श्वाइत्सर, आल्बेअर : (१४ जानेवारी १८७५ – ४ सप्टेंबर १९६५). जर्मन ईश्वरविदयावेत्ता, तत्त्वज्ञ, कुशल ऑर्गनवादक आणि डॉक्टर. जन्म कायझन्सबर्ग (ॲल्सेस) येथे एका प्रॉटेस्टंट कुटुंबात. ॲल्सेस हा फ्रान्स आणि जर्मनी ह्या दोन राष्ट्रांमधला निमुळता भूभाग. ह्या दोन राष्ट्रांची येथे युद्धे होत आणि त्यानंतर होणाऱ्या तहांतील कलमांनुसार ॲल्सेसचे राज्यकर्ते फ्रेंच की जर्मन हे ठरत श्वाइत्सरच्या जन्माच्या वेळी ॲल्सेस जर्मनीच्या ताब्यात असल्यामुळे तो जर्मन नागरिक ठरला. श्टासबुर्ग विदयापीठात त्याचे तत्त्वज्ञान आणि ईश्वरविदया ह्या विषयांचा अभ्यास केला. तेथे१८९९ मध्ये त्याने जर्मन तत्त्वज्ञ ⇨ इमॅन्युएल कांट ह्याच्या तत्त्वज्ञानावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली. पुढल्याच वर्षी ख्रिस्ताच्या प्रीतिभोजनावर प्रबंध लिहून त्याने धर्मशास्त्रातील उच्च पदवी प्राप्त केली.
जर्मन तत्त्वज्ञ ⇨फ्रीड्रिख व्हिल्हेल्म नीत्शे आणि रशियन साहित्यिक ⇨लीओ टॉलस्टॉय ह्यांचा श्वाइत्सरने सखोल अभ्यास केला होता प्रेमाच्या आणि करूणेच्या टॉलस्टॉयप्रणीत तत्त्वज्ञानाने त्याला प्रभावित केले होते तथापि त्याच्यावर सर्वाधिक प्रभाव ख्रिस्ताचा होता. त्यातूनच त्याने द क्वेस्ट ऑफ द हिस्टॉरिकल जीझस (१९०६, इं. भा.१९१०) हा गंथ लिहिला. सतराव्या शतकापासून जे महत्त्वपूर्ण लेखन झाले, त्याचा अभ्यासपूर्ण परामर्श त्याने त्यात घेतला. त्यासाठी ख्रिस्तचरित्राविषयी स्वतंत्रपणे केलेल्या चिंतनाचा उपयोगही त्याने करून घेतला. ख्रिस्तावरील मोलाचा संदर्भगंथ म्हणून द क्वेस्ट …. मान्यता पावला.
एकीकडे हे सर्व चालू असताना एक उत्तम ऑर्गनवादक आणि संगीततज्ज्ञ म्हणूनही त्याचे व्यक्तिमत्त्व विकसित होत होते. श्वाइत्सरचे ऑर्गनशिक्षक शार्लमारी विडॉर ह्यांच्यासह विख्यात जर्मन संगीतकार ⇨ योहान झेबास्टिआन बाख ह्याच्या स्वररचनांवर तो मार्मिक चर्चा करीत असे. बाखच्या स्वररचनांचे मर्म तो सहज उलगडून दाखवीत असे. त्यामुळे बाखचे जीवन आणि त्याचे संगीत ह्यांवर त्याने एखादा गंथ लिहावा, अशी इच्छा विडॉर ह्यांनी व्यक्त केली आणि J. S. Bach : le Musician-Poete (१९०५) हा त्याचा गंथ निर्माण झाला. फ्रेंचनंतर जर्मन भाषेतही त्याने ह्या गंथाची रचना केली.
श्वाइत्सरने १९०५ मध्येच व्याधिपीडित, दु:खी मानवांची सेवा करण्यासाठी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि वैदयकाचा अभ्यास करून१९१३ मध्ये तो डॉक्टर झाला. त्याच वर्षी तो पत्नी हेलन ब्रेसलू हिच्यासह वैदयकीय सेवेसाठी आफ्रिकेला गेला (फ्रेंच इक्वेटोरिअल आफ्रिका). श्वाइत्सरला सहकार्य देता यावे, म्हणून हेलनने नर्सचे शिक्षण घेऊन ठेवले होते. गाबाँ ह्या आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतीमधील लांबारेने येथे त्याने स्थानिक लोकांच्या मदतीने एक रूग्णालय बांधले. ओगवे नदीच्या काठावरील या गावातील हवामान यूरोपीय लोकांना सहन न होण्याइतके उष्ण होते. नदीच्या दोन्ही तीरांवर निबिड अरण्य होते. अनेक प्रकारची रोगराई होती पण ह्या सर्व संकटांना तोंड देत तेथील दरिद्री, अंधश्रद्ध आदिवासींमध्ये त्याने काम केले. ऑन द एज ऑफ द प्राइमीव्हल फॉरेस्ट (१९२२, इं. भा.) आणि फ्रॉम माय आफ्रिकन नोटबुक (इं. भा.) ह्या पुस्तकांत त्याने आफ्रिकेला आल्यापासूनचे अनुभव लिहिले आहेत.
