसारख्या काही जनुकदोषीय विकारांमध्ये कधीकधी रक्तकर्कासारखे बदल काही काळ निर्माण होऊन बरे होतात अथवा काही रूग्णांमध्ये कालांतराने तीव्र स्वरूप धारण करतात.

श्वेतकोशिकार्बुदाच्या विविध प्रकारांमध्ये रूग्णांचे चित्र भिन्नभिन्न असू शकते परंतु कोशिकीय बदलांची प्रगती आणि त्यातून उद्‍भवणारी लक्षणे यांमधील संबंध सर्वत्र सारखाच असतो. तो प्रथम पाहणे सोयीचे ठरेल. गुणसूत्रांमधील उत्परिवर्तनामुळे पूर्वगामी कोशिकेपासून निर्माण होणाऱ्या कोशिका नेहमीपेक्षा कमी परिपक्व असतात. त्यांचे परिपक्वन कमी व निर्मितीचा वेग अधिक असतो. या वेगावर लक्षणांची तीवता (आणि त्यावर आधारित वर्गीकरण) अवलंबून असते. सुरूवातीस अस्थिमज्जेतील एखादया ठिकाणी निर्माण झालेल्या या कोशिका रक्तात उतरल्यावर सर्व ठिकाणांच्या अस्थिमज्जेत पोहोचतात व तेथे आपले गुणन (संख्यावाढ) सुरू करतात. अस्थिमज्जेतील निरोगी मज्जाभ आणि लसीकाभ कोशिकांसारख्या निर्मितिक्षम कोशिकांची जागा या कोशिका घेतात. त्यामुळे रक्तात येणाऱ्या परिपक्व कार्यक्षम कोशिकांची टक्केवारी कमी होऊन अपरिपक्व अशा जनककोशिकांची संख्या वाढू लागते. एकूण श्वेतकोशिकांची संख्या नेहमीच्या ४,००० ते ११,००० प्रतिमायकोलिटर (घन मिलीलिटर) वरून ५०,००० ते एक लाखापर्यंत वाढूनही प्रतिकारक्षमता कमी होऊन संकामणजन्य (सांसर्गिक) रोग होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ताप येतो. रात्री घाम येतो. श्वेतकोशिकांप्रमाणेच रक्तकोशिकांच्या पूर्वगामी कोशिकांवर आक्रमण झाल्याने हळूहळू अल्परक्तता आणि ऑक्सिजन वहनातील अकार्यक्षमता दिसू लागते. फिकटपणा, लवकर दमणे, वजन घटणे, भूक कमी होणे ही त्यातून उद्‌भवणारी लक्षणे असतात. अस्थिमज्जेतील बिंबाणूंची निर्मिती घटल्यामुळे रक्ताचे क्लथन होण्यास (साखळण्यास) वेळ लागतो. नाकातून रक्त येणे, हिरड्यांमधून सहजासहजी रक्तस्राव होणे, त्वचेखाली रक्तस्राव झाल्यामुळे जांभळे डाग दिसणे ही लक्षणे आढळतात. लसीका गंथींमध्ये अपरिपक्व कोशिकांची वाढ झाल्याने लसीका कोशिकांची नेहमीची निर्मिती कमी होते, प्रतिपिंडनिर्मिती (रक्तातील गॅमा ग्लोब्युलिनासारखी द्रव्ये) तसेच कोशिकीय प्रतिरक्षा यंत्रणा यांच्या कार्यक्षमतेस ओहोटी लागते. लसीका गंथी वाढलेल्या दिसतात.

