श्चेड्र्यिन (श्चेड्र्यिन), एन् : (२७ जानेवारी १८२६-१० मे १८८९). श्रेष्ठ रशियन उपरोधकार. मूळ नाव म्यिखईल यिव्हग्रव्हयिच एन्.श्चेड्र्यिन सलटिकॉव्ह पण लेखन मात्र एन्. श्चेड्रिय्न ह्या टोपणनावाने तो करीत असे. तो रशियातील स्पास-युगोल येथे एका उमराव कुटुंबात जन्मला. १८३८ मध्ये त्सारस्कय स्लो (हल्लीचे पुश्किन) येथील विदयालयात शिक्षणासाठी तो दाखल झाला. विदयार्थिदशेतच तो कविता करू लागला.
श्चेड्रिय्नच्या विशेष उल्लेखनीय गंथांत ‘ द हिस्टरी ऑफ ए टाउन ’(१८६९-७०, इं. शी.), ‘ पोंपाइर अँड पोंपाइरेसिस ’(१८६३-७४, इं. शी.), द गल्व्हल्यॉव्ह फॅमिली (१८७६, इं. भा. १९५५) आणि फेबल्स (१८८०-८५, इं. भा. १९३१) ह्यांचा समावेश होतो. ‘ द हिस्टरी ऑफ ए टाउन ’मध्ये सिलीटाउन या नावाच्या एका शहराचा इतिहास सांगण्याच्या मिषाने तत्कालीन रशियन राज्यकर्त्यांचे विडंबन केलेले आहे. ‘ पोंपाइर ’मध्ये अत्युच्च पदावरील रशियन अधिकाऱ्यांवर उपरोधाचे धारदार हत्यार चालविले आहे. द गल्व्हल्यॉव्ह फॅमिली ही त्याची अत्यंत महत्त्वाची, उच्च प्रतीची वास्तववादी कादंबरी होय.एका ऱ्हासशील जमीनदार कुटुंबाचे प्रभावी चित्रण तीत केलेले आहे. फेबल्समध्ये सामाजिक अपप्रवृत्तींवर झोंबरी टीका आहे. आयुष्याच्या अखेरीस लिहिलेल्या ‘ओल्ड टाइम्स इन पोटोखाना’(१८८७-८९, इं. शी.) या पुस्तकात भूदासपद्धती नष्ट होण्याच्या थोडा आधीचा काळ एका जमीनदार कुटुंबाच्या केंद्राभोवती चित्रित केलेला आहे. श्चेड्रिय्नची आई शेतमजुरांना अतिशय क्रूरपणे वागवीत असे. त्याचेच तीव्र पडसाद ह्या लेखनात उमटलेले आहेत.
सेंट पीटर्झबर्ग येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“