श्रवणमिति : व्यक्तीच्या श्रवणक्षमतेचा श्रवणमापकांच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या अभ्यासाला श्रवणमिति म्हणतात. यामध्ये प्राकृतिक (सामान्य) आणि दोषयुक्त श्रवणक्षमतांचे संख्यात्मक (परिमाणात्मक ) मूल्यमापन करतात. ध्वनिदोलकातून निरनिराळ्या कंप्रतांचे (कंप्रता म्हणजे दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची संख्या ) शुद्ध स्वर काढले जातात. या स्वरांची तीव्रता इष्ट मर्यादेतच बदलेल अशी योजना असते. प्राकृतिकश्रवण असणाऱ्यांना हे स्वर दिलेल्या तीव्रता मर्यादेत ऐकू येतात परंतु श्रवणहानी ( किंवा दोषयुक्त श्रवण ) असणाऱ्यांना ते ऐकू येत नाहीत. अशा व्यक्तींना ते स्वर ऐकू येण्यासाठी त्या स्वरांची तीव्रता वाढवावी लागते.
शुद्ध स्वर, संभाषण व अस्थिसंवाहन या श्रवणमितीच्या तीन कसोट्या आहेत. या कसोट्यांमुळे पुढील हेतू साधले जातात : (१) गोंगाटामुळे आलेल्या श्रवणग्लानीचे परीक्षण करणे, (२) वापरात असलेली श्रवण साहाय्यके व संदेशवहन प्रयुक्त्या यांचे मानव अभियांत्रिकीच्या दृष्टीने अध्ययन करणे, (३) श्रवणदोषांचे निदान करणे व त्यांवर उपचार करणे.
श्रवणमापके : शुद्ध स्वर श्रवणमापक या उपकरणाचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. यामध्ये आंदोलक, विवर्धक आणि ध्वनी तीव्रतेचे नियंत्रण करणारा क्षीणक असतात. श्रवणाच्या संभाषण कसोटीकरिता श्रवणमापकात वापरलेल्या ध्वनिमुद्रिकांवर शब्दांची एक यादी असते. या शब्दांच्या तीव्रतेचे समायोजन करून अभिज्ञानक्षमता आणि आकलनक्षमता यांचे मापन करता येते. अस्थिसंवाहन कसोटी घेण्याकरिता श्रवणमापकातील संदेश कपाळावर किंवा कर्णपश्चास्थीवर ठेवलेल्या कंपनकाला चालना देत असतात. अस्थिसंवाहन श्रवणहानीमुळे तंत्रिका ( मज्जासंस्थेशी निगडित ) बहिरेपणा आढळून येतो [⟶ काम].
इलेक्ट्रॉनीय श्रवणमापकामध्ये निम्न कंप्रता १२५ हर्ट्झ व उच्च कंप्रता ८,००० किंवा १०,००० हर्ट्झ असलेली शुद्ध स्वरांची श्रेणी वापरलेली असते. संभाषणाकरिता वापरण्यात येणाऱ्या ५०० ते ४,००० हर्ट्झ कंप्रतांचाही या पट्ट्यात समावेश असतो. स्वयंचल श्रवणमापकांच्या साहाय्याने दहा मिनिटांपेक्षा कमी वेळात संपूर्ण सलग श्रवणालेख मिळू शकतो.
श्रवणालेख : ध्वनी तीव्रता आणि ध्वनी कंप्रता यांच्या आलेखास श्रवणालेख म्हणतात. श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तीच्या दोन्ही कानांत दर खेपेस एक अशा रीतीने ध्वनीच्या निरनिराळ्या कंप्रता सोडतात. प्रत्येक कंप्रतेच्या निरपेक्ष श्रवणक्षमतेची तीव्रता पातळी मोजण्यात येते. यामध्ये लघुतम तीव्रता पातळी ( प्रत्येक ध्वनी कंप्रतेत ज्या लघुतम तीव्रता पातळी-वर संबंधित व्यक्तीच्या आवाजाचे श्रवण होते ती पातळी ) श्रवणदोष असणाऱ्याची निरपेक्ष श्रवणक्षमता असते. गोंगाटमुक्त प्रयोगशाळेत साधारण मानवाचे प्राकृतिक श्रवण शून्य डेसिबेल (ध्वनीची तीव्रता मोजणारे एकक) पातळीत असल्याचे मानले जाते. श्रवणालेखामध्ये शून्य डेसिबेलकरिता प्राकृतिक श्राव्यता वक्र हा प्रातिनिधिक रीत्या सरळ रेषा म्हणून दाखविला जातो. श्रवणहानी या वक्राच्या खाली डेसिबेल मूल्यात दाखविली जाते. प्राकृतिक श्राव्यतेची व्याख्या प्रथम द अमेरिकन नॅशनल स्टँर्डड्स इन्स्टिट्यूटने केली होती आणि द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन या संस्थेने १९६४ मध्ये ते आंतरराष्ट्रीय एकक म्हणून मान्य केले. आकृतीमध्ये ५०० हर्ट्झपेक्षा जास्त कंप्रता असलेल्या स्वरांकरिता श्रवणहानी दाखविली आहे. श्रवणालेखावरून श्रवणदोषाचा प्रकार व कारण यांचे निदान करता येते.
श्रवणमितीत झालेल्या प्रगतीमुळे श्रवणविज्ञानाशी संबंधित प्रयोग करताना सर्व पर्यावरणीय ध्वनीचे काळजीपूर्वक नियमन ( निवारण ) करणे गरजेचे असते. म्हणून श्रवणमिती व श्रवणविषयक संशोधन यांसाठी खास प्रकारे बांधलेल्या निनादन व प्रतिध्वनीरहित खोल्यांचा वापर करतात. संभाषणाच्या वेळची श्रवणक्षमता व श्रवणहानी यांचे मूल्यमापन करण्यासाठी उच्चरण चाचण्या वापरतात. रूग्ण स्वत:च नियंत्रित करू शकेल अशी पहिली व ⇨गेऑर्ख फोन बेकेसे यांनी शोधलेली बेकेसे श्रवणमिती पद्धत, ३-४ वर्षांची बालके तसेच मतिमंद व अपंग यांच्यासाठी उपयुक्त असलेली विद्युतीय प्रतिसादाची श्रवणमितीय पद्धती आणि श्रवणमितीमधील संगणकीय प्रणालींचा वाढता वापर यांमुळे श्रवणमितीमध्ये चांगलीच प्रगती होत आहे.
पहा : श्रवणकिया श्रवण साहाय्यक.
आठवले, कुमुद अ.
“