श्रम : ( लेबर ). कोणत्याही प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष मोबदल्याच्या अपेक्षेने करण्यात येणारी शारीरिक अगर बौद्धिक स्वरूपाची कृती अथवा कष्ट. शेतकरी, कामगार अगर सुतार यांचे कष्ट शारीरिक असतील, तर शिक्षक अथवा कंपनी व्यवस्थापक यांचे कष्ट बौद्धिक असतील पण या दोहोंचे कष्ट मोबदल्यासाठीच असतात व त्यामुळे ते श्रमाच्या व्याख्येत मोडतात.एखादयाने मोबदला न घेता केवळ श्रम केले, तर ते या व्याख्येत मोडणार नाहीत. उदा., गवयाने रियाझ म्हणून किंवा स्वत:च्या समाधानासाठी गीत गायले, तर ते श्रम होऊ शकणार नाहीत.

उत्पादनाच्या प्रकियेमध्ये श्रम हा एक अनिवार्य घटक आहे. नैसर्गिक साधनसाम्रगी ( उदा., भूमी, खनिजे ) किंवा कच्च माल ( उदा., खते, बियाणे ) असे सर्व हाताशी असले, तरी त्यांवरील संस्कार, प्रक्रिया व नंतरचा वापर इ. गोष्टी श्रमानेच साध्य होतात. श्रमाचा वाढता वापर, श्रमाची गुणवत्ता, अधिक श्रमातून साधले जाणारे कौशल्य अथवा कार्यक्षमता, या बाबी आजपर्यंतच्या मानवी प्रगतीस कारणीभूत ठरल्या आहेत. परंपरेने भूमी, श्रम, भांडवल व संयोजन असे चार मूलभूत उत्पादनघटक मानले जातात पण त्यातही श्रम या मानवी घटकास तुलनेने अधिक महत्त्व आहे. ⇨ कार्ल मार्क्स ने आपल्या समाजवादी विचारप्रणालीत [⟶  मार्क्सवाद] श्रम हा एकच खरा उत्पादक घटक मानला व श्रमातून उत्पादन साधले जाते, असे आगहाने प्रतिपादन केले. श्रम उपलब्ध करून देणाऱ्या श्रमिकास पुरेसा मोबदला न देता त्याचे शोषण केले जाते, या मार्क्सच्या तत्त्वावर समाजवादी अर्थप्रणाली उभारली गेली आहे. आधुनिक समाजव्यवस्थेत यंत्रे, स्वयंचलीकरण, संगणकीकरण यांचा वाढता वापर होत असला, तरी या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष विनियोग, त्याचे उपयोजन, त्याची निर्मिती, देखभाल यांसाठी श्रमाची गरज अटळपणे भासते.

श्रमाचे प्रकार : एकूण उत्पादनात श्रमाचा महत्त्वाचा सहभाग असला, तरी ते श्रम नेमके कोणत्या प्रकारचे आहेत, हे ओळखणे आवश्यक ठरते. त्यानुसार त्या श्रमाचा मोबदला तसेच एकूण उत्पादनातील श्रमाचे नेमके योगदान ठरविणे सोपे जाते. श्रमाचे सोपे व प्राथमिक वर्गीकरण शारीरिक श्रम व बौद्धिक श्रम असे केले जाते. शेतकरी, शेतमजूर, लोहार, चर्मकार इ. मुख्यत: शारीरिक श्रम करतात. डॉक्टर, वकील, शिक्षक, न्यायाधीश, लेखापाल इत्यादींचे मुख्यत: बौद्धिक श्रम असतात. दोन्ही प्रकारचे श्रम समाजात आवश्यक असतात. ते एकमेकांना पूरकही ठरतात. न्यायालयात वकील, न्यायाधीश बौद्धिक श्रम करतात तर टंकलेखक, शिपाई, सफाई कामगार यांचे शारीरिक श्रम न्यायालयीन कामकाजास पूरक ठरतात.