रक्तनिर्मिती आणि लसीकानिर्मितीशी संबंधित कोशिकांचे विस्थापन कर्ककोशिकांकडून झाल्यामुळे वरील सर्व लक्षणे उद्‌भवतात. याबरोबरच इतरत्रही कर्कप्रक्षेप होऊ लागून अन्य लक्षणे हळूहळू दिसू लागतात. अस्थिमज्जेतून हाडांच्या कठिण भागात व सांध्यामध्ये रोग पसरल्यामुळे तेथून वेदना निर्माण होतात. हाडांमधील आकमण पुरेसे विस्तृत असेल, तर ठिकठिकाणी अस्थिभंग होतो. यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड येथे कोशिकांच्या आकमणामुळे कार्यक्षमता ओसरू लागते, उदरामध्ये जडपणा जाणवतो व त्याचे रूपांतर वेदनांमध्ये होते. ⇨तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) प्रवेश करून मस्तिष्कावरणावर आकमण करणारा कर्करोग अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोकेदुखी, उलट्या होणे यांसारखे परिणाम घडवितो. या सर्व कर्कप्रक्षेपांमध्ये प्रत्येक ठिकाणी कर्ककोशिकांची अनिर्बंध वाढ मूळ ऊतकाची पोषणद्रव्ये बळकावून घेत असल्यामुळे ऊतकाचा नाश होत राहतो व त्याचे पुनरूज्जीवन होत नाही. मोठया प्रमाणावर कोशिकानिर्मिती झाल्याने संपूर्ण शरीराच्या चयापचयी यंत्रणेवर [शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडी घडविणाऱ्या यंत्रणेवर ⟶ चयापचय]भार पडतो आणि जीवनसत्त्वे, ॲमिनो अम्ले व इतर पोषक द्रव्यांची कमतरता भासून कुपोषणाची लक्षणे दिसू लागतात.


 या विकाराचे निदान पूर्वी केवळ रक्तातील श्वेतकोशिकांची संख्या, विविध प्रकारांची टक्केवारी व अपरिपक्व कोशिकांची रक्तातील मोठया प्रमाणातील उपस्थिती यांच्यावर आधारले जात असे. रूग्णाचे बाह्य स्वरूप व लक्षणांची तीवता यांवरच प्रामुख्याने पुढील प्रगतीचे प्रागनुमान आणि उपचारांची दिशा अवलंबून असे. आधुनिक रूधिरवैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे अचूक निदान व रक्तककांच्या अनेक उपचारांची निश्चिती झाली आहे. परिघीय (रक्तवाहिन्यांमधील) रक्ताचा नमुना तपासताना कर्करोगाची शंका आल्यास अस्थिमज्जेतील रक्ताचा नमुना घेतला जातो. रक्तामधील कोशिकांच्या निर्मितीचे कार्य बाल्यावस्थेनंतर हळूहळू लांब हाडांकडून चपट्या हाडाच्या मज्जेकडे स्थलांतरित होत असते होत असते व प्रौढांमध्ये ते बव्हंशी चपट्या हाडांमध्येच घडून येते. त्यामुळे नमुना घेण्यासाठी कंबरेचे हाड (श्रोणिफलक), छातीचे हाड (उरोस्थी), बरगडी किंवा मणका यांची किंवा मुलांमध्ये पोटरीच्या हाडांची निवड केली जाते. जाड सूईने छिद्र पाडून तिला जोडलेल्या पिचकारीत मज्जाद्रव शोषून घेतला जातो. या क्रियेत कोशिकांना इजा होणे व अनैसर्गिक रीत्या मज्जाऊतकाचे मिश्रण होणे शक्य असते. म्हणून एका विशेष उपकरणाच्या मदतीने अस्थिमज्जेचा छोटासा तुकडाही ऊतकपरीक्षेसाठी त्याची नैसर्गिक अवस्था जशीच्या तशी ठेवून घेतला जातो. याला गाभ्याची ऊतकपरीक्षा म्हणतात. या तुकड्याचे परीक्षण अतिशय पातळ असे छेद घेऊन घनऊतकांसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राने केले जाते. दोन्ही नमुन्यांच्या परीक्षणात विशिष्ट रंजकद्रव्यांचा उपयोग  करून कोशिकांचे रंजन केल्यावर सु. ५०० श्वेतकोशिका पाहिल्या जातात. त्यांमधील जनक-कोशिका आणि इतर अपरिपक्व कोशिकांचे प्रमाण मोजले जाते. कोशिकांचे मोठे आकारमान , केंद्रकाने कोशिकेतील बहुतेक सर्व जागा व्यापणे, जनुकद्रव्याचे असंघटित्व असे विखुरले जाणे यांसारखी वैशिष्ट्ये दर्शविणाऱ्या कोशिकांचे प्रमाण वाजवीपेक्षा अधिक असल्यास कर्करोगाचे निदान केले जाते. विविध रासायनिक द्रव्यांची कोशिकांवरील क्रिया दर्शविणारा कोशिकारासायनिक अभ्यास, विशिष्ट ⇨प्रतिपिंड रेणूंशी कोशिकाद्रव्याच्या आसक्तीचे मापन आणि गुणसूत्रांमधील बदलांचे सविस्तर सविस्तर निरीक्षण यांच्या मदतीने मज्जाभ किंवा लसीकाभ कर्करोगाचे अनेक उपप्रकार ठरविता येतात. उपचारांची दिशा व त्यांना मिळणारा प्रतिसाद यांचा अंदाज काही प्रमाणात वर्तविणे शक्य होते. स्वयंचलित गणकयंत्रांनी या सर्व चाचण्या त्वरीत होऊ शकतात.