श्वाइत्सर आणि त्याची पत्नी जर्मन असल्यामुळे पहिल्या महायुद्धाच्या काळात फ्रेंच सरकारने त्यांना लांबारेने येथे काही काळ स्थानबद्ध करून ठेवले होते. पुढे युद्धकैदी म्हणून त्यांना फ्रान्समध्येही नेण्यात आले. यथावकाश त्यांची मुक्तता झाली तथापि त्यानंतर जागतिक समस्यांकडे त्याचे लक्ष अधिकाधिक वेधले गेले. महायुद्धात झालेल्या प्रचंड नरसंहारामुळेही तो व्यथित झाला होता. त्यातूनच फिलॉसफी ऑफ सिव्हिलिझेशन (१९२३, इं. भा.) हा गंथ त्याने लिहिला. संस्कृती टिकवावयाची असेल, तर जीवनाविषयी आदर ह्या नैतिक तत्त्वाचा स्वीकार केला पाहिजे, हा विचार त्याने ह्या गंथात मांडला.१९२० ते१९२४ ह्या काळात त्याने यूरोपात अनेक दौरे केले, व्याख्याने दिली, संगीताचे कार्यक्रम केले.१९२४ मध्ये तो पुन्हा आफ्रिकेत परतला. तेथे त्याने पूर्वीचे रूग्णालय अन्य जागी हलविले आणि दुसरे रूग्णालयही बांधले. पुढे कुष्ठरोग्यांसाठीही एक विस्तृत वसाहत निर्माण केली.१९६३ च्या सुमारास त्याच्या रूग्णालयात ३५० रूग्ण होते. कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत १५० रोगी होते आणि तेथे यूरोपियन डॉक्टर व परिचारिकांची संख्या सु. ३६ होती. शिवाय स्थानिक सेवकही होतेच.
इतक्या जबाबदाऱ्या पेलत असतानाही संगीत आणि गंथलेखन ह्यांत तो मन गुंतवीत होताच.द मिस्टिक ऑफ पॉल द अपॉसल (१९३०, इं. भा.१९३१) हे पुस्तक त्याने लिहिले तसेच विडॉर ह्यांच्यासह बाख ह्या संगीतकारावर काम केले. यूरोपमध्ये तसेच अमेरिकेतही त्याने व्याख्यानांचे दौरे केले. त्याच्या कार्यात त्याला आयुष्यभर निष्ठेने साथ देणारी त्याची पत्नी १ जून१९५७ रोजी निधन पावली. १९५७-५८ मध्ये मानवतेच्या नावाने जगातील महासत्तांना त्याने अण्वस्त्रचाचण्या बंद करण्याचे आवाहन केले.
श्वाइत्सरने केलेल्या आत्मचरित्रात्मक लेखनात मेम्वार्स ऑफ चाइल्ड्हुड अँड यूथ (१९२५, इं. भा.) आणि आउट ऑफ माय लाइफ अँड थॉट (१९३३, इं. भा.) ह्यांचा समावेश होतो. श्वाइत्सरला १९५२ सालचे शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यावेळी त्याने केलेले भाषण गाजले व पुढे पुस्तकरूपात द प्रॉब्लेम ऑफ पीस इन द वर्ल्ड ऑफ टू-डे (१९५४, इं. भा.१९५४) प्रसिद्ध झाले.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्याला अनेक अन्य सन्मान मिळाले : ‘ब्रिटिश ऑर्डर ऑफ मेरिट ’ (१९५५), केंबिज विदयापीठातर्फे ‘ डॉक्टर ऑफ लॉज ’ ही सन्माननीय पदवी (१९५५), पश्चिम जर्मनी प्रजासत्ताकातर्फे ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ (१९५५) इत्यादी.
वृद्धापकाळाने त्याचे लांबारेने ह्या आपल्या कर्मभूमीतच निधन झाले.
संदर्भ : 1. Anderson, Erica Exmam, Eugene, The World of Albert Schweitzer, New York, 1955.
2. Cousins, Norman, Dr. Schweitzer of Lambarene, New York, 1960.
3. Hagerdorn, Hermann, Albert Schweitzer: Prophet in the Wilderness, New York, 1962.
4. Payne, Robert, The Three Worlds of Albert Schweitzer, Toranto, 1957.
५. देवस्थळे, सुमती, डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर, मुंबई.
कुलकर्णी, अ. र.
“