अकुशल, अर्धकुशल व कुशल असे श्रमाचे प्रकार केले जातात. वाहनचालक, यंत्रचालक, शिक्षक हे कुशल स्वरूपाचे श्रम करतात. सुतार, गवंडी, रंगारी यांचा मदतनीस, तसेच पडेल ते काम करणारा माणूस अकुशल काम करतो. जुजबी शिक्षण, कौशल्य अथवा प्रशिक्षण प्राप्त केलेल्याचे श्रम अर्धकुशल सदरात मोडतात. कौशल्याच्या वाढीबरोबर कामाचा दर्जा, कामाची सफाई, गुणवत्ता हेही वाढत जातात. वाढीव कौशल्यानुसार त्या प्रमाणात वाढीव मोबदला अथवा मेहनताना लाभतो. वेतनदरांची श्रेणी ठरविताना अकुशल कामगारास किमान वेतन व त्यानंतर कौशल्याच्या वाढीव प्रमाणानुसार वाढता वेतनदर, असे धोरण सामान्यत: दिसते. आर्थिक विषमता-निर्मूलनाच्या कार्यकमांत ही श्रेणीरचना ध्यानात घेतली जाते. एकोणिसाव्या शतकात काही काळ उत्पादक श्रम व अनुत्पादक श्रम अशा वर्गीकरणाचा प्रभाव राहिला. फ्रान्समधील निसर्गवादी विचारसंप्रदाय त्याचा पुरस्कर्ता होता. शेती ही एकच किया त्यांनी उत्पादक मानली व शेतीतील श्रम हेच फक्त उत्पादक श्रम असून बाकीचे श्रम अनुत्पादक आहेत, अशी एकांगी भूमिका त्यांनी मांडली. नंतरच्या काळात हे वर्गीकरण मागे पडले. विधायक व विध्वंसक श्रम असेही प्रकार मानले जातात. सट्टेबाज, चोर, दरोडेखोर, अतिरेकी यांच्या विध्वंसक श्रमांतून समाजाचे अकल्याण व अहितच साधले जाते.

श्रमाची वैशिष्ट्ये : श्रमाचे एकूण उत्पादनातील योगदान, त्याला दिला जाणारा मोबदला, यांबाबत विचार करताना श्रमाची काही खास वैशिष्ट्ये लक्षात घ्यावी लागतात. श्रम हे श्रमिकापासून वेगळे करता येत नाहीत पण इतर उत्पादन घटकांबाबत तसे म्हणता येत नाही. भूमी व भूमीचा मालक या वेगळ्या गोष्टी आहेत. भांडवल देणारी व्यक्ती आणि भांडवल हे एकमेकांपासून निराळे असतात पण श्रम व श्रमिक हे अविभक्त असतात. त्यामुळे श्रमिकाकडून श्रम विकले जात असताना श्रमिकाचा स्वभाव, सवयी, आवडीनिवडी, भावभावना यांसारख्या सर्व घटकांचा विचार अनिवार्य ठरतो. या सर्व गोष्टींवर शेवटी श्रमाची गुणवत्ता अवलंबून असते. श्रम हा मूलत: मानवी घटक आहे. त्यामुळे श्रमासाठी दिले जाणारे वेतन व इतर सुविधा यांच्या बरोबरीने श्रमिकाची सामाजिक-मानसिक भूमिका निर्णायक ठरत असते. श्रम हे विनाशी असतात त्यांचा साठा करून ठेवता येत नाही. भूमी किंवा भांडवल हे अविनाशी व टिकाऊ घटक आहेत. जर एखादयाने एक आठवडा काम केले नाही, तर ते श्रम शिल्ल्क म्हणून नंतर वापरता येत नाहीत, ते वाया जातात. देशातील लाखो श्रमिक जेव्हा कित्येक महिने श्रमाशिवाय बेकार राहतात, तेव्हा मोठीच श्रमशक्ती वाया जाते.


 श्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला मर्यादित प्रमाणात का होईना, पण गतिशीलता आहे. भूमी हा घटक गतिशील नाही. वस्तुरूप भांडवल ( उदा., यंत्रसामगी, खनिज संपत्ती, कच्चा माल ) गतिशील आहे. पैसारूप भांडवल अतिशय गतिशील आहे. एका स्थळी राहून दूरच्या ठिकाणी अगर देशात भांडवली गुंतवणूक सहजपणे करता येते. श्रमिकही आपले श्रम दुसऱ्या प्रदेशात जाऊन उपलब्ध करून देऊ शकतात पण असे सरसकटपणे म्हणता येत नाही. कामाच्या आकर्षक संधी मिळत असतील, तर अशी गतिशीलता दिसते. तसेच मूळ ठिकाण सोडण्याची तयारी, नवीन सामाजिक-सांस्कृतिक वातावरण स्वीकारण्याची मानसिक तयारी, हेही   मुद्दे श्रमाच्या गतिशीलतेमागे महत्त्वाचे ठरतात. श्रम देणाऱ्या श्रमिकांकडे फारशी सौदाशक्ती नसते, हेही ध्यानात घेतले पाहिजे. अधिक वेतन, अधिक सुखसोयी यांसाठी कामगार संघटनांमार्फत श्रमिक संघर्ष करतात पण प्रबळ मालकवर्गापुढे हा संघर्ष प्रभावहीन ठरतो. शिवाय बेकारीचा अनुभव येत असताना वेतनवाढीची मागणी जोर धरू शकत नाही.