श्वेतकोशिकार्बुदाचे वर्गीकरण मुख्यतः मज्जाभ आणि लसीका कोशिकीय असे आणि प्रत्येकी तीव्र आणि दीर्घकालिक असे एकूण चार प्रकारांत केले जाते. ज्या रूग्णांमध्ये निरोगी श्वेतकोशिकांची संख्या कमी आणि त्यामानाने प्रतिविभेदन दर्शविणाऱ्या कोशिका अधिक असतात, त्यांमध्ये लक्षणांची तीव्रता अधिक असते. विशिष्ट उपयुक्त कार्यासाठी आवश्य अशी कोशिकीय रचना निर्माण न होता (विभेदन किंवा भिन्नीभवन न होता) केवळ पोषणद्रव्ये वापरणे व गुणन होणे एवढ्यासाठीच आवश्यक अशी रचना ज्यामुळे निर्माण होते. त्या प्रक्रियेला प्रतिविभेदन म्हणतात. तीव्र कोशिकार्बुदात रोगाची प्रगती झपाटयाने हेत असल्यामुळे उपचार न केल्यास रूग्ण काही आठवडयांत किंवा काही महिन्यांत दगावतो. दीर्घकालिक विकारात प्रतिविभेदनाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक महिने किंवा वर्षे रूग्ण जगू शकतो. चार मुख्य प्रकारांची वैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

तीव्र लसीका कोशिकीय श्वेतकोशिकार्बुद : हा मुख्यतः लहान मुलांचा विकार असून हा तीन वर्षांपासून किशोरावस्थेपर्यंत केव्हाही होऊ शकतो. अल्परक्तता, संक्रामणजन्य ज्वर, रक्तस्राव (नाक व हिरड्यांमधून) आणि तंत्रिका तंत्रावरील परिणामामुळे अतिसंवेदनशीलता ही याची प्रमुख लक्षणे आहेत. कर्करोधक औषधांच्या एक किंवा दोन आवर्तनांनी हा पूर्ण बरा होऊ शकतो. प्रौढांमध्ये आढळल्यास उपचार अधिक प्रदीर्घ ठरू शकतात.

तीव्र मज्जाभ श्वेतकोशिकार्बुद : हा मुख्यतः प्रौढांमध्ये आढळतो. किरणोत्सर्गी द्रव्ये किंवा कोशिकाघातक औषधांशी संपर्क आल्यास पूर्वेतिहास असल्यास याची शक्यता अधिक असते. मज्जाभ कोशिकांपैकी कणिका कोशिकीय वर्गाच्या कोशिकांचे पुंज त्वचेत, हाडांच्या पृष्ठभागावर किंवा मेंदूत जाऊन तेथे लहान लहान हरित-अर्बुदे निर्माण करतात. त्यामुळे काही लक्षणे संभवतात. यावरील कर्करोधक औषधांची संख्या मर्यादित आणि तीही बऱ्याच वेळा सहन होत नाहीत.

