श्पिटेलर, कार्ल : (२४ एप्रिल १८४५ – २९ डिसेंबर १९२४). स्विस कवी. पूर्ण नाव कार्ल फीड्रिख गेओर्ख श्पिटेलर. जन्म स्वित्झर्लंडमधील बाझेलजवळील लीस्टाल येथे. बाझेल आणि हायड्लबर्ग विदयापीठांतून शिक्षण घेतल्यानंतर रशिया आणि फिनलंड ह्या देशांत काही वर्षे त्याने खाजगी शिक्षकाचे काम केले आणि स्वित्झर्लंडमध्ये परतल्यानंतरही अल्पकाळ त्याने मुलींच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्याने स्वत:ला साहित्यसेवेला पूर्णत: वाहून घेतले.
प्रोमेथॉयस उंड एपिमेथॉयस (१८८१, इं. भा. १९३१) आणि ओलिम्पिशर फऱ्यूलिंग (१९०० – १९०५, इं. शी. द ऑलिंपिक स्प्रिंग) ही दोन महाकाव्ये त्याच्या सर्वश्रेष्ठ साहित्यकृती समजल्या जातात. त्यांविषयी फेलिक्स व्हायीनगार्टनर या ऑस्टि्नयन संगीतरचनाकाराने Carl Spitteler, ein kuen-Sterliches Erlebnis (१९०४) ही पुस्तिका लिहिली. त्यामुळे त्याची कीर्ती यूरोपभर पसरली प्रोमेथॉयस…साठी त्याने वापरलेली बायबल सारखी वैशिष्ट्यपूर्ण शैली विख्यात जर्मन तत्त्ववेत्ता ⇨फ्रीड्रिख नीत्शे ह्याच्या आल्झो श्प्राख् त्साराथुस्ट्रा (३ भाग, १८८३-८४, इं. शी. दस स्पोक जरथुश्त्र) ह्या प्रसिद्ध गंथातील शैलीशी मिळतीजुळती आहे. शिवाय ह्या दोन्ही गंथांत शक्तिशाली व्यक्तिमत्त्वाचा पुरस्कार केलेला आहे. श्पिटेलरबद्दल नीत्शेला आदर होता आणि नीत्शेच्या आधी श्पिटेलरचे महाकाव्य प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे श्पिटेलरचा काही प्रभाव नीत्शेवर पडला असणे शक्य आहे. मिथ्यकथांचा वापर करून ओलिम्पिशर…मध्येही त्याच्या मनातील आदर्श स्वित्झर्लंडचे दर्शन घडविण्याचा, त्याचप्रमाणे दुष्टता आणि नैतिकता ह्यांच्यातील अखंड संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. १९१९ चा नोबेल पुरस्कार त्याला मुख्यत: ओलिम्पिशर … ह्या साहित्यकृतीसाठी देण्यात आला.
कोन्राड डेअर लॉयटनाण्ट (१८९८) आणि इमागो (१९०६) ह्या त्याच्या दोन कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. कोन्राड …मध्ये त्याने निसर्गवादी तंत्राचा वापर केलेला दिसतो. इमागोमध्ये कलावंताची सर्जनशीलता आणि मध्यमवर्गीय मूल्ये ह्यांच्यातील संघर्ष त्याने दाखविला आहे.
त्याने काही भावकविता (बटरफ्लाइज, १८८९, इं. शी. ग्रास अँड बेल साँग्ज, १९०६, इं. शी.) तसेच कथाही लिहिल्या.
स्वित्झर्लंडमधील लूसर्न येथे तो निधन पावला.
संदर्भ : Bagachi, Asoke K. Hinduja Foundation Encyclopedia of Nobel Laureates, Delhi, 2002.
कुलकर्णी, अ. र.