श्ट्रासबुर्गर, एडूआर्ट आडोल्फ : (१ फेबुवारी १८४४ – १८ मे १९१२). जर्मन वनस्पतिकोशिकावैज्ञानिक. त्यांनी वनस्पतिकोटीतील प्रकलीय विभाजनाच्या प्रकियेचे स्पष्टीकरण केले. त्यांचा जन्म वॉर्सा येथे झाला. त्यांचे शिक्षण पॅरिस, बॉन व येना विदयापीठांत झाले. त्यांनी येना विदयापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली (१८६६). वॉर्सा, येना व बॉन या विदयापीठांत प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बॉन विदयापीठ हे कोशिकाविज्ञानाच्या अध्ययनाचे तत्कालीन सर्वांत मोठे केंद्र म्हणून मान्यता पावले.
श्ट्रासबुर्गर यांचे सुरूवातीचे कार्य हे जर्मन वनस्पतिवैज्ञानिक ⇨व्हिल्हेल्म होफ्माइस्टर यांच्या ‘पिढ्यांचे एकांतरण ’ यावरील कार्यासंबंधी होते. सूचिपर्णी वृक्षासारख्या प्रकटबीज वनस्पतींतील गर्भकोशाचे अचूक वर्णन करणारे श्ट्रासबुर्गर हे पहिले वनस्पतिवैज्ञानिक मानले जातात. सपुष्प वनस्पतींतील गर्भकोशाचेही त्यांनी वर्णन केले व त्याच्या जोडीला आवृतबीज वनस्पतींतील दुहेरी फलन सप्रयोग दाखवून दिले. आपल्या Uber Zellbildung und Zelltheilung (१८७६ इं. शी. ‘ऑन सेल फॉर्मेशन अँड सेल डिव्हिजन ’) या गंथात त्यांनी समविभाजनाचे मूलभूत तत्त्व मांडले आणि या माहितीमध्ये नवीन भर घालीत असतानाच त्या गंथाच्या तिसऱ्या आवृत्तीत १८८० मध्ये कोशिकाविज्ञानाचे आधुनिक नियम सुस्पष्टपणे मांडले. त्यात नवीन प्रकल अन्य प्रकलांच्या विभाजनाने तयार होतात हे त्यांनी प्रामुख्याने विशद केले आहे. १८८२ मध्ये कोशिकाद्रव्य व प्रकलरस या संज्ञा त्यांनी तयार करून त्या अनुकमे कोशिकांग व प्रकल यांच्या वर्णनात वापरल्या. सपुष्प वनस्पतींच्या आनुवंशिकीमध्ये प्रकल ही प्राथमिक संबंधित संरचना आहे हेही त्यांनी निदर्शनास आणले. आवृतबीज वनस्पतीच्या जननकोशिकांचे अर्धसूत्री विभाजन होते म्हणजेच न्यूनीकरण विभाजन होऊन मूळ प्रकलातील गुणसूत्रांच्या निम्मी (अर्धी) संख्या तयार होते, असे मतही त्यांनी आगहाने प्रतिपादिले (१८८८).
वनस्पतीतील रसाची वर जाण्याची हालचाल ही शरीरकियावैज्ञानिक प्रकिया नसून भौतिक असल्याचे त्यांनी सिद्घ केले. तत्कालीन काही वनस्पतिवैज्ञानिकांच्या सहकार्याने त्यांनी Lehrubuch der Botanik (१८९४ इं. शी. ‘ टेक्स्ट बुक ऑफ बॉटनी ’) हा गंथ लिहिला.
बॉन येथे ते मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.