दीर्घकालिक लसीका कोशिकीय श्वेतकोशिकार्बुद : उतारवयात (६० वर्षांहून अधिक) आणि पुरूषांमध्ये याची अधिक शक्यता असल्याने प्रगती संथ असते. चिनी व जपानी लोकांमध्ये दुर्मिळ असल्याने जनुकीय घटकांचा सहभाग अधिक असण्याची शक्यता असते. लसीका गंथींची वाढ, त्वचेवरील पुरळ वरवर निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्ततपासणीत अचानकपणे आढळण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती कमी होत असतानाच इतर प्रकारचे कर्करोगही उद्‌भवण्याची शक्यता असते. काही औषधे, किरणोपचार [⟶ फॉस्फरस] रक्ताधान इत्यादींनी रोग नियंत्रणात ठेवता येतो. रूग्णाच्या स्वतःच्याच ऊतकांवर घातक परिणाम घडविणाऱ्या आत्मप्रतिरक्षात्मक प्रतिक्रियांमधून निर्माण झालेले विकार उद्‌भवून गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. उदा., संधिशोथ, अवटूगंथि-शोथ, रक्तकोशिकांचे विलयन होऊन अल्परक्तता इत्यादी.

दीर्घकालिक मज्जाभ श्वेतकोशिकार्बुद : हा दहा वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीस होऊ शकतो. श्वेतकोशिकांची संख्या ५०,००० ते दहा लाख प्रतिमायकोलिटर होते. त्वचेवर हरित-अर्बुदांची शक्यता असते. अपरिपक्व कणिकाकोशिकांबरोबरच अपरिपक्व रक्तकोशिकांची रक्तात उपस्थिती, ‘ फिलाडेल्फिया क्रोमोसोम ’ या नावाने ओळखली जाणारी गुणसूत्रांची विकृती, जनककोशिकांच्या अचानक वाढणाऱ्या संख्येमुळे मधूनमधून ‘जनककोशिकीय व्याधिसीमा ’ नावाची गंभीर परिस्थिती निर्माण होते. औषधोपचार आणि प्लीहेच्या वाढीसाठी किरणोपचार यांनी काहीसा आराम मिळू शकतो. इंटरफेरॉन अल्फासारखी नवीन कर्करोधी औषधे आणि अस्थिमज्जारोपण यांच्या उपलब्धतेमुळे या प्रकारचे चित्र अधिक आशादायी झाले आहे.

पूर्वी वर्णन केलेल्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे रोगाच्या अवस्थेनुसार वरील कोणत्याही प्रकारच्या रक्तकर्कात उद्भवू शकतात. कोणत्याही रूग्णाच्या विकाराचे प्रागनुमान सांगताना केवळ त्या विशिष्ट प्रकारच्या श्वेतकोशिकांची संख्या लक्षात न घेता इतर सर्व प्रकारच्या श्वेतकोशिका, रक्तकोशिका, बिंबाणू , हीमोग्लोबिन, रक्तजलातील प्रथिने व इतर सर्व रासायनिक घटक यांचा विचार केला जातो. उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांत अनेक प्रकारची कर्करोधक द्रव्ये, स्टेरॉइड औषधे, प्रतिजैविक (अँटिबायॉटिक) पदार्थ, रक्तकोशिकांची निर्मिती वाढविणारी एरिथो-पोएटिनासारखी हॉर्मोने, मज्जारोपण आणि रक्ताधानामुळे उद्‌भवू शकणाऱ्या प्रतिक्रिया टाळण्यास मदत करणारी प्रतिरक्षादमनकारी औषधे यांचा समावेश होतो. प्रतिरक्षात्मक दृष्ट्या पूर्णपणे स्वीकारणीय अशा रक्तदात्याकडून घेतलेल्या अस्थिमज्जेचा आरोपणासाठी वापर करण्याच्या तंत्रामुळे श्वेतकोशिकार्बुदाच्या रूग्णांचे भवितव्य निश्चितच सुधारलेले आहे.

पहा : अर्बुदविज्ञान औषधिक्रियाविज्ञान कर्करोग रक्त.

संदर्भ : 1. Bain, B. J. Leuckaemia Diagnosis, A Guide to the FAB Classification, London, 1990

           2. Berkow, R., Ed., The Merck Manual of Madical Information, New Jersey, 1997.

           3. McKenzie, S. Textbook of Haematology, Baltimore, 1994.

 

श्रोत्री, दि. शं.