श्री जगन्नाथ संस्कृत विश्व विदयालय : ओरिसा राज्यातील पुरी येथील एक संस्कृत विदयापीठ. स्थापना १९८१. ओरिसा राज्याचे राज्यपाल हे या विदयापीठाचे कुलपती असतात. ओरिसा विधानसभेच्या १९८१ मधील एकतीसाव्या अधिनियमानुसार ७ जुलै १९८१ रोजी राज्यातील पूर्वीची संस्कृत महाविदयालये, विदयालये यांच्या समावेशासह एक अध्यापन व संलग्न विदयापीठ म्हणून याची स्थापना करण्यात आली. ओरिसा विदयापीठीय कायदा १९८९ व १९९० नुसार या विश्र्वविदयालयाचे कामकाज चालते.
श्री जगन्नाथ संस्कृत विश्वविदयालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण ओरिसा राज्य आहे. विदयापीठाचे स्वत:चे सात पदव्युत्तर शिक्षण अध्यापन विभाग आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या ४९६ होती (२००६). राज्यभरातील ३५ महाविदयालये या विदयापीठाशी संलग्न आहेत. त्याशिवाय १०२ प्रथम तल व ४८ मध्यमा विदयालये या विदयापीठाशी संलग्न आहेत. विदयापीठात मुला-मुलींसाठी प्रत्येकी एक अशी दोन वसतिगृहे आहेत. धर्मशास्त्र, न्याय, संस्कृत साहित्य, संस्कृत व्याकरण, सर्वदर्शन, वेदान्त (अव्दैत) व वेद या विदयापीठातील विदयाशाखा आहेत.
विदयापीठातील उप-शास्त्री या पदवीसाठीचा अभ्यासकम दोन वर्षांचा आहे. या वर्गात प्रवेशासाठी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. शास्त्री ( बी.ए.) हा पदवी अभ्यासकम तीन वर्षांचा आहे. त्याच्या प्रवेशासाठी उप-शास्त्री पदवी किंवा संस्कृत विषयासह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण, अशी पात्रता असावी लागते. आचार्य (एम्.ए.) हा पदव्युत्तर अभ्यासकम दोन वर्षांचा असून शास्त्री पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास या पदवीसाठी प्रवेश घेता येतो. विशिष्टाचार्य (एम्.फिल्.) व विदयावरिधी ( पीएच्.डी.) साठीचे संशोधन येथे करता येते. संस्कृत पदविका शिक्षणाचीही सोय येथे आहे. वेगवेगळ्या पदवी स्तरांवर इंग्रजी, संस्कृत व्याकरण, सर्वदर्शन, वेद, कर्मकांड, धर्मशास्त्र, विविध ज्योतिषशास्त्रे, आयुर्वेद, योग, सामान्य साहित्य, सामान्य व्याकरण, सामान्य दर्शन, वेदान्त, नवन्याय इ. विषय अभ्यासिले जातात. विदयापीठाच्या गंथालयात सु. २२,७३० पुस्तके होती (२००७).
विदयाभूषण संस्कृत महाविदयालय, बोलानगीर जगन्नाथ वेद कर्मकांड महाविदयालय, पुरी परलखेमुंडी संस्कृत महाविदयालय, परलखेमुंडी (गंजाम) रामदिन संस्कृत महाविदयालय, बेऱ्हमपूर ( गंजाम ) श्याम सुंदर संस्कृत महाविदयालय, भोगराई ( बलसोर ) ही या विदयापीठाशी संलग्न प्रमुख महाविदयालये आहेत.
चौधरी, वसंत