श्यामजी कृष्णवर्मा : (४ ऑक्टोबर १८५७ – ३१ मार्च १९३०). भारतातील एक थोर संस्कृत पंडित आणि सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म गरीब कुटुंबात मांडवी (कच्छ जिल्हा) येथे झाला. वडील कृष्णवर्मा भन्साली. श्यामजी यांचे पाथमिक शिक्षण जन्मगावी झाले. पुढे त्यांनी भूजच्या हायस्कूलमधून इंग्रजी शिक्षण घेतले. बालवयात माता-पित्यांचे छत्र गेल्यामुळे ते पोरके झाले (१८६७). त्यांच्या वडिलांच्या भाटिया नावाच्या मित्राने त्यांना मुंबईला नेले. विल्सन हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. त्याचवेळी त्यांनी एका पाठशाळेत संस्कृतचा अभ्यास केला. त्यांना गोकुळदास कहन्दास बक्षीस मिळाले (१८७५). रामदास या श्रीमंत व्यापाऱ्याच्या भानुमती या बहिणीशी त्यांचा विवाह झाला (१८७५). माधवदास रघुनाथदास या सुधारकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विधवाविवाह चळवळीत भाग घेतला तसेच स्वामी दयानंदांच्या आर्यसमाजाचे प्रचार-प्रसार कार्य करण्याकरिता त्यांनी नासिक, पुणे, अहमदाबाद, भूज, लाहोरपर्यंत दौरा केला (१८७७-७८). एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये असताना त्यांचा मोनिअर-विल्यम्सशी परिचय झाला होता. त्यावेळी विल्यम्स त्यांच्या संस्कृत व्यासंगाने थक्क झाले होते. त्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार करून, तसेच रामदास यांच्याकडून काही आर्थिक साहाय्य घेऊन उच्च् शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले (१८७९). ऑक्सफर्ड विदयापीठातून ते बी.ए. (१८८३) व नंतर बार ॲट लॉ झाले (१८८५). दरम्यान बर्लिन (जर्मनी) येथील अखिल प्राच्यविदया परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले (१८८४). मुंबईला उच्च न्यायालयात वकिली करावी असे त्यांनी ठरविले पण रतलामला त्यांना दिवाण म्हणून नेमणूक मिळाली. प्रकृति-अस्वास्थ्यामुळे पुढे त्यांनी राजीनामा दिला (१८८८). नंतर त्यांनी उदेपूर आणि जुनागढ संस्थानांतही दिवाण म्हणून काम केले पण जुनागढच्या नबाबाशी मतभेद झाल्याने नोकरी सोडून ते पुण्यात आले (१८९५). लोकमान्य टिळकांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला आणि ते प्रखर राष्ट्वादी बनले. लोकमान्य टिळकांच्या अटकेमुळे ते अस्वस्थ झाले (१८९७) आणि बिटिशांच्या अन्याय्य व भारतविरोधी धोरणाबद्दल त्यांच्या मनात द्वेष उत्पन्न झाला. ते इंग्लंडला गेले आणि लंडनमध्ये राहू लागले. लंडनमधल्या आयरिश, रशियन आणि इतर देशांच्या क्रांतिकारकांशी त्यांनी सौहार्दाचे संबंध जोडले. स्पेन्सर-मिल यांच्या लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तत्पूर्वी त्यांनी आफ्रिकेतील बोअर युद्धात बिटिशांविरूद्घ आवाज उठविला (१८९९).
काँग्रेसच्या मवाळ नेत्यांच्या अर्ज-विनंत्यांच्या राजकारणाबद्दल त्यांना खेद वाटे. त्यांनी लंडनला ‘इंडियन होमरूल सोसायटी ‘ची स्थापना केली (१९०५). त्याच वर्षी त्यांनी एक जुनी वास्तू खरेदी करून भारतीय विदयार्थ्यांसाठी ‘इंडिया हाउस ‘ची स्थापना केली. सरदारसिंग राणा या मित्राच्या सहकार्याने त्यांनी विदयार्थ्यांसाठी चार शिष्यवृत्त्याही सुरू केल्या. या शिष्यवृत्तीमुळेच वि. दा. सावरकर इंग्लंडला जाऊ शकले. श्यामजींनी द इंडियन सोशिऑलॉजिस्ट हे मासिक स्वातंत्र्य व सुधारणांचे मतप्रतिपादक साधन म्हणून काढले (जानेवारी १९०५) आणि स्पेन्सरचे ‘ आगळीकी विरूद्धचा प्रतिकार केवळ समर्थनीय नाही, तर आज्ञार्थक आहे ‘ हे आदर्श वचन अंगीकारले. बंगालची फाळणी रद्द करून घेण्यासाठी गो. कृ. गोखले ब्रिटिश मुत्सद्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रयत्न करीत होते, तेव्हा श्यामजींनी या प्रयत्नांचा काहीही उपयोग होणार नाही, असे त्यांना स्पष्ट सांगितले. अर्ज-विनंत्यांचा कोणताही परिणाम होणार नाही आणि स्वराज्यासाठी हाती शस्त्रच घेतले पाहिजे, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सुमारास इंग्लंडमधील आपली शासकीय छात्रवृत्ती सोडून सेनापती बापट वि. दा. सावरकरांसह पूर्ण कार्यकर्ता म्हणून श्यामजींबरोबर भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करू लागले. १८५७ च्या सुवर्ण जयंतीनिमित्त १० मे १९०७ रोजी त्यांनी हिंदी विदयार्थ्यांची एक मोठी सभा सावरकरांच्या पुढाकाराने आयोजित केली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सशस्त्र कांतीचे पर्व सुरू झाल्यावर त्यांनी कांतिकारकांना सर्वतोपरी सहकार्य केले पण त्याचवेळी ब्रिटिशांच्या दडपशाही धोरणामुळे त्यांना लंडनमध्ये राहणे धोक्याचे झाले. ते पॅरिसला गेले. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारी राष्ट्रगीत गुजरातीसह अनेक भारतीय भाषांत प्रसिद्ध केले. यावेळी सावरकरांना अटक झाली (१९१०). ते बोटीतून पळाले व फ्रान्सच्या किनाऱ्याला पोहोचले. तिथे त्यांना पकडले. त्यांच्याविरूद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल झाला. त्यांच्या सुटकेसाठी श्यामजी, सरदारसिंग राणा, मादाम कामा यांनी खूप मेहनत घेतली आणि अफाट पैसाही खर्च केला. पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर श्यामजी स्वित्झर्लंडमध्ये जिनीव्हाला स्थायिक झाले (१९१४). तेथूनही त्यांनी म. गांधीजींच्या असहकार चळवळीला सहकार्य केले. तसेच विविध देशांतील भारतीयांना मदत देण्याचे कार्य चालू ठेवले होते. त्यांनी आपल्याकडील काही कागदपत्रे १९२३ मध्ये प्रसिद्ध केली. त्यांचे निधन जिनीव्हा येथे झाले. त्यांच्यानंतर तीन वर्षांनी पत्नी भानुमती यांचे निधन झाले. त्यांनी मागे ठेवलेल्या पैशाचा विश्वस्तनिधी करण्यात आला असून त्यातून मांडवीतील रूग्णांना मदत देण्यात येते.
संदर्भ : 1. Yagnik, Indulal, Shyamaji Krishnavarma, Bombay, 1950.
२. नगरकर, वसंत, भारतीय स्वातंत्र्यसंगाम, पुणे, १९८१.
नगरकर, व. वि.