आर्थिक विकास जसजसा होत जातो, तसतशी श्रमांची मागणी वाढत  जाते. आधुनिक काळात श्रमिक वर्गाचा एक प्रभावी दबावगट म्हणून जो परिणाम दिसून येतो, त्यामागे हे कारण आहे. श्रमाला असणारी मागणी अप्रत्यक्ष स्वरूपाची असते. उदा., कापड किंवा घर-निवारा यांची मागणी  वाढली की, ते तयार करणाृया कारखान्यांमध्ये श्रमाची म्हणजे मजुरांची मागणी वाढते, पण यातही विशिष्ट प्रकारच्याच श्रमांची मागणी वाढत राहते व तीतही बदल होत राहतो. भारतात काही विशिष्ट उदयोगांच्या उत्पादनांना काही काळ सापेक्षतेने वाढीव मागणीचा अनुभव आला आहे. उदा., प्रथम कापड-कागद-जहाज उदयोग नंतर लोखंड -पोलाद-सिमेंट उदयोग नंतर खते-रसायने-पेट्रोरसायने उदयोग नंतर इलेक्ट्रॉनिक-संगणक उदयोग, अशा क्रमाने श्रमांची वाढीव मागणी उत्क्रांत होत गेल्याचे दिसते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार अशी मागणीही बदलत राहते. सर्वसाधारण पद्धतीच्या श्रमाला फारशी मागणी नसल्याने एकीकडे बेकारी व दुसरीकडे विशिष्ट कौशल्यांच्या श्रमाची टंचाई, असा विरोधाभास अनुभवास येतो.

श्रमाचा पुरवठा साधारणपणे लोकसंख्येवर अवलंबून असतो. लोकसंख्या वाढत असताना जास्त श्रम उत्पादनासाठी उपलब्ध होतात. एकूण लोकसंख्येत स्त्री-पुरूष प्रमाण किती आहे, तसेच लोकसंख्येतील वय वर्षे १५ ते ६० या कामकरी वयोगटात किती लोकसंख्या आहे, यांवर श्रमांचा प्रत्यक्ष पुरवठा ठरत असतो. एखादया विशिष्ट उदयोगास किंवा विशिष्ट प्रदेशात कसकसे श्रम उपलब्ध व्हावेत, हेही काही घटक नियंत्रित करीत असतात. उदा., संगणकशास्त्रातील पदवी, पदविकाधारक पुढे आले, तरच त्या उदयोगात श्रमाचा पुरवठा होईल. त्या विदयाशाखेच्या शिक्षणाच्या किंवा प्रशिक्षणाच्या पुरेशा सोयी नसतील, तर श्रमाचा अपुरा पुरवठा होऊन टंचाई भासेल. वाहतुकीच्या व निवासाच्या पुरेशा सोयी असतील, तर श्रमाची गतिशीलता वाढून पुरवठाही वाढू शकतो. श्रम हा घटक आंतरराष्ट्रीय पातळीवरही गतिशील असल्याचे दिसून येते. विशिष्ट उदयोगातील श्रमाच्या आयातीला उत्तेजन देऊन उत्पादनाची इष्ट पातळी राखण्याचे प्रयत्न अनेक देश करताना दिसतात. जागतिकीकरणाच्या विद्यमान युगात हे प्रकर्षाने जाणवते.

व्यक्तिगत पातळीवर श्रमिक आपल्या सेवेचा पुरवठा करताना एक अपवादात्मक अनुभव येतो. वेतनदर वाढत गेल्यास अधिक उत्पन्नाच्या आशेने श्रमिक जास्त श्रम करतील पण या प्रवृत्तीसही काही मर्यादा आहेत. उत्पन्नाची एक ठराविक पातळी गाठल्यावर अधिक श्रम करण्याऐवजी करमणूक, मनोविनोदन, विश्रांती यांकडे श्रमिकांचा कल वाढू लागतो. त्यामुळे उच्च वेतनदरास कमी श्रमाचा पुरवठा होतो, असा अनुभव येतो.

पहा : उत्पादन परिव्यय सिद्धांत उदयोग कामगार कामगार चळवळी कामगार वर्ग कामगार संघटना मार्क्सवाद मूल्यनिर्धारण यंत्रणा मूल्यनिर्धारण सिद्धांत वेठबिगार.

दास्ताने, संतोष